आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानवाला सतत नवीन काहीतरी करायचं असतं. मानवाची ही धडपड करायची वृत्ती त्याला काही स्वस्थ बसू देत नाही. निसर्गात अशा बऱ्याच गोष्टी लपल्या आहेत ज्याचं आकलन किंवा त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण अजून माणसाला समजलं नाही, या अशा गोष्टी एखादं कोडं म्हणून माणसासमोर येतात आणि माणूस ही निसर्गाने घातलेली कोडी सोडवायला अख्ख आयुष्य पणाला लावतो. पण हीच धडपड करताना एखादा माणूस अचानकपणे एखाद्या गोष्टीचा त्याला उलगडा होतो, तो क्षण त्याच्या आयुष्यातला ‘युरेका मोमेन्ट’ ठरतो.
माणसाची आकाशात झेप घ्यायची इच्छा फार जुनी आहे. लहान असताना आपण प्रत्येकजण उडणाऱ्या पक्षांकडे बघून हा विचार जरूर येत असेल, जर मलाही या पक्षांप्रमाणे स्वछंदीपणे उडता आलं तर किती भारी झालं असतं. पण शांत बसेल तो माणूस कसला, माणसाने आकाशात उडायचं या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. आता या विमान बांधणीला ही एक इतिहास आहे तो काय आहे हे आपण जाणून घेऊ. रामायण या महाकाव्यामध्ये “पुष्पक” विमानाचे दाखले आहेत. असं म्हणतात श्रीरामांनी लंकेतून अयोध्येपर्यंतचा प्रवास “पुष्पक” विमानातुन केला.
15व्या शतकात लिओ नार्दोदा विंची या थोर शास्त्रज्ञाने आकाशात उड्डाण करण्यासाठी विमानाचा एक प्रारूप आराखडा तयार केला. 1849 साली जॉर्ज केली (George Cayley) यांनी ग्लायडरचा (Glider) शोध लावला. हे ग्लायडर एखाद्या मोठ्या आकाराच्या पतंगासारखे होते. ग्लायडरला बांधलेल्या दोऱ्या पकडून तीन-चार जण जोरात पळायचे. या धावण्यामुळे ग्लायडर (Glider) पतंगासारखा हवेत वर जायचा. त्यानंतर धावणारी माणसं हातातले दोर सोडून द्यायचे व हे ग्लायडर (Glider) हवेत उडायचं. अनेक उत्साही वैमानिक ग्लायडर (Glider) चालवत असताना अपघातग्रस्त होऊन मरण पावले आहेत.
अखेर मानवाच्या प्रयत्नांना यश आलं, 1893 साली जर्मन शास्त्रज्ञ काउन्ट फर्डिनांड वोन झेपलीन (Count Ferdinand Von Zeppelin) यांनी हायड्रोजन वायूचा वापर करून झेपलीन (Zeppelin) नावाचा मोठ्या फुग्याच्या आकाराचं विमान तयार केलं.
आता तुम्हाला कुणालाही विमानाचा शोध कुणी लावला हे जर विचारलं तर तुम्ही लगेच उत्तर द्याल की राईट बंधू (Wright Brother’s) यांनी शोध लावला. तुम्ही आयुष्यमान खुराना याचा “हवाईजादा” हा सिनेमा पाहिला का? हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकला नाही पण या सिनेमाने एक रोचक अशी बाब प्रेक्षकांसमोर मांडली. आता मी म्हणालो की राईट बंधू (Wright Brother’s) यांनी विमानाचा शोध लावायच्या आधी जर एका मराठी माणसाने विमानाचा शोध लावला आहे तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, पण ही बाब खरी आहे “शिवकर बापूजी तळपदे” या मराठी माणसाने विमानाचा शोध लावला.
जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना तळपदे यांनी हे विमान बनवले. भारद्वाज ऋषींनी रचलेल्या “वैमानिक शास्त्र” या ग्रंथाचा तळपदेंवर प्रभाव होता व त्यांनी जे विमान बनवलं ते काही काळ हवेत होतं व जमिनीवर येण्यापूर्वी तळपदे यांच्या विमानाने 1500 फूट उंचीपर्यंत उड्डाण केले होते.
अमेरिकेत ओहायो राज्यातील डेटन शहरात ऑरव्हील आणि विलबर राइट (Orville and Wilbur Wright) हे सायकलचे दुकान चालवायचे. दोन्ही बंधूंना ग्लायडिंगचा छंद होता. ग्लायडर (Glider) चालवत असताना त्या ग्लायडर (Glider) नियंत्रण ठेवता येत नसल्याने ग्लायडर (Glider) अपघातग्रस्त होते ही बाब त्यांच्या लक्षात आली. पंख्याचा आकार हा ग्लायडर (Glider) च्या स्थैर्याच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे त्यांनी जाणलं. ग्लायडर (Glider) च्या पंख्यात अनेक बदल करून उत्तर कॅरोलिना (North Carolina) येथे समुद्रकिनारी चाचण्या सुरू केल्या. अखेर बऱ्याच सुधारणा करून 17 डिसेंबर 1903 रोजी राईट बंधूंच्या विमानाने आकाशात झेप घेतली व मानवाच्या इतिहासात विमान युग सुरू झालं.
माणसाला आयुष्यात संकटं आली की त्याला त्याच्या क्षमतांचा अंदाज येतो. जगात ज्या ज्या लोकांनी यश, कीर्ती मिळवली आहे त्याचा मागे एक कारण म्हणजे त्या माणसांची धाडसीवृत्ती. अशी धाडसी लोक आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अनेक विक्रम प्रस्थापित करतात. जेव्हा एखादी जगावेगळी गोष्ट कुणी करतं त्यावेळी त्या गोष्टीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नावाची ही संस्था घेते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झारा रुदरफोर्ड या मुलीने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी एकटीने विमान चालवत पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे ही बातमी तुम्ही वाचलीच असेल.
आज अशाच अजून एका विक्रमाची आपण चर्चा करणार आहोत जो दारिओ कोस्टा (Dario Costa) यांच्या नावावर आहे.
दारिओ कोस्टा (Dario Costa) यांचा जन्म 9 मे 1980 रोजी युनायटेड किंगडम येथे झाला. पण सध्या त्यांनी इटलीचं नागरिकत्व घेतलं आहे. वयाच्या 6व्या वर्षी दारिओ कोस्टा (Dario Costa) हे इटलीमध्ये बॉलोग्ना (Bologna) येथे वैमानिक प्रशिक्षण घेण्यासाठी स्थायिक झाले. 1996 ला वयाच्या 16व्या वर्षी दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी वैमानिक म्हणून स्वतंत्रपणे उड्डाण केले. 2011 साली ते वैमानिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक बनले. 2016 साली Red Bull Air Race World Championship या स्पर्धेसाठी पहिले इटालियन वैमानिक म्हणून पात्र ठरले.
2019 साली ते जगातील एकमेव वैमानिक होते ज्यांनी लो लेव्हल एअर रेसिन्ग या प्रकारात प्राविण्य मिळवले होते. पण दारिओ कोस्टा (Dario Costa) हे एवढ्यावर समाधान मानणारे नव्हते.
कॅप्टन अमेरिका फर्स्ट अव्हेंजर या सिनेमाचा क्लायमॅक्स आठवतो आहे? कॅप्टन अमेरिका हा एका बोगद्यातून चक्क विमानाचं उड्डाण करतो. पण जर मी म्हणालो की हे खरंच शक्य आहे व असं धाडस वास्तवात कुणी केलं आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो! एक नव्हे तर चक्क सलग दोन बोगद्यातून विमान उडवण्याचं धाडस व विक्रम दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी त्यांच्या नावावर केला आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद ही झाली आहे. चला तर हा विक्रम दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी कसा साध्य केला हे जाणून घेऊ.
दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी 2019 साली लो लेव्हल एअर रेसिंग या प्रकारात प्राविण्य मिळवले होते हे तर आपण वाचलेच. दारिओ कोस्टा (Dario Costa) हे रेड बुल स्टंट पायलट म्हणून प्रमाणित आहेत. आपल्या लो लेव्हल एअर रेसिंगचा वापर करून दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी एक स्टंट करायचा ठरवला. हा स्टंट करण्यासाठी दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी तुर्कीमधील इस्तंबूल (Istanbul) शहराच्या मरमारा हायवेवर कॅटाल्का (Catalca) बोगद्यांची निवड केली. हा स्टंट करण्यासाठी दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी जिवको एज 540 (Zivko Edge 540) हे विमान वापरायचे ठरवले.
अखेर तो निर्णायक दिवस उजाडला, 4 सप्टेंबर 2021. या दिवशी दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी दोन बोगद्यांमधून 150 मैल प्रति तासाहून अधिक वेगाने विमान उडवले. 360 मीटर लांबीच्या एका बोगद्यातून तीन फूट उंची वरून हे विमान उडवले व त्यानंतर 1160 मीटर लांबीच्या दुसऱ्या बोगद्यातून हे विमान उडवलं.
दोन बोगद्यातील एकूण 5200 फुटांचे अंतर दारिओ कोस्टा (Dario Costa) यांनी 43.44 सेकंदात पार केले. धक्कादायक बाब म्हणजे हा स्टंट करायच्या वेळी वाऱ्याची दिशा त्यांच्या उलट होती व ज्यामुळे विमान हवेत हेलकावे घेण्याची शक्यता होती पण या आव्हानाला दारिओ कोस्टा (Dario Costa) पुरून उरले.
त्यांनी हा स्टंट करताना एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत आणि या पाचही विक्रमांची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. तर हे 5 विक्रम कोणते त्याची आता माहिती घेऊ..
1. प्रथम एका बोगद्यातून विमान उडवल्याचा विक्रम
2. सर्वात जास्ती लांबीच्या बोगद्यातून विमान उडवल्याचा विक्रम
3. बोगद्यातून सर्वात जास्त वेळ विमान उडवल्याचा विक्रम
4. पहिल्यांदाच दोन बोगद्यामधून विमान उडवल्याचा विक्रम
5. पहिल्यांदाच एका बोगद्यात विमानाचे टेक ऑफ केल्याचा विक्रम
तर दारिओ कोस्टा (Dario Costa) यांचा हा किस्सा ऐकल्यावर आपल्याला हे नक्की पटेल की जर मनात धाडस करण्याची इच्छा प्रबळ असेल तर अशक्य असलेल्या अनेक गोष्टी शक्य करता येतात. तर दारिओ कोस्टा (Dario Costa) या विक्रम वीराच्या धाडसाला व कर्तुत्वाला आमचा सलाम.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.