मानसिक आजार म्हणजे भूतबाधा ही अंधश्रद्धा या माणसाने दूर केली आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


आज जगभरात मानसिक आजरांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. नुकतंच सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने देश भरात मानसिक आजारांवर चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. आज मानसिक आजारांचे प्रकार आपल्याला माहिती आहे, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आपल्याला माहिती आहेत. पण एक काळ असा होता ज्यावेळी जगभरात मानसिक आजारांबद्दल असंख्य अंधश्रद्धा रूढ होत्या. भूत-पिशाच्च बाधेच्या नावाखाली अनेक लोकांचा बळी दिला जात होता. बुवा मंत्रिकांचे अधिराज्य सर्वदूर होते. भारतच नाही तर युरोप देखील ह्या जुनाट संकल्पनांनी पछाडलेला होता.

पण या सर्व प्रथा परंपरांच्या आणि भूत पिशाच्च यांच्या अंधश्रद्धेतून जगाला मुक्ती मिळवून देण्याचे काम केले डॉ. फिलिप पीनेल यांनी!

डॉ. फिलिप पीनेल यांनी दाखवून दिले होते की भूतबाधा हा एक प्रकारचा मानसिक आजार असून त्याचा कुठल्याही पारलौकिक गोष्टीशी संबंध नाही.

फिलिप पीनेल यांचा जन्म २० एप्रिल १७४५ मध्ये जनक्रेस शहरात झाला. त्यांचे वडील फिलिप फ्रेंकोईस आणि आई एलिझाबेथ डुफी हे डॉक्टर होते. शहरात त्यांचा परिवाराला मोठे मानाचे स्थान होते, याचा प्रभाव पीनेल यांच्या आयुष्यावरदेखील पडला.

फिलिप पीनेल यांना ७ लहान भाऊ आणि बहीण होते. पीनेल यांच्या आईने त्यांना विविध गोष्टींचे शिक्षण दिले. फिलिप पीनेल यांना धार्मिक पुस्तकांच्या वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांचे आई वडील त्यांना धार्मिक साहित्य वाचायला देत.

बायबलमध्ये फिलिप पीनेल यांची रुची बघून तिथल्या एका पाद्रीने त्यांना चर्चची सेवा करायला सांगितली, यामुळे पीनेल शाळा संपल्यावर उरलेला वेळ चर्चमध्ये घालवत. वय वाढलं मग त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांनी लिवर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी चर्चमध्ये पाद्री म्हणून रुजू होण्याचा त्यांनी निर्धार केला होता. याच प्रयत्नात १७६७ मध्ये कॉलेजमधील शिक्षण संपवून पीनेल पुन्हा घरी परतले व त्यांनी आपली इच्छा घरच्यांसमोर प्रकट केली.

परंतु त्यांच्या नशिबात मात्र वेगळीच कथा लिहलेली होती. कॉलेज संपल्यावर अचानक त्यांच्या वाचनात प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत व्होल्टेयर यांचे विविध पुस्तकं आले. व्होल्टेयरचा मोठा प्रभाव पीनेलवर पडला. त्यांचा धार्मिक श्रद्धांवर याचा अमुलाग्र परिणाम झाला.

यानंतर मात्र त्यांनी पाद्री न होता आपल्या आई-वडिलांच्या व्यवसायाला म्हणजेच वैद्यकीय व्यवसायाला अंगिकारले आणि त्याचा अभ्यास सुरू केला. शिक्षण झाल्यावर पीनेल पॅरिसच्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करणार होते पण त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही.

शिक्षण संपल्यावर रोजगार मिळाला नाही म्हणून पीनेल हे पार्ट टाईममध्ये अध्यापनाचे काम करू लागले. उरलेल्या वेळात ते कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे असईनमेंट लिहून देत, ज्यामुळे आपली रोजी रोटी चालवण्या इतपत त्यांना उत्पन्न मिळू लागले.

१७८४ मध्ये पीनेल यांना हेल्थ जर्नलमध्ये नोकरी मिळाली. तिथे लेखक म्हणून ते काम करू लागले. अशातच त्यांना त्यांच्या एका मित्राच्या मृत्यूची वार्ता मिळाली. त्यांच्या मित्राचा मृत्यू मानसिक रोगाने झाला होता.

मित्राच्या मृत्यूनंतर पीनेल फार बेचैन राहू लागले. त्यांना प्रश्न पडला की त्यांचा मित्र इतका वेडा कसा झाला की त्याचा सरळ मृत्यू झाला? या प्रश्नाने त्यांच्या मनात मानसिक आजारांवर अभ्यास करण्याचे बीज रोवले.

यानंतर पीनेल यांनी मनोविज्ञानासंबंधी अनेक लेख लिहिले. यात त्यांनी अध्यात्मिक मार्गाचा देखील आसरा घेतला होता. त्यांच्या लेखांचा प्रभाव लोकांवर पडायला सुरुवात झाली व मत परिवर्तन होऊ लागले. १७८८ मध्ये त्यांनी मनोविज्ञानावर लिहिलेले लेख प्रचंड गाजले. परंतु त्यांचे ज्ञान हे केवळ पुस्तकी स्वरूपाचे होते. याच काळात त्यांना फ्रान्सच्या एका मनोरूग्णालयात नोकरी मिळाली.

त्याकाळात फ्रेंच राज्यक्रांतीचे वारे वाहत होते. पीनेल क्रांतिकारकांचे खंदे समर्थक होते. १७९२ मध्ये राजेशाही संपुष्टात आली तरी क्रांतिकारकांच्या स्थितीत कुठलाच सुधार होत नव्हता.

१७९३ मध्ये सोळाव्या लुईने क्रांतिकारकांना मृत्युदंड सुनावला, त्यांना भर चौकात गिलेटिन या यंत्राखाली मुंडकं छाटून मृत्यू देण्यात आला. हे भयानक दृश्य बघून अनेक लोकांच्या मानसिक संतुलनावर परिणाम झाला.

त्याकाळात मनोरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. अनेक लोकांनी गिलेटिनने दिली जाणारी शिक्षा हेच त्यांच्या वेडेपणाचे कारण सांगितले. त्यांनी २ वर्ष अशा रुग्णांसोबत काम केले. यानंतर त्यांना १७९५ मध्ये पॅरिसच्या लॉ वेस्टरे या इस्पितळाचा प्रभारी बनवण्यात आले. याठिकाणी त्यांना एक मनोविकारतज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

वर्षांच्या अनुभवाने पीनेल यांना कळून चुकले होते की मनोरूग्णांना अत्यंत वाईट पद्धतीने हातळले जात आहे. अगदी जनावरासारखी वागणूक त्यांना देण्यात येते आहे. यामुळे रुग्ण बरे न होता, अजून जास्त ग्रासले जात आहे. त्यांनी वॉर्डमध्ये काम करतना रुग्णांसोबतच्या अमानवीय व्यवहाराचे ते स्वतः प्रत्यक्षदर्शी बनले होते.

रुग्णांना दिले जाणारे वीजेचे झटके, त्यांना मोठ्या साखळदंडात बांधून ठेवणे, त्यांना अन्न न देणे यामुळे मनोरूग्ण अजून जास्त भयग्रस्त होत होते. या भयातून ते जास्त आक्रमक व्हायचे.

पीनेल यांना या गोष्टींचा प्रचंड त्रास झाला मग यावर उपाय म्हणून त्यांनी उपचाराचा एक वेगळा मार्ग शोधून काढला. त्यांनी सर्वप्रथम रूग्णांना बंधनमुक्त केले. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अजून प्रशिक्षण देऊन मनोरुग्णांशी प्रेमाने कसे वागावे याचे धडे दिले.

त्यांच्या या प्रयत्नांना लवकरच यश मिळाले अनेक मनोरूग्ण बरे झाले व अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ते उपचारात सहयोग करू लागले व त्यांच्या राहणीमानात देखील मोठा बदल झाला.

त्यांची कामगिरी बघून त्यांची सालपेटीरर रुग्णालयात बदली करण्यात आली. इथेदेखील आपल्या प्रेमपूर्वक वागणुकीने त्यांनी रुग्णांच्या मनावर प्रभाव टाकला. इथल्या कर्मचारी वृंदाला प्रशिक्षित केले. ज्या लोकांना पीनेल यांची पद्धत आवडली त्यांनी तिचा वापर केला तर इतरांनी त्यांचा दुस्वास करायला सुरुवात केली. अर्थात, यामुळे पीनेल यांच्यावर विशेष फरक पडला नाही, त्यांनी त्यांचे कार्य चालूच ठेवले. त्यांनी आनंदाने अनेकांवर उपचार केले.

पीनेल यांच्या कामाने प्रभावित होऊन जीन एर्क्युटोल यांनी त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. जीन हे पीनेल यांच्या कामाने प्रचंड प्रभावित झाले होते. त्यांनी बघितले होते की पीनेल कशाप्रकारे मनोरुग्णांसोबत वेळ घालवून त्यांचा इलाज करतात. त्यांनी पिनेल यांच्या कामाला पाठबळ दिले व १० नवीन रुग्णालय चालू केले. या रुग्णालयात फक्त मनोरुग्णांवर उपचार केले जाऊ लागले. यामुळे या क्षेत्रात मोठी क्रांती घडली.

भूत पिशाच्च बाधेच्या अंधश्रद्धेला फाटा देत फ्रान्स हा जगातील पहिला देश बनला जिथे मनोविकार ग्रस्त व्यक्तीला ‘रुग्ण’ म्हटले जाऊ लागले व त्याच्यावर तंत्रमंत्र नाहीतर मेडिकल सायन्सच्या पद्धतीने उपचार केले जाऊ लागले.

फ्रान्सच्या कामगिरीने प्रभावित होऊन इतर देशांनीदेखील पीनेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मनोविज्ञानावर संशोधन करायला सुरुवात केली.

जगात पहिल्यांदा कुठल्याही हिंसेविना फक्त प्रेम व आपुलकीच्या बळावर मनोविकारावर उपचार करण्यात आले. मनोविज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी फिलिप्स पीनेल यांना १८०४ मध्ये Chevalier of the Legion d’ Honneur या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांची मूर्ती आजदेखील सालपेटीररच्या बाहेर आहे. २५ ऑक्टोबर १८२६मध्ये पॅरिसमध्ये पीनेल यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या आयुष्यात असंख्य मनोरुग्णांवर उपचार करून त्यांचे आयुष्य वाचवले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!