आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कला म्हणजे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग. प्रत्येक माणसात काही न काही विशेष कला असतेच, फक्त ती कला माणसाला जपता आली पाहिजे, निःस्वार्थपणे. एखादा कलाकार म्हटलं की तो/ती उदार मनाचा असणारच. कारण जेव्हा माणूस स्वयंशिस्तीने काही गुण जोपासतो, तेव्हा त्यातूनच त्याची अविरत प्रगती होत जाते.
अनेक कलावंतांना त्यांच्या कलेच्या प्रदर्शनामुळे कौतुकाची थाप मिळते, प्रसिद्धी मिळते. पण त्याचबरोबर जगात असेही अनेक कलाकार असतात, ज्यांना पाहिजे तशी कीर्ती मिळत नाही. यामागे अनेक कारणे असतीलही, पण असं होतं हे मात्र निश्चित. असं असलं तरी काही कलाकार मात्र शेवटपर्यंत आपल्या कलागुणांना जपत असतात. अशाच एका पाश्चिमात्य कलाकाराबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न..
एलिझाबेथ ‘लिब्बा’ कॉटेन ‘रूट्स म्युझिक रिव्हायव्हल इरा’मधील सर्वात प्रभावशाली गिटार वादक होती. संगीतातील तिची अभिव्यक्ती आणि निपुण ‘फिंगरपिकिंग’ शैली तिच्या नंतरच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणाच होती. कॉटेनचा जन्म १८९३ साली ‘नॉर्थ कॅरोलिना’ येथील ‘चॅपल हिल’ याठिकाणी झाला. तिची आई एक कुक होती, तर वडील खाणकामगार होते.
वयाच्या आठव्या वर्षी प्रथम ‘बँजो’ हाताळल्यानंतर तिने आपल्या भावाच्या गिटारकडे मोर्चा वळवला आणि यावरच तिने स्वतःची अद्भुत शैली विकसित केली. वयाच्या नवव्या वर्षी तिने आपल्या मजुरीतून आलेले पैसे वाचवून स्वतःचे सिअर्स आणि रोबक गिटार विकत घेतले. इतक्या कमी वयातच ती ७५ सेंट प्रति महिना कमवत होती. ती लेफ्टि (डावखुरी) असल्यामुळे, तिने तिच्या भावाचा बॅन्जो उलटा करून वाजवायला सुरुवात केली त्यामुळे तिचा उजवा हात फ्रेटबोर्डवर राहत होता आणि तिचा डावा हात सुरेल तारांवर..
विशेष म्हणजे, तिने तिच्या अंगठ्याने ट्रेबल नोट्स आणि बोटांनी खालच्या बेस नोट्स वाजवल्या. गिटारवर कमी फ्रिक्वेन्सी ते उच्च फ्रिक्वेन्सीच्या स्वरांच्या सहा तारा असतात. यांनाच गिटार स्ट्रिंग नोट्स असेही म्हटले जाते. या सगळ्याचं पद्धतशीर प्रशिक्षण घेण्याइतपत तिची आर्थिक स्थिती सुदृढ नव्हती. हे सगळं ती स्वतःहूनच शिकली आणि स्वयंशिस्तीच्या माध्यमातून तिने याच क्षेत्रात प्रगती केली. तिची निपुण दोन-बोटांची पिकिंग, तिची ‘सिग्नेचर स्टाईल’ बनली. तिच्या याच स्टाईलला ‘कॉटेन पिकिंग’ म्हणूनही ओळखले जाते.
भारतात तर सोडाच पण युरोप किंवा अमेरिकेत त्याकाळी एलिझाबेथ कॉटेनचे नाव कोणालाही माहिती नसले तरी बहुतेकांनी तिचे सर्वांत लोकप्रिय गाणे, ‘फ्रेट ट्रेन’ नक्कीच ऐकले असेल. हे लोकप्रिय गीत पीटर, पॉल आणि मेरी यांनी १९६३ साली रिलीज केले होते. अनेक संगीतकारांनी तर याच सुरेल गाण्याच्या आपापल्या पद्धतीने अनेक आवृत्त्या तयार केल्या. या गाण्याचे बोल एलिझाबेथने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी लिहिले होते.
हे फॉल्क सॉन्ग (लोकसंगीत) इतके प्रसिद्ध होऊनही कॉटेनला प्रसिद्धी मिळायला मात्र फार वेळ लागला. आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी एलिझाबेथ कॉटेन नावाची महान संगीतकार नॉर्थ कॅरोलिना, न्यू यॉर्क सिटी, वॉशिंग्टन डीसी याठिकाणी घरकाम करीत होती. सुमारे चार दशके तिने अशा प्रकारचं काम केलं.
वयाच्या बाराव्या वर्षी ती घरगुती मोलकरीण म्हणून काम करत असतानाच तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. चर्चमध्ये सामील झाल्यावर, तिने गिटार वाजवणे बंद केले. पण, १९४० च्या दशकात एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करत असताना तिने एका हरवलेल्या मुलीला तिच्या आईपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. याच लहान मुलीच्या कुटुंबाने तिला ‘मोलकरीण’ म्हणून नोकरी देऊ केली.
ती लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर प्रसिद्ध अमेरिकन लोक-संगीतकार ‘पेगी सेगर’ होती. तिची आई रूथ क्रॉफर्डसुद्धा एक उत्तम संगीतकार आणि फॉल्क-म्युझिकची जाणकार होती. यानंतर कॉटेनने फॉल्क-म्युझिकच्या या विशेष चाहत्यांच्या आणि संगीतकारांच्या कुटुंबासाठी घरकाम करायला सुरुवात केली. पेगी सेगरचे वडील, चार्ल्स सेगर हे संगीतशास्त्राचे प्रोफेसर तसेच उत्तम संगीतशास्त्रज्ञ होते. पेगीचा भाऊ, माईक हा सुद्धा संगीतकार आणि लोकसाहित्यकार होता. आपल्या संगीत कलेने कॉटेनने सुद्धा या कुटुंबाचे मन जिंकले.
१९३०-४० च्या दशकात मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रगतीवादाचा संदेश लोकांमध्ये पसरत होता. ‘रेड्स, व्हाईट्स अँड ब्लूज: सोशल मूव्हमेंट्स, फॉल्क म्युझिक अँड रेस इन द युनायटेड स्टेट्स’ या १९६० च्या दशकातील पुस्तकात व्यावसायिक फॉल्क म्युझिक रिव्हायव्हल सोशिओलॉजिस्ट, ‘विलियम रॉय’ लिहितात, ‘साठच्या दशकातील फॉल्क प्रोजेक्ट्समध्ये सीगर्स, बॉब डायलन, आर्लो गुथ्री आणि पीटर अशा श्वेतवर्णीय संगीतकारांचे जरी वर्चस्व असले तरी रसिकांना मात्र अस्सल लोकसंगीतकारांचे योगदानच आवडत असत.’
पुढे ते लिहितात, ‘संगीत निर्माते जितके व्यवसायी, नम्र आणि ‘असंस्कृत’ असतील तितके चांगले, हा शहरी आणि सुशिक्षित लोकांचा दृष्टिकोन होता.’ हे निंदनीय वाटत असले तरी रॉय या प्रकाराला ‘सांस्कृतिक पदानुक्रमाची उलथापालथ’ असेही म्हणतात. या मुळेच डाव्या विचारसरणीचे अनेक कार्यकर्ते लोकसंगीताकडे आकर्षित झाले असाही त्यांचा दावा आहे.
“लोकांचे संगीत” म्हणून याचा वापर ‘सामाजिक चळवळी वाढवण्यासाठी आणि विशेषत: वांशिक आणि वर्ण भेदभाव संपवण्यासाठी’ केला जाऊ शकतो. लोकसंगीत नागरी हक्क चळवळीवर खूप प्रभावशाली ठरले.
एलिझाबेथ कॉटेन शक्य तितक्या ‘व्यवसायी’ आणि ‘नम्र’ होत्या, पण त्यांच्या संगीतात असंस्कृतपणा नव्हता. त्यांच्या संगीतात एखाद्या सर्वोत्तम संगीतकाराची चपळता आणि आयुष्यभराच्या संगीत-अनुभवाचे मिश्रण होते. वर सांगितलेल्या कारणांमुळे त्यांचे संगीत सामान्यांना आवडेल याची शक्यता खूपच कमी होती. १९५९ साली कॉटेन यांनी ‘माईक सीगर’ सोबत पहिला ‘लाइव्ह शो’ केला आणि त्यांनी त्यांच्या पिढीतील संगीतकारांच्या तुलनेत अधिक ‘ग्लॅमरस’ कारकीर्द सुरू केली होती.
कॉटेन यांनी १९६८ साली प्रसिद्ध न्यूपोर्ट फॉल्क फेस्टिव्हल, फिलाडेल्फिया फॉल्क फेस्टिव्हल, स्मिथसोनियन फेस्टिव्हल आणि अशा अनेक संगीत महोत्सवांमध्ये गायन केले. कालांतराने त्या न्यू यॉर्क येथील सायराक्यूस येथे स्थायिक झाल्या. कॉटेन यांनी एकूण ७ अलबम्स रेकॉर्ड केले आणि संगीतासाठी जीवनभर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दौरे केले. कॉटेनचे ‘फ्रिट ट्रेन’ हे गाणे गातानाचा ‘विंटेज’ व्हिडीओ पाहण्यासारखा आहे. यात ती आपले डोळे हळुवारपणे मिटून आपल्या ‘स्टाईल’ने गिटार वाजवत आहे.
१९८५ साली, वयाच्या ९३व्या वर्षी, कॉटेन यांना त्यांच्या ‘एलिझाबेथ कॉटेन – लाइव्ह’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट पारंपारिक फॉल्क म्युझिक रेकॉर्डिंगसाठी ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाला. असा हा सुरेल प्रवास अखेर १९८७ साली संपला. कॉटेन यांनी वयाच्या ९५व्या वर्षी सायराक्यूस येथे अंतिम श्वास घेतला. पण आजही त्यांचे अनेक अलबम्स आणि गाणी म्युझिक ॲप्सवर प्रसिद्ध आहेत. अनेक जाणकार लोक तसेच सामान्यही त्यांची गाणी आवर्जून ऐकतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.