आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जीवनात वावरताना अनेकदा आपण ‘करायला जातो एक आणि होतं भलतंच’ अशी परिस्थिती होऊन जाते. काहीतरी साध्य करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करतो, पण वास्तविक होतं काही वेगळंच. यालाच आजच्या कॉर्पोरेट विश्वात “कोब्रा इफेक्ट” असं म्हटलं जातं, आणि व्यावसायिक भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या समस्येवरील उकलच त्या समस्येची तीव्रता आणखी वाढवते.
पण या तत्वाला भारतीय सापाच्या प्रजातीतील नागावरून ‘कोब्रा इफेक्ट’ नाव का बरं पडलं असेल, याचाच परामर्श घेण्याचा हा लहानसा प्रयत्न..
ब्रिटिश शासनाचं केंद्र बदलून राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली होती. या पूर्वीही मुघल आणि अन्य राजसत्तांचं केंद्र असल्याने दिल्लीत दाट लोकवस्ती होती. असं असूनही दिल्लीच्या आसपासचा बराचसा प्रदेश तेव्हा ग्रामीण भागातच येत होता.
एके दिवशी अचानकच दिल्ली शहरात नागांची संख्या वाढू लागली. सर्पदंशामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अखेरीस हे संकट मोठ्या प्रमाणात वाढल्याने ब्रिटिश सरकारला जातीने या सगळ्या प्रकरणात लक्षं घालावं लागलं. समस्या सोडवण्यासाठी ब्रिटिश सरकारने पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे उपाय प्रभावी असल्याचे दिसून आले.
सरकारने लोकांना मृत कोब्र्याच्या बदल्यात एक चांदीचं नाणं देण्याचं ठरवलं. या प्रकारे कोब्रांच्या संकटावर मात करण्यासाठी ब्रिटिश सरकारने नागरिकांना तथाकथित आर्थिक प्रोत्साहन दिलं. कोब्रांची संख्या कमी होत असल्याचं आणि लोकांचा त्रास कमी होत असल्याचं सुरुवातीला वाटलं, पण उलटंच घडलं होतं.
आधीच इंग्रजांच्या जुलमी करवसुलीच्या कारभारामुळे आणि अ*त्याचारांमुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या भारतीय समाजातील अनेक लोकांनी या संधीचा गैरफायदा घेतला. अनेक लोकांनी कोब्रांची अनैसर्गिक रीतीने पैदास करण्यास सुरुवात केली आणि अनेकदा पुनरुत्पादन केलेल्या नागांची कत्तल करून त्यांनी सरकारात दाखवायला सुरुवात केली. कोब्रा प्रजननकर्त्यांनी बहुतांश कोब्रा मारले आणि आणखी पैशासाठी त्यांची सुटका केली तर ते अधिक कोब्राची पैदास करत राहिले.
अखेर ब्रिटिश सरकारने या प्रजननकर्त्या लोकांबद्दल शोधून काढले. त्याच वेळी लोकांना कोब्रा मारण्याच्या बदल्यात मिळणारे आर्थिक प्रोत्साहन, म्हणजे चांदीचं नाणं देण्याचे बंद केले. यानंतर, कोब्रा प्रजननकर्त्यांनी सापांना रस्त्यावर सोडून दिले, कारण हे पकडलेले विषारी साप आता काही फायद्याचे राहिले नव्हते. दुर्दैवाने, यामुळे कोब्राची समस्या जेव्हा सुरू झाली तेव्हापेक्षा कैक पटीने वाईट झाली, तेव्हाच अशा परिस्थितीला “कोब्रा इफेक्ट’ म्हटले जाते.
आधीच सांगितल्याप्रमाणे व्यवसायात आपण “कोब्रा इफेक्ट”ची संकल्पना अनेकदा पाहतो. व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज समस्या सोडवण्यासाठी किंवा निकाल लावण्यासाठी चांगल्या हेतूने अनेक निर्णय घेतात. तथापि, जर त्या निर्णयांचा दूरदृष्टीने विचार केला नाही तर ते प्रत्यक्षात परिस्थिती आणखी वाईट बनू शकते.
अशा अनेक कंपन्या जगात आहेत ज्यांनी ग्राहकांना किंवा त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाला जास्त फायदा न देणारी, किंबहुना तोटा होणारी उत्पादने किंवा सेवा विकण्यासाठी विक्री प्रतिनिधींना (सेल्स रिप्रेसेंटेटिव्हस) जास्त आर्थिक प्रोत्साहनं (इन्सेन्टिव्हस) दिले आहेत. यामधून, अनेकदा त्यांचे लक्ष्य चुकीच्या वस्तू किंवा सेवांच्या स्वरूपातील सोल्यूशन्सच्या विक्रीकडे वळवले जाते. यामुळे ग्राहकांचा नकारात्मक अनुभव निर्माण होतो आणि तो व्यवसायासाठी हानिकारक ठरू शकतो. जर प्रत्येकाने शॉर्ट-टर्म गोल्सवर लक्ष्य केंद्रित केले तर ते फक्त एक मोठी समस्या निर्माण करतात. याचंच एक उदाहरण आपण पाहू.
कोणत्याही उत्पादनावर आधारित कंपन्यांप्रमाणेच वेल्स फार्गोला ग्राहकांनी त्यांची अधिक उत्पादने वापरावीत अशी इच्छा होती. याच अभियानाद्वारे कर्मचाऱ्यांना अधिक उत्पादने विकण्यासाठी आणि त्यांचा ठराविक कोटा पूर्ण करण्यासाठी अधिक ग्राहकांची खाती उघडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. ग्राहकांची ही खाती त्यांनी उत्पादने खरेदी करावीत यासाठी उघडण्यात येत होती.
इन्सेन्टिव्हसच्या (आर्थिक प्रोत्साहन) आमिषाने अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने कैक खाती उघडली गेली. पण धक्कादायक बाब म्हणजे उघडलेल्या खात्यांपैकी कित्येक खात्यांना ग्राहकांनी अधिकृतपणे परवानगी दिलीच नव्हती. यामुळे ‘अनेक खाती उघडण्याचा’ ‘शॉर्ट-टर्म’ गोल यशस्वी झाला, पण ‘लॉन्ग-टर्म’गोलच्या दृष्टीने कंपनीने स्वतःवर मोठं संकट ओढवून घेतलं होतं. कारण या प्रकारामुळे त्यांनी अनेक ग्राहक गमावले होते.
व्हिएतनाममध्येसुद्धा उंदरांनी उच्छाद मांडल्यानंतर अशाच प्रकारचा कोब्रा इफेक्ट जाणवला होता. जिज्ञासूंनी द पोस्टमनचा त्याबद्दलचा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे
असाच प्रकार ‘एअरबस’ या विमानकंपनी सोबतही घडला होता आणि काही प्रमाणात टाटाच्या ‘नॅनो’ प्रोजेक्टवरही या कोब्रा-इफेक्टचा परिणाम जाणवला होता. कोब्रा इफेक्टची ही संकल्पना आपल्याला दूरदृष्टीने विचार करण्याचा धडा देते, मग क्षेत्र कोणतंही असो!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.