अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्यात आंबेडकरांच्या बाजूने उभा राहिलेला राजा : राजर्षी शाहू

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय ज्यांनी १९०२साली आपल्या वाढदिवशी घेतला व दलित, वंचित, पीडित, गोरगरीब, शोषित, गावकुसाबाहेरच्या मागास जनतेला एक अनोखी भेट दिली होती. त्या निर्णयाला आता शंभरहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे.

आज जग परग्रहावर वसाहत करण्याचा प्रयत्न करीत असताना एकविसाव्या शतकातही मागास, दलित, विकलांगांना बरोबरीच्या नात्याने वागवले जात नाही आणि म्हणूनच महाराजांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या या वटहुकुमाचे महत्त्व आणखीनच, नव्हे शतपटीने अधोरेखित होते.

असे म्हणतात की प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात आत्मजागृतीचा क्षण येतो, जो त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. त्याला आपण कशासाठी जगायचे, कोणासाठी जगायचे याचे भान देतो.

महाराजांच्या आयुष्यातही असाच एक प्रसंग आला. एकदा थंडीच्या दिवसांत भल्या पहाटे महाराज पंचगंगेत स्नान करीत होते, तर गरम कोट घालून, उपरणे, कानटोपी व पायात चामड्याच्या चपला घातलेला आणि स्वतः स्नान न केलेला भटजी काठावर उभा राहून अंघोळ न करताच मंत्र पुटपुटत होता.

महाराजांचे पुरोगामी विचाराचे मित्र राजारामशास्त्री भागवत यांनी याबाबत महाराजांना सांगितले आणि महाराजांनी पुरोहिताकडे विचारणा केली असता, ‘याची आम्हाला काही गरज नाही, ते केवळ तुमच्यासाठी आहे,’ असे उपमर्दकारक उत्तर मिळाले.

पुरोहिताचे वर्णश्रेष्ठत्व दाखविणारे उर्मट उत्तर ऐकून महाराज पंचगंगेतून बाहेर आले. ते समतेची मशाल हाती घेतलेले आणि बंधुभावाचा संदेश घेऊन आलेले वेगळेच महाराज होते.

shahu maharaj the postman

या प्रसंगातून त्यांना जगण्याचे प्रयोजन सापडले. आपले उर्वरित आयुष्य दलित, वंचित, पीडित, शोषित, गावकुसाबाहेरच्या, ज्यांना समाजाने बहिष्कृत करून पशुपेक्षाही हीन लेखले आहे अशा मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्ची घालण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच महाराज बाहेर पडले.

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समता व मानवतावादावर आधारीत नवसमाज निर्मितीचे व समाजातील उच्चनीचता व जातीभेद नष्ट करण्याचे कार्य आरंभिले होते. तेच पुढे चालू ठेवण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले.

कारण सत्यशोधक समाजाचे कार्य म्हणजे सार्‍या कनिष्ठ जातींची आर्त किंकाळी होती.

महात्मा फुले यांनी,

‘विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली
नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’

असे सांगून शूद्र म्हणजेच सर्वसामान्य बहुजन समाजाच्या अवनतीचे कारण त्यांचे अज्ञान, निरक्षरता होय हे ओळखले होते. समतेवर आधारीत नवसमाज निर्मितीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुले यांनी सांगितलेले सूत्र महाराजांनी पुरते ओळखले होते. मग त्यांनी आपल्याला मिळालेल्या सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी केला नसता तरच नवल!

या लोकाभिमुख व प्रजाहितदक्ष राजाने दुर्बल, दलित, पीडित, वंचित, गावकुसाबाहेरच्या लोकांना सबल बनवण्याचा निर्धार केला.

शिक्षण हे सर्व सुधारणेचे केंद्र आहे हे ओळखून आपल्या संस्थानात खेडोपाडी शाळा उघडण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता. त्याचवेळी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र असणार्‍या शाळा रद्द करण्याचा त्यांनी वटहुकूम काढला व सर्वांना एकाच शाळेत शिकण्याची व्यवस्था केली आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होते आहे ना याकडे विशेष लक्ष दिले.

shahu the postman

अस्पृश्य आणि सवर्णांनी एकत्र शिकण्याच्या महाराजांच्या या धोरणाला काहींनी तीव्र विरोधही केला. तेव्हा शाळा बंद पडल्या तरी चालेल; पण हा वटहुकूम आपण मागे घेणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले आणि शिक्षणाची गंगा अस्पृश्यांच्या अंगणात आणून पोहचवली.

याहीपुढे जाऊन अस्पृश्यता व जातीवर आधारीत उच्चनीचता नष्ट करण्यासाठी अस्पृश्य व्यक्तिंना वकिलीच्या सनदा देऊन त्यांनी त्यांची जणू वकिलीच केली होती. यावर एकदा त्यांचे एक मित्र म्हणाले,

‘महाराज, सवलती देताना जातीपातीकडे पाहू नये, पात्रता वा लायकीकडे पाहावे’

हे ऐकून महाराज काहीच बोलले नाहीत. महाराजांनी काहीच उत्तर न दिल्यामुळे त्या मित्रालाही आश्‍चर्य वाटले. नंतर त्या मित्राला आपल्याबरोबर घेऊन ते घोड्यांच्या पागेकडे गेले व घोड्यांसाठीची चंदी एकत्र ठेवून सर्व घोड्यांना एकाच वेळी सोडण्यास मोेतद्दाराला सांगितले.

यावर धडधाकट घोडे धावत पुढे आले आणि त्यांनी सर्व चंदी खाऊन टाकली. लुळ्या, पांगळ्या, दुर्बल घोड्यांना चंदी तर नाहीच; पण सबलांच्या लाथा मात्र खाव्या लागल्या. यावर तो मित्र महाराजांना म्हणाला, ‘महाराज, असे का केलेत? यामुळे अशक्त घोड्यांना खायला कसे मिळणार?’

यावर महाराज म्हणाले,

‘बरोबर आहे तुमचे. मदतीची, सवलतींची खरी गरज आहे ती या दीनदुबळ्यांना! गरिबांना, पांगळ्यांना, धडधाकटांना नव्हे, हे आता तुम्हाला पटलेले दिसते.’

यावर ते काय बोलणार? महाराज आपल्या कृतीतून असे लोकांना शिकवत असत.

आज एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगतीमुळे जग जवळ आले आहे, तरीही जात पात, धर्म, पंथ, वंश, वर्ण हे भेद गेलेले नाहीत. यातूनच आंतरजातीय विवाह केला म्हणून आपल्या पोटच्या मुलीचाही खून केला जातो. कुठे दोघांनाही ठार मारले जाते, कुठे सार्‍या वस्तीलाच जाळून मारण्यात येते, तर कुठे बहिष्कृत केले जाते.

अशी ‘ऑनर किलिंग’ची उदाहरणे रोजच ऐकायला मिळतात. महाराजांचा काळ तर १९ व्या शतकाच्या अखेरचा व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील. त्यामुळे त्यावेळची सामाजिक परिस्थिती ओळखून त्यांनी सर्व जातीधर्मांतील पुढार्‍यांना बोलावून आपापल्या समाजासाठी शाळा व वसतिगृहे सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले.

एवढेच करून ते शांत बसले नाहीत, तर त्यांनी त्या संस्थांचे पालकत्व स्वीकारले. म्हणजेच त्या संस्था निर्भर व्हाव्यात यासाठी त्यांच्या खर्चासाठी जमिनी इनाम दिल्या.

खेड्यापाड्यांतील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये यासाठी त्यांनी वसतिगृहात्मक शिक्षणाचा पुरस्कार केला. ‘स्वतःच्या घरापासून दूर असलेले घर म्हणजे वसतिगृह,’ ही त्यांची वसतिगृहाची कल्पना होती आणि म्हणूनच वसतिगृह बहुजन समाजाच्या शिक्षणाचे प्रवेशद्वार आणि महाराज वसतिगृहात्मक शिक्षणाचे जनक ठरले.

त्यांनी केवळ कोल्हापूर या आपल्या संस्थानातच नव्हे तर पुणे, नाशिक व नगर येथेही अशी वसतिगृहे सुरू केली.

shahu 2 the postman

त्यांचे शिष्य आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराजांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करून शिक्षण खेडोपाडी, दुर्गम भागातही पोहोचवले. केवळ लिहायला वाचायला येणे म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणातून त्याची माणसाकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

महाराज उदारमतवादी शिक्षणाचे प्रणेते होते. विषमता व जातीभेदाने ग्रासलेल्या समाजाला समानतेच्या पातळीवर आणण्याचे व्यापक मानवतावादाचे अधिष्ठान त्यांच्या या योजनेला लाभले होते.

स्त्रीशिक्षणाचाही त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला होता. स्त्रीशिक्षण हे कुटुंबाचे शिक्षण आहे, हे त्यांना पक्के ठाऊक होते. या विचारानेच आप्तस्वकियांचा विरोध पत्करूनही आपली सून राणी इंदुमतीदेवी यांच्या शिक्षणाने त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात घरापासून केली होती.

स्त्री साहसी, स्वावलंबी व सद्गुणी असावी, तरच निकोप समाज निर्माण होणे शक्य आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती. यासाठी मुलींच्या मोफत शिक्षणाची सोय त्यांनी केली.

पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्र शासनाने त्याचा सुमारे ८५ वर्षांनंतर स्वीकार केला आहे, यातूनच महाराजांच्या द्रष्टेपणाची साक्ष पटते.

आपल्या समाजाची उभारणी परंपरागत अशा उच्चनीचतेच्या उतरंडीवर झालेली आहे. हीच उच्चनीचतेवर आधारीत उतरंड मोडण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कसोशीने आणि प्राणपणाने केला.

ज्यांना गावात प्रवेशही नव्हता अशा गुन्हेगार म्हणून वागवल्या जाणार्‍या फासेपारध्यांना त्यांनी आपल्या राजवाड्यावर पहार्‍याचे काम देऊन माणसांत आणले.

हे म्हणजे जामदारखान्याच्या चाव्या चोराच्या हाती देण्यासारखे आहे, असेही अनेकांनी शेरे मारले. पण मातेच्या प्रेमाची पाखर घालून अधमांनाही माणसांत आणणार्‍या या कनवाळू, ममताळू राजाने यासाठी प्रसंगी नातलगांचाही रोष पत्करला, पण आपला निर्णय बदलला नाही.

आपले राजेपण विसरून महाराज माणुसकीच्या नात्याने सर्वांनाच बरोबरीने वागवत. एकदा दुपारच्या रणरणत्या उन्हात डोक्यावर गोवर्‍यांची टोपली घेऊन जाणार्‍या बाईला राजांनी पाहिले आणि तिला आपल्या बग्गीत बसण्यास सांगितले होते. यावर सोनतळी कॅम्पमधील हवेलीत जिन्यावरून उतरताना त्यांचे एक नातेवाईक त्यांना म्हणाले,

‘महाराज, आपण छत्रपती आहात. आपण भलत्या सलत्याशी असे सलगीने वागणे बरे नाही. ज्याने त्याने आपल्या पायरीप्रमाणे वागावे, नाही तर या जिन्याच्या पायर्‍या केल्या आहेत कशासाठी?’

यावर महाराज काहीच बोलले नाहीत; पण त्यांनी लगेच एक मेस्त्री बोलावून सोनतळी कॅम्पमधील त्या हवेलीच्या दक्षिणेकडील जिन्याच्या पायर्‍या बुजवून घ्यायला सांगितले व त्या आपल्या नातेवाईकाला म्हणाले, ‘या खाचाखोचा असणार्‍या, माणसांमाणसांत उच्चनीच असा भेदभाव करणार्‍या पायर्‍याच आपण बुजवून टाकू या.’ यावर त्या नातेवाईकाचा चेहरा पाहण्यासारखा झाला.

सोनतळी कॅम्पमधील या इमारती भारत स्काऊट आणि गाईड संस्थेच्या ताब्यात असून आजही या हवेलीतील तो पायर्‍या बुजवलेला जिना महाराजांच्या समानतेच्या दृष्टिकोनाची साक्ष देत आहे.

अन्यायाविरुद्ध लढताना महाराज वज्रकठोर होत, तर दलित, पीडित, वंचित, दुःखितांच्या दर्शनाने हेलावून जात. त्याकाळी वाड्यावरच्या अस्पृश्य नोकरांना पाणी वरूनच वाढण्यात येत असे. राजवाड्यावर घोड्यांची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या अस्पृश्य गंगाराम कांबळे दुपारच्यावेळी तहानला असताना त्याला पाणी वाढायला कोणीही आले नाही, तेव्हा तहानेने व्याकूळ होऊन त्याने पाण्याच्या हौदाला स्पर्श केला म्हणून तिथल्या सवर्णांनी त्याला बेदम मारहाण केली.

महाराजांना हे समजताच ज्यांनी ज्यांनी गंगारामला मारहाण केली होती त्यांना त्यांना महाराजांनी हंटरने फोडून काढले व हे लोक तुला इथे सुखाने जगू देणार नाहीत असे सांगून त्याला नोकरीतून कमी केले व महाद्वार रोडवर हॉटेल सुरू करण्यास मदत केली.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी महाराज जेव्हा जेव्हा जात तेव्हा सोबतच्या लवाजम्यासह ते गंगारामच्या हॉटेलात चहापान करीत. सोबतच्या लोकांचा एका अस्पृश्याच्या हॉटेलात जायला विरोध असे; पण महाराजांसमोर ते बोलणार काय आणि कुठल्या तोंडाने? असे करावे लागते पुनर्वसन!

shahu 3 the postman

महाराज जेव्हा शिकारीसाठी राधानगरी किंवा दाजीपूरच्या जंगलात जात तेव्हा दर्‍याखोर्‍यात राहणार्‍या धनगर आणि गोरगरिबांच्या झोपडीत घोंगड्यावर बसून त्यांच्याकडचीच चटणी भाकरी हातावर घेऊन खात. आपला राजा आपल्या झोपडीत जेवताना पाहून त्याचे डोळे भरून येत.

महाराजांनी आपल्या चुलत बहिणीचा विवाह इंदूरच्या एका धनगर समाजातील युवकाशी लावून दिला होता.

महाराज असे ‘आधी केले मग सांगितले’ या विचाराचे होते. ते आपल्या कृतीतून अस्पृश्यता नष्ट करीत होते. महाराजांच्याकडे शिकारीसाठी शिकविलेले चित्ते असत. त्यांच्याकडून ते शिकार करवून घेत.

त्यांच्या दालनात त्यांच्याजवळ असाच एक वाघ बसलेला असे. एखाद्या कामचुकार किंवा काही चूक केलेल्या इसमाला ते तिथे बोलावत आणि मुद्दामच आतल्या खोलीत जात. तेव्हा तो माणूस आणि वाघ दोघेच त्या दालनात असत. यावेळी वाघाला पाहून गर्भगळीत झालेला तो इसम आपली चूक कबूल करीत असे.

त्यांनी असाच एक सिंहाचा बछडा (सिंहीण) पाळला होता. ती महाराजांच्या बरोबरच राजवाड्यात इकडे तिकडे फिरत असे. ती मोठी झाल्यानंतर तिला जोडीदाराची गरज आहे हे ओळखून एके दिवशी तिला जमखंडीच्या जंगलात सोडून देण्यात आले; पण तिथे महाराज कुठेच दिसत नसल्यामुळे ती सैरभैर झाली आणि माणूस वस्तीतूनही वाट काढत ती महाराजांपर्यंत पोहोचली आणि तिने महाराजांच्या अंगावर झेप घेतली.

पाहणार्‍यांना वाटले की तिने महाराजांवर हल्ला केला आहे; पण महाराजांना तिचे प्रेम माहित होते. त्यावेळी महाराज तिला म्हणत होते, ‘पुरे झाले बाई. आता, शांत हो.’ हे अनोखे दृश्य पाहणार्‍यांचे डोळे मात्र पाण्याने भरून गेले होते.

मातेच्या प्रेमाची पाखर घालून गुन्हेगारांना माणसांत आणणार्‍या या कनवाळू राजाने त्या सिंहीणीच्या जन्मजात पशुत्वावरही मात केली होती.

एकदा महाराजांच्या सेवेत असणार्‍या नोकराने दोन शेर तांदळाची चोरी केल्याची काहींनी महाराजांकडे तक्रार केली. हे ऐकून महाराजांनी त्या नोकराला काहीच शिक्षा केली नाही, हे पाहून त्या असंतुष्टांनी पुन्हा तक्रार करताच महाराजांनी चांगल्या तांदळाचे एक मणाचे पोते व डबाभर तूप त्या नोकराच्या घरी पाठवून दिले.

शिक्षा करण्याऐवजी चोरालाच परत धान्य पाठवून दिल्यामुळे आश्‍चर्यचकित झालेल्या लोकांनी महाराजांना विचारताच ते म्हणाले,

‘अरे, या गरीब माणसाची बायको बाळंतीण, घरात खायला अन्न नाही म्हणून अगतिक होऊनच त्याने चार दोन शेर तांदूळ नेले ना? त्याने एवढा काय अनर्थ होतो? मी राजा म्हणून माझ्या प्रजेची योग्य काळजी घेऊ शकलो नाही, म्हणूनच हे घडले ना?’

या कनवाळू व प्रजाहितदक्ष राजाने तक्रार करणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन तर घातलेच; पण राजाने प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेतली पाहिजे, हेही दाखवून दिले. मानवतेच्या सेवेत रममाण झालेल्या या प्रजाहितदक्ष राजाची उक्ती आणि कृती सारखीच होती. म्हणूनच त्याला नैतिक बळ प्राप्त झाले होते.

शेतकरी हाच सर्वांचा पोशिंदा असून तो सुखी तर जग सुखी हे ओळखून त्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोफत शिक्षणाची सोय केली.

शेतकर्‍यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी सहकारी सोसायट्या, पतपेढ्या स्थापण्यास मदत केली. दलालांची गरज भासणार नाही याची काळजी घेतली. सर्वांचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍याच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. यासाठी राधानगरी धरण बांधण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन ते हरितक्रांतीचे जनक ठरले.

पहिले महायुध्द व इतर कारणांमुळे दुर्दैवाने हा प्रकल्प त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही; पण त्या काळातील ते देशातील सर्वांत मोठे धरण होते.

१९७४साली मंजुरी मिळालेल्या काळम्मवाडी धरणाची कल्पनाही त्यांचीच होती. कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी सोसायट्या, पतपेढ्या, सहकारी बँका, शेतकरी संघ व साखर कारखान्यांचे जाळे पसरले आहे, ही महाराजांच्या प्रजाहितदक्षतेचीच परिणती होय.

shahu 4

आपल्या संस्थानात सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. कोल्हापूर हे कलापूर बनवण्याचा ध्यास घेतला. कोण्या एका लेखकाने म्हटल्याप्रमाणे ‘इथल्या मातीला सृजनाचा गंध आहे, माणसांना नवनिर्मितीचा छंद आहे, तर इथली हवा देशाभिमानाने धुंद आहे.’

त्यामुळेच नृत्य, नाट्य, अभिनय, संगीत आदी क्षेत्रांत पुढे येणार्‍यांना आश्रय देऊन त्यांनी कोल्हापूरला कलापूर बनवले.

इथे कलावंतांचे केशराचे पीक देणारे मळे फुलवले. भास्करराव बखले, अब्दुल करीम खॉं, अल्लादिया खॉं, केशवराव भोसले, रामकृष्ण बुवा वझे, बालगंधर्व ही नावेच त्याची साक्ष देतात. गाव तेथे शाळा, वाचनालय व तालीम स्थापून ज्ञानोपासनेबरोबरच बलोपासनेची आराधना त्यांनी सुरू केली.

‘शरीरसंपत्ती, पुत्रसंपत्ती आणि धनसंपत्ती असणारा खरा पुण्यवान’ अशी अक्षरे म्हणूनच मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावर कोरलेली दिसतात. त्यांनी मल्लविद्येला राजाश्रय दिला.

कारण महाराज स्वतःच एक नावाजलेले मल्ल होते, वस्तादांचे वस्ताद होते. आपल्या मल्लविद्येची कदर करणारा राजा इथे आहे हे ओळखून देशभरातील नावाजलेले मल्ल कोल्हापूरला येत. जिंकलेल्याला शाबासकी देऊन व हरलेल्याला धीर देऊन पुन्हा लढतीस तयार करण्याची महाराजांची पद्धत होती. गावोगावी शाळा, वाचनालये व तालमी स्थापून त्यांनी मन, संस्कृती आणि शरीरसंपदेचे संवर्धन केले.

मल्लविद्येद्वारा शक्तीची उपासना सुरू राहावी यासाठी खासबाग मैदानाची निर्मिती केली. राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो, तो राज्याचा मालक नव्हे, तर विश्‍वस्त असतो, हे त्यांनी आपल्या आदर्श वर्तनातून दाखवून दिले आहे. म्हणूनच महाराज थोर तत्त्वज्ञ प्लेटोच्या स्वप्नातील ‘तत्त्वज्ञ राजा’ ठरतात.

मराठ्यांच्या राजाच्या गळ्यात कवड्यांची माळ असायची असे म्हणतात. आपले जीवन कवडीमोल मानून समाजसेवेत रमणार्‍या या राजाने म्हणूनच सहभोजनातून समानता आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

शाळा, वाचनालये व तालमीच्या माध्यमातून माणसे पेरून महाराजांनी समाजसेवेचा धडाकाच लावला. त्याचा धोका ओळखून इंग्रजांनी त्यांना आपल्या संस्थानाच्या बाहेर समाजसेवेचा पसारा वाढवू नये अशी इशारेवजा सूचना केली होती. पण महाराज म्हणाले, ‘तशी वेळच आली तर जनतेच्या हितासाठी मी सिंहासनावरून खाली येईन; पण जनहिताचे काम सोडणार नाही.’ याला म्हणतात समर्पणवृत्ती.

अस्पृश्यता नष्ट करताना त्यांनी अनेकांना आर्थिक मदत केली, हात धरून पुढे आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही त्यांनी आर्थिक मदत केली होती.

माणगाव येथे अस्पृश्यांच्या एका मेळाव्यात तरुण बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. ‘हा युवकच तुमचा खरा नेता होईल व एक दिवस राष्ट्रीय स्तरावरचा पुढारी होईल,’ असे त्यांची ओळख करून देताना सांगितले होते. महाराजांच्या वाणीला भविष्यवाणीचे तेज प्राप्त झाले. महात्मे काळाच्यापुढे असतात, असे म्हणतात त्याची प्रचिती येते.

महाराजांनी वेळोवेळी केलेले कायदे, वटहुकूम पाहता त्यांच्या दूरदृष्टीचा आवाका लक्षात येईल. पुनर्विवाह नोंदणी कायदा, मिश्र विवाह कायदा, जोगत्या, मुरळ्या प्रतिबंधक कायदा, घटस्फोटाचा कायदा, स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास बंदी करणारे नियम, अनौरस संततीस वारसा मिळणेसंबंधी कायदा, अस्पृश्यांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी काढलेला वटहुकूम, वेठबिगारी प्रतिबंध, बिगर गुन्हेगारांची हजेरी पद्धत बंद,महार वतने रद्द करणे, बलुते पद्धती बंद करणे, सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा, शिक्षण विषयक कराचा कायदा, सहकारी सोसायट्यांचा कायदा, पहिल्या महायुध्द काळात सैन्यात भरती होणार्‍या अथवा करणार्‍या शेतकर्‍यांना सावकारी कर्ज फेडीबाबत सवलत, कुलकर्णी वतने रद्द करून तलाठी पद्धत राबवणे, न्याय, समानता व मानवता यांचे दर्शन घडवणारे हे कायदे व आज्ञापत्रे महाराजांची समाजसुधारणेची तळमळ व दूरदृष्टीच दर्शवितात.

महाराजांनी ८०-९० वर्षांपूर्वी केलेले कायदे केंद्र सरकार व राज्य सरकारांनी अलीकडे केले आहेत. मानवी स्वातंत्र्याचा शोध घेत घेत पुढे जाणार्‍या प्लेटोच्या कल्पनेतील या ‘तत्त्वज्ञ राजा’ला आपल्या दुर्दैवाने दीर्घायुष्य लाभले नाही. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

लेखक : सदानंद पुंडपाळ
(साहित्य चपराक दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!