आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बेनिटो मुसोलिनी हा फॅसिझम या अत्यंत विखारी विचारधारेचा प्रवर्तक म्हणून जगभरात विख्यात आहे. १९२२ – १९४३ या दीर्घ कालखंडात त्याने इटलीवर आपली एकाधिकारशाही प्रस्थापित केली होती. इटलीतील क्रांतिकारी जमावाने २९ एप्रिल १९४५ साली त्याला आणि त्याची प्रेयसी क्लेरेटा पेट्रीसी यांना गोळी घालून संपवले होते. मिलान येथील पिझाले लोरेटो येथे दोघींचे प्रेत उलटे टांगले होते.
इटलीला दुसऱ्या महायु*द्धात जर्मनीच्या बाजूने यु*द्धात उतरवण्यात मुसोलिनीची भूमिका मोठी होती.
पण हाच मुसोलिनी एकेकाळी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विस्टन चर्चिल आणि जॉर्ज बर्नार्ड शो इत्यादी मान्यवर लोकांचा अत्यंत आवडीचा नेता होता.
इतकंच नाही, गांधी आणि टागोर यांना मुसोलिनीने आपल्या प्रचारासाठी इटलीला आमंत्रण दिलं होतं.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे हि*टल*रप्रमाणेच मुसोलीनिशी देखील मैत्रीपूर्ण संबंध होते. १९४१ -१९४३ ह्या कालखंडात सुभाषबाबूंची मुसोलीनिशी मैत्री होती. जेव्हा काबुलमधून सुभाषबाबू ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटले, त्यावेळी त्यांनी ओर्लांडो माझोटा हे इटालियन नाव धारण करून जर्मनीची राजधानी बर्लिन येथे प्रवेश मिळवला होता.
१९२५ साली मुसोलिनीने आपल्या फॅसिस्ट विचारसरणीच्या दोन प्राध्यापकांना रवींद्रनाथ टागोरांच्या विद्यापीठाला भेट देण्यासाठी पाठवले. कार्लो फोमिंची आणि ग्युसीपे तुसी असे ह्या दोन प्राध्यपकांची नावे होती.
विश्वभारती विद्यापीठाला भेट देण्यासाठी आलेले हे दोन प्राध्यापक सोबत मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा संच देखील घेऊन आले होते.
त्यांच्या भेटीमुळे टागोर प्रभावित झाले आणि त्यांच्या मनात मुसोलिनीची भेट घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि १५ मे १९२६ साली टागोर इटलीतील नेपल्स येथे मुसोलिनीला भेटण्यासाठी गेले होते. इटलीला पोहचल्यावर ते मुसोलिनीच्या आतिथ्याने टागोर भारावून गेले होते.
टागोर यांनी मुसोलिनीला भेटण्याअगोदर मुसोलिनीचा एक ऐतिहासिक महापुरुष म्हणून गौरव केला होता.
नेपल्सहुन एका वेगळ्या रेल्वेने त्यांना इटलीची राजधानी रोम येथे मुसोलिनीच्या भेटीसाठी नेण्यात आले होते. मुसोलिनीची भेट घेतल्यावर रवींद्रनाथ टागोरांनी त्याचे वर्णन करतांना लिहले आहे की मुसोलिनी हा एक जिवंत उदारतेचा पुतळा असून त्याच्या आत्म्याची जडणघडण देखील स्वतः ईश्वराने केल्याची प्रचिती मला झाली आहे.
मुसोलिनीसमोर त्यांनी ‘मिनिंग ऑफ आर्ट’ ह्या विषयावर भाषण देखील दिलं होतं. हे भाषण दिल्यावर त्यांनी इटलीचा राजा तिसरा व्हिकटोर इमॅन्युएल याची भेट घेतली आणि इटलीच्या फ्लोरेन्स शहरात काही काळ घालवून ते पुढे जिनिव्हाला गेले.
जिनिव्हाला त्यांची भेट रोमन रोनाल्ड ह्या लेखकाशी झाली, ह्या लेखकाने रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या भाषणाचा आणि वक्तव्याचा इटलीतील फॅसिस्टांनी कसा गैरवापर केला हे लक्षात आणून दिले. रवींद्रनाथ टागोरांना हे ऐकून धक्का बसला होता. त्यांना त्यांच्या हातून घडलेली चूक लक्षात आली होती.
पुढे रवींद्रनाथ टागोरांनी लिहलं आहे की त्यांचं दुर्दैव होतं की ते इटलीला गेले आणि अशा माणसाशी संबंध प्रस्थापित केले जो एक ठग आहे.
प्रत्यक्षात आणि जगासमोर अशी दोन रूपे या ठगाने उभी केली आहे. मी कुठलाही विचार न करता या माणसाच्या जाळ्यात अडकलो, मला याचा कायम पश्चाताप होत राहील. इटलीतील आपल्या भेटीनंतर त्यांनी जरी आवेग व्यक्त केलेला असला तरी व्हायचे ते नुकसान झालेले होते.
दुसरी गोलमेज परिषद झाल्यावर १९३१ साली महात्मा गांधी जिनिव्हाला गेले आणि त्यांनी रोमन रोनाल्ड यांची भेट घेतली. रोमन रोनाल्ड यांनी महात्मा गांधींच्या आयुष्यावर एक छोटेखानी चरित्र १९२४ साली लिहलं होतं, ज्याला स्वतः गांधीजींची स्वीकृती होती.
रोनाल्ड ह्यांना भेटल्यावर गांधी यांनी त्यांच्यासमोर इटलीला जाण्याची व मुसोलिनीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण रोनाल्ड यांनी गांधींच्या प्रस्तावच तीव्र विरोध केला, त्यांनी गांधींना विनंती केली की त्यांनी मुसोलिनीची भेट घेऊ नये, तो त्यांच्या चांगुलपणाचा वापर करून घेईल जसा त्याने रवींद्रनाथ टागोरांचा केला होता.
पण महात्मा गांधी यांनी आपला हट्ट सोडला नाही. ते रोनाल्ड यांनी त्यांना त्या देशातील पत्रकार देखील फॅसिस्ट असतात, हे समजवुन सांगण्याचा प्रयत्न देखील केला पण गांधींनी हट्ट सोडला नाही.
गांधी मिलानला गेले त्याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. टागोरांप्रमाणे गांधींसाठी देखील स्पेशल रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ट्रेनने ते रोमला गेले. रोनाल्ड यांचे मित्र जनरल मॉरिस मोंन्टे यांच्याकडे गांधींच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती.
गांधींनी व्हॅटिकनच्या पोप यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण पोपने गांधीना भेटण्यास इन्कार दिला.
पुढे मुसोलिनीने २० मिनिटांसाठी गांधींची भेट घेतली. त्याने गांधींना भारताच्या राजकीय भविष्याविषयी अनेक प्रश्न विचारले. त्याने गांधींचे जंगी स्वागत केले तसा त्यांना शाही निरोप दिला. गांधींनी व्हॅटिकच्या लायब्ररीत अनेक तास घालवले.
त्यांनी मादाम मॉंटेसरी शाळेला भेट दिली आणि फॅसिस्ट पार्टीच्या सचिवाची देखील भेट घेतली.
गांधींनी इटलीत जी काही वक्त्यव्ये केली, त्या वक्तव्यांचा आधार घेऊन फॅसिस्ट पार्टी आपला प्रोपागंडा चालवत होती.
त्यांनी गांधींना फसवून त्यांच्या विधानातील अहिंसेचा तत्वांना बगल देऊन फॅसिस्ट राजवटीला जे सोयीचे त्या सर्व गोष्टींचा उल्लेख असलेली वक्तव्ये आपल्या ‘जनरले इटली’ ह्या प्रसिद्ध वृत्तपत्रात छापली होती.
गांधी मुसोलिनीची भेट घेऊन झाल्यावर रोनाल्ड यांना लिहलेल्या पत्रात मुसोलिनीविषयी गौरवोद्गार काढत म्हणाले होते की मुसोलिनी हा खरंच एक राष्ट्रभक्त नेता असून तो जे काही करत आहे, त्याचा जो काही मार्ग आहे त्यामागे आपल्या जनतेप्रतीची अपार निष्ठा आणि प्रेमाची भावना आहे.
तो एक सच्चा नेता असून मुसोलिनीच्या राजवटीविषयी इटालियन जनतेत असलेल्या प्रेम भावनेचा मी साक्षी आहे.
महात्मा गांधींच्या ह्या वाक्यांवरून ते मुसोलिनीच्या राजवटीने किती भ्रमित झाले होते, हे दिसून येते. गांधींनी केलेल्या काही अक्षम्य चुकांपैकी ही एक चूक होती.
पुढे पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या दिवंगत पत्नीच्या अस्थींना घेऊन भारतात यायला निघाले असता, रोमला गेले होते. रोमहून नेहरूंचे विमान भारताच्या दिशेने झेपावणार होते.
नेहरूंची भेट घेण्यासाठी मुसोलिनीने त्यांना आमंत्रण धाडले पण नेहरूंचा त्यांचा एका अधिकाऱ्यासमवेत वाद झाला आणि त्यांनी मुसोलिनीला भेटायला नकार दिला होता.
डॉ. मुंजे, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ह्या नेत्यांनी मुसोलिनी या विखारी फॅसिस्ट विचारधारेच्या प्रमुखाची भेट घेतली होती. मुसोलिनीने ह्या भारतीय नेत्यांचा अपप्रचारासाठी विशेष वापर करून घेतला होता. याची नोंद इतिहासात झाली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.