आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील फाळणी हे एक दुर्दैवी सत्य आहे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश या मागणीतून फाळणीचा आणि पर्यायाने पाकिस्तानचा जन्म झाला ही बाब खरी आहे. पाकिस्तानचे कायदे आझम मोहम्मद अली जिन्नांनी पाकिस्तानात इतर धर्मियांचे स्वागत असल्याची घोषणा केली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची धर्मनिरपेक्ष नेता अशी प्रतिमा ठसवण्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत एका हिंदू शायरकडून लिहून घेण्याची घोषणा केली.
७ ऑगस्ट १९४७ रोजी जिन्नांनी भारत देश सोडला आणि ते पाकिस्तानमध्ये गेले. लाहोर रेडीओ स्टेशनवरील अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले की पाकिस्तानचे राष्ट्रगीत लिहिण्यासाठी एखादा हिंदू शायर शोधा.
धर्मनिरपेक्ष नेता म्हणून संपूर्ण जग नेहरूंकडे आदराने पाहत होते, जिन्नांना देखील त्याच पंक्तीत जाऊन बसायचे होते. म्हणून पाकिस्तानची निर्मिती धर्माधारित झाली असली तरी, पाकिस्तान एक धर्मनिरपेक्ष देश आहे, जिथे सर्वधर्मीय लोकांना समान संधी दिली जाते हे सिद्ध करून दाखवायचे होते. याच कारणांनी त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत लिहिण्यासाठी हिंदू व्यक्तीचा आग्रह धरला.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री लाहोर रेडीओ स्टेशनवरून पाकिस्तानचा कौमी तराना प्रसारित करण्यात आला. हे राष्ट्रगीत ऐकून संपूर्ण पाकिस्तान रोमांचित झाला होता.
पाकिस्तानचे हे पहिले राष्ट्रगीत लाहोरच्या एका हिंदू शायरने लिहिले होते. ज्यांना नंतर पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले.
पाकिस्तानच्या राजकारण्यांनी नंतर हे राष्ट्रगीत बदलले आणि त्याऐवजी एका पाकिस्तानी शायरने लिहिलेल्या गीताचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. जोपर्यंत कायदे आझम जिन्ना जिवंत होते तोपर्यंत याच हिंदू शायरने लिहिलेले गीत हे राष्ट्रगीत होते. जिन्नांच्या मृत्यूनंतर मात्र पाकिस्तानचे राष्ट्रगीत बदलण्यात आले.
७ ऑगस्ट १९४७ रोजी जिन्ना पाकिस्तानात पोहोचले तेव्हा त्यांना भरपूर कामे उरकायची होती. पण, अचानक त्यांच्या लक्षात आले की, पाकिस्तानसाठी एक स्वतंत्र राष्ट्रगीत लिहिण्याची गरज आहे. त्यांनी लागलीच लाहोर रेडीओ स्टेशनच्या अधिकाऱ्यांना हुकुम सोडला की चार दिवसात पाकिस्तानसाठी राष्ट्रगीत लिहून देईल असा उत्साही शायर शोधा आणि त्याच्याकडून राष्ट्रगीत लिहून घ्या.
लाहोरमध्ये एक अत्यंत विद्वान हिंदू शायर होते, ज्यांच्या समोर मुस्लीम विद्वानही फिके पडत. विशेष बाब म्हणजे फाळणीनंतरही त्यांनी लाहोरमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
रेडीओ अधिकाऱ्यांनी ही माहिती जिन्नांपर्यंत पोहोचवली. जिन्नांनी त्या हिंदू शायराला हुकुम दिला की त्याने त्वरित पाकिस्तानसाठी एक राष्ट्रगीत लिहावे.
पाकिस्तानसाठी पहिले राष्ट्रगीत लिहिणाऱ्या या हिंदू शायरचे नाव होते, जगन नाथ आझाद.
अर्थात, लाहोर रेडीओच्या अधिकाऱ्यांना एका हिंदू शायरकडून पाकिस्तानी राष्ट्रगीत लिहून घेण्याची कल्पना मुळीच आवडली नव्हती. पण, जिन्नांच्या समोर ब्र उच्चारण्याचीही कुणाची हिंमत नव्हती.
जगन नाथ यांचा मुलगा आणि मुलीने स्वतः ही गोष्ट खरी असल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानच्या काही वेबसाईटवर या गोष्टीवरून बराच वादविवाद सुरु होता. जिओ टीव्ही आणि इतर टीव्ही चॅनेल्सनी या वादात जबरदस्ती उडी घेतली होती.
जिन्नांनी मुसलमानांसाठी एक वेगळा देश मिळवण्यात यश मिळवले होते, परंतु आपण फार धर्मनिरपेक्ष आहोत हे त्यांना संपूर्ण जगाला दाखवून द्यायचे होते. यासाठीच त्यांनी पाकिस्तानला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले होते. त्यांना नेहरूंच्या तुलनेत स्वतःची प्रतिमा उंचावायची होती.
जगन नाथ आझाद यांनी पाच दिवसांत पाकिस्तानी राष्ट्रगीत लिहून पूर्ण केले. पाकिस्तान रेडीओने याला गीताला संगीत दिले.
जिन्नांनी जेव्हा हे राष्ट्रगीत ऐकले तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला होता. कारण त्याच्या अपेक्षांवर हे गीत खरे उतरले होते. त्यांनी परवानगी दिल्यावर १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री हे गीत रेडीओवरून प्रसारित करण्यात आले. हे राष्ट्रगीत जेव्हा पाकिस्तानच्या लाहोर रेडीओ स्टेशनवरून पहिल्यांदा प्रसारित करण्यात आले, तेव्हा संपूर्ण पाकिस्तान रोमांचित झाला होता.
परंतु इतर मुस्लीम नेत्यांना मात्र एका हिंदूने लिहिलेले पाकिस्तानी राष्ट्रगीत फारसे रुचत नव्हते.
जगन नाथ आझाद यांचा जन्मच लाहोरमध्ये झाला होता. लाहोरच्या मातीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जगन आझाद यांना लाहोर सोडून भारतात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. ते लाहोरच्या साहित्यिक पत्रिकामध्ये नोकरी करत होते. त्यात जिन्नांनी देखील सर्व धर्मियांचे पाकिस्तानात स्वागत असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे ते थोडे निर्धास्त झाले होते.
पण, हळूहळू परिस्थिती बदलू लागली. पाकिस्तानात हिंदूंना खूपच धोका होता. जिथे तिथे रक्ताचे पाट वाहत होते. सुरुवातीला काही दिवस जगन यांच्या मुस्लीम मित्रांनी त्यांना आसरा दिला पण, नंतर तेच मित्र त्यांना भारतात जाण्यासाठी आग्रह करू लागले.
या प्रसंगाबद्दल जगन यांची मुलगी पम्मी हिने त्यांना अर्पण केलेल्या एका वेबसाईटवर लिहिले आहे, सप्टेंबर जवळ येईल तसतसे पाकिस्तानात हिंदूंनी दिवस काढणे अत्यंत धोक्याचे झाले होते. शेवटी जगन नाथ यांनी साश्रू नयनांनी लाहोरला निरोप दिला आणि दिल्लीतील एका निर्वासातांच्या छावणीत येऊन राहिले.
काही दिवसांनी त्यांना डेली मिलापमध्ये नोकरी लागली. काही दिवसांनी जोश मलीहाबादी याने दिल्लीतील आपले भले मोठे घर त्यांना देऊन टाकले आणि ते त्यांना मिळालेल्या सरकारी निवासात राहायला गेले. भारतात आल्यानंतर जगन यांची खूपच प्रगती झाली. लाहोरशी जुळलेली नाळ मात्र त्यांना सतत सलत होती.
१९४८ नंतर ते आझाद सूचना प्रसारण मंत्रालयात उर्दू वृत्तपत्राचे सहाय्यक संपादक म्हणून रुजू झाले.
परंतु आपण पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीत लिहिले होते याबद्दल जगन यांनी क्वचितच कुणाला माहिती दिली असेल. यामागे बरीच करणे होती. त्यांच्या पाकिस्तानातील मित्रांना याची कल्पना होती.
कित्येक वर्षानंतर आझाद यांनी एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता. कोणत्या परिस्थितीत त्यांनी जिन्नांच्या सांगण्यावरून हे राष्ट्रगीत लिहिले याबद्दलही त्यांनी खूप काही सांगितले.
२००४ साली जगन नाथ यांचे निधन झाले. मात्र उर्दू आणि शायरीशी असलेले नाते मात्र त्यांनी कधीच तोडले नाही. उर्दू साहित्यावर त्यांनी खूप काम केले. जम्मू विद्यापीठात उर्दू विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली.
पाकिस्तानात आजही कुठले राष्ट्रगीत जास्त चांगले आहे यावरून वाद होत असतात. आझाद यांचे गीत आजही अनेकांना राष्ट्रगीत म्हणून उत्तम दर्जाचे वाटते. ९० आणि २००० च्या दशकात फहीम मजहरसारख्या तरुण गायकांनी हे गीत आपल्या आवाजात गायिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.