नेहरूंनी अहमदनगरच्या कारागृहात असताना लिहिलेल्या पुस्तकावरची ही मालिका प्रचंड गाजली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवरील अनेक जुन्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण करण्यात आले. ९०च्या दशकात प्रक्षेपित करण्यात आलेल्या या बहुतांश मालिकांनी लोकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या मालिका पुन्हा प्रक्षेपित करून लोकांच्या त्या जुन्या आठवणींना उजळणी देण्यात आली.

परंतु या सर्व मालिकांमध्ये एका मालिकेचे पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले नाही. ती मालिका म्हणजे शाम बेेनेगल यांची ‘भारत एक खोज’. ८०-९० च्या दशकातील लोकांना ‘भारत एक खोज’ ही मालिका माहिती असेलच.

छोडो भारत चळवळीच्या काळात अहमदनगरच्या कारागृहात कारावास भोगणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंने लिहलेल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या ग्रंथावर आधारलेली ही मालिका, भारताच्या ५००० वर्ष प्राचीन इतिहासावर दृष्टिक्षेप टाकते.

भारत कसा घडत गेला याची वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून मांडणी करून प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास या ५३ भागांच्या मालिकेच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवण्यात आला होता.

या मालिकेच्या पहिल्या भागात जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू एका खेड्या गावाला भेट देतात आणि लोकांना ‘भारत माता कोण आहे?’ असा प्रश्न विचारतात. त्यानंतर स्वतः भारत माता दुसरं तिसरं कोणी नसून भारताचे लोक आहेत, हे ज्या सुबकपणे मांडतात ते अगदीच मनाला भावते.

तिथून सुरू झालेल्या मालिकेचा प्रवास हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, रामायण, महाभारत, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, अकबराचा मोघल दरबार, शिवाजी महाराजांचे राज्य, १८५७ चा उठाव आणि पुढे महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेली स्वातंत्र्यता चळवळ असा शेवटाकडे प्रवास करतो.

या मालिकेच्या वैशिष्ट्यावर भाष्य करताना श्याम बेनेगल म्हणाले होते की “या मालिकेच्या कथानकात मी दोन बाजू मांडल्या आहेत. एक बाजू होती नेहरूंची भूमिका साकारणाऱ्या रोशन सेठ यांनी मांडलेली नेहरूंची बाजू आणि दुसरी होती त्याच्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवली गेलेली ओम पुरी यांच्या आवाजातील बाजू, यातुन या कथेला एक वेगळा भरभक्कमपणा प्राप्त झाला, जो एकांगी नव्हता.”

या मालिकेत दक्षिण भारताच्या इतिहासाला देखील न्याय देण्यात आला होता.

यात चोळ साम्राज्याचा कालखंड दाखवण्यात आला होता, सोबतच रामायण-महाभारतातील विविध घटनाक्रम आणि जातीप्रथेच्या निर्मितीचा भागाने या मालिकेला समृद्ध केले.

या मालिकेत तब्बल ५०० कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. नसिरुद्दीन शहा, शबाना अजमी, ओम पुरी, इरफान आणि रोशन सेठ या काही दिग्गजांचा यात समावेश करण्यात आला होता. या मालिकेच्या पटकथा लेखनाचे काम शमा झैदी यांच्या नेतृत्वाखालील २५ लेखकांनी केले होते. यासाठी १४४ वेगवेगळ्या सेट्सची निर्मिती करण्यात आली होती.

या मालिकेसाठी २२ इतिहासकारांनी तीन वर्षे अखंड परिश्रम घेतले होते. यासाठी पुरातत्व विभागाची मदत घेण्यात आली होती. या मालिकेच्या संपूर्ण चित्रीकरणाला २० महिन्यांचा अवधी लागला होता.

बेनेगल यांच्या दिग्दर्शनाचे प्रमुख सूत्र म्हणजे दुर्योधन आणि अल्लाहुद्दीन खिलजीसारखे इतिहासात आपल्या क्रूरतेसाठी आणि कपटासाठी प्रसिद्ध असलेले खलनायकसुद्धा त्यांनी अतिशय भावपूर्णरित्या मांडले होते. आजच्या काळात कोणी असं करणं शक्यच नाही.

नसिरुद्दीन शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला होता. बेनेगल म्हणाले होते की या मालिकेच्या निमिर्तीसाठी त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा राजकीय दबाव नव्हता, त्यांना ती मालिका जशी दाखवायची तशीच दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

मालिकेचे कथानक जरी चांगलेच होते पण त्यातही काही कमतरता होत्याच.

या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं आधुनिक भारताचा निर्मितीत असणारे योगदान झाकोळले गेले होते. इतकेच नाही तर, बऱ्याच ठिकाणी ओम पुरी यांचा प्रतिवादी आवाज अनेक ठिकाणी दाखवण्यात आला नाही, यामुळे या मालिकेवर सर्वार्थाने नेहरूंच्या विचारांची छाप पडलेली दिसते.

काहीही असले तरी भारत एक खोज ही मालिका, त्या काळातील कलाकृतीचा एक सर्वोत्तम नमुना होती. कदाचित श्याम बेनेगल यांचं त्यावेळी केलेलं सर्वोत्तम काम होतं.

श्याम बेनेगल म्हणायचे की या मालिकेच्या निर्मिती दरम्यान ते प्रचंड झपाटले होते. भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन या मालिकेतुन समाजाला घडावण्यात आलं होतं.

परंतु ही मालिका शेवटपर्यंत नेहरुंच्या तत्वांचा आदर करणारी असल्यामुळे आजच्या सत्ताधारी पक्षाला या मालिकेच्या पुनःप्रक्षेपणाचा विचार रुचला नसावा. असं असलं तरीही ही मालिका युट्युबवर उपलब्ध असून भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासाचे नेहरूवादी चष्म्यातून केलेले विवेचन जाणून घ्यायचे असेल तर ही मालिका नक्कीच बघायला हवी!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!