आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गांधी आणि नेहरू परिवाराबद्दल माहिती नसलेला माणूस भारतात शोधूनही सापडायचा नाही. याच राजकीय परिवारातील अनेक सदस्य पुढे देशाचे प्रधानमंत्री झाले. स्वातंत्र्यापूर्वी कोणत्याही राजकीय घराण्याची पार्श्वभूमी नसलेल्या या परिवाराला भारताच्या लोकशाही व्यवस्थेने आणि ती व्यवस्था जपणाऱ्या भारतीयांनी अनेक वर्षे पसंती दर्शवली. २०१४ च्या निवडणुकांनंतर मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मागे पडला आणि संसदेत विरोधी बाकांवर बसण्याची वेळ त्यांच्यावर आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी आपल्या वादग्रस्त तसेच हास्यास्पद विधानं आणि कृत्यांसाठी प्रसिद्ध आहेतच. एका भाषणात त्यांनी असेच वादग्रस्त आणि काही प्रमाणात अज्ञानामुळे एक विधान केलं. ते विधान होतं, “मी राहुल ‘गांधी’ आहे, राहुल ‘सावरकर’ नाही.”, यातून त्यांनी स्वतःला अहिंसावादी महात्मा गांधींचा वंशज असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण खरंच तसं आहे का? ते महात्मा गांधींचे वैचारिक वारसदार आहेत की नाहीत याचा निर्णय प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने करावा.
भारतातील बहुतांश लोकांना गांधी परिवारातील अनेक सदस्यांची नावे माहिती आहेत, त्यांचा इतिहासही माहित आहे. पण बहुतेकांना फिरोज गांधी किंवा फिरोज जहांगीर गॅंधी हे नाव माहित नसेल. एक असा खासदार, ज्याचे सासरे देशाचे पहिले प्रधानमंत्री होते, ज्याची पत्नी देशाची दीर्घकालीन प्रधानमंत्री होती आणि दोन मुलांपैकी एक राजीव गांधीसुद्धा देशाचे प्रधानमंत्री होते, असा माणूस मात्र इतिहासाच्या पानांत हरवला. त्यांना अन्य सदस्यांसारखी प्रसिद्धी किंवा महत्त्व मिळाले नाही.
फिरोज गांधी मूळचे गुजरातचे. धर्माने पारशी असलेले फिरोज, महात्मा गांधी आणि कमला नेहरू यांचे विद्यार्थी-अवस्थेपासूनच निकटवर्तीय होते. पुढे ते खासदार बनले. आपल्या वक्तृत्वाने ते संसद गाजवत. भ्रष्टाचाराचा भयंकर राग असलेल्या काही भारतीय नेत्यांपैकी ते एक होते. वेळप्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीच्या सरकारविरोधातही संसदेत भाषण केलं.
१९३० च्या दशकात प्रयागराजमधील ‘एवीन ख्रिश्चन कॉलेज’मध्ये फिरोज गांधी आणि कमला नेहरूंची भेट झाली. फिरोज गांधींना कमला नेहरूंच्या व्यक्तित्त्वाचे कौतुक वाटत. प्रयागराजमधील एवीन ख्रिश्चन कॉलेजमध्ये कमला नेहरू भाषण देत असताना फिरोज एका भिंतीवर बसून ते ऐकत होते, आणि अचानक नेहरू चक्कर येऊन पडल्या. फिरोज धावत त्यांच्याकडे गेले आणि एका विद्यार्थ्याने आणलेले ओले कापड त्यांनी नेहरूंच्या कपाळावर ठेवले. शुद्ध आली तेव्हा त्या आनंदवन या त्यांच्या आश्रमात होत्या आणि तेव्हापासूनच फिरोज जहांगीर गॅंधी यांचं नातं नेहरू घराण्याशी जुळलं.
त्यानंतर अनेक वर्षं फिरोज कमला नेहरूंबरोबर वावरत होते. एकदा फिरोजच्या आई रतीमाई प्रयागराजला असताना गांधीजींना भेटल्या. रतीमाईंनी आपलं गाऱ्हाणं गांधीजींना सांगितलं आणि त्यांना फिरोजला या सगळ्यातून बाहेर काढण्याची विनंती केली. जेणेकरून तो आपला अभ्यास पूर्ण करू शकेल. यावर गांधीजी म्हणाले फिरोजसारखी सात कार्यकर्ता मुलं जर मला मिळाली तर अवघ्या सात दिवसांत मी भारताला स्वातंत्र्य मिळवून देईल.
सत्तेच्या मोहापायी नेहरू घराण्याने गांधी आडनावाचा ‘कॉपीराइट’ घेतला असा आरोप त्यांच्यावर होत आला आहे. काही लोकांनी फिरोज गांधी हे गांधीजींचे दत्तक पुत्र असल्याचं सांगितलं. पण गांधींनी लिहिलेल्या १९४२ च्या हरिजन पत्रिकेत याचा कोठेही उल्लेख नाही. तसेच गांधींनी त्यांच्या आडनाव घेण्यावरून आक्षेप घेतला की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे. सत्तेपायी या आडनावाचा स्विकार केला गेला का? की हा निव्वळ योगायोग होता हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.
एम.ओ. मथाई हे जवाहरलाल नेहरूंचे सचिव होते. त्यांनी पंडितजींच्या जीवनावर आणि त्यांच्या कारकिर्दीवर ‘रेमिनीसन्स ऑफ द नेहरू एज’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात एक अध्यायच फिरोज गांधींना समर्पित आहे. या पुस्तकावर काही काळ बंदी देखील होती. आपल्या पुस्तकात फिरोज गांधींविषयी लिहिताना ते म्हणतात, “जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांना फिरोज आणि इंदिराचे लग्न व्हावे असे वाटत नव्हते.” यामध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या आणि फिरोज गांधींच्या तथाकथित नात्याबद्दल काहीही वर्णन केले नाही.
कमला नेहरूंबद्दल लिहिताना ते म्हणतात, “कमला नेहरू इंदिराच्या भविष्याबद्दल अत्यंत चिंतातुर होत्या. त्यांनी फिरोज आणि इंदिराच्या लग्नाच्या शक्यतेलाही स्पष्ट नकार दिला. त्यांच्यामते फिरोजच्या आयुष्यात स्थैर्य नव्हते. एखाद्या व्यवसायात जाऊन इंदिराला आधार देण्याइतकेही शिक्षण त्याच्याकडे नव्हते. कमला नानूकडे वळल्या आणि म्हणाल्या, ‘ते काय बोलले हे तुम्ही ऐकलं? इंदू माझ्याशिवाय आणखी कोणाचं ऐकणार नाही. मी इंदूला फिरोजपासून दूर नेलं असतं, पण माझा अंत जवळ आला आहे. जवाहर तिला काही समजावणार नाही आणि इंदू आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून बसेल.'”
पुढे १९४२ साली फिरोज आणि इंदिराचा विवाह झाला. या विवाहाला देशभरातून विरोध झाल्याचा दिसून येतो. या विवाहाच्या विरोधात गांधींना अनेक पत्रं आली. यावर गांधींनी १९४२च्या एका हरिजन पत्रिकेत लिहिले, “राग आणि द्वेषाने भरलेली अनेक पत्रं मला मिळाली. काही पत्रांमध्ये इंदिरा आणि फिरोजच्या विवाहाबद्दल मला जाब विचारला जात आहे. पारशी असणं इतकीच फिरोजची चूक आहे. लग्नासाठी धर्म परिवर्तनाच्या कायमच मी विरोधात राहिलो आहे. आपल्या मर्जीने बदलावा असा धर्म काही कपड्यांसमान नाही आणि यामध्ये धर्म बदलण्याचा प्रश्नच येत नाही. फिरोज गांधी खूप वर्षांपासून नेहरू परिवाराच्या जवळचे आहेत. आजाराच्या दिवसांत त्यांनी कमला नेहरूंची सेवा केली, ते त्यांच्या पुत्रासमान आहेत.”
फिरोज गांधींनी आपल्या दोन्ही मुलांना विज्ञान-तंत्रज्ञानाचे धडे दिले, यातूनच प्रेरित होऊन संजय आणि राजीव गांधींनी आपल्या आयुष्यात तसेच देशातही विज्ञान-तंत्रज्ञानाला चालना दिल्याचे सांगितले जाते. फिरोज आपल्या मुलांना खेळणी देत असत पण तोडून. ही तुटलेली खेळणी ते परत जोडायला सांगत असत.
बर्टिन फॉक लिखित पुस्तकामध्ये आलेल्या वर्णनानुसार माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या मते, फिरोज गांधींच्या मृत्यूपूर्वी काही दिवस ते निराश होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर म्हणतात, “फिरोज यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी मी त्यांना लखनऊमधील एका कॅफेत भेटलो, तिथे ते सिगारेट पीत असताना त्यांना कोणीतरी सांगितले की धूम्रपान तुमच्या तब्येतीसाठी हानिकारक आहे. त्यावर ते म्हणाले, जीवनात जगण्यासारखं काही राहिलं नाही.”
७ सप्टेंबर १९६० रोजी फिरोज यांना संसद भवनातच कामकाजाच्या वेळी हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतरही ते स्वतः गाडी चालवत विलिंगडर नर्सिंग होम येथे उपचारासाठी गेले. अनेकांच्या विरोधानंतरही त्यांनी स्वतःच गाडी चालवण्याचा निर्णय केला. ८ सप्टेंबर १९६० रोजी आयुष्यातील एकाकीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी मात्र जवळ जवळ सर्वधर्मियांनी प्रार्थना केल्या.
प्रयागराज (तत्कालीन अलाहाबाद) येथील पारशी स्मशानभूमीत त्यांची समाधी आहे. राजकारणातील गांधी घराण्याच्या या मूळ पुरुषाला त्यांचेच वंशज विसरल्यासारखे झाले आहे. त्यांच्या स्मृतिदिनी आणि जन्मदिनी काँग्रेसचे काही स्थानिक कार्यकर्तेच या समाधीवर येऊन त्यांना सन्मान देतात. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वड्रा हे त्यांच्याबद्दल क्वचितच सामाजिक माध्यमांवर लिहिताना दिसतात. केवळ धर्मावर आधारित राजकारणाला यश मिळावे यासाठी ‘फिरोज जहांगीर गॅंधी’ हे ‘फॉरगॉटन गांधी’ बनले आहेत हीच शोकांतिका!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.