एकेकाळी भारताचे वैभव असणाऱ्या हंपीचे आता फक्त काही भग्नावशेषच उरले आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतामधील पर्यटकांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ म्हणजे कर्नाटकमधील हंपी. या हंपीला युनेस्कोने विश्व वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हंपी हे मध्यकालीन भारतातील हिंदू साम्राज्य विजयनगरच्या राजधानीचे ठिकाण होते. कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठी हे शहर वसले आहे.

1336 ते 1565 पर्यंत हे शहर विजयनगर साम्राज्याची राजधानी होते. 1565 साली बहामनी साम्राज्याने या शहराची लूट केली. ही लूट कित्येक महिने चालली असे मानले जाते.

तसं बघायला गेलं तर विजयनगर हे तेराव्या शतकातील अत्यंत बलाढ्य हिंदू साम्राज्य होते. राजा कृष्णदेवराय नावाचा अत्यंत शूर आणि पराक्रमी राजा या नगरीला लाभला होता. 1503 ते 1530 या साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळामध्ये विजयनगर साम्राज्याची कीर्ती पार इराण-इराक, इजिप्तपर्यंत पसरली होती.

हंपी हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. टेकड्यांवर वसलेल्या या नगरीला ओळीने सात कोट बांधलेले होते. त्या काळात विजयनगर साम्राज्याचा विस्तार खाली दक्षिणेकडे केरळपर्यंत तर वर उत्तरेकडे ओरिसापर्यंत होता.

राजा कृष्णदेवरायाकडे जवळपास दहा लाख सशस्त्र सैन्य होते. सोने चांदी रूपे यांची नाणी चलनामध्ये होती. पण 1565 साली विजयनगरला नजर लागली. तालिकोट येथील बहामनी सुलतान आणि विजयनगरचा राजा यांच्यात तुंबळ युद्ध झाले. आणि दुर्दैवाने विजयनगर त्या युद्धात पराभूत झाले.

हरल्यानंतर या विशाल साम्राज्याचा विध्वंस सुरू झाला. जवळपास तीन महिने या नगराची लूट होत राहिली. मोठमोठे देऊळ, महाल, इमारती नष्ट केल्या गेल्या. आग लावून हंपी भस्मसात करण्याचा प्रयत्न झाला.

लोकसंस्कृती नष्ट झाली. लोकजीवन नष्ट झाले. शहर उजाड झाले. जे लोक वाचले होते ते शहर सोडून निघून गेले. हळूहळू याठिकाणी जंगल वाढू लागले. आणि एकेकाळचे जगातील सर्वात मोठे शहर जंगल आणि मातीच्या आड भूमीमध्ये गाडले गेले.

अठराव्या शतकामध्ये एक पोर्तुगीज अधिकारी मॅकेंझीने हंपीच्या अवशेषांचा शोध लावला. त्याच्यानंतर या जागी हळूहळू उत्खनन सुरू झाले.

या शहराचे आज फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत परंतु तेही इतके देखणे आहेत की बघण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी हंपीला भेट देतात. हंपी हे एकेकाळचे हिंदू धर्माचे प्रमुख केंद्र स्थान होते त्यामुळे येथे हिंदु मंदिरांचे देखणे अवशेष आजही पाहायला मिळतात.

येथील विरुपक्ष शिवमंदिर हे अत्यंत प्राचीन शिवमंदिर आहे. विजयनगर साम्राज्याचा उदय आणि अस्त या विरूपाक्ष शिवमंदिराच्या साक्षीने झाला. मात्र हंपी उद्ध्वस्त झाल्यानंतर देखील हे शिवालय सुरक्षित राहिले. हे शिवालय आज पंपालय शिवतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे.

या मंदिराचे गोपुर जवळपास 105 फूट म्हणजे जवळजवळ दहा मजले उंच आहे. या मंदिरात अलंकाराने मढवलेला नंदी आणि नंदीवर विराजमान असलेली शिव-पार्वतीची मूर्ती मुख्य गाभाऱ्यामध्ये स्थित आहे. सुंदर नक्षीकाम केलेले जवळपास शंभर खांब या मंदिरामध्ये आढळतात. शिव आणि विष्णू अवताराच्या अनेक कथा शिल्पाच्या माध्यमातून या मंदिरांमध्ये जिवंत केल्या आहेत.

या शहरामध्ये लक्ष्मी-नरसिंहाची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आढळते. हे शिल्प 22 फूट इतके उंच आहे.

अर्धा पशू आणि अर्धा माणूस अशा स्वरुपात असलेला विष्णूचा अवतार सात फण्याच्या शेष नागावर बसलेला आहे. आणि त्याच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे अशी या शिल्पाची रचना आहे.

या मूर्तीसमोर अखंड दगडातून कोरलेले शिवलिंग स्थापन केलेल्या आहे या शिवलिंगाचा तळ हा सतत पाण्याखाली असतो. या शिवलिंगाला बडवालिंग असे नाव पडलेले आहे.

हजारा राम मंदिर नावाचे एक सुंदर मंदिर या शहरांमध्ये आहे. हे मंदिर हिंदू शिल्पकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना मानले जाते. दोनशे फूट लांब चौथर्‍यावर हे भव्य मंदिर वसवण्यात आले आहे.

विजयनगर साम्राज्यातील प्रत्येक राजा या मंदिरामध्ये पूजा करण्यास येत असे. विष्णूचा अवतार प्रामुख्याने या मंदिरामध्ये रंगवलेला आढळतो. मुख्य गाभाऱ्यामध्ये देखील श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती आहेत.

गाभार्‍या पुढेच काळ्या घोड्यावर बसून येणारा विष्णूचा कलियुगातील भावी अवतार कल्की रंगविण्यात आलेला आहे. अत्यंत काळ्या कुळकुळीत दगडांमध्ये हे बांधकाम केले गेले. याही मंदिरामध्ये शेकडो खांब आढळतात. प्रत्येक खांबावर अत्यंत गुंतागुंतीची नाजूक कलाकुसर आढळते. विष्णूची शंख चक्र गदा पद्म अशी चिन्हे तसेच राम अवतारांमधील अनेक प्रसंग या मंदिराच्या भिंतीवर आणि खांबांवर कोरलेली आढळतात.

हंपीतील सर्वात भव्य दिव्य आणि पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले मंदिर म्हणजे विजय विठ्ठल मंदिर!

हे जगातील एक महान शिल्प समजले जाते. हे खरं तर विठ्ठलाचे मंदिर. विठ्ठल महाराष्ट्राचे कुलदैवत. मराठी लोकांचे आवडते दैवत. महाराष्ट्राच्या बाहेर विठ्ठलाची मंदिरे फारशी आढळत नाहीत. मात्र महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकाच्या काही भागांमध्ये विठ्ठलाची पूजा केली जाते. विजयनगरमधील विजय विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे सर्वात भव्य मंदिर म्हणून ओळखले जाते.

पुरातत्व खात्याने मिळालेल्या माहितीनुसार पंधराव्या शतकात या मंदिराचा जवळ जवळ तेवीस वेळा जीर्णोद्धार झालेला होता. अजस्त्र अशा दगडी चौथर्‍यावर हे मंदिर उभे आहे मंदिराला तीन मुख्य द्वार आहेत गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आज आढळत नाही.

या मंदिरात फारच सुंदर असे पण लांबच्यालांब व्हरांडे बांधलेले आढळतात. या मंदिराच्या मुख्य दालनात 56 मोठ-मोठे कोरीव खांब आढळतात. या खांबांचे एक वैशिष्ट्य आहे.

या प्रत्येक खांबावर विशिष्ट रीतीने थाप मारली किंवा थाप मारत राहिले असता या खांबांमधून संगीताच्या ध्वनी निर्माण होतात. हे संगीतमय खांब पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देत असतात.

या मंदिराच्या दर्शनी भागाला कल्याण मंडप असे म्हटले जाते. या कल्याण मंडपामध्ये अगणित कोरीव खांब उभारलेले आढळतात. असे म्हणतात राजघराण्यातली सगळी लग्न या कल्याण मंडपात होत असत.

या मंदिराच्या प्रशस्त आवारामध्ये एक दगडी रथ आढळतो. हा संपूर्ण रथ दगडांध्ये कोरला आहे. इतकेच नव्हे तर दगडाची चाके असलेला हा रथ चालतो देखील. अजस्त्र अशा शिळेमधून असा रथ बांधून काढणे हे आपल्या देशातील प्राचीन काळच्या वास्तु कला विषयाचे ज्ञान आणि सामर्थ्य दर्शवतो. या रथाच्या सारथी आसनावर विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहे.

गरूडाची दगडी मूर्ती या रथाचे सारथ्य करते. या मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात कधीकाळी पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती होती. असे म्हणतात की, विठ्ठलाने राजा कृष्णदेवरायला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. आणि आपल्याला पुन्हा पंढरपूरला जायचे आहे असे सांगितले. त्यावर राजाने विठ्ठलाच्या आज्ञेचे पालन केले. विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला पाठवली.

परंतु त्यानंतर या सम्राटाने हंपीच्या विठ्ठल मंदिरात दुसरी कुठलीही मूर्ती स्थापन केलेली नाही. आजही हे मंदिर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीची वाट बघत उभे आहे.

हंपी हे आपल्या गौरवशाली इतिहासाचा एक जिवंत मानबिंदू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने एकदा तरी या देखण्या शहराला जरूर भेट द्यावी आणि आपला इतिहास पुन्हा एकदा अनुभवावा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!