चार्ली हेब्दोच्या आधीही या चित्रांमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


इस्लाममध्ये सुधारकांच्या परंपरेचा आभावावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू असते, अनेकांना असे वाटते की इस्लामिक व्यवस्थेचा पाया हा मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या पायावर उभा आहे आणि या मूलतत्त्ववादी व्यवस्थेत बदल घडवण्याची परंपरा इस्लाममध्येच अस्तित्वातच नाही. परंतु हे सत्य नाही. इस्लाममध्ये सुधारणा वादाची परंपरा अस्तित्वात होती. अगदी १४ व्या शतकात अस्तित्वात आलेल्या ऑटोमन साम्राज्यात याची बीजे रोवली गेली होती, पुढे आधुनिक टर्कीचा हुकूमशहा असलेल्या मुस्तफा केमाल पाशाने या सुधारणावादी परंपरेवर कळस चढवला होता.

आज जरी टर्कीत मूलतत्त्ववादी विचारसरणीने जोर पकडला असला तरी तिथे एकेकाळी सुधारणावादी परंपरा अस्तित्वात होती, याचीच साक्ष देणाऱ्या काही कलाकृती आज टर्कीत आहेत, या कलाकृती साकारणाऱ्या कलाकाराचे नाव होते उस्मान हमदी बे.

उस्मान हमदी बे यांनी असंख्य कलाकृती निर्माण केल्या, परंतु त्यांच्या सर्व कलाकृतीत सर्वात खळबळजनक कलाकृती होती ‘मिहराप’ जिला इंग्रजीत ‘जेनेसीस’ म्हणून देखील ओळखले जाते. १९०१ साली त्यांचे हे चित्र बर्लिनमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. १९०३ मध्ये लंडनमध्ये रॉयल अकॅडमी एक्झिबिशनमध्ये हे चित्र प्रदर्शित करण्यात आले होते.

मिहराप या चित्रात त्यांनी एका तरुणीचे रेखाटन केले आहे, जी पवित्र कुराण पठणासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रहाले’ या लाकडी स्टँडवर मक्केच्या दिशेने तोंड करून बसली आहे, तिच्या पायाशी कुराण आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंड इ अव्हेस्टा पडलेले आहेत.

या चित्रातील तरुणी ही गर्भवती असून तिने मध्ययुगीन पोशाख परिधान केलेला आहे. तिच्या पायाशी १९ व्या शतकातील काही पुस्तके असून त्यापैकी एकावर उस्मान हमदी बेची स्वाक्षरी दिसून येते आहे. हे चित्र जसाच्या तसेच आजही इस्तंबूलच्या म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट मध्ये ठेवण्यात आले आहे. एकेकाळी या म्युझियमची इमारत ग्रँड व्हिलझर इब्राहिम पाशाने बांधली होती, ज्याने टर्कीच्या उभारणीत योगदान दिले होते.

Mihrap, Osman Hamdi Bey
Mihrap, Osman Hamdi Bey

उस्मान हमदी बे यांच्या या चित्रावर आधारित एका पाषाण शिल्पमूर्तीची निर्मिती करण्यात आली होती. जीन लियोन जीरोम यांनी या शिल्पाकृतीची निर्मिती केली होती. त्यावेळी ना चित्राने कोणाच्या भावना दुखावल्या होत्या ना शिल्पामुळे दुखावल्या होत्या. उस्मान हमदी बे हे कट्टर सुधारकी विचारांचे होते, त्यांच्या कलाकृतींना कोणी विरोध केला तरी ते तो मोडून काढत.

उस्मान हमदी बे, हे तन्झिमियत या इस्लाममधील पाश्चात्य विचारांच्या पंथाचे होते. ज्यात व्हिजिअर मिधात पाशा आणि उस्मान यांचे वडील इब्राहिम यांचा समावेश होतो. उस्मान हे सदैव ऑटोमन प्रणित मुस्लिम धर्माचे समर्थक होते. त्यांनी सदैव टर्की साम्राज्याला आवश्यक असलेल्या युरोपियन धाटणीच्या सुधारणांचा पुरस्कार केला होता. फक्त हे राष्ट्रीय चौकटीत घडून यावे असा त्यांचा आग्रह होता.

त्यांचे आधुनिक टर्कीविषयक विचार उस्मान यांनी आपल्या पित्याला लिहलेल्या पत्रात स्पष्टपणे दिसून येतात, अशी माहिती त्यांचे वंशज आणि इतिहासकार एधम एल्डम यांनी एका वृत्तवहिनीला दिली होती. एल्डम म्हणतात मिहराप या चित्रातील गर्भवती तरुण महिला ही टर्कीची प्रतीक होती, जिने आपल्या भूतकाळाकडे पाठ करत आधुनिकतेची वाट धरली होती.

 

अनेकांच्या मते ही महिला आर्मेनियन वंशाची होती, जिची आई उस्मान यांच्या दुसऱ्या बायकोकडे चाकरी करायची, पण अनेक जण असे मानतात की ही उस्मान यांची मुलगीच होती, जी त्या काळात गर्भवती होती. जिने एका मुलीला जन्म दिला होता. उस्मान यांनी या चित्रातून आधुनिक टर्कीचे भविष्य वर्तवले होते.

उस्मान यांच्या इतर कलाकृती देखील अशाच सुधारकी धाटणीच्या होत्या, त्यात धार्मिक छटा होत्या, त्यांचे ‘सेटलमेंट फौंडेड बाय काँबन मुस्तफा पाशा’ हे चित्र असेच होते, यात एक मशिद होती, एक मदरसा आणि एक कॅन्टीन, हे चित्र त्यांनी १८९० मध्ये काढले होते. यंग इमिर स्टडिंग या चित्रात त्यांनी अभ्यास करणाऱ्या बालकाला रेखाटले होते.

थियोलॉजियन या चित्रात उस्मान यांनी कुराण वाचणाऱ्या आधुनिक तुर्की मनुष्याला रेखाटले होते. त्यांचे डिबेट डोअर नावाचे चित्र देखील असेच सुधारकी धाटणीचे होते ज्यात विवादाच्या संस्कृतीचे रेखाटन केले होते.

उस्मान हमदी बे हे सर्वार्थाने इस्लाम सुधारकी परंपरेचे वाहक आणि प्रसारक होते, त्यांच्या माध्यमातून युरोपियन आधुनिक मुल्यांकडे झुकणाऱ्या इस्लामचे रूप दिसते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!