आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
क्रिकेटमध्ये अनेक संज्ञा वापरण्यात येतात ज्यांचा क्रिकेटशी तसा काडीमात्र संबंध नसतो. आता क्रिकेटमध्ये एक ‘गोमाता शॉट’ अशी एक संज्ञा आहे, तिला ‘काऊ स्ट्रोक’ असे देखील म्हटले जाते. काऊ स्ट्रोक या नावाप्रमाणेच क्रिकेटमध्ये अशा अनेक संज्ञा व विशेषणे आहेत, जी ऐकायला फारच विचित्र आहेत पण खेळात त्यांचे फार मोठे महत्व आहे. आज आपण अशाच काही संज्ञाविषयी जाणून घेऊयात..
१) काऊ शॉट (अथवा काऊ स्ट्रोक)
काऊ अर्थात गायीला आपल्याकडे बरेच पौराणिक महत्व आहे. या गायीच्या नावावर क्रिकेटमध्ये एक शॉट प्रचलित असून ज्यावेळी एखादा फलंदाज युष्टीच्या कक्षेतून बाहेर जाणाऱ्या चेंडूला क्रॉस करत लेगसाईट बाऊंडरीच्या दिशेने टोलावतो, त्या शॉटला काऊ शॉट म्हटले जाते.
हा शॉट खेळताना फलंदाज आपली पावले गायीप्रमाणे मागच्या बाजूला वळवून घेतो म्हणून याला काऊ शॉट म्हटले जाते.
२) काऊ कॉर्नर
काऊ शॉट प्रमाणेच क्रिकेटमध्ये एक काऊ कॉर्नर देखील असतो. हा मिडविकेट ते वाईड लॉंगच्या दरम्यानचा भाग असतो. या भागात फलंदाजाने शॉट मारल्यावर फिल्डर त्या भागापर्यंत पोहचू शकत नाही, त्यामुळे या भागाला काऊ कॉर्नर म्हणतात. इथे गायी चरू शकतात इतका विस्तृत भाग असतो म्हणून याला काऊ कॉर्नर म्हणतात.
३) मिलिटरी मिडियम
मध्यम गतीच्या गोलंदाजीला मिलिटरी मिडीयम म्हणून ओळखले जाते. या गोलंदाजीचे स्वरूप हे मिलिटरीप्रमाणे सावधगतीचे असते. इथे वेग फार कमी नसतो ना फार अधिक असतो, फलंदाजाला टप्प्यात घेऊन नेमकी गोलंदाजी करण्यात येते. ही एक अचूक गोलंदाजी असते.
४) चायनीज कट
तसं बघायला गेलं तर चीनचा आणि क्रिकेटचा काही विशेष संबंध नाही. चिनी लोक आत्ता कुठे क्रिकेट खेळू लागले आहेत पण क्रिकेटमध्ये चायनीज कट नावाचा एक शॉट आहे. याचा किस्सा पण तितकाच रोचक आहे.
ज्यावेळी एखादा फलंदाज बॉल बॅटवर येण्याचा अगोदरच फटका मारायची तयारी करतो त्यावेळी बॉलर मुद्दाम त्याचा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून त्याला खच्ची करणारा बॉल टाकतो.
बऱ्याचदा अशा बॉलचा कट लागून फलंदाज आउट होतो. याला चायनीज कट म्हणून ओळखले जाते. चायनीज कटमुळे टी-ट्वेन्टी मालिकांमध्ये मोठ्याप्रमाणात फलंदाज आउट होतात.
५) ऍग्रीकल्चर शॉट
ऍग्रीकल्चर शॉटच्या नावावरून असे वाटते की याचा सरळ संबंध शेतकरी आणि शेतीशी असावा आणि एका दृष्टीने हे खरं देखील आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळी क्रिकेट लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली त्यावेळी तिथल्या शेतांमध्ये ज्याला काउंटी म्हटले जाते, मोठं मोठे सामने होत. याठिकाणी खेळायला येणारे बहुतेक लोक हे खेडवळ शेतकरी असायचे. या शेतकऱ्यांना क्रिकेटचे शास्त्रशुद्ध ज्ञान नसायचे त्यामुळं ते चेंडू दिसला की त्याला टोलवण्याचे काम करायचे. यावेळी ना त्यांना आउट व्हायची चिंता असायची ना मॅच हारायची. या अशाच अंदाधुंद फटकेबाजीत मारण्यात आलेल्या शॉटला ऍग्रीकल्चर शॉट म्हटले जाते.
६) गली आणि सिलिपॉइंट
क्रिकेटमध्ये फिल्डिंगच्या काही पोझिशनचे नाव गली, सिलिपॉइंट आणि स्लिप असे आहे. त्यांची अशी नावे का आहेत, याचे कारण माहिती नसले तरी या फिल्डिंग पोझिशन यष्टीरक्षणाच्या व क्षेत्ररक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. यामुळेच फिल्डर उत्तम कामगिरी करू शकतो.
७) डक
ज्यावेळी क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज पहिल्याच चेंडूवर अथवा कुठलाही रन न काढता शून्यावर बाद होतो, त्याला डक म्हटले जाते. शून्याचा आकार बदकाच्या अंड्याचा आकारासारखा असतो म्हणून क्रिकेटमध्ये ‘डक’ हा शब्द प्रचलित झाला आहे. डक या शब्दाचा वापर सर्वप्रथम १८६३ मध्ये करण्यात आला होता.
८) डॉली
ज्यावेळी एखादा फलंदाज सहज आपली कॅच फिल्डरच्या पदरात टाकतो, त्याला डॉली असे म्हटले जाते.
९) फ्रुट सॅलड
क्रिकेटमध्ये फ्रुट सॅलड देखील आहे, ज्यावेळी एखादा गोलंदाज त्याचा प्रत्येक बॉल फेकू लागतो त्यावेळी त्याला फ्रुट सॅलड म्हटले जाते.
क्रिकेट हा खेळ तीनशे वर्ष जुना आहे. या तीनशे वर्षात या खेळात अनेक बदल झाले तसेच अनेक नवीन संज्ञा वापरात आल्या आहेत. अनेक असे खेळाडू होऊन गेले ज्यांनी या खेळाला रंजक बनवले आहे. क्रिकेट यामुळेच दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.