या माणसाने एक नाही तर चक्क दोन वेळा विकला आयफेल टॉवर!!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

१९२५ साली पॅरिसच्या एका हॉटेलात व्हिक्टर लुस्टिंग नावाचा मनुष्य वृत्तपत्र वाचत बसला होता. त्या वृत्तपत्रात तो आयफेल टॉवरवर लिहलेला एक लेख वाचत होता ज्यात त्या धातूने तयार केलेल्या टॉवरला गंज लागतोय असं सांगून त्याचा सांभाळ करणे फ्रेंच राज्य शासनाला अशक्य असल्याचे नोंदवण्यात आले होते. ह्या लेखाच्या शेवटी एक गोष्ट नमूद करण्यात आली होती ती म्हणजे आता आयफेल टॉवरची विक्री करणे हा एकमेव पर्याय सरकार समोर आहे.

हे वाचताच व्हिक्टरला एक युक्ती सुचली आणि त्याने त्याची कुठलीही मालकी नसलेला आयफेल टॉवर विकायला काढला. हा व्हिक्टर कोणी साधारण मनुष्य नव्हता तर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा ठग होता. खूप मोठ्या मोठ्या लोकांना त्याने अत्यंत शिताफीने गंडवून आपल्या गुन्ह्यांना आकार दिला होता व कोट्यवधी रुपयांची लूट केली होती. त्याच्या लुटीचे किस्से आजही अंगावर काटा आणतात.

व्हिक्टरच्या चरित्रानुसार, तत्कालिन ऑस्ट्रिया-हंगेरीत व आजच्या झेक प्रजासत्ताकमध्ये असलेल्या होस्टिने नावाच्या छोट्या शहरात त्याचा जन्म झाला होता. तो एका मोठ्या घराण्याचा वारस होता. त्याचे वडील त्या शहराचे प्रमुख होते. एक विद्यार्थी म्हणून व्हिक्टर फार हुशार होता.

तो बहुभाषिक होता. त्याला झेक, इंग्लिश, फ्रेंच आणि इटालियन ह्या चार भाषा उत्तम प्रकारे बोलता येत. तो लोकांच्या स्वभावाला ओळखण्यात आणि अनुमान लावण्यात तरबेज होता. त्याच्या ह्याच गुणांचा पुढे त्याला फायदा झाला. आपल्या राहणीमान आणि वागण्या बोलण्याने तो एक वेगळी छाप लोकांवर सोडून जात असे.

१९ व्या शतकात व्हिक्टर यश कमावू लागला आणि त्याने गुन्हेगारी विश्वात आपलं प्रस्थ निर्माण करायला सुरुवात केली. छोटे मोठे जॅकपॉट, लॉटरी आणि मटक्याचे व्यवसाय करत करत तो एक दिवस प्रसिद्ध गॅम्बलर म्हणून उदयास आला.

त्याच्या उच्च राहणीमानाचा व व्यवहाराचा वेगळाच प्रभाव लोकांवर पडत होता. त्याला पत्ते खेळण्यात विशेष प्राविण्य होते, त्यामाध्यमातून अनेक श्रीमंत लोकांना त्याने यशस्वीपणे चुना लावला होता. त्याची श्रीमंत लोकांमध्ये एक चांगला वक्ता आणि एक मोठा सामर्थ्यवान उद्योजक अशी प्रतिमा निर्माण झाली होती. त्याने त्याच्या वागण्यातून एक वेगळीच छाप लोकांच्या मनावर सोडली होती. त्याच्या अशा वागण्यामुळे तो संशयाच्या फेऱ्यात कधी सापडत नसे.

त्याला द काऊंट हे टोपण नाव त्याच्या सट्टेबाजी आणि गॅम्बलिंगच्या प्रतिभेमुळे मिळाले होते. त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या एका खुणेवरून त्याची ओळख पोलीस करायचे, स्कारड हे टोपण नाव त्याला पोलिसांकडून देण्यात आलं होतं.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत औद्योगिक प्रगती मोठा श्रीमंत वर्ग उदयास आला. एका रात्रीत अमेरिकन लोक श्रीमंत होत असल्याचा अनेक गोष्टी जागोजागी पसरल्या. व्हिक्टरला आता त्याच्या ठगबाजीसाठी नवीन बाजारपेठ डोळ्यासमोर दिसू लागली आणि त्याने निश्चय केला की त्या बाजारपेठेवर डल्ला मारायचा.

त्यासाठी व्हिक्टरने अमेरिकेच्या दिशेने प्रवास सुरू केला, आपण श्रीमंत असल्याची बतावणी करून आणि आपल्या उच्चभ्रू राहणीमानाची छाप सोडून त्याने सरळ अमेरिकेत प्रवेश मिळवला होता. इतकंच नाही तर प्रवासादरम्यान त्याने सोबतचा एका श्रीमंत जोडप्याची फसवणूक करून पैसे लुबाडले होते.

आपल्या उच्चभ्रू राहणीमानाच्या आणि श्रीमंत व्यवहाराच्या बळावर अमेरिकेत त्याने प्रस्थ निर्माण केले. त्याने आपल्या व्यक्तिमत्वाच्या बळावर अमेरिकेत लोकांना मनी बॉक्सची विक्री करायला सुरुवात केली. व्हिक्टरने लोकांना त्या मनी बॉक्सवर शंभर डॉलर प्रिंट करून देई आणि त्याला रेडियमने सील केलं आहे अशी बतावणी करत असे. हे एक मनी बॉक्स तो २० ते ३० हजार डॉलर्सला विक्री करायचा आणि मुळात त्याच्या निर्मितीचा खर्च हा १०० डॉलर्सपेक्षा कित्येक पट कमी असायचा. तो लोकांची शुद्ध फसवणूक करायचा पण लोकांना जोवर त्याचा खेळ लक्षात यायचा तोपर्यंत तो लांब निघून गेलेला असायचा.

नंतरच्या काळात त्याला त्या व्यवसायात रस उरला नाही म्हणून काहीतरी नवीन करण्याच्या शोधात असताना त्याला आयफेल टॉवरचा तो लेख वाचायला मिळाला आणि त्याच्या मनात एका मोठ्या कटाने आकार घेतला. त्याने सुरुवातीला स्वत:चे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले. मग त्याने सरकारच्या मालकीच्या इमारतींची काळजी घेणाऱ्या विभागांच्या नावाने त्याने बनावट कागदपत्र तयार करून पॅरिस शहरातील धातू वितळणाऱ्या पाच मोठ्या उद्योगांचा प्रमुखांना भेटीसाठी पॅरिसच्या एका प्रसिद्ध आलिशान हॉटेलमध्ये बोलवलं. त्याने त्यांच्या समोर अत्यंत शिताफीने आयफेल टॉवर विक्रीची योजना ठेवली. त्यांच्यापैकी आंद्रे पोईजन नावाचा गृहस्थ फारच प्रभावित झाला आणि त्याने आयफेल टॉवरच्या खरेदीची तयारी दर्शवली.

परंतु त्याने जेव्हा व्हिक्टरच्या बनावट नावाचा तपास केला तेव्हा तो इतका श्रीमंत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो हे व्हिक्टरला बोलला देखील होता. त्यावर व्हिक्टरने भावनिक पणे तो एक सामान्य नागरिक असल्याचा खोटा कबुलीनामा देऊन आपण एक सरकारी कर्मचारी असून ह्याची विक्री करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचं बरोबर भासवून त्याने अखेर पोईझनला बाटलीत उतरवून त्याला आयफेल टॉवरची विक्री केली.

पोईझनने दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात आपण आयफेल टॉवर विकत घेतल्याची बोंबाबोंब केल्या नंतर सत्य बाहेर आलं आणि पोईझनची मोठी नाचक्की झाली. बदनामी टाळण्यासाठी त्याने व्हिक्टर विरोधात गुन्हा देखील दाखल केला नाही. पण व्हिक्टरची मजाल बघा तो परत आला आणि त्याने दुसऱ्या माणसाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी त्याची चोरी पकडली गेली. पोलिसांना त्याचा ठगबाजीची सूचना मिळून त्याला अटक करायच्या आत तो पॅरिससोडून अमेरिकेला पळाला.

अमेरिकेत त्याने परत मनीबॉक्स विक्रीचा धंदा करायला सुरुवात केली. त्याने ४७ वेगवेगळे नाव धारण करून असंख्य नवश्रीमंत मंडळींची फसवणूक केली. त्याच्या ह्या फसवणुकीचा चक्राचा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होऊ लागला होता. पोलीस त्याचा शोध घेत होती पण तो शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती आला नाही. पण एकदा त्याचा गर्लफ्रेंडशी त्याचा वाद झाला आणि तिने पोलिसांकरवी १९३५ साली अटक केली. त्यानंतर त्याला २० वर्षांचा जेलची शिक्षा सुनावण्यात आली. अल्काट्राजच्या तुरुंगात त्याचे निधन झाले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!