आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एखाद्या मुलीला पहिल्यांदा भेटायचे कुठे हा प्रश्न असो किंवा परीक्षेच्या आधीची रात्र असो किंवा साधं डोकं दुखत असो सगळ्यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे गरमागरम कॉफीचा प्याला. कॉफी ब्रेक दिवसभराच्या कामामध्ये आवश्यकच असतो. मग ती कॉफी स्टारबक्सची असो वा कोपऱ्यावरच्या अण्णाची.
आपल्याकडे नाही इतकं कॉफीचं वेड पाश्चिमात्त्य लोकांना आहे. त्यांना जरी असं वाटलं की कॉफी त्यांच्या इथेच बनते आणि अनादी काळापासून तिथेच उगवतेय तरी असं नाहीये. कॉफीचा शोध मानवाच्या इतिहासात फार उशिरा लागला. म्हणजे अगदी अलीकडे १५०० च्या शतकात आणि तोसुद्धा जगाच्या पूर्वेकडे लागला. (भारतात नाही)
ही कॉफी खरी आहे कुठली? आली कुठून? आणि सातासमुद्रापार युरोप-अमेरिकेत पोहोचली कशी?
आज जगात कुठेही मिळणाऱ्या कॉफीच्या बिया तेव्हा अरबस्तानात एकाच जागी मिळायच्या आणि त्या कोणी चोरी करू नये म्हणून तिथे पहारेकरी ठेवले होते.
कॉफी कुठून आली याची देखील एक दंतकथा आहे.
इथिओपियामध्ये कालदी नावाचा एक बकऱ्या पाळणारा होता. एक दिवस त्याला त्याच्या बकऱ्या नेहमीपेक्षा जास्ती उत्साही दिसू लागल्या. त्या इकडेतिकडे बागडत होत्या. त्याला काही कळेना काय झालं नेमकं ते. दुसऱ्या दिवशी पण असाच प्रकार घडला. मग मात्र कालदीने याचा शोध घ्यायचे ठरवले. बकऱ्या काय खातात, कुठे जातायत याचा माग त्याने काढला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की रानातील छोटीछोटी लाल फळं खाल्ल्याने त्यांच्यात एवढा उत्साह येतोय.
त्याने ती फळं एका फकीराला दाखवली आणि बकऱ्यांचा किस्सा सांगितला. त्याने त्या फकिराला स्वतःसोबत ती फळं खाऊन बघण्याची विनंती केली. पण फकिराने असे करण्यास नकार देऊन रागारागात ती फळं तिथल्या चुलीत टाकून दिली. लगेचच भाजलेल्या त्या कॉफीच्या बियांचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला. त्या दोघांनी त्या भाजलेल्या बियांची पूड करून गरम पाण्यात टाकली.
आणि असा झाला आपली झोप उडवणाऱ्या कॉफीचा जन्म.
आता ही दंतकथा आहे की सत्य याबद्दल बऱ्याच लोकांचे दुमत आहे. आपण त्यात नको पडायला.
पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की कॉफीचा जन्म झाला तो इथिओपियामध्येच.
इथिओपियामधून कॉफी येमेनच्या “mocha” या बंदरावर पोहोचली. तेव्हापासूनच mocha म्हणजेच कॉफी असं समीकरण बनलं.
येमेनमध्ये कॉफीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले. तुर्कस्तान, पर्शिया, इजिप्त सगळीकडे कॉफी पसरू लागली. तिथे याला काहवा म्हणत आणि अनेक सुफी संत आपल्या ध्यानधारणा करण्यासाठी रात्री जगताना याचं सेवन करत.
थोड्याच कालावधीत ऑटोमन साम्राज्यात सगळीकडे हे काहवा खाने (कॉफी हाऊसेस) दिसू लागले. लोकं तिथे चर्चांसाठी जमू लागले.
इतक्यात एक दिवस मक्केच्या न्यायालयाने कॉफीचा होणारा परिणाम बघून कॉफी सेवन करण्यावर बंदी घातली. हाच निर्णय कैरो, इजिप्त आणि इथिओपियामध्येसुद्धा लागू करण्यात आला. याच्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरले. थोड्या कालावधीनंतर ही बंदी उठवण्यात आली.
कॉफीच्या उत्पादनावर, व्यापारावर आपली मक्तेदारी राहावी यासाठी येमेनने बरेच प्रयत्न केले. बाहेर जाणाऱ्या बिया गरम पाण्यात उकळून, वाळवून मगच बाहेर जाऊ लागल्या. जेणेकरून याचं पीक घेणे कोणाला शक्य होणार नाही.
अरबस्तानातून कॉफी आता भारत, इंडोनेशिया, तर पश्चिमेकडे इटली आणि संपूर्ण युरोपात पोहोचली.
एखाद्या देशाला जर कॉफी घ्यायची असेल ते त्यांना येमेनकडूनच विकत घ्यावी लागत असे. अशातच बाबा बुदान म्हणून भारतातील एक सुफी संत १६०० च्या शतकात मक्केला यात्रेसाठी गेला. तिथून येताना त्याने कॉफीच्या काही बिया दक्षिण भारतात आणल्या. तेव्हापासून तिथे मोठ्या प्रमाणात कॉफीचे पीक घ्यायला सुरुवात झाली. आजही दक्षिण भारतात कॉफीचे पीक जास्त प्रमाणात होते.
१६०० च्या शतकातच डच लोकांनी देखील कॉफीची लागवड करायला सुरुवात केली. याआधीही त्यांनी येमेनमधून काही बिया चोरून आणल्या आणि हॉलंडमध्ये त्यांची लागवड केली. पण तिथल्या थंड वातावरणात ते पीक टिकले नाही.
याच काळात सिलोनने (आताचे श्रीलंका) इंडोनेशियामध्ये कॉफीची काही पिकं पाठवली. बऱ्याच प्रयत्नांती तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात कॉफीची लागवड केली जाऊ लागली. एवढी की mocha सारखाच जावा हा सुद्धा एक कॉफीचा प्रकार बनला.
१५७० मध्ये व्हेनिसला आलेली कॉफी लगेच लोकप्रिय झाली. १६१५ साली पोप पाचवा क्लेमेंट कॉफीला सैतानाचे पेय म्हणून घोषित करणार होता, पण त्याने थोडी छानबिन केल्यानंतर कॉफीचे ख्रिस्तीकरण केले आणि कॉफी ख्रिश्चन पेय बनले.
थोड्याच कालावधीत इंग्लंडमध्ये जागोजागी कॉफी हाऊसेस उघडले गेले. पुरुषमंडळी आपला जास्तीतजास्त वेळ तिथेच घालवायचे.
१६८३ साली व्हिएन्ना यु*द्धानंतर तुर्क ऑस्ट्रियामध्ये कॉफी सोडून गेले आणि तिथे पहिलंवहिलं कॉफी शॉप उघडलं. द ब्लू बॉटल नावाचं.
बोस्टन टी पार्टी आणि अमेरिकन राज्यक्रांतीनंतर अमेरिकेत कॉफी पोहोचली. इंग्लंडने चहावर भरमसाठ कर लावला होता त्याचा निषेध बोस्टनच्या किनाऱ्यावर सगळ्या चहाचे जहाज पाण्यात बुडवून अमेरिकन लोकांनी केला. यालाच बोस्टन टी पार्टी म्हणून ओळखले जाते. चहा अचानक देशद्रोही झाला तेव्हा कॉफीने चहाची जागा घेतली.
ती जागा आजतागायत कायम आहे. कॉफी अमेरिकन लोकांचं आवडतं पेय आहे. आज अमेरिका सगळ्यात मोठा कॉफी इम्पोर्टर आहे.
आज जगात तेलानंतर सगळ्यात जास्ती व्यापार कॉफीचा होतो. जवळजवळ 400 अब्ज कप कॉफी एका वर्षात विकली जाते.
सुरुवातीला बकऱ्यांनी खाल्लेली फळं, नंतर प्रवासात सोबत म्हणून घेतलेली कच्ची फळं ते भाजलेल्या बिया पाण्यात उकळून पिण्यापासून ते आज मोठ्यामोठ्या कॉफी शॉपपर्यंत आपल्या लाडक्या कॉफीने बराच मोठा पल्ला गाठला आहे. काही हजार वर्षांपूर्वी जन्माला आलेली ही कॉफी अनादी काळापर्यंत आपल्यासोबत राहणार आहे असं दिसतंय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.