आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लेखक- भूषण देशमुख (अहमदनगर)
मनाला अपार आनंद देणारी, शरीर आणि मनाचा शीण काही क्षणांत दूर करणारी देखणी वास्तू सोळाव्या शतकात निजामशाही राजवटीत अहमदनगरमध्ये बांधण्यात आली. आपल्याकडे येणार्या पाहुण्यांची शाही सरबराई करण्यासाठी निजामशाह त्यांना या निसर्गरम्य महालात घेऊन जात. उद्यानात फेरफटका मारून नौकानयनाचा आनंद घेतल्यानंतर पाहुण्यांसाठी नृत्यगायन आणि संगीत मैफली इथं रंगत. कुण्या कवीच्या कल्पनेतून निर्मिलेली ही वास्तू प्रत्यक्षात साकारली ती कविमनाच्या माणसानंच.. ती बघताना आपणही नकळत कवी होऊन जातो..
सीना नदीकाठच्या आमराईत गुलाबाच्या ताटव्यांनी वेढलेला चौरसाकृती तलाव, त्याच्या मध्यभागी अष्टकोनी दगडी चौथरा, त्यावर उभा गुलाबी रंगाचा, मोठ्या कमानी असलेला अष्टकोनी दुमजली महाल, फुलांचा सुगंध आणि जलाशयाचा गारवा घेऊन महालात शिरणार्या वार्याच्या मोहक झुळूका! कधीकाळी इथं देश-विदेशांतील शायरांचे मुशायरे रंगले असतील, सौंदर्याची उधळण करत नृत्यांगना थिरकल्या असतील, कव्वाली आणि मुजर्यांना दाद देताना महालाच्या भिंतींवरही रोमांच उभे राहिले असतील.
नगर-सोलापूर रस्त्यावरील वेड्या बाभऴींनी वेढलेल्या काटवनात असा काही अद्भुत महाल असू शकेल का, असा प्रश्न मला पडला होता. रणगाडा संग्रहालयाकडे जाणार्या रस्त्यानं थोडं पुढं जाऊन डावीकडे वळलं की, झाडीतून महालाचं दर्शन होतं. जवळ पोहोचलं, की त्याचं रूप डोळ्यांत भरू लागतं.
निजामशहा भुईकोट किल्ल्यात रहात असत. तिथंच त्याचे राजप्रासाद आहेत. मात्र, ते अतिशय साधेसुधे आहेत. फेरफटका मारण्यासाठी, थोडा विसावा घेण्यासाठी आणि पाहुण्यांसाठी मात्र त्याने देखण्या वास्तू उभ्या केल्या. निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद निजाम-उल-मुल्क बहिरी याच्यापासून ही परंपरा सुरू झाली.
त्याने सीना नदीकाठी बाग तयार करून तिथं गार्डन पॅव्हेलियन तयार केलं. विविध प्रकारच्या फुला-फळांच्या झाडांनी ही बाग बहरलेली असे. बागेला पाणी देण्यासाठी तिथं बारवही बांधण्यात आली. ही जागा राजाला इतकी आवडली, की त्यानं आपल्या अखेरच्या प्रवासासाठी “बागरोजा”चीच निवड केली.
सध्या सावेडीत असलेला हश्त बिहिश्त बाग पहिल्या राजाच्या काळात सोळाव्या शतकाच्या प्रारंभी तयार करण्यात आला. त्याला तेव्हा “फैज बख्क्ष महाल” (लाभ देणारी वास्तू) असं म्हटलं जात असे. उद्यानातील अष्टकोनी तलावाच्या मध्यभागी असलेली ही हवाखानी आकारानं लहान, पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्या कमानींतून हवेची झुळूक आत शिरली, की पंख्यासारखी फिरत राहते.
मलिक अहमदाचा मुलगा बुर्हाण गादीवर आल्यानंतर त्यानं या बागेचा विस्तार केला. तलावाशेजारी प्रशस्त हमामखाना बांधला. हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह. गार आणि गरम पाण्याची, तसंच शौचालयाची सुविधा तिथं आहे. हमामखाना आणि तलावासाठी वडगाव आणि शेंडीच्या तलावांतून खापरी नळानं पाणी आणण्यात आलं होतं. काही भागात तांब्यापासून बनवलेले पाइपही आहेत. हमामखान्यालगत भव्य प्रवेशद्वार आणि टेरेसवर जाऊन परिसराचं निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी जिना आहे. या बागेचं सौंदर्य इतकं अनोखं होतं, की आठवं नंदनवन म्हणजे “हश्त बिहिश्त बाग” म्हणून ती ओळखली जाऊ लागली.
हश्त बिहिश्त बागेतच अष्टकोनी महालापासून काही अंतरावर राजस्त्रियांसाठी भूमिगत हमामखाना बांधण्यात आला आहे. तळघरात हवा खेळती राहावी, यासाठी हमामखान्याच्या वरच्या बाजूला चौरसाकृती मनोरा (विंड टाॅवर किंवा विंड कॅचर) तयार करण्यात आला. त्याला “बादगीर” म्हणतात. पर्शियन वास्तुशैली असलेली ही वास्तू महाराष्ट्रात अन्यत्र अभावानंच पहायला मिळते.
याच बागेत राहण्यासाठी म्हणून “लक्कड महाल” बांधण्यात आला. लाकडाचा जास्त वापर करण्यात आल्यानं त्याला हे नाव पडलं असावं, पण मागील काही वर्षांत सगळं लाकूड लांबवलं गेलं. दगडांनाही पाय फुटत आहेत.
अहमदनगरचा चौथा सुलतान मूर्तजा (पहिला) जास्त काळ लक्कड महालातच रमायचा. सुलताना चांदबिबीच्या काळात अहमदनगरवर चाल करून आलेला मोगल बादशहा अकबराचा मुलगा मुरादचा तळही याच बागेत होता.
आपल्या वडिलांनी बांधलेल्या जलमहालापेक्षा अधिक भव्य आणि हवेशीर महाल उभारावा, अशी बुर्हाणची इच्छा होती. चंगेजखान आणि न्यामतखानाकडून त्यानं कामाला सुरूवात केली, पण निजामशाहीत वजीर म्हणून मोठं प्रस्थ निर्माण केलेल्या शहा ताहीरला या महालाचा त्रिकोणी आराखडा आवडला नाही. त्यानं तो रद्द करून नव्यानं इमारत बांधण्यास सांगितलं.
दरम्यानच्या काळात बुर्हाण, शहा ताहीर यांचं निधन झालं. नंतर गादीवर आलेल्या हुसेनशाहच्या काळात भुईकोट किल्ल्याचं पुनःनिर्माण आणि लढायांची धामधूम सुरू होती. त्यावर मोठा खर्च झाल्यानं फराह बख्क्षचं बांधकाम थांबलं असावं. मात्र, १५६५ साली तालिकोटच्या लढाईत मिळालेला विजय आणि विजयनगरच्या लुटीत मिळालेला मोठा खजिना यामुळे नंतर मुर्तजा (पहिला) निजामशहाच्या काळात काही इमारती उभारण्यात आल्या.
सध्या दिसते आहे ती फराह बख्क्ष महालाची वास्तू १५७६ ते १५८३ दरम्यान उभारण्यात आली असावी. न्यामतखान सिमनानीकडे हे काम सोपवण्यात आलं. तथापि, नंतर सलाबतखान (दुसरा) यानं ते मार्गी लावलं. शेवटच्या कालखंडात निजामशाही अस्थिर झाल्यानं या महालाचं काम थोडं अपूर्णच राहिलेलं दिसतं.
नगरचं हवामान उष्ण आणि कोरडं. ते अल्हाददायक बनवायचं असेल, तर भरपूर झाडं लावून उद्यानं तयार केली पाहिजेत, तलाव आणि कारंजी बनवली पाहिजेत, इमारती बांधताना त्यात हवा आणि प्रकाश खेळता राहिला पाहिजे, शिवाय बाहेरची उष्णता आत पाझरू नये, अशी स्थापत्त्य रचना करायला हवी, हे तेव्हाचे राजे आणि राज्य चालवणार्यांना चांगलं ठाऊक असावं. तेव्हा वीज किंवा पाणी उपसण्यासाठी पंप नव्हते. मोठी धरणं नव्हती. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा चपखल वापर करून जलमहाल बांधण्यात आले.
गर्भगिरीच्या डोंगरावर पडणार्या पावसाचं पाणी अडवून, एकत्र करून ते साठवण्यासाठी तलाव, बारवा तयार करण्यात आल्या. गुरूत्वाकर्षणाचं तत्व, जमिनीचा उतार आणि सायफन पद्धतींचा वापर केला गेला. जमिनीच्या उताराचा फार बारकाईने विचार केला गेला असावा. कारण वास्तूंची जागा निवडताना तिथपर्यंत पाणी कसं वाहून आणायचं, हेच मोठं आव्हान होतं.
फराह बख्क्ष महाल अगदी सीना नदीच्या काठी नसला, तरी त्याभोवती उद्यान होतं, तेव्हा ते नदीच्या किनार्यावरच असणार. हश्त बिहिश्त महालापासूनही नदी फार लांब नाही. तलावातील पाणी काढून देण्यासाठीही नदीचा उपयोग होत असावा.
फराहबख्क्ष महालासाठी अगदी शहरानजीक किंवा किल्ल्याजवळची जागा निवडण्यात आलेली नाही. कापूरवाडी किंवा भिंगार तलावातून आणलेल्या खापरी नळाबरोबर भंडारा नळ तयार करण्यात आला. हा नळ सध्याच्या जामखेड रस्त्यावरील हत्ती बारवेवरून आणलेला आहे. ही बारव आकारानं मोठी आणि उंचावर असून मोटेनं पाणी उपसून उतारानं कारंजासाठी पाणी आणणं शक्य झालं असावं. हा नळ पूर्व-दक्षिण दिशेकडून, तर कापूरवाडीचा नळ उत्तरेकडून आणण्यात आला.
सोलापूर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सैन्याच्या ऑटो रेजिमेंट आणि अर्काईव्ज परिसरात हा ॲक्वाडक्ट पहायला मिळतो. महालाच्या मागील बाजूस खापरी नळ आणल्याची खूण दिसते. कोपर्यात पाणी कमी-जास्त सोडण्यासाठी व्हाॅल्वसारखी यंत्रणाही असावी.
विस्तीर्ण चौरसाकृती तलाव बांधून त्याच्या मध्यभागी सुमारे सात-आठ फूट उंचीच्या अष्टकोनी दगडी चौथर्यावर महाल बांधण्यात आला आहे. आज जिथं वेड्या बाभळी माजलेल्या दिसतात, तिथं मोठी आमराई होती, चिंच व कवठाची झाडं होती, असा उल्लेख काही ग्रंथांत आढळतो.
या आमराईत हापूसची झाडंही असावीत. कारण बुर्हाण व हुसेन निजामशाहच्या काळात पोर्तुगीजांचं अहमदनगरला येणं-जाणं वाढलं होतं. वनस्पतींचा अभ्यासक गार्सिओ डाओत्रा तर बुर्हाण निजामशाहचा फिजीशियन होता. दख्खनचा आंबा अकबर बादशहाला आवडायचा, म्हणून करंड्या भरून दिल्लीत पाठवल्या जात, अशी इतिहासात नोंद आहे.
महाल असलेल्या चौथर्यावर चारही दिशांना कारंजी आहेत, पण आमराईतही कारंजी आणि विहिरी होत्या. यातील एका कारंजाचे अवशेष कुंपणाच्या बाहेर उत्तर-पूर्व दिशेला पहायला मिळतात. उत्तर-पश्चिमेला असून ती नेहमीसारखी गोल नसून चौरसाकृती आहे. आता तिच्यात पाणी साठत नाही.
तलावाच्या काठी फेरफटका मारण्यासाठी गुलाब आणि अन्य सुवासिक फुलांच्या ताटव्यांनी वेढलेली प्रशस्त मार्गिका होती. तलावातील पाण्यात उतरण्यासाठी मार्गिकेलगत एक टप्पा आहे. महालात जायचं ते चालत नव्हे, तर होडीतून. (या तळ्यात राजहंसासारखे पक्षी आणि होडी असलेलं चित्र सुमारे सव्वादोनशे वर्षांपूर्वी नगरचे चित्रकार गंगाराम तांबट नवगिरे यांनी रेखाटलं आहे. सध्या हे चित्र अमेरिकेतील येल विद्यापीठात जपून ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेतील अभ्यासक डाॅ. होली शेफर हे चित्रं पाहून नगर शोधत इथवर आली होती. आता तलाव कोरडा पडला असला, तरी चांगला पाऊस झाला की, थोडंफार पाणी साचतं. त्यात पडणारं महालाचं प्रतिबिंब डोळ्यांत साठवून ठेवावसं वाटतं.)
नौकाविहार करत, पक्ष्यांचं कूजन एकत चौथर्यापर्यंत यायचं. तिथं स्वागतासाठी थुईथुई नाचणारं कारंज सज्ज असायचं. या अष्टकोनी महालाच्या चारही बाजूला कारंजी आहेत. समोरचं आणि मागच्या बाजूच्या कारंजांचा आकार चौरसाकृती, तर कडेच्या दोन कारंजांचा आकार अष्टकोनी आहे. (आता केवळ खड्डे उरले आहेत. नाही म्हणायाला पाणी आणण्यासाठीची छिद्र तिथं दिसतात. पावसाळ्यात पाणी साचतं. )
महाल अष्टकोनी असला, तरी त्याच्या सगळ्या बाजू सारख्या नाहीत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांच्या बाजू मोठ्या आणि एकसारख्या आहेत, तर उपदिशांच्या बाजूची रूंदी कमी आहे. महाल दोन मजली, पण सध्याच्या पाच मजली अपार्टमेंटसपेक्षाही उंच असावा.
कुठल्याही बाजूनं वारा वहात असेल, तरी तो आत येणारच, सूर्य कुठल्याही बाजूला असू द्या, त्याचा प्रकाश अंतर्भाग उजळवेल अशा कमानी आणि गवाक्ष या महालाला आहेत. सकाळी सूर्य उगवला की, किरणं महालातून आरपार जातात. त्यांनी तयार केलेली नक्षी बघण्यासारखी असते.
महालात प्रवेश केला, की काॅरिडोअरमध्येही छोटी कारंजी दिसतात. छताकडे नजर फिरवा. चुन्यामध्ये केलेली नक्षी अजूनही आपलं सौंदर्य टिकवून आहे. सूर्यकिरणं आणि शंकरपाळ्यांची ही नक्षी केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर प्रकाश आणि ध्वनिपरिवर्तनासाठीही फार उपयुक्त ठरते. आता जरा खाली जमिनीकडे नजर टाका. तिथल्या दरजा भरण्यासाठी चक्क हिरव्या रंगाची काच वापरलेली आहे. टाॅर्चचा प्रकाश टाकला, की काच प्रकाशमान होते. काचेचा असा वापर अन्यत्र कुठे सहसा पहायला मिळत नाही.
आता काॅरिडोअरमधून आपण मध्यभागी असलेल्या रंगमहालात किंवा दिवाणखान्यात प्रवेश करूया. इथं रंगायच्या मैफली. कधी देखण्या नृत्यांगनांचा पदन्यास, तर कधी देश-विदेशांतील शायरांचा मुशायरा. मध्यभागी असलेल्या कारंजाभोवती एका बाजूला गाद्यागिरद्या टाकलेल्या असत. समोर कलाकार आपली अदा सादर करत असतील.
मध्यभागी असलेलं अष्टकोनी कारंजं कधीकाळी संगमरवरी पुष्करणीनं मढवलेलं असावं. त्यातील पाण्यात निरनिराळ्या सुवासाची अत्तरं मिसळली जात असतील. सगळ्या दारांवर मखमली आणि चिकाचे पडदे झुळझुळत असतील. भिंतींमध्ये केलेल्या टेराकोटा पद्धतीच्या कोनाड्यांत दिवे प्रज्ज्वलित केल्यावर तर महालाचा गुलाबी रंग सोन्यासारखा उजळत असेल. आज नुसती कल्पना केली, तरी फराहबख्क्षचं वैभव डोळ्यासमोर उभं राहतं..
या रंगमहालाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याचं छत घुमटाकृती असूनही आवाज अजिबात घुमत नाही. प्रत्येक सूर, स्वर आणि शब्द स्पष्ट ऐकू येतो. शिवाय सगळीकडे आवाज एकसारखा पोहोचतो. एखाद्या कोपर्यात आवाज ऐकू येत नाही, असं होत नाही. खाली सुरू असलेल्या संगीत मैफलीचा आवाज वरच्या मजल्यावरील जनानखान्यात म्हणजे स्त्रियांसाठी असलेल्या महालातही अगदी छान पोहोचतो. एखादं गाणं गुणगूणून पहा, म्हणजे याची प्रचिती येईल..
असं सांगतात, या घुमटाच्या मध्यभागी बिलोरी लोलक लावलेलं सुंदर झुंबर होतं. रंगमहालाच्या चारही बाजूनं गवाक्ष आहेत. बारकाईनं पाहिलं, तर लक्षात येतं, त्यांचा आकार व कोन एकसारखा नाही. बाहेरची बाजू मोठी आणि आतली छोटी. शिवाय मध्ये एक स्टेप. हवेचं तापमान नियंत्रित करण्याबरोबर ध्वनिवर्धकाचं काम हे गवाक्ष करत असावेत. त्यामुळं महालात सुरू असलेलं गाणं बाहेरही छान ऐकू येतं.
या महालाच्या बांधकामात साग आणि शिसमच्या तुळयांचा सढळ वापर करण्यात आला आहे. चार शतकांनंतरही हे लाकूड खराब झालेलं नाही. भिंतींना असलेलं चुन्याचं प्लास्टर काही ठिकाणी सहा इंचापेक्षा जाड आहे. नगरचा चुना प्रसिद्ध. गुळ, विविध प्रकारच्या डाळी, तूस, लिद मिसळून तो चाळीस दिवस चांगला मळला जात असे. त्यामुळे सिमेंटपेक्षाही तो जास्त मजबूत बनत असत. प्लास्टर करताना त्यात खापरांचे तुकडे मिसळले जात. शिवाय गुळगुळीतपणा आणि चकाकी येण्यासाठी वरून कवड्या घासल्या जात. त्याला “कवडी प्लास्टर” म्हणत. प्लास्टर धरून ठेवण्यासाठी लाकडी तुळ्यांवर टोचे आणि खिळे मारलेले दिसतात.
हा महाल राजे आणि त्यांच्या पाहुण्यांना राहण्यासाठी किंवा निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे अन्यत्र असतात, तशी दालनं इथं नाहीत. हा महाल केवळ मौजमजा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठीच बांधण्यात आला. चारही बाजूने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेले जिने ऑडीटेरियमसाठी योग्य असेच आहेत.
जिने असे आहेत की, त्यावरून ये-जा करणाऱ्यांचा व्यत्यय रंगमहालात सुरू असलेल्या मैफलीत येऊ नये. जिने प्रशस्त आहेत. आगंतुकांना रोखण्यासाठी जिना जिथे संपतो, तेथे वरच्या बाजूला चोरकप्पा तयार करण्यात आला आहे. भाला घेतलेला सैनिक त्यात बसलेला असणार. “हा मजला स्त्रियांसाठी आहे. तुम्ही बिनबुलाये मेहमान आहात,” असं लक्षात येताच तो पाठीमागून भाला टोचून परत जा, असे सांगत असेल. आता चारपैकी केवळ खालचे दोन व वरचा एकच जिना सुस्थितीत आहे.
या महालात त्या काळचे नावाजलेले कलाकार आपली कला सादर करत. त्यांची वाद्ये, पोषाख ठेवण्यासाठी, तसंच रंगभूषा आणि वेशभूषा करण्यासाठी जागा हवी. त्यासाठी एक ग्रीन रूमवजा छोटी खोली तळमजल्यावरील मागच्या कोपर्यात आणि वरच्या मजल्यावर आहे. आता तिथे दरवाजा नाही, पण दार लावण्यासाठी असलेली खोबणी वरच्या बाजूला दिसते. काहींच्या मते किल्ल्यातून येणारं भुयार तिथं असावं, पण ते कुणी पाहिलेलं नाही.
या महालाचं छतही नेहमीपेक्षा वेगळं आहे. हा घुमट बाहेरून लक्षातही येत नाही. विजापूरच्या गोल घुमटाएवढा नाही, पण बर्यापैकी मोठ्या आकाराचा हा घुमट आहे. त्याच्या चारही बाजूला दुहेरी छत आहे. छतामध्ये तीन-चार फुटांची पोकळी आहे. त्यात हवा खेळत राहते. सूर्यनारायण कितीही कोपला, तरी मधल्या पोकळीमुळं ती उष्णता खाली पाझरत नाही. छताच्या कडेचा काही भाग पडला असल्यानं काही प्रियकर-प्रेयसी या मधल्या जागेत जाऊन प्रेमाच्या आणाभाका घेतात. भिंतीवर त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या प्रेमाची साक्ष देतात. अलिकडे काही उत्साही मंडळी प्री-वेड फोटो सेशन करण्यासाठी इथं येत असतात.
फऱाहबख्क्ष महालाच्या छतावर उभं राहिलं की, नगर शहराचं विहंगम दश्य दिसतं. अगदी मांजरसुंभा, मिरावली पहाड, मेहेराबाद आणि सलाबतखान मकबरा सहज दिसतो. पूर्वी सलाबतखान मकबर्याचा उपयोग टेहाळणी आणि संदेशवहनासाठी केला जायचा. तिथे मशाली पेटवल्या, धूर केला, की थेट फराहबख्क्ष महालापर्यंत सांकेतिक पद्धतीनं तो संदेश पोहोचवला जात असणार.
डावीकडे रणगाडा संग्रहालयाची झाडी दिसते. त्याच्या मागच्या बाजूला नगरपालिकेच्या काळात बांधण्यात आलेलं बंद पडलेलं जलनिःसारण केंद्र आणि सोलापूर रस्त्याच्या टोकाला एमआयआरीसीच्या इमारतींचं छत दृष्टीस पडतं. खाली नजर टाकली की, तलावाच्या भव्यपण दाखवणार्या त्याच्या सीमा दिसतात.
पाण्याची आधीच कमतरता, मोठ्या मुश्किलीनं आणलेलं पाणी जमिनीत झिरपू नये, म्हणून तलाव वाॅटरप्रूफ करण्यात आला होता. त्याची चुनागच्ची उखडली असली, तरी अजून काही ठिकाणी पांढरे पॅचेस दिसतात. महालाच्या अवतीभोवती पूर्वी रणगाडे व चिलखती गाड्या चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्यांच्यासाठी तयार केलेला रॅम्प जवळच आहे. कुंपण करण्याआधी काही वेळा हे रणगाडे तलावातही येत असावेत. त्यामुळं तलावातील चुनागच्ची खराब झाली. नंतर झाडांच्या मुळांनी तलावाची वाट लावली.
या महालाची कमान किती उंच आहे, याची कल्पना छतावरून थोडं पुढं डोकवलं की येते. अक्षरशः डोळेच फिरतात. क्रेनसारखी फारशी साधनं नसताना इतक्या उंच कमानी कशा बांधल्या असतील, हे उमगत नाही. महाराष्ट्रात अन्यत्र इतक्या उंच कमानी अभावानंच असतील.
अनेक प्रकारचे पक्षी इथं पहायला मिळतात. पोपट, कबुतर, मैना, कोतवाल, शिंजीर, सुगरण, कोकिळ, सनबर्डबरोबरच कधी तरी कापशी घार भक्ष्य टिपताना दिसते. पिंजर्यात पोपट पाळणार्यांनी इथले स्वच्छंदी पोपट एकदा न्याहाळावेत. त्यातला एखादा लिंबाच्या झाडाच्या शेंड्यावर बसून फोटोसाठी तुम्हाला छान पोझही देईल..
अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार फराहबख्क्ष महाल आहे. हा महाल सुंदर असला, तरी तो अपशकुनी आहे, अशी निजामशहाची समजूत झाली होती. कारण बांधकाम झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कालव्यातून (ॲक्वा डक्ट) पाण्याचा इतका मोठा लोंढा आला, की महालात पाणी शिरलं. राजाला हे चिन्ह चांगलं वाटलं नाही. शिवाय ज्याच्या काळात महाल उभा राहिला, तो मुर्तजा दिवाना होऊन वेडाचार करू लागला होता.
या पर्शियन किंवा तिमूर शैलीतील महालाचा आराखडा ज्यानं तयार केला, तो शहा ताहीर मोठा कवी होता आणि प्रत्यक्ष बांधकाम ज्यानं करून घेतलं, तो सलाबतखान (दुसरा) हाही कवी होता. कवींचा आदरसत्कारही तो करत असे. किल्ल्याच्या बांधकामात त्याचाच मोठा सहभाग होता. नगर-पाथर्डी रस्त्यावरचं तिसगाव आणि पुण्याजवळचं तळेगाव यानंच वसवलं. भातोडीचा तलाव सलाबतखानानं तयार केला. शाह डोंगरावरचा दुर्बिण महाल यानंच उभारला, जिथं नंतर तो कायमचा विसावला.
या महालाचं उदघाटन मुशायर्यानं झालं होतं. मुक्का मलिक कुम्मी या प्रसिद्ध शायरानं यावेळी दीर्घ काव्य सादर केलं होतं. या महालाच्या सौंदर्याचं वर्णन त्यात होतं. उद्यानातील गुलाब आणि अन्य झाडांचीही माहिती त्यात होती. “सुरूचं झाड असं सरळसोट उभं आहे, की जणू सुलतानाच्या आदेशाची प्रतीक्षा करत असावं.. महाल इतका उंच की, जणू आकाशाला गवसणी घालत आहे”, असं एका कवीनं म्हटलं आहे.
या महालाच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या खजिन्यावर एक शिलालेख होता. त्यात महाल कधी बांधण्यात आला, याचा उल्लेख आहे. हा शिलालेख आता चंगेजखान महाल म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या जुन्या वास्तूच्या तळभागात असा लावण्यात आला आहे, की तो सहजासहजी कुणाला दिसू नये. “मुजदे अहमदनगर” पुस्तकात या शिलालेखातील मजकूर देण्यात आला आहे –
नामे ई अजखूबीने आबोहवा
शुद्ध फराबक्ष ई चुनी मशहूरबाद
बूद न्यामतखान च्युं साईएबिना
सइ हाये उ हुमा मशकूरबाद
खास्तं तरखिश अजपीरे खिर्द
गुपत यारब ता अबद मामूरबाद
“सौंदर्य आणि उत्तम हवा यावरून या जागेचं नाव फराबक्ष म्हणजे सुख देणारा असे होते. त्याच नावाने तो प्रसिद्ध असो. ज्याअर्थी न्यामतखान या इमारतीचा कारागीर झाला, त्याअर्थी त्याच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता असावी. मी एका वृद्ध व शहाण्या माणसात त्याची तारीख विचारली. तो म्हणाला, गुप्त यारब, ता. अबद मामूर बाद (हे परमेश्वरा यावत चंद्र दिवाकरौ) येथे वास्तव्य असो.”
या शिलालेखावरून महाल तयार झाल्याची तारीख हिजरी ९८४ म्हणजे इ. स. १५७६ येते. शहा ताहीर यांच्या म्हणून काही काव्यपंक्तीही “मुजदे अहमदनगर”मध्ये देण्यात आल्या आहेत.
दरबावे फराहबक्ष गुजरकुनशाहा
अरवावे निशतरा नजरकुनशाहा
न्यामतखान रा अजबहरे तारीखे बिना
आज बागे फराहबक्ष बदरकुनशाहा
या ओळींचा अर्थ असा – हे राजा, या फराबक्ष बागेमध्ये तू जा. तेथील सुखाची साधने जी आहेत, त्याकडे तू नजर टाक. हे राजा, ही इमारत तयार झाल्याची तारीख तुला पाहिजे असल्यास या फराबागेमधून न्यामतखानास हाकलून दे.
मुर्तजाची बहीण सुलताना चांदबिबी आपल्या सख्यांसमवेत फराह बख्क्ष महालात येत असावी. तिला काव्य, संगीताची आवड होती. वनविहार करतानाची तिची चित्रं प्रसिद्ध आहेत.
असं म्हणतात, की शहाजहान युवराज असताना वडील जहांगीर यांच्याविरोधात बंड करण्याच्या मनःस्थितीत दख्खनमध्ये आला होता. त्यावेळी त्यानं फराह बख्क्ष महाल पाहिला. त्याला तो इतका आवडला, की प्रिय पत्नी मुमताज बेगमच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ वास्तू उभारायची ठरली, तेव्हा शहाजहानला आठवला तो अहमदनगरचा फराहबख्क्ष महाल.
ताजमहाल संगमरवात बांधला गेला. त्याच्यासारखे मिनार आणि भव्य घुमट फराहबख्क्ष महालाला नाही, पण ताज नसलेला हा महाल ताजमहाल आधी सुमारे पन्नास वर्षे बांधला गेला, ही गोष्ट महत्त्वाची आहे. अभ्यासकांनी, वास्तुविशारदांनी फराहबख्क्ष महाल आणि ताजमहालाच्या मोजमापांची तुलना केली, तेव्हा त्यांना त्यात बरंच साम्य आढळलं. दिल्ली, आग्र्यातील इतिहासकार मात्र याबाबत अनभिज्ञ असावेत.
मोगलांनी अहमदनगरच्या किल्ल्यावर आक्रमण केलं, तेव्हा अकबरपुत्र मुराद बरोबर आलेला सरदार खान खनान याचा तळ फराहबख्क्ष महालात होता. या महालाच्या सौंदर्याच वर्णन मुरादला समजलं, तेव्हा तो हश्त बिहिश्त बागेतला डेरा उठवून इथं येऊन राहिला. औरंगजेबानंही इथं भेट दिल्याचा उल्लेख आहे.
सन १७५० मध्ये जर्मन मिशनरी जोसेफ टिफेनथालर यांनी अहमदनगरला भेट दिली होती. या प्रवासाचं वर्णन त्यांनी लॅटिन भाषेत लिहून ठेवलं आहे. त्याचं फ्रेंच भाषांतर १९८६ साली बर्लिनमध्ये प्रसिद्ध झालं. “नगर शहरात सुंदर बागा आहेत. त्यात फराहबाग ही सगळ्यांत मोठी बाग आहे. ही बाग २४०० चौरस मीटर क्षेत्रात पसरली असून तिच्या मध्यभागी ६२४ मीटर परिघाचा सुंदर तलाव आहे. आजूबाजूच्या डोंगरांमधून भूमिगत कालव्यातून या तलावात पाणी येते,” असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
पेशवाईत सदाशिवराव भाऊ उदगीरच्या मोहिमेवर असताना त्यांचा मुक्काम डिसेंबर १७५९ मध्ये फराहबख्क्ष महालात होता. या महालाच्या सौंदर्याचं वर्णन त्यांनी एका पत्रात केलं आहे. “फराहबाग बहुत उत्तम आहे. तेथे जवळ राहणे यासही स्थळ चांगले आहे,” असे लिहिलेल्या या पत्राची प्रत नगरच्या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात आहे. तलावाच्या मध्यभागी असलेल्या फराह बख्क्ष महालाच्या कल्पनेवरून नंतर पुण्यात सवाई माधवरावांच्या काळात “तळ्यातला गणपती”ची निर्मिती (सारसबाग) झाली असावी.
ब्रिटिशांच्या काळात प्रारंभीचे हौशी युरोपियन कलेक्टर काही दिवस या महालात रहात असावेत. महालाचे काही झरोके, गवाक्ष विटांनी बंद केल्याची जुनी छायाचित्रं पहायला मिळतात. या छायाचित्रांत महालाभोवतीच्या तलावात पाणी आणि चौथर्यावर उगवलेली मोठी झाडं स्पष्ट दिसतात.
ख्रिस्ती मिशनरी १८३१ साली अहमदनगरला आले, तेव्हा त्यांना शहरात राहण्यासाठी जागा मिळेना. मग त्यांचा मुक्कम फराह बख्क्ष महालात पडला. मिशनर्यांचं तथाकथित सेवाभावी कार्य पहिल्यांदा या वास्तूतच सुरू झालं. मिशनर्यांचा पहिला दवाखाना, पहिली शाळा आणि पहिलं रेशीम उद्योग केंद्र या महालातच होतं.
“महाराष्ट्रातील ख्रिस्ती मिशन्सचा इतिहास” या पुस्तकात बाळकृष्ण भोसले यांनी म्हटलं आहे – नोव्हेंबर १८३१ मध्ये मिस्टर अलन व मिस्टर रिड हे मिशनरी अहमदनगरला आले. डाॅ. ग्रॅहम या ब्रिटिश वैद्यकीय अधिकार्यानं त्यांचं स्वागत करून आपल्या बंगल्यात ठेवून घेतलं. ९ डिसेंबर १८३१ ला मुंबईहून मिसेस ग्रेव्हज, मिसेस रीड व मिस्टर हर्वे निघाले. तेव्हा रेल्वेची सोय नसल्यानं मजल-दरमजल करत २० डिसेंबरला ते अहमदनगरला पोहोचले.
ब्राह्मण समाजातून ख्रिस्ती झालेला बाबाजी रघुनाथ याला त्यांनी सहायक म्हणून घेतलं. अमेरिकन मिशनर्यांना मुस्लिम सुलतानाच्या ओसाड पडलेल्या महालात, फर्या बागेत जागा मिळाली. तेथील काही खोल्यांची डागडुजी करून त्यांनी आपला संसार थाटला व आपल्या कामालाही प्रारंभ केला. बाबाजीच्या मदतीने त्यांना एक आश्रम स्थापला. निराधार, दरिद्री, अपंग यांच्याकरिता एक आश्रयस्थान त्यांनी तयार केले.
काळाच्या ओघात या देखण्या वास्तूकडं सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं. उद्यान नाहीसं होऊन तिथं वेड्या बाभळी उगवल्या. तलाव कोरडा पडला. तलावात, चौथर्यावर, भिंती आणि छतावर झाडंझुडपं उगवली. त्यांच्या मुळांनी महाल वेढला, भिंतींना तडे गेले, काही कमानी कोसळल्या. तलावाची चुनागच्ची उखडली.
त्यात पूर्वीसारखं पाणी साठेनासं झालं. महालात जे काही मूल्यवान होतं, ते सगळं लांबवण्यात आलं. अगदी भिंतीवरचा पाच-सहा इंच जाडीचा गिलावा फोडून आतल्या सागवानी तुळया चोरण्यात आल्या. महालात कोणाचा वावर नाही, असं पाहून चोर आणि दरोडेखोर तिथं मुक्काम करू लागले. गंजाडी आणि जुगारी अड्डा जमवू लागले. त्यामुळे एकटा-दुकटा पर्यटक किंवा इतिहासप्रेमी तिथं जायला घाबरू लागला.
ढासळणारी शेवटची कमान तग धरून राहावी, यासाठी पुरातत्व विभागानं विटांचं बांधकाम करून त्याला टेकू दिला, पण त्यामुळं महालाला कायमचं वैगुण्य आलं. महालापर्यंत रस्ता तयार करण्यासाठी तलावात दगड-मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळं तलावाचंही सौंदर्य कमी झालं.
१९९० साली अहमदनगरची पंचशताब्दी साजरी झाली आणि या महालाच्या दुर्दैवाचे दशावतार थोडे कमी होऊ लागले. पुरातत्वकडून थोडीफार डागडुजी सुरू करण्यात आली. एकेवर्षी अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रूपचे जयंत येलूलकर आणि नगरपालिकेच्या वतीनं २८ मेच्या संध्याकाळी फराह बख्क्ष महालाच्या चौथर्यावर गाण्याची मैफल आयोजित करण्यात आली.
संध्याकाळी प्रकाशझोतानं महाल उजळला. कारंजी थुईथुई नाचू लागली. नगरकरांचं स्वागत करण्यासाठी मिलिटरी बँड सुरावट आळवू लागला. सगळं वातावरण सुगंधित, प्रफ्फुलित झालं होतं, उत्साहानं भारलं होतं. चारशे वर्षांपूर्वी महालाचं वैभव कसं असेल, याची झलक सगळ्यांना पहायला मिळाली.
असा काही जलमहाल नगर परिसरात आहे, हे अनेकांना पहिल्यांदाच उमगलं. प्रेक्षकांना बसण्यासाठी ओट्यावर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी विमलेंद्र शरण यांच्या प्रमुख उपस्थितीत मैफल रंगत गेली. कर्नेलसिंग मांगट यांच्या गझलांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
हळूहळू नगर दर्शन सहली सुरू झाल्या. फराह बख्क्ष महाल हे या सहलींचं प्रमुख आकर्षण बनलं. आशियातलं पहिलं रणगाडा संग्रहालय (CAVALARY TANK MUSEUM) याच परिसरात झाल्यानं रस्ता डांबरी झाला. त्यामुळं पर्यटकांची वर्दळ वाढली. पुरातत्व विभागानं महालाभोवती कुंपण तयार करून गेट बसवलं. त्यामुळे थेट महालापर्यंत जाणारे रणगाडे आणि अन्य वाहनांना प्रतिबंध झाला. देखभाल, दुरूस्तीची काही कामं झाली.
“स्वागत अहमदनगर हेरिटेज वॉक”च्या काही आठवणी संस्मरणीय आहेत. हा नुसता महाल नसून ते सोळाव्या शतकातलं ऑडिटोरिअम आहे, कधी काळी इथं मुशायरे झाले आहेत, मैफली सजल्या आहेत. असा एखादा कार्यक्रम महालातील दिवाणखान्यात करावा आणि तोही वीज आणि साउंड सिस्टिमशिवाय असं खूप दिवसांपासून मनात होतं.
अनेक कलावंतांशी, वादकांशी आणि कवींशी बोलताना मी हा विषय काढायचो. एकदा प्रयोग करून पहावा, म्हणून प्रसिद्ध सुफी गायक श्री. पवन नाईक यांना घेऊन महालात गेलो. नाईक दाम्पत्य व मी असे तिघंच होतो. पवनजींनी तिथं बसून कुठलीही साथसंगत नसताना दोन-तीन अप्रतिम गाणी म्हटली. ती इतकी छान ऐकू आली, की मग ठरलं एक मैफल इथं करायचीच. अशातच एकदा पुण्याहून आलेल्या संगीत अभ्यासक सौ. मालकर यांनीही सुरेख गाणं सादर केलं.
दैनिक दिव्य मराठी आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठानमुळं मैफलीचा योग जुळून आला. श्री. पवन नाईक आणि सहकार्यांचं सुफी गायन, श्री. मधुकर चौधरी यांचं ब्रह्मवीणा वादन आणि श्री. चंद्रकांत पालवे, श्री. संजीव तनपुरे, श्री. सतीश डेरेकर, श्री. लियाकत अली सय्यद, श्री. किरण डहाळे, प्रा. एन. बी. मिसाळ, श्री. दिलीप शहापूरकर आदींचं कविता वाचन असा कार्यक्रम ठरला.
मधल्या कारंजाभोवती गाद्या, सतरंजा टाकून बैठक व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेचे तेव्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शैलेश नवाल, यशवंत फाउंडेशनचे श्री. प्रशांत गडाख आदींच्या उपस्थितीत भल्या सकाळी रंगलेली ही मैफल चिरकाळ स्मरणात राहिली. अशाच काही मैफली नंतरच्या काळातही फराह बख्क्ष महालात रंगल्या. राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री. पोपटराव धामणे व त्यांचे काही शिष्य, सुनील महाजन, डाॅ. शिरीष कुलकर्णी आदी मंडळी त्यात सहभागी झाली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी फराह बख्क्ष महालाला दिलेली भेट ही माझ्यासाठी मर्मबंधातील ठेव आहे. हा महाल पाहण्याचं खूप वर्षांपासून त्यांच्या मनात होतं. वयाची नव्वदी ओलांडल्यावरही बाबासाहेबांचा उत्साह तरूणांना लाजवणारा होता. सीए राजाभाऊ काळे यांच्या घरी ते उतरले होते.
भल्या सकाळीच ते बाबासाहेबांना घेऊन आले. महाल जणू शिवशाहिरांची वाटच पहात होता. बाबासाहेबांच्या वाणीतून तो काळ पुन्हा जिवंत झाला. त्या भेटीत बाबासाहेब म्हणाले, योगायोग बघा, “जाणता राजा” महानाट्याचे परदेशांत कार्यक्रम करण्यासाठी मी जो फोल्डींग सेट नव्यानं तयार करून घेतला आहे, तो अगदी या महालासारखा आहे.
आणखी एक गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली, “फार पूर्वी मी फुलवंती नावाचं नाटक लिहिलं होतं. या महालाचीच पार्श्वभूमी त्याला आहे. त्याविषयी मी कुणाला अजून सांगितलेलं नाही. आज पहिल्यांदा सांगतो आहे. आपण त्यांच वाचन निवडक मंडळींच्या उपस्थितीत इथंच करूया..”
प्रसन्न मुद्रेनं बाबासाहेब दोन्ही हात उंचावून संवाद साधत असत, असं ते दृश्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे..
देश-विदेशांतल्या पर्यटकांनी हा आगळावेगळा महाल पहावा, असं मला नेहमी वाटतं. पण पाहुण्यांना घेऊन गेलं की, लाजेनं मान खाली घालावी लागते. कारंजाच्या कोंडाळ्यात टाकलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकार्या, भिंतीवर केलेले ओरखडे आणि नावं लिहून केलेलं विद्रुपीकरण पाहिलं, की फार खंत वाटते. ज्यांनी ही महाल बांधला, त्या राजांनं, अभियंत्यांनी कुठं आपलं नाव लिहून ठेवलं नाही..
फराह बख्क्ष महालाकडे जाणार्या रस्त्यावर काटवनात एका ब्रिटिश अधिकार्याचं थडगं आहे. या थडग्याची उंची तब्बल आठ फूट आहे. त्यामुळे तो मोठा अधिकारी असावा. त्याच्या वरच्या बाजूला शिलालेख आहे. मात्र, तो फुटला असल्यानं काही अक्षरं वाचता येत नाहीत. या लष्करी अधिकार्याचं नाव मेजर डब्ल्यू निक्सन असं असून तो १९ व्या रेजिमेंट एन. आय. मध्ये होता. त्याचा मृत्यू ७ नोव्हेंबर १८३१ रोजी झाला. मात्र, मृत्यू कुठल्या कारणाने झाला, हे नमूद केलेलं नाही. पूर्वी तिथं चिंचेचं झाड होतं. काळाच्या ओघात ते नामशेष झालं…
फराह बख्क्ष महाल केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे. या वास्तूच्या माहितीचे फलक त्यांनी लावले आहेत. या महालाची श्री. विलास नवगिरे यांनी तयार केलेली प्रतिकृती “स्वागत अहमदनगर”च्या वतीनं नगरच्या किल्ल्यातील नेता कक्षात ठेवण्यात आली आहे.
या महालाभोवतीची जागा लष्कराची आहे. पुरातत्व विभाग आणि लष्कराच्या समन्वयातून परिसरातल्या काटवनाचं रूपांतर सुरेख अशा उद्यानात नक्की करता येईल. महालाचं जतन, संवर्धन करण्याबरोबर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं पर्यटन केंद्र करण्याच्या दृष्टीनं नगरमधील आर्किटेक्ट सूचित मुथा यांनी आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी होईपर्यंत निदान तलावाची डागडुजी करून संध्याकाळी प्रकाशझोतांनी महाल उजळवला गेला, पर्यटकांना बसण्यासाठी कडेला बाक टाकले, तरी खूप काही साध्य होऊ शकेल.
८८३१३३७७७५
[email protected]
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.