आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कल्पना करा तुम्ही मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्डकप फायनल सुरू आहे. स्टेडियमवर जवळपास ४० ते ५० हजार प्रेक्षक आहेत. त्यात देशाचे पंतप्रधान देखील आहेत. अशा वेळी जगातील सर्वात लांबलचक आणि मोठं विमान अचानक स्टेडियमच्या अगदी वर काही अंतर राखून काही क्षणांसाठी थांबलं तर..? सर्वात पहिले म्हणजे खेळ थांबेल. देशाच्या पंतप्रधानांना आणि खेळाडूंना वाचवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची पळापळी सुरू होईल. विमान कोसळेल या भितीनं प्रेक्षकांचीदेखील पळापळी सुरू होऊन चेंगराचेंगरी होईल. एकूणच काय तर अशी स्थिती उद्भवल्यास मोठा गोंधळ उडेल.
आता तुम्ही म्हणाल की, मी अशी भलती-सलती कल्पना का करायला सांगत आहे. मी अशी कल्पना करायला सांगत आहे कारण, १९३०मध्ये अशी घटना प्रत्यक्षात घडलेली आहे! जवळपास ९० वर्षांपूर्वी घडलेली ही घटना नेमकी काय होती? स्टेडियमवर अचानक विमान का थांबलं होतं? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…
ही गोष्ट आहे २६ एप्रिल १९३० या दिवसाची. लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर (एम्पायर स्टेडियम) प्रेक्षकांची खचाखच गर्दी होती आणि निमित्त होतं फुटबॉल असोसिएशन चॅलेंज कपचं (एफए कप). लंडनमधील वेम्बली स्टेडियम हे महत्त्वाचे फुटबॉल सामने आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध होतं. त्यामुळं १९३०मधील एफए कपची फायनल त्याच ठिकाणी ठेवण्यात आली होती. फायनल मॅचमध्ये आर्सेनल आणि हडर्सफील्ड टाऊन यांच्यात लढत झाली होती.
मॅचचा पहिला हाफ संपल्यानंतर दुसरा हाफ सुरू झाला होता. त्याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली. एक अवाढव्य विमान अचानक वेम्बली स्टेडियमच्या आकाशात आलं. ते विमान त्या ठिकाणी काही क्षण स्थिरावलं आणि त्यानंतर निघून गेलं. ते विमान एखादं साधं विमान असंत तर कदाचित विशेष वाटलं नसतं. मात्र, ते विमान होतं ‘ग्राफ झेपेलिन’. त्यावेळच जगातील सर्वात मोठ विमान तेही जर्मन निर्मित.
दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी इंग्लंडच्या आकाशात एखाद्या जर्मन विमानाचं अशा पद्धतीनं स्थिर होण्याचं गांभीर्य किती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. विमानाच्या अचानक झालेल्या आगमनामुळं काही वेळासाठी मैदानात गोंधळ उडाला. मात्र, विमान निघून गेल्यानंतर फायनल मॅच पूर्ववत झाली. नंतर स्पष्ट झालं की, इंग्लंडचा राजा ‘किंग जॉर्ज पंचम’ला सलाम करण्यासाठी ‘ग्राफ झेपेलिन’ वेम्बली स्टेडियमवर स्थिरावलं होतं.
इंग्लंडच्या राजाला अशा अनोख्या पद्धतीनं सलाम करणाऱ्या ‘ग्राफ झेपेलिन’ची किर्ती मोठी आहे. त्याच्या निर्मितीपासून तर शेवटच्या उड्डाणापर्यंतची प्रत्येक गोष्ट रंजक आहे. १९२०पर्यंत फ्रेडरिकशाफेन शहराबाहेरील झेपेलिन एअरशिप कंपनीच्या कारखान्यातील संपत्तीमध्ये तीन मोठ्या आकाराच्या इमारती, एक नवीन प्रयोगशाळा, दोन एअरशिप शेड आणि फ्लाइंग फील्ड यांचा समावेश झाला होता. मात्र, त्यावेळी तिथे कुठल्याही प्रकारची विमानबांधणी सुरू नव्हती. तेथील कामगार ऍल्युमिनियमच्या इतर लहान-मोठ्या वस्तू बनवण्यात गुंतले होते.
कंपनीचे व्यवस्थापक मात्र, कुठल्याही क्षणी विमानबांधणी उद्योगात उतरण्यासाठी सज्ज होते. कारण, एक ना एक दिवस जर्मनीला विमानबांधणीची परवानगी मिळेल याची त्यांना खात्री होती. त्यानंतर काही दिवसातच व्हर्सायच्या तहानं जर्मनीवर लावलेले विविध निर्बंध उठवल्यानंतर जर्मनीला पुन्हा एअरशिप बांधण्याची परवानगी देण्यात आली आणि झेपेलिन एअरशिप कंपनी पूर्णपणे कार्यरत झाली. या कंपनीनं तीन महाकाय एअरशिप बांधल्या: LZ-127 ग्राफ झेपेलिन, LZ-l29 हिंडेनबर्गआणि LZ-l30 ग्राफ झिपेलिन II.
झेपेलिन एअरशिप कंपनीच्या पहिल्या तीन विमानांच्या ताफ्यातील ‘LZ-127 ग्राफ झेपेलिन’ हे विमान सर्वात अगोदर तयार करण्यात आलं. LZ-127 या एअरशिपला ‘सर्वात सुंदर एअरशिप’ म्हटलं जातं. तिची लांबी ७७५ फूट आणि रुंदी १०० फूट होती. एका तासात ७० मैल अंतर पार करणाऱ्या विमानात ५३० हॉर्सपावरची पाच मेबॅक इंजिन्स होती. या विमानात एकदा इंधन भरल्यानंतर ते सलग सहा हजार २५० मैल प्रवास करू शकत होतं.
‘LZ-127 ग्राफ झेपेलिन’मध्ये ४४ क्रूमेंबर होते तर २० प्रवाशांच्या राहण्याची सोय होती. विशेष म्हणजे त्यात एक डायनिंग रुम आणि सलूनही होतं. १८ सप्टेंबर १९२८ रोजी लाँच झालेल्या ग्राफ झेपेलिननं ६५० हून अधिक उड्डाणं केली. त्यापैकी १४४ उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासारांना ओलांडणारी होती.
ग्राफनं एक दशलक्ष मैलांपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आणि १८ हजाराहून अधिक प्रवाशांची ने-आण केली. १९२८ ते १९३२ दरम्यान झेपेलिननं अनेक लांब पल्ल्याची उड्डाणं यशस्वीपणे पार पाडली. ग्राफ झेपेलिनने पाच वर्षांच्या काळात जर्मनी आणि ब्राझील दरम्यान व्यावसायिक प्रवासी आणि मेल सेवा प्रदान केली. नाझी पक्ष सत्तेवर आल्यावर त्यांनी त्याचा प्रचाराचं साधन म्हणूनही वापर केला. आपल्या सेवेच्या काळात त्यानं युनायटेड स्टेट्स, आर्क्टिक, मध्य पूर्व आणि दक्षिण अमेरिकेला भेटी दिल्या आणि हजारो प्रवाशांची वाहतूक केली. ग्राफ झेपेलिन हे आतापर्यंत बांधलं गेलेलं सर्वोत्तम एअरशीप मानलं जातं. ग्राफ झेपेलिनच्या कारकीर्दीतील सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे, त्यानं त्यावेळी अस्तित्वात असलेले नकाशे दुरुस्त केले.
वैभवशाली कारकीर्द असलेल्या ग्राफ झेपेलिनचा शेवट मात्र फारच निराशाजनक झाला. ६ मे १९३७ रोजी ब्राझीलहून जर्मनीला परतत असताना ग्राफ झेपेलिनच्या क्रूनं हिंडेनबर्ग दुर्घटनेबद्दल रेडिओवर ऐकलं. मात्र, विमानातील प्रवासी घाबरू नयेत म्हणून त्यांनी दोन दिवस ही गोष्ट त्यांना सांगितली नाही. हिंडेनबर्ग दुर्घटनेमुळं हायड्रोजननं भरलेल्या एअरशिपच्या सुरक्षिततेबाबत असलेला विश्वास नाहीसा झाला. त्यानंतर महिन्याभरातच म्हणजे १८ जून १९३७ रोजी ग्राफ झेपेलिनलाला देखील सेवेतून कायमचं निवृत्त करण्यात आलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.