आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच आजचं युग हे स्मार्टफोन्सचं युग आहे. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच. सगळी बहुतेक कामं आपल्याला घरबसल्या करता येतात. या मध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेटचा मोठा वाटा आहे. समाजातील अगदी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गाकडेही आपल्याला स्मार्टफोन्स असल्याचं दिसून येतं.
कोविड-१९ची साथ आणि लॉकडाऊन यांमुळे तर शिक्षणासाठीही स्मार्टफोन असणं आवश्यक बनलं आहे. थोडक्यात, स्मार्टफोन ही आता एक “गरज” बनलेली आहे. असं असलं तरी भारतात अशी अनेक कुटुंबं आणि व्यक्ती आहेत ज्यांना स्मार्टफोन परवडत नाहीत, पण गरज असते.
मग यावर उपाय म्हणून जियो सह अनेक कंपन्यांनी परवडणारे स्मार्टफोन्स बाजारात आणायला सुरुवात केली. जियो वगळलं तर बाकी कोणत्याही कंपन्यांचे परवडणारे स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत विशेषत्वाने चालले नाहीत. पण पाच वर्षांपूर्वी एका महाशय आणि तथाकथित उद्योजकाने परवडणाऱ्या स्मार्टफोन्सची घोषणा केली.
परवडणारे स्मार्टफोन्स म्हणजे फक्त २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन्स देण्याचा त्याने दावा केला. ‘फ्रीडम २५१’ हा स्मार्टफोन फक्त २५१ रुपयांच्या किमतीत भारतामध्ये विक्रीसाठी देण्यात आला होता. हे स्मार्टफोन्स रिंगिंग बेल्स प्रायवेट लिमिटेडद्वारे विकण्यात आले आणि “जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन” म्हणून त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात आली.
कंपनीने फ्रिडम-२५१ च्या उदघाटनप्रसंगी अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवली होती, यामध्ये भारताचे तत्कालीन रक्षामंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांचं सुद्धा नाव होतं, तसेच मध्यप्रदेशातील काही राजकीय नेत्यांची नावंही यात होती. प्रत्यक्ष मात्र मनोहर पर्रीकर या उदघाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. पण अशा बड्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे म्हटल्यावर ही योजना अस्सल असणार या भ्रमात राहून सुमारे ३० हजार ग्राहकांनी या स्मार्टफोनचं प्री-बुकिंग केलं होतं. कंपनीच्या मते यांतील बहुतांश ग्राहकांना स्मार्टफोन पोहोचला होता तर ज्यांना स्मार्टफोन अद्याप पोहोचला नाही त्यांना त्यांचे पैसे परत देण्यात आले होते.
केवळ १८ ते २१ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ऑनलाईन बुकिंगद्वारे मर्यादित काळासाठी “प्रमोशनल” किंमत देण्यात आली होती. त्यामुळे वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढून पहिल्याच दिवशी क्रॅश झाली. कंपनीने जून २०१६ पर्यंत ५० लाख फोन विकण्याची योजना आखली होती. ज्यावेळी वेबसाइट क्रॅश झाली, त्या वेळी त्याने २५१ रुपयांच्या किंमतीच्या फोनसाठी फक्त ३० हजार बुकिंग्स घेतल्या होत्या.
पण स्मार्टफोन २५१ रुपये इतक्या कमी किंमतीत कसा विकला जाऊ शकतो अशी शंका इंडियन सेल्युलर असोसिएशनने व्यक्त केली आणि तत्कालीन दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले. इंडियन सेल्युलर असोसिएशनच्या मते, अनुदानित विक्रीसह, स्मार्टफोनची विक्री किंमत ३५०० रुपयांपेक्षा कमी नसावी.
उदघाट्नच्या वेळी रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने जो स्मार्टफोनचा नमुना प्रसारमाध्यमं आणि लोकांसमोर ठेवला होता, तो मूळ वितरित स्मार्टफोनच्या नमुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या मूळ प्रोटोटाइपचे स्वरूप पाहून ऍडकॉम उद्योगांनी रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडवर खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली होती. २० फेब्रुवारी २०१६ रोजी रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेड च्या कार्यालयांवर सरकारी कर्मचाऱ्यांनी छापे टाकले आणि या उत्पादनाकडे ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स सर्टिफिकेशन’चे प्रमाणपत्र का नाही याची चौकशी केली.
हा फोन चायनीज फोनसारखा असून त्याचं मूळ चिन्ह व्हाईटनरचा वापर करून लपवण्यात आलेलं आहे. मुख्य पडद्यावरील अँप्सच्या आयकॉनचे डिजाइन ॲपलच्या आयफोनमधून चोरलेले दिसतात. बर्याच लोकांनी हे फोन ऑनलाईन मागवले पण त्यांना कन्फर्मेशन ईमेल देखील मिळाला नाही.
भाजपचे खासदार किरीट सोमय्या त्यांनी दूरसंचार मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि इतर विविध मंत्रालयांनी कंपनीची चौकशी करण्याची विनंती केली. या गोंधळाच्या वातावरणाचा परिणाम म्हणून, कंपनीला पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करवून देणाऱ्या पेयुबीझने रिंगिंग बेल्सला पेमेंट रोखण्याचा निर्णय घेतला.
दूरसंचार मंत्रालयाने फोनवर अंतर्गत मूल्यमापन केल्यानंतर फ्रिडम २५१ नावाचे स्मार्टफोन्स २३०० ते २४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकले जाऊ शकत नाहीत हे स्पष्ट केले. गाझियाबादमधील अयम एन्टरप्राइझेसच्या मालकाने रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकावर अर्थात मोहित गोयलवर १६ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपांवरून पोलिसात तक्रार दाखल केली. याच आरोपाखाली मोहित गोयलला पोलिसांनी अटक केली. सध्या या कंपनीचे डोमेन कालबाह्य झाले आहे.
रिंगिंग बेल्सच्या मते त्यांनी ९ जुलै २०१६ पर्यंत ‘फ्रिडम २५१’ ची ५००० युनिट्स वितरित केली होती.
यानंतर अन्य आरोपींप्रमाणे त्याचीही जामिनावर सुटका झाली. पण २०१८ मध्ये त्याला पुन्हा खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर आता काही दिवसापूर्वीच गोयलला ड्रायफ्रूट व्यवसायातील फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. इंदिरापुरमस्थित विकास मित्तल याने गोयल आणि इतर पाच जणांविरोधात ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. १९ ऑगस्ट रोजी गोयलने मित्तलला कारचा धक्का मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेतच मित्तलने गोयलविरोधात तक्रार दाखल केली, आणि काही दिवसापूर्वीच पुन्हा गोयलला अटक झाली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.