आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
प्रत्येक सामान्याच्या स्वप्नात कार असते. संध्याकाळी आपल्या हक्काच्या गाडीतून कुठे तरी लांब फिरायला जावे हे स्वप्न घेऊन प्रत्येक जण जगत असतो. पूर्वी लहानपणी कार न म्हणता मोटर म्हणत. ज्यादिवशी पाहुणे मोटरमधून यायचे तो दिवस म्हणजे घरातल्या चिल्लर पार्टीसाठी खास असायचा. कारण येणारे पाहुणे मोठे असायचे, त्यांच्यासाठी ठेवणीतल्या कपबश्या निघायच्या, चांगलंचुंगलं खायला बनायचं. ते पाहुणे येताना खाऊ आणायचे. मग त्यांनी दिलेले चॉकलेट, गोळ्या आपण पुरवून पुरवून खायचो. कारण तो काळच तसा होता.
अतिश्रीमंत लोकांच्या दारात कार असण्याचा तो काळ. कार एकतर त्यांच्या घरी दिसायची नाही तर कधी हिंदी सिनेमा बघायचा चान्स मिळाला तर त्यातल्या खलनायकाकडे! त्या खलनायकाची गाडी बघितली की आपल्याकडे पण एखादी “मोटार” असावी असं कधीतरी वाटून जाई. मग मारुतीने त्यांची मारुती800 गाडी बाजारात आणली आणि अनेकांचे हे स्वप्न पूर्ण झाले.
आज प्रत्येक कुटुंबात एक तरी कार असतेच. कार शौकिनांबद्दल तर विचारूच नका! ह्युंडाईच्या गाड्यांपासून ते फरारीपर्यंत सगळ्या गाड्यांचे प्रेमी आपल्याला सापडतील. प्रत्येक कार शौकिनांचे एक स्वप्न म्हणजे लँबॉर्गिनी! अतिशय आकर्षक अशा या सगळ्यांच्या स्वप्नातल्या गाडीची गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
फारुशियो लँबॉर्गिनी, लँबॉर्गिनीचे निर्माते यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्यातून लँबॉर्गिनीचा जन्म झाला.
फारुशियो हे सुरुवातीला ट्रॅक्टर बनवायचे. त्यांचा व्यवसाय अतिशय व्यवस्थित चालू होता. त्यांच्याकडे इतके पैसे साठले होते की ते एखादी भारीतली, लक्झरी कार घेऊ शकतील. चांगली रेसिंग कार घेण्याच्या इच्छेने त्यांनी फरारीची एक गाडी घेतली. परंतु ती चालवताना त्यांना लक्षात आले की गाडीचा क्लच नीट काम करत नाहीये. तो ते दुरुस्त करु शकले असते. परंतु त्यांनी ती बाब फरारीवाल्यांच्या कानावर घातली.
परंतु एका ट्रॅक्टर बनवणाऱ्या मेकॅनिकचे म्हणणे ऐकून ती गोष्ट बदलणे म्हणजे फरारीसारखी गाडी बनवणाऱ्या मालकाचा अपमानच!
असं म्हणतात की एंजोने चिडून फारुशियोला सांगितले चूक गाडीत नसून गाडी चालवणाऱ्यात आहे. त्याच बरोबर ते हे पण म्हणाले फारुशियोने ट्रॅक्टर चालवावा फेरारी नाही. हा अपमान फारुशियोच्या मनाला खूप लागला आणि त्यातून जन्म झाला आजच्या सगळ्यात टॉपच्या रेसिंग कारचा. आपल्या लाडक्या लँबॉर्गिनीचा.
फारुशियोला माहिती होते त्याला कशा पद्धतीची कार पाहिजे आहे. त्याने काहीच महिन्यात आपली पहिली रेसिंग कार बनवली. त्याचा लोगो म्हणून बैलाचे चित्र ठेवले कारण त्यांची रास व्रुषभ होती आणि बैल हे व्रुषभ राशीचे चिन्ह आहे.
लँबॉर्गिनी तयार करण्यासाठी त्यांनी फरारीमधील एक जुना व दोन नवे इंजिनियर ठेवले. या चौघांनी मिळून खूप मेहनत करून फरारीपेक्षा देखील एक चांगली कार बनविली.
350GTमध्ये तेव्हाचे सर्वात चांगले V12 हे इंजिन लावण्यात आले. १९६३मध्ये गाडी पूर्ण तयार होऊन लोकांच्या समोर आली. सगळ्यांना गाडीची माहिती व्हावी म्हणून प्रेझेंटेशन ठेवण्यात आले. सगळ्यांनाच त्या गाडीची उत्सुकता होती.
गाडीच्या फॅक्टरीसाठी २५ किमी आवाराची जमीन घेण्यात आली. १९६४ साल उजाडले आणि लँबॉर्गिनीची ओळख सगळ्यांना झाली. आता ही गाडी घेण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागली होती. आजसारखीच तेव्हा पण प्रत्येकाला ही कार हवी होती.
ही एक टु सिटर लक्जरी स्पोर्ट्स कार होती. तिचं देखणं रूप सगळ्यांना भुरळ घालत होतं. लोक तिच्या प्रेमात पडले. पहिल्या खेपेला 120 गाड्या विक्रीसाठी तयार झाल्या. हे मॉडेल इतके लोकप्रिय झाले की थोड्या दिवसात त्याचं नवीन मॉडेल बाजारात आले, 400GTआणि तेदेखील अतिशय लोकप्रिय झाले.
1966 साली लँबॉर्गिनीने मिउरा कार बाजारात आणली. ती संपूर्ण जगातली पहिली सुपर कार ठरली.
आपल्या दमदार इंजिनमुळे गाडीची स्पीड खूप वाढली होती. पहिल्यांदाच या कारमध्ये चार लिटर पेट्रोलची टाकी होती. त्याचबरोबर या गाडीच्या डिझाईनमध्ये अजून एक बदल होता तो म्हणजे गाडीचे इंजिन मागील बाजूस होते.
आज तर कितीतरी मॉडेल आले आहेत. प्रत्येक शौकिनाजवळ एक तरी मॉडेल असतंच. एका अपमानाचा बदला घेण्यासाठी बनवण्यात आलेली ही गाडी आज सगळ्यांच्या गळ्यातला ताईत ठरली आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.