आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२८ जुलै, १९१४ ते ११ नोव्हेंबर, १९१८ पर्यंत चाललेले पहिले महायु*द्ध इतिहासातील सर्वांत घातक संघर्षांपैकी एक ठरले. दोस्त राष्ट्रे (रशिया, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राष्ट्र) आणि केंद्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटांत झालेल्या या यु*द्धात हळूहळू जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या.
२८ जून १९१४ रोजी सारायेव्होमध्ये ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनाचा वारसदार आर्चड्युक फ्रांझ फरडीनांडची ह*त्या झाली आणि यु*द्धाची ठिणगी पडली. या ह*त्येसाठी ऑस्ट्रियाने सर्बियाला दोषी ठरवले आणि सर्बियासोबत यु*द्धाची घोषणा केली. सगळे देश एकमेकांशी बांधलेले असल्याने या घोषणेमुळे एक मोठा राजकीय पेच निर्माण झाला, ज्यात सगळ्या प्रमुख सत्ता ओढल्या गेल्या.
जुलै १९१४ मध्ये बाल्कन या परिसरात हे यु*द्ध सुरू झाले आणि याचे लोण लगेचच संपूर्ण युरोपात पसरले.
त्यावेळी भारतात ब्रिटिशांचे राज्य होते. अनेक भारतीय सैनिक या महायु*द्धात लढण्यासाठी पाठवले होते. त्यात अनेक मृत्युमुखी पडले. युरोपात सुरू झालेले हे यु*द्ध भारतापर्यंत येऊन पोहोचले होते.
झाले असे की, सप्टेंबर महिना होता. नवरात्रीचा तिसरा दिवस. मद्रासमध्ये राहणारे नागरिक आपापल्या कामाला लागले होते. दुकानं चालू होती, लोक नोकरीवर गेले होते. मद्रास महानगरपालिकेचे काम चालू होते, कोर्टाकचेऱ्या चालू होत्या. तिकडे यु*द्ध सुरू होऊन जेमतेम दोन महिने झाले होते, पण अजून तरी त्याचा परिणाम इथल्या लोकांवर झालेला नव्हता.
हे फार काळ टिकणार नव्हतं. त्याच रात्री, २२ सप्टेंबर १९१४ रोजी, SMS Emden या जर्मन जहाजाने बंगालच्या खाडीत प्रवेश केला.
या जहाजाचा उद्देश इतर व्यावसायिक जहाजांना पाडणे हाच होता. मद्रासच्या बंदरावर कुठलेही सहयोगी जहाज सुरक्षेसाठी तैनात नव्हते. याचाच फायदा Emden ने उचलला आणि या कुठल्याही यु*द्धापासून अनभिज्ञ असलेल्या शहराच्या जेमतेम काही मीटर अंतरावर हे सशस्त्र जहाज येऊन धडकले.
जसं जहाज मद्रासच्या जवळ आलं त्या जहाजाचा सेनापती, Karl Friedrich Max von Muller, याने आपल्या सैन्याला चढाई करण्यासाठी तयार होण्यास सांगितले. मद्रासचा समुद्र नेहमीप्रमाणे शांत होता, किनाऱ्यावर देखील फार हालचाल नव्हती. रात्रीची वेळ असल्याने पूर्णच शहरात निरवानिरव झाली होती. थोड्याच वेळात होण्याऱ्या धमाक्यांची कोणालाच काहीच काहीही कल्पना नव्हती.
समुद्रकिनारी ३ लाल-पांढऱ्या पट्ट्यांनी रंगवलेले तेलाचे टँकर उभे होते. बरोबर ९ वाजून २० मिनिटांनी कार्लने ह*ल्ला करण्याचे आदेश दिले. लगेच जहाजातून बंदुकीच्या फैरी झडायला सुरुवात झाली आणि क्षणार्धात ५००० टनच्या बर्मा तेल कंपनीच्या केरोसीनच्या टँकरला लागलेल्या आगीच्या झळा सर्वदूर पसरल्या. जहाजावर एकच जल्लोष उसळला.
पण एव्हढ्यानेच जर्मन्यांचे समाधान झाले नाही. जरी कार्ल सामान्य नागरिकांना मारण्याच्या पक्षात नव्हता, त्याला फक्त शहरात खळबळ उडवून द्यायची होती. थोड्याच वेळात मद्रासमधील अनेक इमारती हल्ल्याच्या शिकार बनल्या. मद्रास उच्च न्यायालय, पोर्ट ट्रस्ट, बोट हाऊस, नॅशनल बँक ऑफ इंडियाची जागा, सगळ्यांवर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या.
याचदरम्यान एक व्यापारी बोट मद्रास हार्बरवर अडकून पडली होती. त्यातले ५ नाविक या सगळ्या गोंधळात हकनाक मारले गेले तर १३ लोक गंभीररीत्या जखमी झाले.
हा ह*ल्ला तब्बल ३० मिनिटे चालला. जोपर्यंत क्लाइव्हचे सैनिक या ह*ल्ल्याचे उत्तर देतील, तोवर जर्मन तिथून निघून गेले. साहजिकच कितीही गोळ्या झडल्या तरी एकही गोळी Emden पर्यंत पोहचली नाही.
पहिल्या महायु*द्धात भारताच्या मातीवर झालेला हा एकमेव ह*ल्ला असावा.
कुठलाही ह*ल्ला झाला की त्याच्या परिणामांपासून सुटका नसते. या घटनेनंतर संपूर्ण मद्रास शहरात एकच हलकल्लोळ माजला. सगळीकडे अस्थिरता निर्माण झाली. दररोज २०,००० लोक शहर सोडून जाऊ लागले. लोकांना सावरण्यासाठी पोलिसांचं एक वेगळं पथक मागवाव लागलं. त्यांना रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले.
ज्या लोकांना रेल्वेनी जाणं शक्य नाही झालं ते सरळ बैलगाड्या, घोडे मिळेल ते वाहन घेऊन, नाही मिळालं तर मैलोनमैल चालत निघाले. याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर झाला. लोकांच्या मनात Emden परत येईल अशी भीती बसली होती.
याचा परिणाम फक्त मद्रासवरच झाला नाही, तर कलकत्त्याहून चालणारा व्यापारही ठप्प झाला, समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. याचा देशाला खूप मोठा फटका बसला. Emden तर परत आलं नाही पण लोकांच्या मनातून मात्र त्याची भीती गेली नाही.
आजही तुम्ही मद्रास उच्च न्यायालयात जाल तर तुम्हाला Emden च्या ह*ल्ल्याचे निशाण तिथल्या भिंतीवर आढळतील. त्याचे परिणाम मद्रासमध्ये इतके खोल झाले की तामिळ भाषेत Emden या शब्दाचा अर्थच बेधडक, धाडसी आणि अचूक काम करणारी व्यक्ती असा होतो.
युरोपमध्ये सुरू झालेल्या या महायु*द्धात अनेकांचा हकनाक बळी गेला. कितीतरी भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले, पण भारताच्या मातीवर केलेल्या या ह*ल्ल्याची आठवण मद्रासचे रहिवाशी कधीच विसरणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.