आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
तुम्ही सर्वांनीच ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ पाहिलाच असेल, या चित्रपट मालिकेत जॅक स्पॅरोला जरी महत्त्व दिलेले असले, तरी काही भागांत ऑक्टोपससारखे मुंडके असलेला डेव्ही जोन्स हे एक अद्भुत पात्र दाखवले आहे. हा डेव्ही जोन्स एका जहाजाचा कप्तान असतो, त्या जहाजाचं नाव असतं फ्लायिंग डचमॅन!
फ्लायिंग डचमॅन आणि डेव्ही जोन्स या गोष्टी पाश्चिमात्य रहस्य साहित्यात प्रचंड प्रसिद्ध आहेत. तर नेमकं काय आहे हे फ्लायिंग डचमॅन प्रकरण. जाणून घेऊया या लेखातून. हे जग रहस्यमयी घटनांनी भरलेलं आहे. समुद्राने तर आपल्या पोटात हजारो प्रकारची रहस्ये सामावून घेतली आहेत. पृथ्वीवरील सर्वांत उंच पर्वताच्या उंचीपेक्षाही समुद्राची खोली अधिक आहे.
१८८१ मधील ११ जुलैच्या रात्री ब्रिटनचे जहाज एच.एम.एस. पिकांटे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळून नौकायन करीत होते. या जहाजावर जॉर्ज फ्रेडरिक आणि अर्नेस्ट अल्बर्ट म्हणजेच भविष्यातील भारताचा ब्रिटिश सम्राट जॉर्ज पंचम आणि त्याचा लहान भाऊ राजकुमार प्रिन्स अल्बर्ट वेक्टर हे दोघेही महत्वपूर्ण ब्रिटिश होते. पहाटे ४ वाजता एक अद्भुत घटना घडली. खलाशांसह तेथे उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी जहाजापासून थोड्या अंतरावर एक विचित्र लाल रंगाचा प्रकाश पहिला आणि त्यांना समुद्राच्या उसळलेल्या लाटांवर ‘फ्लायिंग डचमॅन’चे जहाज दिसले.
एच.एम.एस. पिकांटे जहाजावरील १३ कर्मचाऱ्यांनी हे भयाण दृश्य पाहिलं होतं. हे समजल्यावर धर्मगुरू त्या ठिकाणी पोहोचले, पण तेथे कोणतेही जहाज अथवा बोट नव्हती. त्याच सकाळी आणखी एक विचित्र घटना घडली.
एच.एम.एस. पिकांटे जहाजावरील ज्या कर्मचाऱ्याने पहिल्यांदा ‘फ्लायिंग डचमॅन’ पहिले होते, त्याचा जहाजावरील मधल्या आडकाठीवरून पडून मृत्यू झाला.
‘क्रुएल सी’ या पुस्तकाचे लेखक आणि ब्रिटिश आरमाराचे अधिकारी ‘निकोलस मोन्सारॅट’ यांनीही दुसऱ्या महायु*द्धादरम्यान प्रशांत महासागरात फ्लायिंग डचमॅनला पाहिल्याचे लिहिले आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायु*द्धादरम्यानच जर्मनीच्या पाणबुडीवरील सदस्यांनीही या फ्लायिंग डचमॅनचे वर्णन केले आहे. त्यांच्यामते त्यावेळी फ्लायिंग डचमॅन जहाज सुएझ कालव्यातून प्रवास करीत होते. युरोपियांशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या मूलनिवासींनी फ्लायिंग डचमॅन पाहिल्याचे सांगितले आहे.
पाश्चिमात्त्य साहित्यातून मोठ्या प्रमाणात फ्लायिंग डचमॅनच्या कथा समोर येतात. पण या रहस्यमयी कथांमागे एक वस्तुस्थितीही असल्याचे अनेक ग्रंथ आणि कथा स्पष्ट करतात. या कथांनुसार, कप्तान हँड्रिक वॅन डर डीकेनने १६४१ साली हॉलंडहून प्रयाण केले होते आणि त्याला जायचं होतं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर तसेच काही पूर्व आशियाई देशांमध्ये, जेणेकरून त्याला काही दुर्मिळ आणि महागड्या वस्तू मिळतील, आणि व्यापारात वृद्धी करता येईल.
आपला उद्देश पूर्ण करून तो हॉलंडला परतत होता. परतीच्या प्रवासात दक्षिण आफ्रिकेत एके ठिकाणी त्याच्या जहाजाने विश्रांती घेतली. हे जहाज दक्षिण आफ्रिकेतील एका बंदरावर थांबले होते. जहाजातील सदस्यांनी सर्व आवश्यक दुरुस्त्या आणि कामं करून घेतली. पण हँड्रिकच्या डोक्यात काही वेगळीच कल्पना सुरु होती.
त्याच्यामते केप ऑफ गुड होपजवळ एखादी वसाहत करून ये-जा करणाऱ्या जहाजांना विश्रांती आणि दुरुस्तीच्या कामांसाठी तेथे थांबता येईल, शिवाय आपला व्यवसायही उत्तम रीतीने चालेल. या विचाराने त्याने दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून थोडे उत्तरेकडे येण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
काही अंतरावर पुढे जाताच वादळ सुरु झाले. जहाजावरील सदस्यांनी कप्तानाला परत फिरण्याच्या विनवण्या केल्या, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. त्या वादळामध्ये जहाज हरवले आणि बहुधा समुद्रामध्ये बुडालेही. त्यानंतर कप्तान हँड्रिक वॅन डर डीकेन आणि त्याच्या जहाजावरील सदस्य हे कोणत्याही किनाऱ्यावर परतले नाहीत.
पण आजही अनेक खलाश्यांच्या आणि नौदल अधिकाऱ्यांच्या अनुभवानुसार, समुद्राच्या प्रचंड वादळ-वाऱ्यामध्ये अनेकांना हे फ्लयिंग डचमॅन दिसतं. अनेकांच्या मते, कप्तान हँड्रिक आणि त्याच्या जहाजावरील सदस्यांना समुद्र आणि महासागरांमध्ये फिरत राहण्याचा आणि कधीही किनाऱ्यावर न परतण्याचा शाप मिळाला आहे.
काही कथांनुसार कप्तान हँड्रिकच्या जहाजावर एक तरुण दाम्पत्यही होतं. या दाम्पत्याला हॉलंडला जायचं होतं. पण कप्तान त्या तरुणीच्या सौंदर्यावर भाळला आणि त्याने त्या तरुणीच्या साथीदाराचा निपटारा केला. हे जेव्हा त्या तरुणीला कळले तेव्हा ती दुःखी तरुणी अचानक एका रात्री गायब झाली.
कप्तानचं जहाज केप ऑफ गुड होपच्या जवळ असताना एका वादळात अडकलं आणि यासाठी जहाजावरील सदस्यांनी कप्तानाला दोषी मानलं. यामुळे कप्तानाच्या तळपायातील आग मस्तकात गेली आणि त्याने केप ऑफ गुड होपच्या पुढेच जहाज नेण्याचा आदेश दिला, तसा हट्टच केला. ‘आपल्या ठिकाणाला पोहोचल्याशिवाय कोणत्याही किनाऱ्याला लागायचं नाही, मग किती युगं लागली तरी चालतील..!’ असाच त्याने आदेश दिला. काहींच्या मते अद्यापही कप्तानाला त्याच्या मुक्कामाचे ठिकाण न मिळाल्याने तो त्या तरुणीच्या शापाने समुद्रातच फिरत आहे.
अन्य काही कथांनुसार, डच कप्तान हँड्रिक वॅन डर डीकेनच्या जहाजावरील सदस्यांना विचित्र आणि भयानक रोग झाला होता. या रोगामुळे किनाऱ्यावरील लोकांनी त्यांना किनाऱ्यावर उतरूनच दिले नाही. तर काही कथांनुसार शक्य असूनही कप्तानच्या या जहाजाने एका बुडत्या जहाजाला वाचवायला नकार दिला होता आणि त्याच जहाजावरील मृतांच्या शापामुळे कप्तानचे ‘फ्लायिंग डचमॅन ‘समुद्रात फिरत आहे.
अनेक कथांनुसार, कप्तान हँड्रिक वॅन डर डीकेनने किनाऱ्यावर जाऊन किनाऱ्यावरील एखाद्या मुलीशी लग्न केल्यास त्याचा हा शाप नाहीसा होईल आणि कप्तान हँड्रिकसह अन्य सदस्यांना मुक्ती मिळेल. समुद्रात प्रवास करणाऱ्या बऱ्याच खलाशांच्या मनात आजही या फ्लयिंग डचमॅनबद्दल भीती आहे. अनेकांनी या फ्लायिंग डचमॅनची वर्णनंसुद्धा लिहून ठेवलेली आहेत.
या रहस्यमयी जहाजाच्या मागील कारणांचा शोध घेण्याचा विज्ञान जगताने प्रयत्न केला. कैक शास्त्रज्ञांच्या मते, ‘फ्लायिंग डचमॅन’ हा फक्त मानवी नजर आणि प्रकाश किरणांचा खेळ आहे. या संकल्पनेला ‘फाटा मोर्गना’ म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर ही संकल्पना मृगजळासारखी आहे.
‘फाटा मोर्गना’ हे नाव एका पौराणिक पत्रावरून पडलं आहे. अर्थर राजाच्या काळात असलेली ही जादुई कन्या आपल्या जादूच्या सामर्थ्याने समुद्रामधील विशाल बेटांचे आणि काही भुताचे किल्ले मानल्या जाणाऱ्या रचनांचे मृगजळाप्रमाणे भ्रामक आकृत्या तयार करीत असत. यामुळे अनेक खलाश्यांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जाते.
हवेच्या तापमानामुळे प्रकाशाची किरणे आपली दिशा बदलतात. आपल्या डोळ्यांना हजारो वस्तू दिसतात, ते केवळ त्यांच्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश किरणांमुळे. म्हणूनच गडद अंधारात आपल्या डोळ्यांना काहीच दिसत नाही. पाण्याच्या आणि प्रामुख्याने समुद्राच्या पृष्ठभागावर हवेचे तापमान सतत बदलत राहते, त्यामुळे ‘फ्लायिंग डचमॅन’सारख्या क्षणिक आकृती निर्माण व्हायला वेळ लागत नाही.
जरी एखादे जहाज लांबून चालले असेल, तरी सतत दिशा बदलणाऱ्या प्रकाश-किरणांमुळे ते जहाज काही क्षणांसाठी आपल्याला दिसू शकते. याचं अन्य महत्वाचं कारण म्हणजे पृथ्वी गोलाकार असणे. यामुळेही प्रकाश-किरणांच्या दिशा बदलण्याला मोठी चालना मिळून अशा भ्रामक आकृती तयार होतात. पृथ्वीवर अशाच प्रकारचे काही मानवी नजर आणि प्रकाश-किरणांचे खेळ आहेत. उदाहरणार्थ सनडॉग नावाची संकल्पना.
फ्लायिंग डचमॅनच्या दर्शनानंतर होणाऱ्या मृत्यूंना मनावर भीतीने झालेला जबरदस्त आघात कारणीभूत असतो, कारण मानवाने अशा काही क्षणिक आकृत्या याआधी पाहिलेल्या नसतात आणि त्याच्या मनात आधीच यांसारख्या आकृतींबद्दल भीती असते. म्हणूनच जबरदस्त मानसिक धक्क्याने काहींचा मृत्यू होत असल्याचं वैज्ञानिक अभ्यासातून समोर आलं आहे. तेव्हा तुम्ही समुद्रप्रवासाला निघाला असाल आणि असलं काहीही दिसलं तर घाबरण्याचं कारण नाही!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.