आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात क्रिकेटला धर्म मानतात आणि खेळाडूंना देव! कोट्यावधी लोकांच्या गर्दीतून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी शेकडो नवोदित खेळाडू झगडत असतात. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून मुख्य संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, जर तुम्ही खेळत असलेली स्थानिक टीम देखील काहीशी कमजोर असेल तर तुमचा राष्ट्रीय संघातील रस्ता नक्कीच थोडा आणखी कठीण होतो.
आंध्र प्रदेशच्या क्रिकेट संघामध्ये असाच एक मुलगा होता. त्याच्यात कमालीची प्रतिभा होती. कठोर परिश्रम करून तो प्रवाहाच्या विरोधात जाण्यात यशस्वी ठरला. त्यानं केवळ आपल्या कामगिरीच्या बळावर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं.
तो काही काळातच एक चपळ यष्टीरक्षक आणि एक विश्वासार्ह फलंदाज झाला होता. मात्र, मिळालेल्या संधीचा दीर्घकाळ फायदा घेणं त्याला शक्य झालं नाही. हा मुलगा होता एम एस के प्रसाद!
राष्ट्रीय संघात आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करणं अशक्य झाल्यानंतर प्रसाद यांनी निवृत्ती स्वीकारून भारतीय क्रिकेट नियामक मंडळात प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांची कारकीर्द वादळी राहिली. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळं वाद निर्माण झाले होते. अशा या एम एस के प्रसाद यांचा जन्म २४ एप्रिल १९७५ रोजी आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील मेडीकोन्डरू या लहानशा गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
मन्नावा श्रीकांत प्रसाद असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आंध्र प्रदेशच्या संघामध्ये स्थान मिळवलं. प्रसाद उजव्या हाताचा फलंदाज आणि विकेट किपर होता. कनिष्ठ स्तरावर खेळत असतानाचं त्यानं आपल्या किपिंगद्वारे सर्वांचं लक्ष वेधून घेतल होतं. त्यानंतर तो आंध्रच्या रणजी संघात आला.
रणजीमध्ये चांगली कामगिरी केल्यानं भारत ‘अ’ संघात त्याला प्रवेश मिळाला. १९९७-९८ मध्ये त्यानं इंडिया ‘अ’ संघासोबत पाकिस्तानचा दौरा केला. तिथं आपल्या खेळानं त्यानं प्रशिक्षक क्रिस श्रीकांतचं लक्ष वेधून घेतलं. क्रिस श्रीकांतनं त्याच्या क्षमतेचं कौतुक केलं. यादरम्यान प्रसादची फलंदाजीही कमालीची सुधारली. परिणामी, १९९८ मध्ये त्याला भारतीय संघाची प्रवेशद्वारं खुली झाली.
कोका-कोला तिरंगी मालिकेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. एम एस के प्रसादला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. यानंतर, तो पुढील सामना केनियाविरुद्ध खेळला. त्यात एका कॅचसह नाबाद ११ धावा त्याच्या नावावर नोंदवल्या गेल्या. नंतर मात्र, जवळपास एक वर्ष तो टीम इंडियाच्या बाहेर राहिला.
१९९९ मध्ये नशिबानं त्याची पुन्हा साथ दिली. विश्वचषकाच्या तोंडावर भारताचा पूर्णवेळ यष्टीरक्षक व फलंदाज असलेल्या नयन मोंगियाला दुखापत झाली. परिणामी त्याच्या जागी प्रसादला संघात बोलावण्यात आलं. त्यानंतर तो जवळपास एक वर्ष सलग टीम इंडियाचा भाग होता. या दरम्यान, त्यानं इवा कप, एलजी कप सारख्या स्पर्धांमध्ये विकेट किपींगची धुरा सांभाळली. मात्र, या काळात बॅटनं तो विशेष कमाल करू शकला नाही.
एलजी कपच्या अंतिम सामन्यात त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या ६३ धावा हे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अर्धशतक आणि सर्वोच्च धावसंख्या आहे. नोव्हेंबर १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तो आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. १७ सामन्यांच्या एकदिवसीय कारकीर्दीमध्ये प्रसादनं १४.५५ च्या सरासरीनं १३१ धावा केल्या. विकेटच्या मागे १४ झेल घेतले.
१९९९-२०००च्या हंगामात प्रसादनं कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. त्यानं न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामने खेळले. न्यूझीलंडविरुद्ध त्यानं चांगली कामगिरी केली मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा तो अपयशी ठरला. परिणामी भारतीय संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसाद खेळत राहिला. पुढे तो आंध्र संघाचा कर्णधारही झाला.
२००२-२००३चा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरला. एका वर्षात ११ सामने खेळून २ शतकं आणि ५ अर्धशतकांच्या मदतीनं ७५४ धावा केल्या. २००८मध्ये प्रसाद क्रिकेटमधून निवृत्त झाला.
क्रिकेट खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१५ मध्ये, त्याला साऊथ झोनचा प्रमुख म्हणून निवड समितीच्या पॅनलमध्ये सामील करण्यात आलं. एका वर्षानंतर, सप्टेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीनं दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तीन सदस्यीय निवड समितीचा अध्यक्ष म्हणून प्रसादची निवड झाली होती.
माजी अध्यक्ष संदीप पाटील यांच्याकडून प्रसादनं पदभार स्वीकारला होता. त्याच्या निवडीवर वाद झाले होते. प्रसादला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव जवळपास नसल्यात जमा आहे. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या निवडीवर टीकाच केली होती. मात्र, प्रसादनं कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी आपले संबंध चांगले केले. या त्रिकुटामुळं भारतीय संघाला मैदानावर अनेक ठिकाणी यश मिळालं.
निवड समितीचा अध्यक्ष म्हणून प्रसादची कारकीर्द गाजली. आपल्या कार्यकाळात चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७, इंग्लंडचा २०१८ चा दौरा, २०१८-१९ चा ऑस्ट्रेलिया दौरा आणि २०१९ चा विश्वचषकासारख्या काही हाय प्रोफाइल टूर्नामेंटसाठी संघ निवडण्याची संधी प्रसादला मिळाली. विश्वचषकासाठी अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत यांना डावलून विजय शंकरची केलेली निवड सर्वात वादग्रस्त ठरली. विजय शंकर देशातील सर्वोत्तम फास्ट बॉलिंग ऑल राउंडर्सपैकी एक आहे. त्याच्याकडे मधल्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मात्र, त्याला इंग्लंडमधील परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव नव्हता. तरी देखील प्रसादनं त्याची भारतीय संघात निवड केली होती.
माजी भारतीय क्रिकेटपटू फारुख इंजिनीअर यांनी एम एस के प्रसादच्या नेतृत्वाखालील निवड समितीची ‘मिकी माऊस निवड समिती’ अशी खिल्ली उडवली होती. निवडकर्त्यांच्या पात्रतेवरही फारुख यांनी प्रश्न उपस्थित केले होते. २०१९ वर्ल्ड कप दरम्यान निवड समिती विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला चहा देण्यात व्यस्त असल्याचा टोला देखील या माजी क्रिकेटपटूनं प्रसाद यांना लगावला होता. यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला. फेब्रुवारी २०२० मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर प्रसाद यांचा चार वर्षांचा करार संपला.
एक विकेट किपर म्हणून प्रसादकडे कमालीची क्षमता होती. मात्र, फक्त एका कौशल्याच्या बळावर मुख्य संघामध्ये तुमचा निभाव लागणं कठीण आहे, या गोष्टीकडं प्रसादनं दुर्लक्ष केलं. त्यामुळे एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांमध्ये संधी मिळून देखील प्रसादची कारकीर्द बहरली नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.