आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
फुटबॉल हा जगातील सर्वाधिक खेळला जाणारा खेळ आहे. दर चार वर्षांनी होणारा फिफा वर्ल्डकप तर फुटबॉल चाहत्यांसाठी अक्षरश: परवनीचं असते. तुमचा आवडता फिफा कुठला आहे? वैयक्तिक मला विचारालं तर…दक्षिण आफ्रिकेत झालेला २०१० चा फिफा मला प्रचंड आवडला होता. टुर्नामेंट अँथेम असलेलं पॉपस्टार शकिराचं ‘धिस टाईम फॉर आफ्रिका’ हे गाणं आजही आपल्याला ताल धरायला लावतं. आजही त्या वर्ल्डकपमधील सामन्यांच रिपीट टेलिकास्ट पाहिलं की, तोंडातून कौतुकाची अनेक विशेषणं बाहेर पडतात. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीमुळं २०१०चा फिफा वर्ल्डकप गाजला, ती म्हणजे ‘पॉल’ नावाच्या ऑक्टोपसमुळं!
आपण कितीही आधुनिक झालो किंवा कितीही वैज्ञानिक दृष्टीकोण पाळला तरी कधीनाकधी नशीब, कल यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची इच्छा होतेचं. शाळा, कॉलेज किंवा नव्यानं प्रेमात पडलेली मुलं-मुली नाही का, एखादं गुलाबाचं फुल हातात घेऊन ‘He/She loves me or He/She loves me not’ चा खेळ खेळतात. बेसिकली ‘कल’ पाहण्यासाठी त्या गुलाबाच्या फुलाचा वापर केला जातो.
अगदी असाच वापर पॉल नावाच्या ऑक्टोपसचा २०१० फिफा वर्ल्डकपमध्ये करण्यात आला होता. प्रत्येक सामन्याच्या अगोदर तो सामना कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी पॉलच्या चेंबरमध्ये दोन देशांचे ध्वज ठेवले जात. ज्या ध्वजावर पॉल जाऊन बसेल, तो देश सामना जिंकणार, असं समजलं जात होतं. त्यानं केलेली भविष्यवाणी बहुतांशी वेळा खरी ठरल्यानं तो अल्पावधीतच जगप्रसिद्ध झाला होता. असा हा ‘पॉलबाबा’ नेमका होता तरी कोण?
इंग्लंडमधील वेमाउथ ‘सी लाइफ सेंटर’मध्ये २६ जानेवारी २००८ रोजी पॉलचा जन्म झाला होता. नंतर त्याला जर्मनीतील ओबरहॉसेन येथील सी लाइफ सेंटरमध्ये हलवण्यात आलं. लहान मुलांसाठी साहित्य लिहणारा जर्मन लेखक बॉय लॉर्नसेन यांच्या ‘डेर टिन्टेनफिश पॉल ऑक्टोपस’ या कवितेच्या शीर्षकावरून सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्याचं नाव पॉल ठेवलं.
सी लाइफ सेंटरचे संचालक डॅनियल फे यांच्या म्हणण्यानुसार, पॉलनं सुरुवातीपासून त्याच्या बुद्धिमत्तेची चुणुक दाखवली होती. जेव्हा लोक त्यांच्या टँकजवळ येतं तेव्हा तो अगदी एखाद्या चौकस बालकाप्रमाणं त्यांच्याकडे पाहत असे. इतर ऑक्टोपसपेक्षा त्याच्यात नक्कीच काही तरी वेगळं जाणवत होतं. म्हणून आम्ही त्याची प्रतिभा शोधण्याचा प्रयत्न केला.
ऑक्टोपस हा अपरिवर्तकांपैकी (पाठिचा कणा नसणारे आणि सतत आकार बदलणारे प्राणी) सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. जटिल विचार करण्याची, दीर्घ आणि अल्पकालीन आठवणी व व्यक्तींना लक्षात ठेवण्याची क्षमता असते. ते आपल्या शरीराच्या जवळ असलेल्या विविध साधनांचा वापर करू शकतात. सतत केलेल्या निरीक्षणाद्वारे शिकू शकतात.
शारीरिक वेदनांसाठी ते विशेष संवेदनशील असतात. त्यामुळं पॉल ऑक्टोपसला कायमस्वरूपी बंदिवासात ठेवणं क्रू*रपणा होता, अशी टिप्पणी ‘पेटा’ या संस्थेनं केली होती. मात्र, सी लाईफ सेंटरच्या म्हणण्यानुसार पॉल ॲक्वेरियममध्येचं जन्माला आल्या असल्यामुळं त्याला बंदीस्त वातावरणाची सवय होती. त्याला स्वतःसाठी अन्न शोधण्याची सवय नव्हती. जर त्याला खुल्या समुद्रात सोडून दिलं तर त्याच्या जीवासाठी ही बाब धोकादायक ठरू शकली असती.
२०१०च्या फिफा दरम्यान पॉलला प्रसिद्धी मिळाली असली तरी प्रत्यक्षात ‘यूईएफए युरो २००८’ स्पर्धेपासूनचं पॉलची ओरॅकल (दैवी संकेत सांगणारी व्यक्ती) म्हणून कारकीर्द सुरू झाली होती.
जर्मनीच्या फुटबॉल सामन्यांच्या अगोदर पॉलला प्लास्टिकचे दोन पारदर्शक बॉक्स सादर केले जात. प्रत्येक बॉक्समध्ये काही शिंपले आणि ऑयस्टर ठेवले जात. एका बॉक्सवर जर्मनीची ध्वज आणि दुसऱ्या बॉक्सवर जर्मनीच्या प्रतिस्पर्ध्याचा ध्वज लावलेला असे. ज्या बॉक्समध्ये जाऊन पॉल ठेवलेलं खाद्य खात असे, तो देश सामना जिंकेल, असं भाकित गृहित धरलं जाई. युरो स्पर्धेत त्यानं वर्तवलेली बहुतांशी भाकितं खरी ठरली होती. पॉलनं जर्मनीच्या सहा युरो सामन्यांपैकी वर्तवलेले चार अंदाज खरे ठरले होते.
त्यामुळं पुन्हा २०१०च्या फिफा वर्ल्डकपमध्ये देखील त्याचे कौल घेण्याचा निर्णय सी लाईफ सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी घेतला. फिफामध्ये पॉलनं वर्तवलेली भाकितं जर्मन वृत्तवाहिनी एन-टीव्हीनं थेट प्रसारित केल्यानं त्याला सेलिब्रिटी दर्जा मिळाला. ऑस्ट्रेलिया, सर्बिया, घाना, इंग्लंड, अर्जेंटिना, स्पेन आणि उरुग्वे विरुद्ध झालेल्या जर्मनीच्या सामन्यांबाबत पॉलनं अंदाज व्यक्त केले होते. पॉलनं अर्जेंटिना पराभूत होईल असं भाकीत केल्यानंतर अर्जेंटिनाचा प्रसिद्ध शेफ निकोलस बेडरोरोनं संतापून फेसबुकवर ऑक्टोपसची रेसिपीचं पोस्ट केली होती.
पॉलजी भाकितं व्यक्त करत होता त्यामागे नेमकं काय कारण होतं, याबाबत जगभरातील अनेक मरिन बायोलॉजिस्टनी आपापली मतं व्यक्त केली. बाथ विद्यापीठातील प्राध्यापक ख्रिस बड आणि केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड स्पीगेलहॉल्टर या दोघांनी, पॉलच्या यशाची तुलना नाणेफेकीच्या संभाव्यतेशी केली. स्पीगेलहॉल्टर मतानुसार ‘असे इतर अनेक प्राणी आहेत ज्यांनी फुटबॉल सामन्यांच्या निकालाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले’, त्यामुळं पॉलच्या अचूक अंदाजांनी लोकांचं लक्ष वेधलं. ध्वजांच्या डिझाइनमधील फरकांमुळं पॉलवर प्रभाव पडू शकतो की नाही यावर देखील अभ्यासंकांनी चर्चा केली होती. (ऑक्टोपस पार्शिअली कलर ब्लाईंड असतात. त्यांचे डोळे फक्त काळा आणि पांढरा पाहू शकतात.)
पॉलची प्रसिद्धी वाढल्यानंतर त्याला अनेक ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. कार्बलिआनो, गॅलिसियामधील समुदायानं पॉलला स्थानिक ‘फिएस्टा डेल पुलपो महोत्सवा’चं मुख्य आकर्षण म्हणून मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच्या ‘ट्रान्सफर फी’साठी सुमारे ३० हजार पौंड जमा केले होते. मच्छीमार आणि स्थानिक बिझनेस क्लबचे प्रमुख असलेल्या मॅन्युअल पाझो यांनी पॉलला महोत्सवात आणण्याचं आश्वासन दिलं. मात्र, सी लाईफ सेंटरनं त्यांची ऑफर नाकारल्यानं हे आश्वासन पूर्ण होऊ शकल नाही.
सर्व काही सुरळीत सुरू असतानाचं एक दिवस अचानक पॉल मृतावस्थेत आढळला. २५ सप्टेंबर २०१० रोजी सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्याची नियमित तपासणी केली होती. त्याची प्रकृती ठिक होती मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतावस्थेत आढळला. मृत्यूच्या वेळी तो अडीच वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूनंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.
ओरॅकल म्हणून प्रसिद्ध झालेल्या पॉल ऑक्टोपसवर, ‘यु टच लॅब्स’नं ‘आस्क द ऑक्टोपस’ नावाचं आयफोन ऍप डेव्हलप केलं होतं. २०१० मध्ये ‘किल ऑक्टोपस पॉल’ नावाचा एक चिनी थ्रिलर चित्रपट आला होता. त्यात पॉलच्या भविष्यवाणीवर आंतरराष्ट्रीय मॅच फिक्सिंग रॅकेट चालत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. १७ जून २०१४ रोजी, फिफा विश्वचषकादरम्यान, गुगलनं पॉलचं ‘डूडल’ तयार केलं होतं. त्यात तो स्वर्गातून वर्ल्डकपसाठी संघांना चिअर करताना दाखवण्यात आला होता. १३ जुलै रोजी अंतिम फेरीसाठी केलेल्या डूडलमध्ये पुन्हा पॉल दिसला होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved