आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
किडनी स्टोनचा विकार हा अत्यंत वेदनादायी असतो. अगदी एखादा खडा झाला तरीही रूग्णाला त्या वेदनांनी जीव नकोसा होतो. पूर्वी हा खडा शरिरातून बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता. आता तंत्रज्ञान प्रगत झालं असून लेझरद्वारे वेदनाविरहीत शस्त्रक्रिया करून हे खडे काढणं शक्य झालं आहे. पण कधी कधी एकाहून जास्त खडेही आढळतात.
कधी कधी काही घटना अशा घडतात की त्या ऐकल्यावर, ऐकावं ते नवलच असा विचार येतो. साधारण दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या धुळ्यात अशीच एक घटना घडली होती जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल-
शहरातील धनराज वाडिले हे सुपारी व्यावसायिक आहेत. त्यांना अचानक ओटीपोटात वेदना होऊ लागल्या. काही घरगुती आणि तातुरते उपाय करूनही या वेदना कमी होण्याची चिन्हं दिसेनात. उलट दिवसें दिवस या वेदना वाढतच गेल्या. अखेर सहा महिने दुखणं अंगावर काढल्यानंतर त्यांनी तेजनाक्ष हेल्थकेअरमधील युरोलॉजिस्ट आशिष रावंदळे पाटील यांच्याकडे तपासणी करून घेतली. या तपासणीमधे असं आढळलं की धनराज यांच्या डाव्या मूत्रपिंडाचा पेल्वी यूरेटिक जंक्शन अडथळा आहे.
शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यानं धनराज यांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला सर्व तपासण्या झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी तपासणी केली असता मूत्रपिंडांत मोठ्या प्रमाणावर दगड असल्याचं आढळलं. ही शस्त्रक्रिया दोन डॉक्टरांनी केली आणि ती चार तास चालली. हे दगड प्रामुख्यानं ऑक्सलेट आणि कॅल्शियम फ़ॉस्पेट यापासून बनले होते आणि एक मिलीमिटर ते अडीच सेंटीइटर इतके मोठे होते.
धनराज यांच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी तर झाली आणि ते लवकरच हिंडू फ़िरू लागले मात्र या एका शत्स्रक्रियेमुळे पुढे महिनाभर जास्तीचं काम करावं लागलं आणि हे काम करण्यासाठी हिरे मोजणार्यांना खास पाचारण करण्यात आलं होतं. असं काय घडलं होतं की धनराज यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिनाभर हॉस्पिटलमधे एक विशेष काम चाललं होतं. या कामामुळे डॉ आशिष यांची गिनिज बुकमधेही नोंद घेण्यात आली.
तर आता, साधारणपणे किडनी स्टोन असणार्या रूग्णांत चार पाच अगदी दहा दगडसुध्दा कधीकधी आढळतात. मात्र धनराज यांच्या मूत्रपिंडातून दहा पाच नव्हे तर तब्बल १ लाख ७२ हजार १५५ इतके खडे काढण्यात आले. हा एक प्रकारचा विश्वविक्रमच आहे.
शस्त्रक्रियेनंतर खड्यांची संख्या बघूनच डॉक्टरना अंदाज आला की हे नेहमीच्या कर्मचार्यांकडून होणारं काम नाही. त्यांनी हिर्यांची मोजणी करणार्या कारागिराला पाचारण केलं आणि हे खडे मोजायला सांगितले याचं कारण असं की नियमितपणे लहान मोठ्या आकरातील हिरे मोजून या कारागिरांची नजर सवयीची झालेली असते. अगदी बारीकसा खडासुद्धा यांच्या नजरेतून सुटू शकत नाही. हॉस्पिटमधील एक डॉक्टर आणि हा कारागिर रोजचे तीन तास असा महिनाभर हा खडे मोजणीचा कार्यक्रम करत होते तेंव्हा कुठे खड्यांची मोजणी संपली. यानंतर हे सर्व प्रकरण गिनिज बुक ऑफ़ रेकॉर्डकडे पाठविण्यात आलं आणि त्यांच्याकडून सर्व तपासण्या झाल्यानंतर या विक्रमाचं सर्टिफ़िकेट देण्यात आलं.
आहे की नाही कमाल?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.