आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘भगवान देता है तो छप्पर फाड के देता है’ हे आपण बऱ्याचदा ऐकतो. कुणाला लॉटरी लागते, तर कुणाला सहजच चालता चालता रस्त्यात पडलेली शंभराची नोट सापडते, तर काहींना अनपेक्षित असे सुखद धक्केही बसतात.
अशातली एक गोष्ट अमेरिकेत घडली. एक सामान्य भंगारवाला, ज्याचा तेवढ्याच सामान्यपणे संबंध येतो तो निरूपयोगी, टाकाऊ अशा वस्तूंशी. पण अमेरिकेतला एक भंगारवाला थोडा नशीबवान निघाला जेव्हा त्याला एक सोन्याचं अंडं मिळालं.
रशियन राज्यक्रांती पूर्वीचा हा ऐवज. रशियाचा झार, अलेक्झांडर याने १८८७ साली, तो स्वतः ख्रिस्ती परंपरेतील असल्यामुळे ईस्टरच्या पवित्र दिनी भेट म्हणून आपली पत्नी मारिया हिला हे, सुशोभित, सुबक, रत्नजडित, असं सोन्याचं अंडं भेट दिलं. ‘अंड’च का दिलं हाही प्रश्न आपल्याला पडू शकतो, तर याचं कारण आहे अंडं हे ईस्टरच्या दिवसाचं आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं असेल.
रशियातल्या कार्ल फॅब्रिजे याने खास रशियन राजघराण्यातील व्यक्तीसाठी म्हणून हे अंडं तयार केलं होतं त्यामुळे याला ‘फॅब्रिजे एग’ असंही म्हणतात. याचं वैशिष्ट्य होतं की हे अंडं स्वतः एका तीन पायांच्या स्टॅण्ड वर बसवलं गेलं होतं आणि ते अशाप्रकारे बनलेलं की त्याला आतून शोभेल असं लेडीज घड्याळ त्यात बसवलं होतं.
रशियन राज्यक्रांती घडली आणि झारशाही संपून सगळ्याच गोष्टी बदलल्या. या काळात झार, त्याच्या कुटुंबासोबतच हे आणि इतरही अशी त्यावेळी त्याच्या महालात असलेली जवळपास पन्नासेक सोन्याची (ईस्टर) अंडीसुद्धा रशियातून हद्दपार झाली. रशियन क्रांतीनंतर, क्रांतिकारक रशियन लोकांनी सर्वच गोष्टींचा ताबा मिळवला आणि त्यात ही मौल्यवान अंडी त्यांनी बाहेर विकली.
पुढचं जवळपास अर्ध शतक या अंड्यांबद्दल कुणाला काही माहीत नव्हतं. त्यापैकी काही पुढच्या काळात जगात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी वैयक्तिक संग्रहात ठेवलेली आणि काही संग्रहालयांमध्ये जपलेली आढळून आली. यातल्या काहींचा नंतर १९६४ साली लिलावही केला गेला, ज्यांना या किमती अंड्यांचा मूळ इतिहास माहीत नव्हता त्यांनी एक मौल्यवान, शोभेची, अशी वस्तू म्हणून २०००, ४००० डॉलर अशा किंमतीला विकत घेतली आणि विकणाऱ्यांनाही याची मूळ किंमत आणि इतिहास माहीत नसल्यामुळे त्यांनीही ते तसेच विकले.
यानंतर मध्ये जवळपास चारेक दशकांचा काळ गेला, या अंड्यांची, झारच्या वस्तूंची लोकांना फार आठवणही नव्हती, तेव्हा या भंगारवाल्याच्या संग्रहात अमेरिकेच्या फ्ली मार्केटमधून यातलं एक सोन्याचं अंडं आलं. त्याने ते खरंतर बाजारातून खरेदी करताना बाकी लोखंड वगैरे घेत असताना, या सोन्याच्या रत्नजडित अशा अंड्याची आकर्षक वस्तू म्हणून १४ हजार डॉलरला खरेदी केली.
मूळ १४ हजार डॉलरला घेतलेलं हे सोन्याचं, रत्नजडित, ऐतिहासिक अंडं त्याने वितळवून ते विकण्याचा घाट घातला आणि जरा जास्त किंमतीने विकलं तर यातून आपल्यालाही काही नफा मिळेल या विचारात त्याने हे अंडं विकायला नेलं. किमान ५०० डॉलरचा फायदा झाला तरी आपली चंगळ असेल असा काहीसा त्याचा अंदाज. त्याच्या वैयक्तिक संग्रहात हे अंडं शोभा वाढवत त्याच्या तीनपायी स्टॅन्डबर बसून होतं.
२०१२ साली इंटरनेटच्या जमान्यात या अज्ञात भंगार खरेदीदाराने गुगल वर फक्त ‘अंडं’ हा शब्द टाकून बघितला आणि काही माहिती मिळते का ते शोधलं तेव्हा त्याला तो मोठा धक्का बसला. त्यात वर्षभरापूर्वीचा, २०११ सालचा एक लेख त्याच्या वाचनात आला, ज्यात एका विशिष्ट, मौल्यवान अश्या अंड्याबाबत लिहिलं होतं. ते कुठलंही सामान्य, चमकणारं, सोन्याचं अंडं नसून शंभर वर्षांपूर्वी रशियाच्या झारशाहीतून बाहेर आलेलं हे मौल्यवान असं ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं रत्नच आहे हे त्याने वाचलं.
याची किंमत ही २० मिलियन पाउंड/३३ मिलियन डॉलर असल्याचं वाचून तर तो आणखीनच उडाला. ५०० डॉलर चा फायदा व्हावा ह्या एका व्यावहारिक हेतूने तो हे अंडं विकणार होता त्याची किंमत थोडीथोडकी नसून मिलियन्समध्ये होती आणि त्यातही त्याला ऐतिहासिक महत्वही होतंच.
या अज्ञात भंगार खरेदीदाराने हे अंडं विकण्याचा निर्णय बदलला आणि ‘फॅब्रिजे’ कारागिरीमध्ये तज्ज्ञ असलेल्या किएरेन मॅकार्थीला संपर्क करून आपल्यापाशी असलेल्या ‘फॅब्रिजे एग’ची माहिती देऊन नंतर त्याच्या हाती हे अंडं सुपूर्द केलं. त्याला आपल्याकडे असलेल्या या अंड्याची खरी पैशात न मोजता येणारी किंमत माहीतही नव्हती, एक गुगल सर्च करणं आणि त्यातून मिळालेली माहिती हा योगायोग इथे उपयोगी पडला.
भविष्यात कुठे हे हरवलेलं अंडं मिळू शकेल अशी अपेक्षाही नसताना हातात पडलेला हा ऐतिहासिक ऐवज बघून स्वतः मॅकार्थीही चकित झाला होता. आपण ज्या कलेमध्ये, ज्या विषयामध्ये प्रवीण आहोत त्यातली जवळपास शंभर वर्षे जुनी अशी गोष्ट थेट हाती आल्यामुळे ‘आपण नशीबवान आहोत आणि यामुळे माझ्या जीवनाचं सार्थकच झालं’ अश्या भावना मॅकार्थीने त्यानंतर व्यक्त केल्या.
ज्याच्याकडे हे अंड होतं तो त्यावरची कलाकुसर, त्याची रचना, घडण यांपैकी काहीच न बघता केवळ हे सोन्याचं अंडं आहे आणि नक्कीच यातून चांगली किंमत मिळेल, या मानसिकतेत होता आणि दुसऱ्या बाजूला कितीही किंमत द्यावी लागली तरी देईन पण हा महत्वाचा ऐवज आपल्या हाती यावा, ते ज्याप्रकारे साकारलं आहे त्याचा अभ्यास आपण करावा या मानसिकतेत मॅकार्थी होता.
झारची सत्ता अस्ताला जाईपर्यंत १९१६ पूर्वी रशियन झार कुटुंबासाठी फॅब्रिजेने एकूण अशा प्रकारची पन्नास अंडी बनवली होती. या अंड्यांच्या निर्मितीसाठी जवळपास वर्षंभर काम करावं लागत असे एवढी कला आणि सोनं, रत्न यात भरलेली होती. हे कसं बनवलं जात असे याबद्दल तेव्हा कुणालाच फारसं माहीत नसे आणि त्याचमुळे आजही मॅकार्थीसारखे अभ्यासक ते अभ्यासत आहेत.
त्यानंतर भविष्यात या पन्नास अंड्यांपैकी बेचाळीस अंडी विविध ठिकाणी, कुणाच्या घरी, काही संग्रहालयात वगैरे सापडली होती पण उरलेली आठ अंडी गायब होती. बऱ्याच शोधानंतर यांचा पत्ता लागला नव्हता. या आठपैकी हे एक अंडं होतं जे खरोखरच दुर्मिळ होतं.
याचं सध्याचं बाजार मूल्य हे ३ कोटी च्या आसपास आहे पण याची किंमत ही किंमती वस्तू म्हणून पैशात करण्यापेक्षाही जास्त होती कारण इतिहासातल्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या महत्त्वाच्या गोष्टींमधली एक हरवलेली ही वस्तू आहे ज्याचं ऐतिहासिक मूल्य न मोजता येण्याएवढं होतं. यापैकी काही हरवली आहेत, काही नष्टही झाली आहे, जी अस्तित्वात आहेत अशी सोन्याची अंडी कधी ना कधी मिळतील अशी मॅकार्थी सारख्या तज्ज्ञांना आजही आशा आहे…
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.