बौद्ध धर्माचे भाष्यकार द्वितीय बुद्धघोष धर्मानंद कोसंबी

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


एकोणीसावे शतक हे इंग्रजी आमदानीत शिक्षण घेतलेल्या आधुनिक विद्वानांचा बौद्धिक महाराष्ट्र घडविणारे, प्रबोधनाची तुतारी समाज जागृतीसाठी आपल्या अफाट कर्तृत्वाने फुंकणारे शतक म्हणून ओळखले जाते. याच शतकात विद्वान, पंडित, अभ्यासक, लेखक, कवी, स्थापत्यविशारद, चित्रकार अशा विविध ज्ञानकलाशाखातील समाजधुरीणांची एक पिढीच्या पिढी उदयास आली. या माननीयांनी वैचारिक गोंधळात रुतलेला, परकीय राजसत्तेमुळे गलितगात्र झालेला समाज अप्रबुद्धतेच्या खाईतून अथक परिश्रमाने वर काढला. त्याच्या उत्थानाला दिशा दिली.

९ ऑक्टोबर, १८७६ साली गोमंतकातील साखवळ या गावी धर्मानंद कोसंबी यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे-कूळ गौड सारस्वत शणै किंवा शेणाई ब्राह्मणांचे होते. बालपणी धर्मानंदांची तब्येत तोळामासाच होती. त्या अर्थाने ते आसपासच्या पंचक्रोशीत ‘एक मंद बुद्धीचे पोर’ म्हणून तसे दुर्लक्षित होते.

एका कुडमुड्या गाव ज्योतिषाच्या सांगण्याप्रमाणे हाच मंदबुद्धी पुढे मात्र विद्याभ्यासात पारंगत झाला. त्या ज्योतिषाच्या कथनीप्रमाणेच तो जरी जगविख्यात विद्वान झाला तरी त्याच्याकडे आयुष्यभर लक्ष्मीने पाठच फिरवली होती, पण अशीच दुर्लक्षित गरीब माणसे आयुष्यात काही तरी अफाट काम करून जातात.

धर्मानंद कोसंबींचे संपूर्ण आयुष्य म्हणजे या गोष्टीचे एक दुर्मिळ पण उत्तम उदाहरण आहे. काय आहे धर्मानंदाचे आयुष्य आणि काय आहे त्यांनी केलेले महान कार्य? असे प्रश्‍न त्यांच्याबाबतीत ज्यांना थोडीफार माहिती आहे किंवा काहीच माहिती नाही अशांच्या मनात निश्‍चितपणे निर्माण होतील, कारण अशांचे आयुष्य व कर्तृत्व हे जागतिक घडामोडींच्या संदर्भात इतक्या उच्च पातळीवरून घडून गेलेले असते की, त्यांची महत्ता समजून घेण्याएवढी बौद्धिक क्षमता समाजमनाची असतेच असे नाही.

केवळ पाचव्या इयत्तेपर्यंत शालेय शिक्षण घेतलेला एक अडाणी पोर पुढे फर्ग्युसन महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, काशी विद्यापीठ, कलकत्त्याचे नॅशनल विद्यापीठ, महात्मा गांधींनी अहमदाबादेत स्थापलेले गुजरात विद्यापीठ, अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठ या ज्ञानयज्ञाच्या वेदींवरील एक ओजस्वी तपस्वी ऋषी झाला.

या सर्व विद्यापीठातून त्यांना पाली भाषा व बौद्ध धर्म संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक म्हणून निमंत्रले गेले. अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाने ज्यांच्या अभिधर्मविषयक लघुज्ञानकोशाची रोमन लिपीतील आवृत्ती प्रथम प्रकाशित करावी, असे ते पहिले भारतीय व महाराष्ट्रीय संशोधक पंडित ठरले.

भारताबाहेर त्रिखंड पंडित ख्याती प्राप्त, बुद्धजीवन व तत्त्वज्ञानवेत्ता, आधुनिक भारतातील ‘द्वितीय बुद्धघोष’ म्हणून धर्मानंद यांना मानले  गेले.

भारतात नाहीशा झालेल्या बौद्धधर्म तत्त्वज्ञानात प्राण फुंकून, ते पुनरुज्जीवीत करून धर्मप्रसार करणारे, प्रत्यक्ष बुद्धानंतर २५०० वर्षांनी ‘द्वितीय धर्म चक्रप्रर्वतन’ करणारे, एक बुद्धासारखे महान पुरुषोत्तम शिवाय थोर गांधीवादी, कर्ता समाजसुधारक, विश्‍वमानवाच्या कल्याणाचा मार्ग अनुसरणारे महान ‘बुद्धघोष’ झाले.

सामान्यपणे पंडित, विद्वान, संशोधक किंवा शास्त्रज्ञ हे त्यांच्या विषयाचे बुद्धिवादी असतात, पण आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या सखोल अभ्यासाला, ज्ञानाला, कर्मवादी म्हणजे कृतिशील बनवले.

लहानपणी ‘बालबोध’ मासिकातील बुद्धांच्या जीवनावरील लेख वाचून, त्यातून प्रेरणा घेऊन बुद्धचरित्र, बौद्धविचारधारा यांचा झपाटल्यासारखा अभ्यास केला. त्यातूनच स्वतःचे नगण्य आयुष्य बौद्ध जीवनसार, बौद्ध परंपरा यांचा विचार, प्रसार व विकास करण्यासाठी वाहून घेण्याचा निर्धार केला व हे स्वप्न आयुष्यभरातील अथक परिश्रमाने ‘बुद्धोपासक’ हे नामाभिधान प्राप्त करून घेऊन धर्मानंद कोसंबी यांनी आपले आयुष्य सार्थकी लावले.

ज्ञानोपासनेसाठी हा निर्धन तरुण पायपीट, बैलगाडी, आगगाडी, आगबोटी अशा मिळेल त्या मार्गाने संपूर्ण भारतवर्ष, नेपाळ, सिक्कीम, तिबेट, श्रीलंका, ब्रह्मदेश, इंग्लंड, रशिया, अमेरिका येथे आवश्यक त्या ठिकाणी, आवश्यक तेवढा मुक्काम करून ज्ञानसंपादन करणारा ह्युएनत्संग, राहुल सांकृत्यायन यांच्यासारखा ज्ञानसाधक जगप्रवासी झाला.

धर्मानंदांनी बौद्धधर्मविषयक इतके विपुल व दर्जेदार लेखन केले की त्यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी-गुजराती भाषेत अनुवाद झाले. त्यांच्या ग्रंथांच्या पुनरावृत्त्या निघाल्या. डॉ. आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्धधर्म स्वीकारला पण त्यांच्याही अगोदर तथाकथित उच्च सारस्वत ब्राह्मण असलेल्या धर्मानंदांनी बौद्धधर्माची उपासक दीक्षाच नव्हे तर श्रामणेर दीक्षा, उपसम्पदापूर्वक बौद्धभिक्षू दीक्षा श्रीलंकेतल्या सुमंगलाचार्यांकडून घेतली व ‘भगवान बुद्ध’ हे आगळेवेगळे पुस्तक लिहिले. त्या अर्थाने ते महान ठरतात.

अशोकाच्या शिलालेखांचे मराठीत भाषांतर करून त्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण ग्रंथ तयार करणारे ते पहिले विद्वान ठरले. केतकरांच्या ज्ञानकोशात या त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. गौतमबुद्धाने विवाह झालेला असूनही जागतिक कुटुंबकार्य करून वेगळ्या धर्माची स्थापना केली. त्यासाठी पुढील आयुष्य खर्चिले. तसेच काहीसे स्थितप्रज्ञाचे आयुष्य धर्मानंद जगले. भांडारकरांना अपेक्षित असे ‘ज्ञानयोगी’ व ‘कर्मयोगी’ असे आयुष्य धर्मानंदांनी स्वीकारले.

बौद्ध विचारधारा जी अवरुद्ध झाली होती ती प्रवाहीत ठेवण्याचे महान कार्य १९ व्या शतकात धर्मानंद कोसंबी यांनी केले. तेच महान कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपली शिष्य परंपरा निर्माण केली. त्यांचे ते आचार्य झाले. चिं. वै. राजवाडे, प. ल. वैद्य, पु. वि. बापट, चिं. वि. जोशी, ना. के. भागवत असे बौद्धधर्मज्ञानसरिता त्यांच्यानंतर अखंड खळखळत ठेवणारे असे असंख्य शिष्य धर्मानंदांच्या या यादीत आपापल्या विषयानुरुप कार्य करणारे म्हणून समाविष्ट आहेत.

रशियन क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, मार्क्सवाद, समाजवाद यांचे गाढे अभ्यासक म्हणून धर्मानंदांना मान्यता मिळालेली होती. हे सर्व बौद्धिक करत असताना धर्मानंदांनी १९३० मध्ये म. गांधींच्या स्वातंत्र्यविषयक सत्याग्रह आंदोलनात सक्रिय उडी घेऊन, तुरूंगवास भोगून आपल्यातील प्रखर ‘कर्मवाद’ सिद्ध केला. मुंबईत त्यांनी १९३७ मध्ये ‘बहुजन विहार’ स्थापण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

प्रसिद्ध कोसंबी चरित्रकार प्रा. मो. गो. धडफळे धर्मानंदांविषयी म्हणतात की, ते जन्माने ब्राह्मण, दीक्षेने बौद्ध, पार्श्‍वनाथाचा चातुर्याम धर्म सांगणारे जैन धर्मी असे सो ब्राह्मण, सो समणी, सो भिक्खू असे एकाचवेळी अनेक पदांचे पदाधिकारी अभ्यासक होते. गांधी, कोसंबी असे महात्मे हे सर्वधर्मीय तर असतातच पण त्याही पलीकडे जाऊन ते ‘मानवता धर्मी’ होतात, हेच त्यांचे थोरपण!

कारण धर्मानंद हे एकाचवेळी राष्ट्रवादी, गांधीवादी, प्रार्थना समाजवादी, बहुजन विहारवादी, विश्‍वमानव कल्याणवादी विश्‍वपुरुष होते.

आपल्यासारख्या सर्वसामान्य समाज घटकांना त्यांचा परिचय होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल कोण जाणे?

प्रारंभी म्हटल्याप्रमाणे धर्मानंद हे वैचारिक निवड करणारे ‘निवडक’ होते. अशा कृतकृत्य माणसाने १९४७ मध्ये वर्ध्याच्या पवनार आश्रमात करण्यासारखे काही उरले नाही असे ध्यानात येताच ज्ञानेश्‍वराप्रमाणे प्राण ठेवले. पण अर्थातच बुद्धाप्रमाणे संसार त्याग व ज्ञानेश्‍वरांप्रमाणे संजीवन समाधी न घेता पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला व करावयासारखे काही शिल्लक न राहिल्यामुळे ७१ व्या वर्षी बुद्धघोष धर्मानंदांनी अविलंब देहत्याग केला.

बुद्धाच्या सुत्तनिपातातील गाथेप्रमाणे अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या मानवाबद्दल असेच म्हणता येईल की, विद्यासंपन्न, शुद्धाचरणी, ज्याचे सर्व सांसारिक स्त्रोत आटले आहेत असा मानव पुन्हा जन्माला येत नसतो.

धर्मानंदांचा स्वभाव लहानपणापासून विरक्त. तेवीसाव्या वर्षीच विरक्तीपूर्ण गृहत्याग व काही काळाने पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करून कौटुंबिक जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. बाराव्या शतकात ज्ञानेश्‍वरांनी भागवत धर्माचा पाया महाराष्ट्रात रचला तर द्वितीय बुद्ध घोषांनी भारत, नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश येथे विशुद्ध बौद्ध धर्माची व तत्त्वज्ञानाची नव्याने ओळख करून दिली.

बुद्धाने सहाव्या शतकात तर द्वितीय बुद्धघोषांनी एकोणिसाव्या शतकात धर्मचक्र प्रवर्तन केले असे म्हणता येईल. म. गांधींचा अहिंसावादी व सत्याग्रही मार्ग अनुसरून, खादी कातून, देशसेवा व बौद्ध धर्मावर भरपूर लेखन करून त्या धर्माचा प्रचार कार्य हेच त्यांचे जीवनकार्य झाले. धर्मानंद हे सुधारणावादी, ब्राह्मण हिंदू, बौद्ध होते कारण या तीनही संज्ञात त्यांच्या दृष्टीने तफावत किंवा विसंगती नव्हती.

बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी ते लुप्तप्राय झालेली, फक्त ग्रंथात शिल्लक राहिलेली पाली भाषा शिकले. त्यात स्वतंत्र बुद्धीने ग्रंथ लिहिण्याइतके तज्ञ झाले. बुद्धलीला-सारसंग्रह, अभिधम्मट्ट संग्रह, धम्मपद, बौद्ध संघाचा परिचय, समाधिमार्ग, जातककथासंग्रह, सुत्तनिपात, भगवान बुद्धना पचास धर्मसंवादो, शांतिदेव विरचित बोधिचर्यावतार, धर्मचक्र प्रवर्तन हे त्यांचे १९२३ ते १९४५ सालात निर्माण झालेले महत्त्वाचे ग्रंथ होत. तसेच १९४० साली प्रकाशित झालेला ‘भगवान बुद्ध’ हा त्यांचा ग्रंथ विलक्षण गाजला.

अशा द्वितीय बुद्धघोष आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे चिरस्मारक त्यांच्या नावे, त्यांच्या जीवन कार्याची जोपासना, अभ्यास, संवर्धन, प्रसारण करणारी एकतरी संस्था निदान पुण्या-मुंबईत निघावी ही प्रा. डॉ. मो. गो. धडफळे यांची इच्छा भविष्यात प्रत्यक्षात यावी असेच मलाही वाटते.


लेखक- दीपक करंदीकर, पुणे
चलभाष : ९४२३००७०३५ 

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह आहेत.)
सदर लेख साहित्य चपराकमध्ये पूर्वप्रकाशित आहे.


या माध्यमावर व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक आहेत, सदर मतांशी संपादक मंडळ कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!