आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आजवर उंच आकाशात भरारी मारणारा पक्ष्यांचा राजा असेच गरुडाचे वर्णन सर्वसामन्यांच्या ओळखीचे. संस्कृतमध्ये याला ‘वैनतेय’ वगैरे नाव देऊन चांगला भारदस्तपणासुद्धा आणला आहे. पक्ष्यांचा राजा याशिवाय भगवान विष्णूचे वाहन म्हणून देखील गरुड हा पक्षी भारतात प्रसिद्ध आहे. गरुडाच्या जन्माचीसुद्धा एक छान कथा आपल्या पुराणात सांगितली आहे.
सूर्याचा रंग कोणता या पैजेत नाग लोकांच्या कारस्थानामुळे विनिता हीला नागमाता कद्रूचे दास्यत्व पत्करावे लागले. या गुलामीतून सुटण्याची एकच अट आणि ती म्हणजे स्वर्गलोकातून नागांना अमृताचे कुंभ आणून द्यायचे.
पक्षीकुळात जन्मलेल्या या विनिताचा आणि कश्यप ऋषी यांचा सुपुत्र म्हणजे गरुड. आपली आई नागांच्या दास्यात आहे हे समजल्यामुळे गरुडाचे नागांशी अगदी जन्मापासूनचे वैर होते.
परंतु आईला सोडवायचे तर स्वगार्तून अमृतकुंभ आणून देणे गरजेचे होते त्यामुळे गरुडाने स्वर्गावर आक्र*मण केले आणि तेव्हा झालेल्या यु*द्धात इंद्राचा पराभव झाला. नंतर पुढे अशी अशी युक्ती करण्यात आली की गरुडाने तो अमृतकुंभ हा नागांच्या हवाली करावा आणि नागांनी ते अमृतप्राशन करण्याआधीच इंद्राने तो पळवावा. अर्थात या योजनेप्रमाणे सर्व घडून आले आणि गरुडमाता विनितेचीसुद्धा सुटका झाली तसेच देवांना त्यांचा अमृतकुंभ परत मिळाला.
‘गुरुमादाय उड्डीनः इति गरुडः’ म्हणजेच जड वस्तू उचलून उडणारा असा तो गरुड, असे गरुडाचे वर्णन महाभारतात आले आहे. पुढे गरुडाचे विष्णूंसोबतसुद्धा यु*द्ध झाले आणि यु*द्धानंतर झालेल्या तडजोडीत भगवान विष्णूंनी गरुडाला आपल्या ध्वजावर स्थान दिले आणि गरुडानेसुद्धा विष्णूचे वाहन होणे पत्करले. भारतात असणाऱ्या प्राचीन पुराणांमध्ये गरुडाची माहिती सांगणारे सबंध गरुड पुराण आहे.
भारतवर्षात गरुडाला फार मोठे स्थान आहे. अनेक प्राचीन राज्ये आणि त्यांचे राजे हे गरुडाची पूजा करत असत. आजमितीला भारतात गरुडाच्या अनेक मूर्ती आढळून येतात. काही मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहेत तर काही उभ्या.
महाराष्ट्रात वैष्णव परंपरेत तयार केलेल्या गरुडाच्या मूर्ती या दोन हातांच्या असून त्या सदैव हात जोडलेल्या स्थितीत म्हणजेच ‘अंजली’ मुद्रेत असतात.
बऱ्याच वेळा काही काही गरुड मूर्तीना चार हातसुद्धा असू शकतात. काही वेळा एक गुडघा टेकवून बसलेल्या स्थितीत तर काही वेळा उभ्या. पुण्यात सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिरात तर शिवापूर जवळील रांजे गावातील विष्णूच्या मंदिराबाहेर बसलेल्या अवस्थेतील गरुडाची मूर्ती या अत्यंत पाहण्यासारख्या आहेत.
गरुडाची उभी मूर्ती देवळात तरी माझ्या पाहण्यात नाही आलेली किंवा आली असेल तरी आज विस्मृतीमध्ये गेली आहे परंतु आमच्या घरच्या देव्हाऱ्यात दोन हात जोडून उभी असलेली गरुडाची मूर्ती आहे आणि तिची नित्यनियमाने पूजासुद्धा केली जाते. शक्यतो वैष्णव मंदिरात देवाच्या बाजूला उभ्या स्वरुपाची गरुड मूर्ती पाहण्यास मिळते.
असा हा भारतात असलेला गरुड या पक्ष्याचा प्रवास.
अर्थात वरील पौराणिक कथेवरून गरुडाचा आणि भारतातील गंडभेरुंडाचा तसा थेट संबंध समजत नसला तरी या दोन पक्ष्यांमध्ये सार्धम्य असावे असे मनोमन वाटते. इ.स. १०३१ मधील म्हणजेच चालुक्यकाळातील एका शिलालेखात चालुक्यांचा राजा याचा नामोल्लेख हा भेरुंड आणि गरुड अशा दोन्ही अर्थाने येतो. हाच काय तो त्यातल्या त्यात जवळ जाणारा पुरावा.
भारतातील पुराणामध्ये गरुडाला नेहमी सापावर अंकुश ठेवताना पाहिले गेले आहे किंवा पूजले गेले आहे. पण गंडभेरुंडच्या शिल्पांमध्ये साप कुठेच नजरेस पडत नाही. जरी गंडभेरुंडाची नखे ही गरुडासारखी तीक्ष्ण असली तरी या दोन पक्ष्यांमध्ये खरच साम्य आहे का हा थोडा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो.
संदर्भ- भारतीय मुर्तीशास्त्र – नि. पु. जोशी
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.