त्या वेळच्या मिस इंडियासुद्धा गार्डन वारेलीच्या साड्या नेसायच्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


साडी म्हणजे भारतीय स्त्रीचा जीव की प्राण. कोणत्याही वयातील स्त्रीला साडीचे एक स्त्रीसुलभ आकर्षण असतेच. साडीत स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. पूर्वी सर्रास सुती आणि नऊवारी साड्या नेसल्या जात असत. त्यानंतर सहावरी साडी नेसण्याची पद्धत आली. रंग, डिझाईन, कपड्याचा पोत अशी व्हरायटी फारशी प्रचलित नव्हती.

८०च्या दशकात मध्यमवर्गीय महिला घरातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड करत होत्या. गृहिणी सोबतच नोकरदार बनण्यासाठीची तारेवरची कसरत सुरु होण्याचा हा काळ. अशावेळी खादीच्या, एकरंगी, साड्यांत व्यक्तिमत्व जास्त खुलून दिसत नसे. अशा महिलांना आपल्या व्यक्तीमत्वात आकर्षक भर घालण्यासाठी काही तरी नवे, स्टायलीस्टिक हवे होते.

अशा काळात गार्डन वरेलीच्या साड्यानी भारतीय महिलांची ही गरज ओळखत बाजारात पदार्पण केले. तसे या कंपनीची सुरुवात सत्तरच्या दशकात झाली होती. पण, ८० च्या दशकात जेंव्हा मिस इंडियाचा किताब जिंकलेल्या चार मॉडेल्सवर चित्रित झालेली जाहिरात टीव्हीच्या पडद्यावर झळकू लागली तेंव्हा या ब्रँडने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.

नम्रता शिरोडकर, मधु सप्रे, ऐश्वर्या राय आणि लिसा रे या चौघींवर या ब्रँडची जाहिरात चित्रित झाली होती. या चौघींच्या आकर्षक देहबोलीतून जे भाव व्यक्त होत होते ते प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या प्रेमात डुंबण्याचा आनंद काय असतो हे शिकवणारे होते.

या साड्या अतिशय हलक्या-फुलक्या, त्यावर फुलापानांची मोठाली आकर्षक नक्षी आणि तितकीच देखणी रंगसंगती, यामुळे तर या साड्या लवकरच स्त्रियांच्या पसंतीस उतरल्या. वजनाला हलक्या असल्याने या साड्या नेसायला सोप्या होत्या. शिवाय उठावदार रंगसंगतीमुळे या साड्या नेसणाऱ्या स्त्रीचे व्यक्तिमत्वही खुलत होते.

गार्डन वरेलीची ही खासियतच होती की, सर्व वयोगटातील स्त्रियांना या ब्रँडची साडी नेसायला खूप आवडत असे. हलक्या-फुलक्या, नेसायला आणि वागवायलाही सोप्या असल्याने नोकरदार महिलांमध्ये तर या साड्यांविषयी खूपच क्रेझ होती.

सुती आणि सिल्कच्या साड्यांपेक्षा या साड्यांची काहीतरी वेगळी खासियत दाखवून देणे हे या जाहिरीतीचे मुख्य लक्ष होते. साड्यांच्या जाहिरातीत नेमका काय वेगळेपणा दाखवणार? तरीही जाहिरात निर्मात्यांनी हे आव्हानही स्वीकारले.

जाहिरातीचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या जाहिरातीसाठी घेतलेली स्टारकास्ट. या जाहिरातीत काम करणाऱ्या मॉडेल्स बऱ्यापैकी लोकप्रिय होता. ज्या पद्धतीने या स्त्रियांनी ही साडी नेसली आहे आणि त्यासोबत घातलेल्या ब्लाउजच्या वेगवेगळ्या डिझाईन्स हिच या जाहिरातीची बलस्थाने ठरली.

त्यातही या साड्यांवरील नक्षी, त्यावरील प्रिंट, कलरफुल डिझाईन या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या, ज्यामुळे या साड्यांची महिलावर्गात क्रेझ निर्माण झाली.

जाहिरातीत दाखवल्या गेलेल्या मॉडेल्सनी साड्या नेसल्या असल्या तरी त्यांची वेशभूषा अजिबात पारंपारिक आणि जुनाट वाटत नाही. त्यांची देहबोली आधुनिक कळशी सुसंगत आणि बोल्ड वाटते. या स्त्रिया साध्यासुध्या स्त्रिया नसून आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणि आपले लक्ष सध्या करण्यात यशस्वी ठरलेल्या स्त्रिया वाटतात.

मार्केटमधील इतर साड्यांची जाहिरात पारंपारिक चौकटीत अडकली असताना, गार्डन वारेलीने नेमका धागा पकडत भारतातील मध्यमवर्गीय स्त्रीची नस अचूक पकडली. जिला जुनाटपणातून बाहेर पडायचे आहे. तिच्याकडे आपल्या मूल्यांना धक्का न लावता आपले स्थान निर्माण करण्याची जिद्द आहे.

चांगल्या जाहिरातींनी फक्त ब्रँडची विक्री वाढावी यासाठीक खटाटोप करायचा नसतो तर, नवी मुल्ये आणि त्यासोबत ब्रँड अशी सांगड घालत ग्राहकाला आकर्षिक करायचे असते. या जाहिरातीने ही किमया अचूक साधली होती. या जाहिरातीने स्त्रीच्या अलवार भावना मांडताना त्याला कुठेही अश्लीलतेचा स्पर्श होणार नाही याचीही खबरदारी घेतली होती.

स्त्री ही दररोजच्या जीवनात कुणाची तरी पत्नी, आई, बहिण, मुलगी, सून असते. त्या-त्या नात्यांच्या बंधनातून येणारी कर्तव्ये निभावताना तिला स्वतःचाही काही काळ विसर पडलेला असतो. हीच गोष्ट अधोरेखित करत या जाहिरातीत या स्त्रिया एकट्या आणि स्वतःच्या विश्वात मग्न असलेल्या स्वतःच्याच संगतीत त्या क्षणाचा आनंद लुटत असलेल्या दाखवण्यात आल्या.

त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद आणि स्वप्नपूर्तीची अद्भुत छटा आहे. नात्यांच्या बंधनात अडकून नवनव्या भूमिका निभावण्या आधी ‘ती’, ‘ती’ आहे. स्त्रियांच्या दडलेल्या स्वला जागृत करण्याचे काम या जाहिरातीने केले.

जाहिरातीत ब्लाउजचेही विविध प्रकार दाखवण्यात आले, ज्यात अल्टर नेक किंवा बॅकलेस अशा डिझाईन्सचा समावेश होता. रोजच्या त्याच त्याच प्रकारच्या ब्लाउजच्या फॅशनपासून हटके काही तरी दाखवण्यात आले होते. हा एक महत्वाचा बदल होता.

साडी तर आकर्षक असलीच पाहिजे पण, त्यासोबत ब्लाउजची डिझाईनही किती महत्वाची आहे, ही एक दुर्लक्षित कंगोरा या जाहिरातीने नकळतपणे अधोरेखित केला. या साडीने ८०-९० च्या दशकात बाजारपेठेत चांगलाच जम बसवला होता. पण, हळूहळू या क्षेत्रात प्रतिस्पर्धी वाढत गेले.

बदलत्या काळाप्रमाणे फॅशन स्टेटस ही बदलत गेले. साडीतून महिला सलवार कमीज, चुडीदार अशा बदलत्या आणि कालसुसंगत पोशाखात दिसू लागल्या. १९९५ साली या साडीची जाहिरात टीव्ही बंद झाली. आजही हा ब्रँड सुरु आहे, पण त्याचे अस्तित्व आज खेड्यापाड्या पुरते संकुचित झाले आहे.

साडीची जाहिरातच मुळात शहरी मध्यमवर्गीय, नोकरदार महिलेला समोर ठेवून करण्यात आली होती. शहरी महिलांची पसंती बदलत गेली तसतसे या साडीचा खपही खालावत गेला. फॅशनच्या दुनियेत कधीच एकाच ब्रँडची मक्तेदारी राहू शकत नाही. हेच यातून सिद्ध झाले.

खप कमी झाल्याने कंपनी तोट्यात गेली. जाहिरात बंद पडली. कंपनीने साड्यांच्या निर्मिती ऐवजी आता इतर व्हरायटीचीही निर्मिती सुरु केली असली तरी, एकेकाळी कंपनीची जशी भरभराट होती, तशी आता पाहायला मिळत नाही.

सध्या तर या कंपनीला प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कंपनीवर ५४ कोटींचे कर्ज असल्याने गेल्याच वर्षी या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती.

मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये आत्मविश्वास जागे करण्याऱ्या या कंपनीच्या साडीच्या जाहिरातींच्या आठवणी मात्र, प्रेक्षकांच्या मनात आजही ताज्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!