भारताचे हे तीन राष्ट्रपती आपल्या मानधनाच्या फक्त तीस टक्के रकम घेत होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच डळमळीत झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सरकारी कामकाज सुरळीत होण्यासाठी सरकारला भरभक्कम आर्थिक निधीची गरज आहे. कारण, या महामारी विरोधात लढण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय योजल्यानंतर देशात महामारी पाठोपाठ बेरोजगारीचीही लाट आली आहे. अशा कठीण प्रसंगी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांनीही आपल्या वेतनातील ३०% भाग हा सरकारी तिजोरीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेतर सर्वच नेत्यांनी आणि खासदारांनी याचे अनुकरण केले पाहिजे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हा निर्णय स्तुतीस पात्र तर आहेच पण अनुकरणीयही आहे.

आज देश कोरोना महामारी आणि आर्थिक मंदी अशा दुहेरी संकटाशी लढत आहे, म्हणून आज आपल्या नेत्यांना आर्थिक मदत करण्याची गरज वाटते आहे.

परंतु यापूर्वीही आपल्या देशात असे तीन राष्ट्रपती होऊन गेले जे त्यांच्या वेतनातील ७०% भाग नित्यनेमाने सरकारी तिजोरीत जमा करत होते. तेही कुठलीही राष्ट्रीय आपत्ती नसताना. त्यांची इच्छा एवढीच होती की लवकरात लवकर भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा आणि एक मजबूत राष्ट्र म्हणून उभा राहावा.

मग कोण होते हे तीन राष्ट्रपती जे फक्त तीस टक्के वेतनावरच आपला घरखर्च चालवत होते?

यात तर पहिले येतात ते देशाचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद म्हणजे बिहारमधील एक बडी आसामी होते, बिहारमधील एक सुप्रसिद्ध वकील होते. त्याकाळी पटनाच्या अति महागड्या वकिलांत त्यांची गणना केली जात असे. पण महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. स्वातंत्र्य संगरात उडी घेतल्यानंतर तर त्यांच्या आयुष्याचे चित्रच बदलून गेले. राष्ट्रपती पदावर पोहोचूनही आपल्या व्यक्तिमत्वातील साधेपणा आणि नम्रता हे गुण त्यांनी सोडले नाहीत.

१९५० साली जेंव्हा ते देशाचे राष्ट्रपती बनले तेंव्हा तर दिल्लीतील त्या भल्या मोठ्या व्हाईसरॉय हाउसमध्ये राहायला जाण्यासही त्यांचे मन कचरत होते. परंतु त्यांनी या भवनात प्रवेश केला आणि व्हाईसरॉय हाउसचे रुपांतर राष्ट्रपती भवनात झाले. तेंव्हा राष्ट्रपतींना फक्त १० हजार रुपये महिना वेतन मिळत असे. राजेंद्र प्रसाद यातील केवळ ५०% वेतनच घेत असत. उरलेली रक्कम ते सरकारी तिजोरीत जमा करत. नंतरच्या कार्यकाळात तर त्यांनी आपले वेतन आणखीन कमी केले. तेंव्हा तर ते या पगारातील फक्त २५% रक्कमच स्वीकारत असत.

त्यांच्याकडे नोकर चाकरांची रेलचेलही नव्हती. जोपर्यंत ते राष्ट्रपती भवनात राहिले तोपर्यंत त्यांच्या खाजगी स्टाफमध्ये फक्त एकच व्यक्ती नेमण्यात आली होती. राष्ट्रपती असूनही ते नेहमी जमिनीवर बसूनच जेवत असत. त्यांचे जेवण करण्यासाठी कुणी आचारी नव्हता, त्यांच्या पत्नीच सगळा स्वयंपाक करायच्या.

जेंव्हा त्यांच्या नातवंडांचे लग्न झाले तेंव्हा लग्नासाठी आलेल्या पाहुण्याकडून एकही भेटवस्तू स्वीकारली नाही. त्यांचे नातेवाईक आणि परिचित मित्रपरिवार भेटवस्तू घेऊन आले होते. पण, त्यांनी नम्रतेने या साऱ्या वस्तू घेण्यास नकार दिला.

त्यांच्या नातींच्या लग्नातही त्यांनी स्वतः विणलेल्या खादीच्या साड्या त्यांना भेट म्हणून दिल्या. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते पटणा येथे परत गेले आणि अत्यंत साधेपणाने उर्वरित आयुष्य व्यतीत केले.

अशीच साधी राहणी जोपासणारे दुसरे राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी. हे आंध्रप्रदेशचे होते. आंध्रप्रदेश जेंव्हा स्वतंत्र राज्य झाले तेंव्हा ते आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. ते एका जमीनदार कुटुंबातील होते. नंतर त्यांनी आपल्या मालकीची साठ एकर जमीन सरकारला दान करून टाकली.

नीलम संजीव रेड्डी हे १९७७ मध्ये राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. ते भारताचे सहावे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती भवनात राहायला जाताना आपल्यासोबत अत्यंत कमी सामान असेल याची त्यांनी पूरेपर काळजी घेतली. नीलम संजीव रेड्डी देखील आपल्या पगारातील ७०% हिस्स्याची कपात करत आणि उरलेली रक्कम पगारापोटी स्वीकारत. कपात केलेला हा हिस्सा ते सरकारी तिजोरीत जमा करत असत. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर जेंव्हा राष्ट्रपती भवनातून निघण्याची वेळ आली तेव्हाही त्यांच्यासोबत अगदी मोजकेच समान होते.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन तर शिक्षणतज्ञ होते, दार्शनिक होते, विचारवंत होते. परंतु ते देखील आपल्या सध्या राहणीमानासाठीच ओळखले जात. डॉ राधाकृष्णनदेखील आपल्या पगारातील फक्त २५% हिस्सा स्वीकारत आणि उरलेला सगळा भाग ते सरकारी तिजोरीत जमा करत. त्यातही प्राप्तीकराची रक्कम कापून घेतल्यावर त्यांच्यासाठी फक्त १९०० रुपयेच शिल्लक राहत असत. एवढ्या रकमेतच ते आपल्या महिन्याचा खर्च भागवत असत. १९६२ ते १९६७ या काळात ते राष्ट्रपती पदावर राहिले. हा काळ देशासाठी खूपच खडतर काळ होता. याच दरम्यान भारताला दोन मोठ्या युद्धांना तोंड द्यावे लागले होते.

डॉ. राधाकृष्णन जेंव्हा परदेश दौऱ्यावर जात तेंव्हाही त्यांच्यासोबत अगदी कमी लोक असत. त्यात नातेवाईक तर कुणीच नसे. राष्ट्रपती भवनातील त्यांचे राहणीमानही अगदी साधे होते. त्यांचा खर्च अगदी कमी होता. त्यांच्या खाजगी स्टाफमध्ये फक्त दोनच व्यक्तींना नेमण्यात आले होते. 

त्यांना प्रवासासाठी सरकारी कार देखील देण्यात आली होती. पण, त्यांनी कधीच या सरकारी कारचा वापर केला नाही. प्रवासासाठी ते नेहमीच स्वतःची खाजगी कार वापरत असत.

देशावर कुठले संकट आले म्हणून किंवा देशाला गरज होती म्हणून नव्हे तर या नेत्यांनी फक्त आपल्या गरजेपुरताच सरकारी पैसा वापरायचा या धोरणाने स्वतःहून आपल्या पगारात ही कपात केली. सरकारी सोयीसुविधा फुकटात मिळतात म्हणून उगाच तामझाम केला नाही की कधी आपल्या पदाचा बडेजाव केला नाही. देशाचा पैसा हा सामान्य जनतेच्या करातून येतो आणि तो योग्य पद्धतीनेच खर्च केला जावा हीच त्यांची धारणा होती. या नेत्यांनी स्वतःला कधीही देशाहून मोठे मानले नाही, हेच त्यांच्या या कृतीतून लक्षात येते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!