फायबर ऑपटिक्सचा जनक असणारा हा भारतीय शास्त्रज्ञ आयुष्यभर नोबेलपासून वंचित राहिला

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधकांनी खूप मोठे योगदान दिले आहे. परंतु भारतीय वैज्ञानिकांचे संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान याबद्दल माहिती असणारे खूपच कमी लोक सापडतील. नोबेल प्राप्त शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्यापासून ते फायबर ऑप्टीक्सचे जनक मानले जाणारे नरिंदर सिंग कपानी अशी कितीतरी नावे सांगता येतील, ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या संशोधनाने अमुल्य भर घातली.

आधुनिक विज्ञान क्षेत्रातील अनेक महत्वपूर्ण शोध लावणारे शास्त्रज्ञ भारतीय होते. परंतु दुर्दैवाने भारतीय जनतेला याबद्दल खूपच तुरळक माहिती आहे. रेडीओ व्हेव्हजच्या प्रसारणापासून ते इंटरनेटच्या हायस्पीड तंत्रज्ञांनापर्यंत दैनंदिन जीवनात उपयोगी ठरलेल्या अनेक आधुनिक साधनांच्या शोधामागील कल्पक मेंदू हे भारतीयच आहेत, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. पण, बरेच भारतीय संशोधक आजही दुर्लक्षित आहेत, ही खेदाची बाब आहे.

डॉ. होमी भाभा, जानकी अंमल, मेघनाद साहा, जी. एन. रामचंद्रन अशा अनेक दिग्गज शास्त्रज्ञांनी आधुनिक विज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास आणि त्यांचा विस्तार करण्यास प्रचंड मेहनत घेतली. पण, म्हणावी तशी त्यांची दाखल कुणी घेतली गेली नाही. म्हणूनच आजही ही नावे फारशी कुणाला परिचित नाहीत. जागतिक स्तरावर तर भारतीय संशोधकांकडे खूपच दुर्लक्ष झाले आहे.

इंटरनेटच्या स्पीडपासून शरीराची एंडोस्कोपी करण्यापर्यंत आज फायबर ऑप्टीक्सच्या तंत्रज्ञानात कितीतरी प्रगती झाली आहे. पण, या फायबर ऑप्टीक्सचा पाया रचणारे कपानी यांचे नाव कितीजण ओळखतात हे जर विचारले तर होकारार्थी उत्तर देणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य असेल.

परंतु याच फायबर ऑप्टीक्स क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल मात्र शांघायच्या चार्ल्स काओ यांना २००९ साली नोबेल पुरस्कार मिळाला. खरे तर काओ यांनी जे संशोधन केले त्याचा पाया तब्बल १२ वर्षे आधी नरिंदर सिंग कपानी यांनी रचला होता.

अनेकांच्या मते हे पारितोषिक कपानी आणि काओ दोघांत विभागून द्यायला हवे होते. मात्र नोबेल समितीने त्यांची फारशी दखल घेतली नाही. या समितीने आपल्या जर्नलमधून कपानी यांच्या संशोधनाची दखल घेऊन त्यावर लेख प्रकाशित केला असला तरी, त्यांना नोबेलचा मानकरी मात्र होऊ दिले नाही.

याबद्दल कपानी यांना विचारले असता, ते म्हणाले की, “त्यांनी कोणत्या निकषावर हा पुरस्कार दिला, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. मी पुरस्कारापेक्षा माझ्या संशोधनाचा आज लाखो लोकांना फायदा होतो आहे, यातच जास्त समाधानी आहे.” हा पुरस्कार मिळाला नसल्याचा त्यांना जराही खेद वाटत नव्हता.

चार्ल्स काओ यांनी ऑप्टीकल ग्लास फायबरमधून जाणारा प्रकाश १०० किमी अंतरापर्यंत कसा सिग्नल देईल याचे गणित मांडले आणि त्या प्रकाश किरणांच्या अंतरात आपल्या अभ्यासाने थोडी भर टाकली.

परंतु त्याआधीच १९६६मध्ये ही प्रकाश किरणे २० मीटर अंतरापर्यंत सिग्नल देत होती. यावर पूर्वीच संशोधन झालेले होते. काओ यांनी आपल्या संशोधनातून फक्त या प्रकाश किरणांच्या प्रसारणाचे अंतर आपल्या गणितीय पद्धतीने आणखीन वाढवले.

यासाठी त्यांनीही कपानी यांच्याच मुलभूत संशोधनाचा आधार घेतला होता. म्हणूनच कपानी यांना फायबर ऑप्टीक्सचे जनक म्हणून ओळखले जाते. फायबर ऑप्टीक्सचा पाया नरिंदर सिंग कपानी त्यांनीच रचला होता.

या तंत्रज्ञानामुळे हायस्पीड इंटरनेट आणि त्याचा वापर करून जगभरात कुठेही टेक्स्ट, इमेज, व्हिडीओ अगदी काही सेकंदात पाठवण्याची सोय उपलब्ध झाली. आज इंटरनेट न वापरणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. पण, याच इंटरनेटच्या प्रसारणासाठी आवश्यक असणाऱ्या फायबर ऑप्टीक्सचा शोध लावणारा भारतीय शास्त्रज्ञाचे नाव मात्र कुणालाही माहित नाही.

नरेंदर सिंग कपानी यांनी ऑप्टिक्स फायबरच्या बंडलवर प्रतिमा उमटवण्याचा शोध लावला होता. ज्याचा वापर आजच्या इंटरनेट, लेसर सर्जरी आणि एंडोस्कोपीसारख्या प्रगत तंत्रज्ञानात केला जातो.

नरेंदर सिंग कपानी यांचा जन्म १९२७ रोजी मोगा, पंजाब येथील एका शीख कुटुंबात झाला. त्यांनी आग्रा विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. आग्रा येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर ते भारतातीलच एका ऑप्टिकल इन्स्ट्रुमेन्ट्स बनवणाऱ्या कंपनीत तंत्रज्ञान विभागात काम करू लागले.

या कंपनीत काम करत असतानाच त्यांच्यात या क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळवण्याची लालसा निर्माण झाली. या क्षेत्रात अजूनही संशोधन झाले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. या क्षेत्रातील सखोल ज्ञान घेऊन त्यांना भारतात स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता.

१९५२ साली इम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडन येथे पुढील शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. हे शिक्षण घेऊन भारतात परत जायचे आणि स्वतःची कंपनी सुरु करायची हा त्यांचा निर्धार पक्का होता.

शिवानंद कणवी यांनी लिहिलेल्या ‘सँड टू सिलिकॉन : द अमेझिंग स्टोरी ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी’ या पुस्तकात त्यांनी फायबर ऑप्टिक्सच्या क्षेत्रात काओ आणि कपानी दोघांच्याही योगदानाबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. २००३ साली हे पुस्तक प्रकाशित झाले.

कपानी यांचे शालेय शिक्षण डेहराडून येथे झाले. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या त्या निसर्गरम्य ठिकाणी शिकत असताना प्रकाशाचा प्रवास सरळ रेषेतच झाला पाहिजे असे नाही. आपण प्रकाशाचा मार्ग बदलून त्या सरळ रेषेत व्यत्यय आणू शकतो आणि तिला हवी तशी वळवू शकतो, याचा त्यांना साक्षात्कार झाला. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरही त्यांनी  हीच कल्पना आणखी विकसित केली.

१९५४ साली इम्पेरिअल कॉलेजमध्ये पीएचडी करत असताना त्यांनी पहिल्यांदा ऑप्टिक्स फायबरच्या बंडलवर इमेजेसचे ट्रान्समिशन करून पहिले.

”मी माझी पीएचडी पूर्ण करण्यासाठी जेंव्हा इम्पेरिअल कॉलेजमध्ये गेलो तेंव्हा माझे मार्गदर्शक डॉ. हॉपकिन्स यांनी मला असे सुचवले की, मी प्रिझमऐवजी काचेच्या सिलिंडरचा वापर करावा. मग मी पातळ ग्लास फायबरचा वापर करून पहिला. हे ग्लास फायबर वाकवणे सहज शक्य होते. सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्रातील इन्स्ट्रुमेन्ट्समध्ये याचा वापर करून मानवी शरीरातील आतील भागांचे निरीक्षण करता येणे शक्य आहे का, हा प्रयोग मला करायचा होता. १९५५ पर्यंत तरी ऑप्टिकल फायबरच्या क्षमतेचा मला अंदाजही आला नव्हता. त्यांनतरच मला ही फायबर ऑप्टिकची कल्पना सुचली,” कपानी यांनी एका मुलाखती दरम्यान आपल्या संशोधनाविषयी बोलताना ही माहिती दिली.

सायन्स अमेरिकन  पब्लिकेशनच्या १९६०च्या अंकामध्येही कपानी यांनीच पहिल्यांदा ‘फायबर ऑप्टिक’ संकल्पनेची मांडणी केल्याची नोंद केली आहे. अर्थातच चार्ल्स काओ यांनी आपले संशोधन सिद्ध करण्यापूर्वीच्या या गोष्टी आहेत, हे सांगण्याची गरजच नाही.

इम्पेरिअल कॉलेजमधे पीएचडी करत असतानाच त्यांना रॉयल सोसायटीकडून फायबर ऑप्टिक्समधील संशोधन पूर्ण करण्यासाठी स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली. “ग्लास फायबर बनवून त्यांची जोडणी करून त्यावरून प्रकाश किरणे आणि इमेजेस एकाच वेळी प्रसारित करता येऊ शकतात, हे सिद्ध करून दाखवण्यात सुमारे दीड वर्षांचा कालावधी गेला,” अशी माहिती कपानी यांनी एका मुलाखतीतून दिली.

त्यांच्या कामाचे स्वरूप पाहून हरोल्ड हॉपकिन्स यांनी त्यांना ऑप्टिक्समध्येच पीएचडी करण्याचा सल्ला दिला पण कपानी यांना भारतात येऊन आपला व्यवसाय सुरु करायचा होता. इम्पेरिअल कॉलेजमधील आपली पीचडी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

कपानी यांनी भारताच्या संरक्षण मंत्रालयासाठी वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करावे अशी इच्छा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी व्यक्त केली होती.

परंतु इटलीतील एका विज्ञान परिषदेत कपानी यांची भेट अमेरिकेतील प्राध्यापकांशी झाली. या परिषदेत त्यांनी फायबर ऑप्टिक्सवरील आपला पहिला शोधनिबंध त्यांनी सादर केला होता. या परिषदेने त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली.

भारतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सोडून ते रॉंचेस्टर विद्यापीठात फॅकल्टी मेंबर म्हणून रुजू झाले. एक वर्ष याठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी तेथेच आपली कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला. सिलिकॉन व्हॅलीतील पालो अल्टो येथून त्यांनी आपल्या उद्योगाला सुरुवात केली. १९६०साली या कंपनीची सुरुवात केली.

कपानी यांनी ऑप्टिकल फायबरच्या सहाय्याने प्रकाशाचे परावर्तन करणे शक्य असल्याचे सिद्ध केले असले तरी हे परावर्तन दूरच्या अंतरावर सिग्नल देण्यास असमर्थ होते. काओ यांनी या संशोधनातील हीच त्रुटी दूर केली. त्यांनी दूरच्या अंतरापर्यंत प्रकाशाचे परावर्तन शक्य असल्याचे सिद्ध केले.

त्यांच्या या संशोधनाच्या आधारेच १९७० साली पहिल्या अल्ट्राप्युअर फायबरची निर्मिती करण्यात आली.

आधुनिक संदेशवहन तंत्रज्ञानात यामुळे मोलाची भर पडली. म्हणूनच काओ यांना २००९ साली देण्यात आलेल्या नोबेल पुरस्कारावर कपानी यांचाही तितकाच अधिकार होता. जेंव्हा काओ यांना २००९ साली या संशोधनासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला तेंव्हा विज्ञान क्षेत्रातील अनेक संशोधकांनी नोबेल समितीने हा पुरस्कार एकट्या काओ यांना देण्याऐवजी दोघांमध्ये विभागून द्यायला हवा होता, असे मत व्यक्त केले.

परंतु कपानी यांना मात्र पुरस्कार न मिळाल्याची कोणतीही खंत नाही. त्याबद्दल त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट, ते नोबेल समितीच्या या निर्णयाचा आदरच करतात.

“यावरून काही वादविवाद व्हावा असे मला अजिबात वाटत नाही. नोबेल समितीने काही योग्य निकष लावूनच हा पुरस्कार दिला असेल. समितीच्या या निर्णयाचा मी स्वीकार करतो आणि त्याबद्दल मला पूर्ण आदर आहे,” असे ते म्हणतात.

फक्त ऑप्टिकल फायबरच नाही तर कपानी यांच्या नावावर १००हून जास्त पेटंट आहेत. शिवाय, ते शीख फाउंडेशन नावाची एक संस्थाही चालवतात. ही संस्था लोककल्याणाचे कार्य करते. त्यांच्या संशोधनाने जागतिक स्तरावरील उद्योग विश्वाचा चेहरामोहराच बदलून गेला.

यासाठी विज्ञान क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या फॉर्च्यून मॅग्झीनने मात्र त्यांची दाखल घेतली. १९९९ साली त्यांच्या संशोधनावर आधरित लेख या मॅग्झीनने प्रकाशित केला होता. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवे शोध लावत त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतील एक नामांकित आणि यशस्वी उद्योजक म्हणून ख्याती मिळवली.

एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून सगळे जग त्यांच्याकडे सन्मानाने पाहते. त्यांच्या शीख फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरातील शीख समुदायाच्या उन्नतीसाठी काम केले जाते. या संस्थेच्या माध्यमातून ते जगभरातील शीख समुदायाशी जोडले गेले आहेत.

कोणतेही संशोधन हे केवळ एका व्यक्तीमुळे पूर्ण होत नाही किंवा एका व्यक्तीमुळे ते नावारूपास येत नाही. परंतु, एखाद्या संशोधनाचा पाया रचण्यात आणि त्या क्षेत्रातील मार्ग दाखवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून उल्लेखनीय कार्य केले जाते.

फायबर ऑप्टिक्सच्या क्षेत्रात कपानी यांनी अशीच महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या क्षेत्रातील संशोधनाचा मार्ग त्यांनीच दाखवून दिला आहे, याबाबत वादच नाही.

ग्लास फायबरच्या सहाय्याने प्रकाश किरणांचे परिवर्तन करणे शक्य असल्याचा दावा अनेकांनी केला होता. पण, कपानी हे पहिले संशोधक आहेत, ज्यांनी वैज्ञानिक आधारावर ही गोष्ट सिद्ध करून दाखवली.

२००९ मध्ये जेंव्हा काओ यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेंव्हाही कपानी यांनी अत्यंत संयमी आणि संयत भाषेत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ”माझ्या संशोधानंतर काओ यांनी या क्षेत्रातील संशोधनाला सुरुवात केली. त्यांनाही बऱ्याच स्पर्धकांशी सामना करावा लागला. म्हणूनच मला असे वाटत नाही की हा काही वादाचा वगैरे विषय आहे.”

काओ यांना मिळणाऱ्या नोबेलबद्दल किंवा या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली नाही म्हणून त्यांना जराही खंत नव्हती. काओ यांनी ऑप्टिकल फायबरच्या क्षेत्रात जी भर घातली त्यामुळे पुढील काळाची दिशाच बदलून गेली. इंटरनेट असो की वैद्यकीय क्षेत्रातील शरीराच्या आतील भागातील पाहणी करण्याचे तंत्रज्ञान या संशोधनाने मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणले. किंबहुना मानवी समाजाची दिशाच यामुळे बदलून गेली.

इंटरनेटसारख्या सुविधेने जगभरात किती आणि कसा अमुलाग्र बदल घडवून आणला आहे, हे आपण आज अनुभवतो आहोत. एंडोस्कोपीचे तंत्रज्ञान तर मानवी समाजासाठी फार मोठे वरदान ठरले आहे. अनेकांना या तंत्रज्ञानाने संजीवनी दिली आहे, हे आपण नाकारू शकत नाही.

मानवी जीवनात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या या शोधांमागे भारतीय संशोधकांची भूमिका महत्वाची आहे. ऑप्टिकल फायबरचा पाया रचणाऱ्या या भारतीय संशोधाकांविषयी एक भारतीय नागरिक म्हणून निश्चितच आपण अभिमान बाळगला पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!