एका भाभाने आण्विक संशोधनाचा पाया रचला तर दुसऱ्याने एनसीपीएची वास्तू उभी केली

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारत देश हा कर्तृत्ववान रत्नांची खाण आहे, असे म्हटले जाते. आज देश जी प्रगतीची घोडदौड करतो आहे, त्यामागे अनेक ज्ञात-अज्ञात हातांचे कष्ट आहेत. अनेकांच्या कष्टाने, कौशल्याने, त्यागाने, आणि बलिदानातून आजचा भारत साकारला आहे. प्रत्येकाने आपआपल्या परीने भारताच्या उभारणीत योगदान दिलेले आहे. म्हणूनच आज अनेक बाबतीत भारत एक स्वयंपूर्ण देश आहे.

भारताच्या उभारणीत होमी भाभा आणि त्यांचे बंधू जमशेद भाभा यांचे योगदान अमुल्य आहे. या दोघांचेही क्षेत्र भिन्न असले तरी, दोघांनी उभे केलेले काम आजही देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. होमी भाभा यांनी देशाच्या आण्विक संशोधनाचा पाया घातला आणि जमशेद भाभा यांनी कलेचा निखळ वारसा मागे ठेवला.

एकमेकांहून अगदी भिन्न क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या भाभा बधुंचे एकमेकांवरील बंधुप्रेम आणि त्यांची राष्ट्रनिष्ठा यांची ओळख आपण या लेखातून करून घेणार आहोत. दोघांच्याही कामामुळे भारताच्या भविष्याला एक नवे वळण मिळाले.

होमी यांनी देशाला अण्वस्त्र सज्ज करण्यात बहुमुल्य योगदान दिले तर, जमशेद भाभा यांनी देशातील कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत एक मोठे थियेटर बांधण्यासाठी प्रयत्न केले. ज्याकाळी देशातील सरकारला देखील कलेला उत्तेजन देणे शक्य नव्हते त्याकाळी जमशेद भाभा यांनी कला जिवंत ठेवण्यासाठी आणि तिच्या संगोपनासाठी प्रयत्न केले.

होमी भाभा यांना भारताच्या आण्विक उपक्रमाचे जनक मानले जाते. होमी भाभा यांनी भारतातील काही समस्यांवर विज्ञानाच्या सहाय्याने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. जमशेद भाभा यांनी कलेच्या उत्तेजनासाठी संसाधने निर्माण करण्यावर भर दिला.

त्यांनी २९ डिसेंबर १९६९ रोजी मुंबईत नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) ची उभारणी केली. या थियेटरमध्ये ११०९ प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था असलेले जमशेद भाभा थियेटर (जेबीटी) आहे. याचे उद्घाटन २४ नोव्हेंबर, १९९९ रोजी करण्यात आले.

भाभा बंधूंच्या आईचे नाव मेहरबाई आणि वडिलांचे नाव जहांगीर होरमुसजी भाभा असे होते. होमी आणि जमशेद हे दोघेही कला, संगीत, पुस्तके यांच्या सान्निध्यातच वाढले. त्याच्या मुंबईतील घरी त्यांच्या व्यक्तिमत्वाला पोषक ठरतील अशी सर्व साधने त्यांना मिळतील याची सोय जहांगीर भाभा यांनी केली होती. लहानपणापासून होमींना चित्रकला आणि पेंटिंगची आवड होती. तर जमशेद यांना परफॉर्मिंग आर्ट्सची आवड होती. विशेषत: संगीतात त्यांना जास्त रुची होती.

होमी भाभा आणि जमशेद यांनी इंजिनियरिंग शिकून टाटा ग्रुपमध्ये सामील व्हावे अशी जहांगीर भाभा यांची इच्छा होती. जमशेद यांनी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करत टाटाच्या जमशेदपूर येथील टिस्कोमध्ये रुजू झाले. होमी भाभा यांनी मात्र वडिलांना स्पष्ट सांगितले की त्यांना गणिताच्या अभ्यासात रुची असून त्यांना इंजिनियरिंग करायचे नाही.

त्यांच्या वडिलांना होमी यांचा हा निर्णय मुळीच मान्य नव्हता. पण, होमींनी आधी पहिल्या श्रेणीतून इंजिनियरिंग पूर्ण करावे आणि मगच गणिताच्या शिक्षणाकडे वळावे या एका अटीवर ते होमींची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाले.

होमी भाभांनी वडिलांच्या इच्छेचा मान राखत आधी इंजिनियरिंग पूर्ण केले, त्यासोबत गणिताचा देखील अभ्यास सुरु ठेवला. केम्ब्रिज विद्यापीठात असताना त्यांचा ओढा सैद्धांतिक भौतिकशास्त्राकडे होता. त्यामुळे इंजिनियर होण्याचे आपल्या वडिलांचे स्वप्न ते पूर्ण करू शकले नाहीत.

जमशेद भाभा यांनी मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि जमशेदपूर येथील टाटांच्या टिस्को कंपनीत ते इंजीनियर म्हणून रुजू झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे १९३९ साली होमी केंब्रीजमधील पुढचे शिक्षण घेण्यासाठी परत जाऊ शकले नाहीत. तेंव्हा त्यांनी बेंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला.

भारतात पुरेसे विज्ञान संशोधन होत नाही आणि विज्ञान संशोधनाला चालना देणाऱ्या संस्थांचीही वाणवा आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी भारतात संशोधन संस्था स्थापण्यास पुढाकार घेतला.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना त्यांच्याच पुढाकाराने झाली. जेआरडी टाटा यांनी भारतातील विज्ञान संशोधनाला या संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले.

भारतात आण्विक भौतिकशास्त्राचा अभ्यास व्हावा आणि अणुउर्जेचा विधायक कार्यासाठी वापर केला जावा या हेतूने त्यांनी देशात आण्विक प्रकल्प सुरु करण्याचा चंग बांधला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना त्यांनी पत्राद्वारे या विषयाची खोली समजावून दिली. नेहरूंनी देखील यांच्या या प्रकल्पाला मान्यता दिली.

१९४८ साली देशात अणूउर्जा आयोग अस्तित्वात आला. त्यानंतर १९५४ साली अणू उर्जा प्रस्थापन उभारण्यात आले, ज्याला होमी भाभांच्या मृत्यू पश्चात भाभा आण्विक संशोधन केंद्र असे नाव देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय अणूउर्जा समितीच्या सल्लागार मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास्ठी ते व्हिएन्नाला निघाले असतानाच वाटेत विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. होमी यांच्या मृत्यूमुळे जमशेद प्रचंड अस्थिर झाले. यानंतर ते पुन्हा आपल्या परफॉर्मिंग आर्ट्स कडे वळले. विशेषत: मुंबईत एखादे कलेचे दालन उभे करावे यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. एनसीपीएच्या उभारणीतच ते जास्तीतजास्त वेळ व्यस्त राहत असत.

स्वतंत्र भारतात त्याकाळी अशा प्रकारच्या कला सादरीकरणाला फार काही चांगले दिवस नव्हते. सरकार देखील या कलांना प्रोत्साहन देण्यास असमर्थ होते. अशा काळात म्हणजे १९७१ साली त्यांनी एनसीपीएचे काम हातात घेतले.

लोकांच्या मुलभूत गरजा जसे की वीज, रस्ता आणि पाणीपुरवठा यांचीच तजवीज करताना सरकारची दमछाक होत होती. म्हणूनच संगीत, नृत्य आणि नाटक या भारतीय कलांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडे वेळ आणि क्षमता दोन्हींची कमतरता होती. जमशेदजींनी याकडे वेळीच लक्ष दिले आणि त्यांनी यासाठी आवश्यक ती साधनसामग्री जुळवण्यास सुरुवात केली.

जमेल तसा निधीही जमवण्याचा त्यांचा खटाटोप सुरु होता. जेआरडी टाटांनीही भरघोस पाठींबा दिला आणि दोघांनी एकत्र येऊन एनसीपीएची उभारणी केली.

मुंबईत एनसीपीएची इमारत उभारण्यासाठी जमशेद यांनी पाच एकराचा प्लॉट देण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केली होती. सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने ही विनंती मान्य केली नाही. मुंबईऐवजी त्यांना अजंठा लेणी परिसरातील जागा देऊ केली, जी जमशेदजींनी स्वीकारली नाही.

लालफितीच्या या कारभारात अडकण्याऐवजी त्यांनी समुद्रात भर घालून जमीन वाढवण्याचा निर्णय घेतला. होमी भाभा यांच्या मृत्यूला तेंव्हा तीन वर्षे झाली होती. तेंव्हाच्या पंतप्रधान इंदिराजी गांधींनी एनसीपीएच्या भुलाभाई देसाई ऑडीटोरीयमचे उद्घाटन केले. त्यानंतर अकरा वर्षांनी नरीमन पॉईंट येथे एनसीपीएचे टाटा थियेटर उभे राहिले. सध्या एनसीपीएची इमारतही येथेच आहे.

एनसीपीए हा काही केवळ एक छंद म्हणून उभारलेला उद्योग नव्हता. त्यांनी एनसीपीएच्या पहिल्या संचालक मंडळावर पंडित रवी शंकर, येहुदी मेनुहिन, विलायत खान, सत्यजित रे आणि पु. ल. देशपांडे यासारख्या दिग्गज कलाकारांची नेमणूक केली.

एनसीपीए कॉम्प्लेक्समध्ये आज जमशेद भाभा थियेटर, टाटा थियेटर, एक्स्परीमेंटल थियेटर, गोदरेज डान्स थियेटर आणि लिटल थियेटर अशी पाच थियेटर आहेत. यातील प्रत्येक थियेटर हे वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादरीकरणासाठी वापरले जाते.

जेबीटीचे उद्घाटन होण्यास काही महिन्यांचा अवधी राहिला होता. याचवेळी लागलेल्या एका आगीत संपूर्ण जेबीटी थियेटर जळून खाक झाले. पण, यावर जमशेदजींची प्रतिक्रिया अगदी संक्षिप्त होती. ते म्हणाले, उद्यापासून काम सुरु करू.

पुढच्या दोनच वर्षात जेबीटी आजच्या रुपात पुन्हा उभे राहिले. मोठे ओपेरा आणि ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यासाठी हे स्वतंत्र थियेटर त्यांनी बांधून घेतले.

जमशेदजी आपल्या निवृत्तीनंतरही या सभागृहासाठी काम करत राहिले. वयाच्या ९३व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. पण, जीवनभर त्यांनी कलाक्षेत्राला उर्जितावस्था देण्यासाठी स्वतःला वाहून घेतल्यामुळेच भारतीय कला आणि कलाकारांना आज चंदेरी दिवस पाहायला मिळतात.

होमीभाभा यांचे अणू भौतिकशास्त्रातील योगदान, जमशेदजींचे कला क्षेत्रातील योगदान दोघांनीही आधुनिक भारताच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!