सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पण…

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


स्वातंत्र्यपूर्व काळात समाज शिक्षित झाला पाहिजे म्हणून अनेक समाजसुधारकांनी शिक्षणाचा आग्रह धरला होता. त्यातही भारतात शिक्षणाची मक्तेदारी विशिष्ट वर्गापुरती मर्यादित होती. अनेक समाजधुरिणांनी इंग्रजी शिक्षणाचा आग्रह धरला. परंतु, कोणत्याही धर्मातील एखाद्या जुन्या रूढी विरोधात काही सुधारणा कामे सुरु केली की लगेच धर्म बुडाल्याचे फतवे काढले जातात. आधुनिक आणि पुरोगामी विचारसरणीला धर्मविरोधी ठरवले जाते. मुस्लीम धर्मात तर असे फतवे जास्तीच निघतात. जरा कुठे कुणी आधुनिकतेची कास धरली की लगेच यांच्या धार्मिक भावनांना ठेच लागते.

मुस्लीम समाजात आधुनिक शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांमध्ये सर सय्यद अहमद खान यांचे नाव सगळ्यात वर येते. सर सय्यद अहमद खान अत्यंत गरीब कुटुंबातील होते. त्यांच्या तरुणपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. १८३० साली ते इस्ट इंडिया कंपनीत क्लार्क म्हणून रुजू झाले. त्याकाळी कोणाही भारतीयाला या पदापर्यंत मजल मारणे सहज शक्य नव्हते. परंतु सर सय्यद अहमद खान यांनी स्वकष्टाने ही उंची गाठली होती.

त्यानंतर त्यांना १८४१ साली उप-न्यायाधीश पदावर नियुक्त करण्यात आले. इतक्या मोठ्या पदावर जाऊनही त्यांनी आपले साधे राहणीमान कधीच सोडले नाही, हे विशेष

१८५७ च्या उठावाच्या तेव्हा ते इंग्रजांचे नोकर होते. हा उठाव झाला तेंव्हा ते इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले. अनेक इंग्रजांना त्यांनी जीव वाचवण्यास मदत केली. पण, याच उठावात इंग्रजांनी त्यांच्या अनेक जवळच्या लोकांना मारून टाकले. या घटनेनंतर इंग्रजांबद्दलची त्यांची भावना बदलू लागली.

देश सोडून त्यांनी इराकमध्ये जाण्याचा निश्चय केला होता. पण, भारतीय मुस्लीमानांमध्ये सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे याची जाणीव त्यांना झाली. यासाठी मुस्लीम समाजाने आधुनिक शिक्षणाची कास धरली पाहिजे असे त्यांचे मत होते. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी मदरसे होते पण, तिथे आधुनिक काळाशी सुसंगत शिक्षण दिले जात नव्हते.

मुस्लिमांना आधुनिक आणि उच्च शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक कॉलेज सुरु केले. परंतु कट्टरपंथीय मुस्लिमांनी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची निर्भत्सना केली. अनेक मौलवींनी त्यांना काफिर ठरवणारे फतवे देखील काढले.

अशा कट्टर धर्ममार्तंडांच्या काळात त्यांनी मुस्लीम धर्मियांच्या उन्नतीचे स्वप्न पहिले. कुठल्याही समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण ही प्रमुख अट आहे. म्हणून नोकरीच्या निमित्ताने जिथे जातील तिथे त्यांनी शाळा सुरु केल्या. या शाळेतून इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांचे शिक्षण अवर्जून दिले जाईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले.

१८७५ साली त्यांनी अलिगढ येथे मदरसतुलउलुम या नावाने एक मुस्लीम शाळा सुरु केली. १८७६ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर याच ठिकाणी त्यांनी मोमेडन अँग्लो-ओरीएंटल कॉलेज सुरु केले. तेंव्हा हे कॉलेज अलाहाबाद विद्यापीठा अंतर्गत येत होते.

२७ मार्च १८९८ साली त्यांचे निधन झाले, तेंव्हाही इथे कॉलेजच होते. पुढे १९२० साली राष्ट्रवादी विचारांच्या प्रसारासाठी या कॉलेजचेच अलिगढ मुस्लीम विद्यापीठात रुपांतरण करण्यात आले. पुढे जाऊन याला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देखील मिळाला. या कॉलेजला केंब्रीज विद्यापीठाची उंची गाठून द्यायचे त्यांचे स्वप्न होते, पण त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

सर सय्यद अहमद खान हे एक विद्वान पंडित होते याबद्दल काहीच दुमत नाही. गणित, तर्कशास्त्र आणि साहित्य अशा अनेक विषयात ते पारंगत होते. मुरादाबाद येथे त्यांनी पहिली मदरसा सुरु केली. नंतर विज्ञान आणि गणित यांच्याशिवाय प्रगती अशक्य आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर याच मदरशातून त्यांनी मुस्लीम विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यास सुरुवात केली.

सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या उद्धारासाठी आणि उन्नतीसाठी पुढाकार घेतला असला तरी, हिंदू धर्माबद्दलचे त्यांचे विचार संकुचित होते. मुसलमान अनेक पद्धतीने हिंदुपेक्षा श्रेष्ठ आहेत अशी त्यांची भावना होती. त्यांच्या अशा विचारसरणीमुळे अनेकदा ते विवादाच्या भोवऱ्यात अडकले. उर्दू आणि हिंदी यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद उफाळला तेंव्हा त्यांनी हिंदी ही अडाणी लोकांची भाषा असल्याची भलामण केली. दुसरीकडे मदन मोहन मालवीय यांच्यासारखे हिंदीचे जाणकार पंडीत उर्दूला विदेशी भाषा म्हणून हिणवत होते.

असे म्हटले जाते हिंदू-मुस्लीम द्विराष्ट्राची आधी त्यांनीच पुष्टी केली. मुस्लिमांमध्ये हिंदुविषयी तेढ निर्माण करण्यात त्यांचे विचार कारणीभूत असल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले.

मौलाना आझाद यांनी तर कित्येकदा त्यांचे विचार हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी घालणारे असल्याचे म्हटले. त्यांच्या मते सर सय्यद अहमद खान यांनी शिक्षण आणि समाजकार्याच्या आडून राजकीय अजेंडा राबवला. त्यांनी इथल्या मुस्लीम समाजात जे राजकीय विचार पेरले ते एकसंघ भारताच्या दृष्टीने खूपच घातक होते.

मौलाना आझाद यांच्या मते सर सय्यद अहमद खान यांच्या विचारांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल केली. त्यांच्या या विचारांचा परिपाक म्हणूनच भारत-पाकिस्तान फाळणीला सामोरे जावे लागल्याचे मौलाना आझाद यांचे मत होते. मौलाना आझाद यांनी फाळणीसाठी त्यांना जबाबदार धरले असले तरी, त्यांची विद्वत्ता आणि मुस्लीम समाज सुधारणेसाठी त्यांनी उचललेली पावले याबद्दल त्यांना सर सय्यद अहमद खान यांच्या प्रती प्रचंड आदराची भावना होती. मौलाना यांच्या मते हिंदूमध्ये जे काम राजा राम मोहन रॉय यांनी केले तेच काम सर सय्यद अहमद यांनी मुस्लिमांसाठी केले.

सर सय्यद अहमद यांनी मुस्लीम धर्मातील अनेक अनिष्ठ प्रथा आणि रूढींवर कडाडून टीका केली, म्हणूनच मौलवींनी त्यांच्या विरोधात फतवे काढले. मुस्लीमांच्यातील पडदा पद्धतीला त्यांचा सक्त विरोध होता.

त्यांना कितीही धर्मद्वेष्टे ठरवले तरी आपल्या समाज बांधवांना त्यांचे एकच सांगणे होते, “तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करा, मला वाटेल ती नावे ठेवा पण, आपल्या मुलांवर दया करा, त्यांना शाळेत पाठवा, नाहीतर एकदिवस तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल.”

सर सय्यद अहमद खान यांच्यावर फाळणीच्या परिणामासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला जात असला तरी, मुस्लीम समाजातील अनिष्ठ रूढींवर आणि प्रथांवर त्यांनी जे कोरडे ओढले, मुस्लीमांच्यात धर्मसुधारणेचा आग्रह धरला, जे धाडस त्यांनी दाखवले ते त्यांच्या पश्चात मात्र क्वचितच कुणी दाखवले असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!