सहारनपूरमधे रेशन दुकान चालवणारे गुप्ता बंधू आफ्रिकेत जाऊन डॉन कसे बनले..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतातील कर्तबगार उद्योजकांनी जगभरात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. अनेकांनी परदेशात जाऊन नवे उद्योग, व्यवसाय निर्माण केलेत. अशाच उद्योजकांमध्ये काही वर्षापूर्वी गुप्ता बंधूचे नाव अभिमानाने घेतले जायचे.

भारतातील उत्तरप्रदेशमधील सहारनपुर गावातील हे तिन्ही बंधू व्यवसायाच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. तिथे त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. गुप्ता बंधूंच्या कंपनीचा नफा इतका वाढला की, आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत गुप्ता बंधू पाचव्या क्रमांकावर होते.

२४ वर्षापूर्वी उद्योगधंद्यात चांगली प्रगती करण्याच्या उद्देशाने हे तिघे भाऊ दक्षिण आफ्रिकेत गेले. दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर त्यांची अपेक्षेपेक्षा जास्त भरभराट झाली.

ज्या दक्षिण आफ्रिकेत या तीन गुप्ता बंधूंनी संपत्ती, नाव सन्मान, पैसा, मान मरातब मिळवला त्याच आफ्रिकेत आता ते खलनायक ठरले आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या गुप्ता कुटुंबीयांनी आफ्रिकेत फार मोठी अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. ब्रिटन, सौदी अरेबिया अमेरिका अशा ज्या ज्या देशांच्या बँक खात्यात या परिवाराचा पैसा जमा आहे, तो सर्व पैसा जप्त करून सरकारी तिजोरीत भरण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील अधिकाऱ्यांचे जोरात प्रयत्न सुरु आहेत.

एक वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की, गुप्ता बंधू स्वतः आफ्रिकेतील माजी राष्ट्रपती जॅकब जुमा यांच्या सरकारला आपल्या इशाऱ्यावर नाचवायचे. मात्र आता, सगळेच फासे पालटले आहेत. या राष्ट्रपतीच्या कुटुंबियांना त्यांनी आपल्या कंपनीत मोठमोठ्या हुद्द्यावर नोकऱ्या दिल्या होत्या.

परंतु गुप्ता बंधूंवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जॅकब जुमा यांनाही आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेही जुमा आणि इतर राजकारण्यांशी संधान साधूनच गुप्ता बांधवांनी यशाची सीडी चढली असल्याचा आरोप त्यांच्यावर यापूर्वीही कित्येकदा करण्यात आलेला आहे. २

०१८पासून आफ्रिकेत गुप्ता परिवाराविरोधात असंतोष वाढत होता. आता तर त्यांची मालमत्ता जप्त करण्यापर्यंत हे प्रकरण चिघळले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील सरकार त्यांच्या सर्व आर्थिक गैरव्यवहारांची कसून चौकशी करत आहे. चौकशीचा हा फास घट्ट आवळल्याने दक्षिण आफ्रिकेतील त्यांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. गुप्ता बांधव आता दक्षिणेतील आपला बोऱ्याबिस्तरा गुंडाळण्याच्या तयारीला लागले असल्याच्याही चर्चा सुरु आहेत.

गुप्ता कुटुंबातील हे तिन्ही भाऊ, अजय, अतुल आणि राजेश यांचा जन्म सहारनपुरमध्येच झाला. त्यांचे शिक्षणही याच परिसरात झाले. मोठा भाऊ अजय याने बीकॉम पूर्ण केल्यानंतर सी.ए. झाला. अतुलने बीएससी केले आणि कंप्युटर हार्डवेअर आणि असेम्बलिंगचा कोर्स केला. तर छोटा भाऊ राजेश याने बीएससीची पदवी मिळवली.

त्यांचे वडील शिवकुमार यांचे सहारनपूर येथे रेशनिंग दुकान होते. हे तिघे भाऊ सुरुवातीला त्यांच्याच दुकानाच्या कामात मदत करायचे. त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिघांनी दिल्लीत एक मार्केटिंग एजन्सी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून ते मसाल्यांचा व्यापार करत.

मादागास्कर आणि जन्जीबार इथून ते मसाले निर्यात करत. त्यांची आणखी एक कंपनी होती, जी टाल्कम पावडर बनवण्यासाठी लागणारी सोपस्टोर पावडरचे वितरण करीत असे. सहारनपुरमध्ये त्यांचे एक मोठे घर होते. त्याकाळी त्यांच्या कुटुंबाकडे एक कार देखील होती. सहारनपूरमधील धनवान लोकांच्या यादीत त्यांचेही नाव होते.

दक्षिण आफ्रिकेने परदेशी गुंतवणूकदारांसाठी आपल्या देशाची बाजारपेठ खुली केली तेंव्हा, वडील शिवकुमार यांच्या इच्छेसाठी मोठा भाऊ अतुल गुप्ता व्यवसायाच्या संधी शोधण्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेला.

नुकतीच या देशाने परकीय गुंतवणूकदारांसाठी आपल्या देशाचे दरवाजे खुले केलेत याचा अर्थ इथे व्यवसायासाठी मोठी संधी मिळू शकते असा त्यांचा वडिलांचा कयास होता.

अर्थात तो चुकीचा नव्हताच. अतुलने कंप्युटर कोर्स केला होता. त्याने तिथे जाऊन कंप्युटर असेम्बलिंग आणि मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशन आणि ब्रँडिंगचे काम सुरु केले. अतुलने तिथे व्यवसाय सुरु केला तेंव्हा वडिलांनी भांडवलासाठी भारतातून पैसा पाठवला होता.

भारतातून पाठवलेल्या याच पैशातून अतुल गुप्ताने १९९४ साली कंपनीचे मार्केटिंगचे काम सुरु केले. फक्त तीन वर्षात या कंपनीने ९७ दशलक्ष रेंडचा फायदा मिळवला. तेंव्हा या कंपनीत दहा हजार कर्मचारी काम करत होते.

वडिलांच्या मृत्युनंतर संपूर्ण कुटुंबच दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. एकटी आई, अंगुरी, सोडल्यास सर्वांनीच दक्षिण आफ्रिकेचे नागरिकत्व स्वीकारले.

एवढ्या वर्षांत या तिन्ही भावांनी मिळून आपल्या व्यवसायाचा संपूर्ण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात विस्तार केला. जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये शेकडो एकर परिसरात पसरलेला मोठा अलिशान बंगला आहे. कंप्युटर क्षेत्रापासून सुरु केलेला व्यवसाय आता खाणकाम, हवाई वाहतूक, ऊर्जा निर्मिती, तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रसार माध्यम अशा अनेक क्षेत्रात विस्तारलेला आहे.

परंतु २०१८ पासून गुप्ता बंधूंच्या विरोधात वातावरण हळूहळू तापू लागले. दक्षिण आफ्रिकेचे अर्थमंत्री मासोबिसी यांनी आधीच्या अर्थमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवून नेने यांना ते पद मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

गुप्ता परिवार आणि जेकब जुमा यांच्या मैत्रीकडेही संशयाने पाहिले जाते. या मैत्रीपूर्ण संबंधांचा फायदा उठवतच गुप्ता यांच्या कंपनीने सरकारी प्रकल्प स्वतःच्या घशात घालण्यात यश मिळवले असल्याच्याही चर्चा कानी पडतात.

सरकारच्या संगनमताने कमावलेला अवाढव्य पैसा त्यांनी इतर देशांच्या बँकेत सुरक्षित ठेवला असे म्हणतात. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेतील अधिकारी त्यांच्या इतर देशातील बँक खात्यांचीही चौकशी सुरु आहे.

त्यांच्या विरोधात दक्षिण आफ्रिकेत आंदोलनेही करण्यात आली आहेत. एकूणच दक्षिण आफ्रिकेत या गुप्ता बंधूंविरोधात एकदमच विखारी वातावरण तयार झाले आहे. गुप्ता बंधूनी आता दक्षिण आफ्रिकेतील आपला पसारा आवरायला घेतला असून ते दुबईमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करत असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळतात.

परंतु गुप्ता बंधूंच्या मते ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये त्यांचा पूर्वीपासूनच व्यवसाय आहे. त्यातच गुप्ता परिवारातील मोठ्या मुलाचा लग्न सोहळा तुर्की येथे पार पडला तेंव्हा कदाचित हे कुटुंब दक्षिण आफ्रिका सोडून दुबईत वास्तव्याला जाऊ शकते, अशी चर्चा तेथील प्रसारमाध्यमांत सुरु होती.

दुबईतील सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या परिसरातही त्यांचा एका अलिशान व्हिला आहे. इतर देशांतही त्यांची बरीच संपत्ती आहे. दुबई, तुर्की, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!