आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
महाराष्ट्राला सुमारे ७०० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा समुद्रकिनारा म्हणजे आपलं कोकण. कोकणात दोन समुद्र आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक महाप्रचंड अरबी समुद्र तर दुसरा सण-समारंभ आणि परंपरांचा. कोकण आणि गोवा यांच्यात तसं बघायला गेलं तर फक्त प्रशासकीय कारणांसाठी सीमा आखलेली दिसते. पण तेथील मूळ, स्थानिक परंपरा, भाषा, राहणीमान, इतकंच नाही तर खाद्यसंस्कृती देखील महाराष्ट्रातील कोकणाशी मिळती-जुळती आहे.
दिवाळी म्हटलं की आपल्याकडे फराळ, दुर्ग प्रतिकृती, नवनवे कपडे, दागिने, वस्तू यांबरोबरच फटाक्यांची आतिषबाजी देखील येते. पण गोव्यात मात्र दिवाळीपेक्षा गणेशोत्सवात अतिषबाजीचे प्रमाण जास्त असते. याचे कारण स्पष्ट आहे. पोर्तुगीजांनी सुमारे ४ शतकं गोव्यावर राज्य केलं, त्यांच्या काळात हिंदू सणांवर निर्बंध होते, जर कोणताही व्यक्ती गणपतीची पूजा करताना आढळला तर त्याला आपली बाजू मांडण्याचीही संधी दिली जात नसे, त्याच्यावर इन्क्वीजीशनमध्ये खटला चालवून थेट मृत्युदंडाची शिक्षा दिली जात.
इतकंच नाही तर एखाद्या धर्मांतरित ख्रिश्चन धर्मीयाने अशी तक्रार जरी केली, तरी कोणतीही शहानिशा केल्याशिवाय मृत्युदंड दिला जात असे. पोर्तुगीजांच्या अशा जुलमी जोखडातून गोव्याची सुटका झाली १९६१ साली. त्यानंतरचे गणेशोत्सव प्रचंड उत्साहात साजरे केले जात.
गोमंतकीय सण
गणेशोत्सवाबरोबरच गोव्यातील माशेल या गावी श्री देवकी कृष्ण मंदिर परिसरात आषाढ महिन्यात खेळला जाणारा ‘चिखल कालो’ अतिशय उत्साहाने साजरा केला जातो, चिखल कालोशिवाय शिमगा, होळी, दसरा आणि दिवाळी असे सण देखील गोव्यात स्थानिक परंपरांनुसार अतिशय उत्साहात साजरे केले जातात. यांशिवाय स्थानिक देवतांच्या यात्रांना देखील याठिकाणी उधाण आलेले असते.
काही दिवसांपूर्वीच भारतभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गोव्यामध्ये देखील अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. तेथे नरकचतुर्दशीचा उत्साह अन्य कोणत्याही दिवसापेक्षा जास्त असतो.
नरकासुराची आख्यायिका
नरकासुर हा कामरूप-प्रागज्योतिषपूरचा राजा होता. कामरूप-प्रागज्योतिषपूर म्हणजे सध्याचे आसाम-अरुणाचल प्रदेश. त्याठिकाणी हा नरकासुर राहत असे. तो विष्णूचा अवतार वराह आणि भूदेवीचा मुलगा होता. त्याला अजिंक्य असण्याचे वरदान आणि अग्निदेवाकडून ब्रम्हास्त्र मिळाले असल्याने तो उन्मत्त झाला होता.
अनेकांनी श्री कृष्णाला प्रार्थना करून त्याचे निर्दालन करण्याची विनवणी केली. तेव्हा त्याचेच माता-पिता भगवान श्री कृष्णांनी सत्यभामेसह नरकासुराशी यु*द्ध करून आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. भगदत्त हा त्याचा मुलगा पुढे महाभारत युद्धातही कौरवांच्या बाजूने लढला. भगदत्तच्या हत्तीखाली अर्जुनाचा रथ येणार होता, पण श्री कृष्णाने चपळाईने आणि आपल्या कौशल्याने अर्जुनाला वाचवले.
नरक चतुर्दशी
नरकासुराचा वध आजही आपण दिवाळीत साजरा करतो. गोव्यामध्ये हा सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पूर्वीच्या काळात अंगणातल्या तुळशीच्या वृन्दावनावर कारीट नावाचे काकडीसारखे फळ उजव्या पायाच्या अंगठ्याने फोडून हा सण साजरा केला जात असे. कालांतराने नरकासुराचा पुतळा जाळण्याची प्रथा सुरु झाली.
१९९० च्या दशकापर्यंत नरकासुर दहनाची प्रथा गोव्याच्या ग्रामीण भागापर्यंतच मर्यादित होती. बांबूच्या काड्या, कागदांचा लगदा आणि जुने कपडे यांच्यापासून हा नरकासुर बनवला जात आणि नरकचतुर्दशीच्या पहाटे त्याचे दहन केले जात. यात हळूहळू बदल होत गेले आणि उत्सव मोठा झाला.
आता तर नरकासुराचे हलते पुतळे जाळून साजरा केला जातो. या सगळ्याला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले. आजही हा उत्सव गोवेकर तरुणांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देत आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे ही स्पर्धा सुरु होते. वेगवेगळ्या खेळांनंतर आणि मौज-मजेनंतर श्री कृष्णाच्या रूपातील एक माणूस नरकासुराच्या पुतळ्यावर बाण मारतो आणि आतिषबाजी होते.
भारतीय जनमानसाला गोव्याची एकच बाजू माहित आहे, पण स्वतंत्र भारतातील ‘गोमंतका’त अशा प्रकारचे सण साजरे होतात याची माहिती अगदी काहीच जणांना असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.