आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अलीकडे विकास हा शब्द अतिशय परवलीचा होऊन बसला आहे. महानगरांमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध असतात, त्यांच्यापेक्षा तुलनेने कमी सोयीसुविधा छोट्या म्हणवल्या जाणाऱ्या शहरांमध्ये उपलब्ध असतात, अशी छोटी शहरे सहसा तालुक्याची किंवा जिल्ह्याची ठिकाणं असतात. काही अपवाद वगळता “लोककल्याणकारी” राज्याच्या सुविधा अगदी ग्रामीण भागातील तळागाळातील माणसांपर्यंत आजही पोहोचलेल्या दिसत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही अनेकदा “अंत्योदय”च्या बाता करणारं शासन, प्रशासन ७ दशकं उलटून गेली तरी त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकलं नाही.
महानगरांमध्ये देखील पायाभूत सोयीसुविधांची काय अवस्था असते हे आपल्याला कोविडसारख्या संकटसमयी समजतं. अपवाद वगळता अनेक महानगरांमधील सरकारी दवाखाने आणि इतर आस्थापनांचे काम अपेक्षित कार्यक्षमता आणि प्रभावाने होताना दिसत नाही. अस्वच्छता, व्यवस्थापनाचा आभाव, कर्मचारी वर्गाची मनमानी, आणि अशा अनेक कारणांमुळे सामान्य माणसाला नाईलाजाने खाजगी दवाखान्यांचा रस्ता धरावा लागतो. या आणि अशाच अनेक कारणांमुळे मागील काही वर्षांत खाजगी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्सची संख्या झपाट्याने वाढली.
अशी परिस्थिती असली तरी काही जागरूक नागरिक उपलब्ध सोयीसुविधांचा सुयोग्य वापर करून जनसामान्यांपर्यंत आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा पोहोचवत असतात. आज भारतीय महानगरांमध्ये सलूनपासून भाजीपाल्यापर्यंत सर्व काही एका क्लीकवर काही मिनिटांत घरपोच मिळण्याचे अनेक मार्ग मोकळे झाले आहेत. पण रुग्णवाहिकांसारख्या आरोग्याशी संबंधित सेवांसाठी आजही सामान्यांना तशीच धडपड करावी लागते.
अशा सुविधांची जर शहरी भागात ही अवस्था असेल तर ग्रामीण भागाची कल्पना न केलेलीच बरी. रुग्णवाहिका फक्त आपत्कालीन रुग्णांना घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडत नाही तर ज्या वयोवृद्ध आणि दिव्यांगांना हॉस्पिटलमध्ये नेणं अतिशय अवघड असतं त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची ठरते.
याच समस्येवर उपाय शोधून काढलाय तामिळनाडूमधील एका युवा डॉक्टरने. डॉ. चंद्रमौली २०१९ पासून पहाटे अनेक पेशंट्सना भेट देऊन आपल्या क्लिनिकमध्ये जातात. पहाटे तीनपासून ते पेशंट्सच्या घरी भेटी द्यायला सुरुवात करतात, हे पेशंट्स प्रामुख्याने वयोवृद्ध व्यक्ती किंवा अशा विकलांग असतात, ज्यांना घरातून निघून हॉस्पिटलला जाणे आणि पुन्हा तिथून तितकाच प्रवास करणे शक्य नसते. यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतः व्हॅन घेऊन आपलं काम सुरु केलं. ते वयोवृद्ध किंवा दिव्यांग रुग्णांच्या घरी नियमित भेट देतात. याच उपक्रमाला त्यांनी “डॉक्टर ऑन व्हील्स” असे नाव दिले आहे. आपलं हे अनोखं काम करताना त्यांना विविध अनुभव येतात.
मदुराई शहरातील एका रुग्णाच्या घरी आपलं ‘मिनी-आयसीयू’ घेऊन ते नेहमी जात असतात. त्यांनीच या गाडीला मिनी-आयसीयू असे संबोधले आहे, आणि हे नाव सार्थही ठरते, कारण या कारमध्ये इन्फ्युजन पंप्स, सिरिंज ड्रायव्हर्स, ऑक्सिजन सिलिंडर आणि अन्य आयसीयूसंबंधी सोयीसुविधा आहेत. मदुराई शहरातील राव यांच्या घरी नियमित जाऊन ते त्यांच्या ८३ वर्षीय आईंची तपासणी करतात. डॉ. चंद्रमौली राव यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून जात आहेत. तीन वर्षांपूर्वी राव यांचे ९३ वर्षीय सासरे आजारी पडले. त्यांच्या वाढत्या वयामुळे त्यांना दवाखान्यात नेणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. तेव्हा राव यांना पहिल्यांदा डॉ. चंद्रमौलींबद्दल समजले आणि त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला.
‘डॉक्टर ऑन व्हील्स’ उपक्रमाचा राव यांच्यासारख्या अनेक वयोवृद्ध रुग्णांना फायदा होत आहे. त्यांनी हे काम २०१९ साली सुरु केले. वैद्यकीय सेवा अनेक लोकांपर्यंत, विशेषत: ६० वर्षांवरील वृद्ध लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ही अचाट कल्पना शोधून काढली होती. या स्तुत्य उपक्रमामागील डॉ. चंद्रमौलींबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथे जन्मलेल्या डॉ. चंद्रमौली कॅनडात वाढले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, २००६ साली वैद्यकशास्त्राचे उच्च शिक्षण घेण्यासाठी ते भारतात परतले. त्यांनी इमर्जन्सी मेडिसिनमध्ये एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केले. २०१५ साली शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ते एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील इंटेन्सिव्ह केअर युनिट – आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात ज्युनिअर कन्सल्टन्ट म्हणून रुजू झाले. आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे किंवा उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक रुग्णांना प्रवेश नाकारण्यात येतात हे त्यांच्या लक्षात आले.
याच जाणिवेने आणि आपल्या आजीशी असलेल्या खास संबंधामुळे त्यांनी वृद्धांसाठी विशेष वैद्यकीय सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, वृद्ध रुग्णांना काळजीची आणि प्रेमाची जास्त गरज असते. ती फक्त मोठी बाळं असतात, ज्यांना एखाद्या वैद्यकीय तज्ञाची आवश्यकता असते. या तज्ज्ञाने त्यांच्या आरोग्यविषयक समस्या समजावून घेत त्यांचे निराकरण करायला हवे. वयोवृध्दांना डॉक्टरांची कमी वेळ भेट घ्यायची असली तरी तासंतास रांगेत थांबावे लागते. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी ‘डॉक्टर ऑन व्हील्स’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
२०१९ साली सुरुवात केल्यानंतर महिन्यात त्यांच्याकडे ८ केसेस होत्या, तर आता त्यांच्याकडे महिन्याकाठी सुमारे ६०० केसेस आहेत. आजवर त्यांनी २५ हजार लोकांवर उपचार केले आहेत. त्यांच्याकडे आठ लोकांची टीम आहे, ज्यात फिजिओथेरपिस्ट, फिजिशियन असिस्टंट, रेडिओलॉजिस्ट, नर्स आणि ड्रायव्हर यांचा समावेश होतो. ही टीम रुग्णांना त्यांच्या परिस्थितीनुसार प्रत्येकी एका आठवड्याने, दोन आठवड्यांनी किंवा प्रत्येक महिन्यात किंवा ठराविक दिवसांच्या अंतराने नियमित फॉलोअपसाठी भेट देते.
डॉ. चंद्रमौलींचा दिवस पहाटे ३ वाजता सुरु होतो, सकाळी १० वाजेपर्यंत ते आपल्या रुग्णांना भेटी देत असतात, तर सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ७ ते ९ यावेळेत ते आपलं क्लिनिक चालवतात, मधल्या ४ ते ७ या वेळेत देखील ते रुग्णांच्या घरी भेटी देत असतात. सुरुवातीला, डॉक्टरांनी फक्त आपत्कालीन प्रकरणे घ्यायचे ठरवले होते, पण ते आता अपॉइंटमेंट पद्धतीने केसेस घेतात.
डॉक्टर ऑन व्हील्स मदुराई आणि विरुधुनगर, शिवगंगा आणि दिंडीगुल यांसारख्या जवळपासच्या जिल्ह्यांमधील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवतात. डॉक्टर ३०० ते ८०० रुपये शुल्क आकारतात. हे शुल्क रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठीच्या अंतरावर आधारित असतं. खरंतर डॉक्टरांना ही सेवा निःशुल्क द्यायची आहे, पण रुग्णांकडून घेत असलेल्या या शुल्कातून आपल्या उपक्रमाला चालू ठेवण्याचा प्रयत्न करूनही त्यांना स्वतःच्या खिशातून देखील यासाठी खर्च करावा लागतो. तरीही जी कुटुंबे गरीब आहेत त्यांना निःशुल्क सेवा पुरवली जाते.
डॉक्टरांची टीम टीम बेसिक कन्सल्टेशन, उपशामक काळजी (पॅलिटिव्ह केअर) आणि हॉस्पिटलायझेशन नंतर होणारे सर्व उपचार करण्याचे काम करते. ही टीम केवळ औषधेच देत नाही तर चाचण्यांसाठी रक्ताचे नमुने देखील गोळा करते, पोर्टेबल एक्स-रे अशा बऱ्याच वैद्यकीय सुविधा या टीमद्वारे पुरवल्या जातात.
डॉक्टर दिवसात १४ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात आणि त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत घालवण्यासाठी देखील फार कमी वेळ मिळतो. वृद्ध लोकांच्या चेहऱ्यावरचे स्मित पाहून, त्यांच्याशी बोलताना आपलं काम करण्यातच त्यांना असीम आनंद मिळतो. त्यांच्यामते, एखाद्याच्या जीवनात रोज सकारात्मक बदल घडवून आणण्यात एक वेगळेच समाधान मिळते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.