चार पेग पोटात गेल्यावर हा राजा चक्क कटोरा हातात घेऊन भीक मागायला चालू करायचा

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


एखाद्या प्रसिद्ध किंवा उच्च पदस्थ व्यक्तीला जर काही विचित्र सवयी असतील तर त्याची थोडी जास्तच चर्चा केली जाते. भारतातील राजा महाराजांच्या चित्र-विचित्र सवयी आणि त्यांचे किस्से याबाबत तर विचारायलाच नको. स्वातंत्र्यपूर्व काळातील या महाराजांचे किस्से आजही चर्चिले जातात.

गुजरातमधील इडर संस्थानाचे राजे श्री हिम्मत सिंहजी दौलतसिंहजी राठोड यांनाही अशाच काही विक्षिप्त सवयी होत्या. त्यांचे दिवाण जरमनी दास यांनी ‘महाराजा’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. जरमनी हे त्याकाळी इडर संस्थानात उच्च पदावर कार्यरत होते. इडर व्यतिरिक्त त्यांनी अनेक संस्थानात उच्च पदावर कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे अनेक राजे-महाराजांच्या ते खास संपर्कात असत. याच निरीक्षणातून त्यांनी हे महाराजा पुस्तक लिहिले आहे. त्यांचे हे पुस्तक खूपच गाजले आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

महाराजा या पुस्तकाच्या यशानंतर त्यांनी महाराणी नावाचेही एक पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी विविध संस्थानाच्या महाराणींचे वर्णन केले आहे.

दिवाण जरमनी दास यांनी अनेक राजांचे दिवाण म्हणून काम केले होते, साहजिकच त्यांनी या राजा-महाराजांचे जीवन खूप जवळून पाहिले आहे. मोठमोठ्या राजघराण्यातील लोकांचे परस्पर संबंध, हेवेदावे, द्वेष-मत्सर, वासना, अशा कित्येक गोष्टींवर त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे.

इडर संस्थानचे राजे हिम्मतसिंह राठोड यांच्यावर त्यांनी एक पूर्ण अध्यायच लिहिला आहे. इडर संस्थान एक श्रीमंत संस्थान होते. त्यामुळे या महाराजांचे शौकही उंची होती. या राजांनी १४ एप्रिल १९३१ रोजी गुजरातच्या इडर संस्थानाची सूत्रे आपल्या हाती घेतली. या राजांच्या सन्मानार्थ रोज १५ तोफांची सलामी दिली जात असे. दर एक दोन वर्षांनी ते इंग्लंड वारीसाठी जात असत.

या राजाला दारूचे तर प्रचंड व्यसन होतेच पण, दारूची नशा चढल्यानंतर त्यांचे स्वतःवरील नियंत्रण पूर्ण सुटत असे. या नशेच्या प्रभावाने त्याच्या व्यक्तिमत्वात कमालीचा बदल होत असे. राजा हिम्मत सिंह वरचेवर उंची आणि शाही पार्ट्या देत असत आणि अशा पार्ट्यांमध्ये भरपूर पीत असत.

एकदा त्यांना दारूची नशा चढली की, ते स्वतः कोण आहेत हे देखील विसरून जात. आपला राजेशाही पोशाख उतरवून ते चिंध्या पांघरत. नशा चढली की ते भिकाऱ्यासारखे हातात कटोरा घेऊन “भीख दे” अशा आरोळ्या ठोकत अक्षरश: एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे भिक मागत असत.

ज्यांना राजांची ही सवय माहिती आहे असे लोक त्यांच्या त्या कटोऱ्यात एक दोन रुपयांची भिक पण टाकत. पण, कधी कधी जे नवे लोक पार्टीला हजेरी लावत ते मात्र आश्चर्याने पाहत राहत. त्यांना राजांच्या या विचित्र वागण्याचा काहीच संबंध लागत नसे. राजांनी आपल्या अंगाला राख आणि माती फसलेली असे ज्यामुळे तर त्यांचा अवतार एखाद्या खऱ्याखुऱ्या भिकाऱ्यासारखाच दिसायचा.

भर पार्टीत ते जोरजोरात ओरडून भिक मागत असत. ते म्हणत, “भिखारी हुँ बाबा, गरीब आदमी हुँ. कई दिनों का भुखा हूँ. दया करो, एक पैसा दे दो बाबा”.

राजांच्या पदरी असलेल्या दरबारी सेवकांना राजांची ही सवय चांगली परिचयाची होती. त्यामुळे ते भिक देत असत. नवख्या व्यक्तीला मात्र हे दृश्य पाहून फारच विचित्र वाटे. त्यांना वाटे अचानक महाराजांना हे काय झाले?

दरबारी सेवकांनी त्यांच्या कटोऱ्यात भिक घालताच ते त्यांना तंतोतंत भिकाऱ्याप्रमाणेच लवून सलाम करत. जरमन दास यांनी महाराजांच्या या आणि अशाच सवयींबद्दल बरेच काही लिहिले आहे.

कधी कधी राजा नशेत असल्या वर पहाटेच सैनिकांना बोलावून घेत असत आणि त्यांच्याकडून भल्या पहाटे परेड करवून घेत असत. नशेत ते स्वतःच सैन्याला आदेश देत. सैनिकांकडून परेड करवून घेतल्यावर ते आपल्या बागेतील लॉनवर गडगडा लोळत असत.

राजाला नशेत भिक मागण्याची सवय आहे, ही गोष्ट त्यांच्या प्रजेला देखील माहिती होती. प्रजेतही राजांच्या या सवयीची भरपूर चर्चा होत असे.

इडर संस्थान हे भरपूर श्रीमंत संस्थान होते. हिम्मतसिंह राठोर महाराजांनी आपल्या जनतेसाठी अनेक कल्याणकारी कामे देखील केली होती. या राजांना आणखी एका गोष्टीचे प्रचंड वेड होते. ते म्हणजे, हॉर्स रेसिंग.

जनतेसाठी कल्याणकरी कामे केली असली तरी त्यांच्या हा हॉर्स रेसिंगच्या वेडामुळे बराच वेळ संस्थाना बाहेरच जात असे. पुणे, मुंबई, कलकत्ता, बंगलोर अशी जिथे हॉर्स रेसिंग असेल तिथे हे महाराजा आवर्जून पोहोचत असत. एक प्रकारे या हॉर्स रेसिंगचेही त्यांना व्यसनच होते म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

महाराजा दर दोन ते तीन वर्षांनी इंग्लंड दौऱ्यावर जात असत. त्यांचे एका इंग्रजी महिलेवर प्रेम जडले होते. या महिलेशी विवाह करण्याची त्यांची खूप इच्छा होती. पण, काही कारणाने त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली. नंतर त्यांच्या आयुष्यात नर्गिस नावाची एक पारसी युवती आली. नर्गिसशी त्यांनी विवाह केला आणि तिला पट्टराणीचा दर्जा दिला. महाराजांना तशा इतरही राण्या होत्या. पण, त्यांना नर्गिसच विशेष प्रिय होती. असे म्हटले जाते की नर्गिसने राजांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला. तिने राजांना फसवून त्यांची बरीच संपत्ती आणि दागिने हडप केले.

मोठमोठ्या राजा-महाराजांचे हे असे किस्से ऐकल्यानंतर खरंच आश्चर्यचकित व्हायला होते. शेवटी त्या “अमृताचे” घोट पोटात गेल्यानंतर कोण राजा आणि कोण भिकारी! सगळे सारखेच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!