आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
बिडी, सिगारेट आणि सिगार यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या रचनेत बराच फरक आहे. अर्थात यांचा वापर एकाच कारणासाठी केला जातो. सिगार हे आजच्या सिगारेटचे मूळ स्वरूप आहे. सिगार ही आता फार दुर्मिळ झाली आहे तरीही श्रीमंत लोकांकडे प्रामुख्याने आढळून येते. बाकी मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी सिगारेट आणि बिडीचा पर्याय उपलब्ध आहे.
भारतात सिगार पहिल्यांदा आणली ती युरोपियन लोकांनी, त्याआधी भारतात चिलीम आणि हुक्क्याचा वापर होत होता. पण चिलिम, हुक्का आणि सिगार यामध्ये बराच फरक आहे.
सिगारचा सर्वप्रथम उल्लेख मायन संस्कृतीत केलेला आढळतो. मायन संस्कृतीच्या काळात जी सिगार वापरली जात होती, ती आजच्या सारखी नव्हती. एका पानाचे गोलाकार वेटोळे करून त्यात तंबाखू भरली जात आणि त्या पानाला हलकी अग्नि देऊन मायन संस्कृतीचे लोक धुम्रपान करत होते.
सिगार हा शब्द मायन शब्द सिकारचा अपभ्रंश आहे.
तंबाखू त्याकाळी अमेरिकन लोकांमध्ये बरीच प्रसिद्ध होती. खासकरून कॅरेबियन बेटांवर राहणारे लोक तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणात करत. पानाचे रोल करून त्यांच्यात तंबाखू भरून, त्याची सिगार बनवून तिचा वापर धुम्रपान करण्यासाठी करत होते. पुढे तिथे युरोपियन लोकांचे आगमन झाले आणि त्यांनी सिगारला जगभरात पोहचवण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
जेव्हा ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेच्या शोधात कॅरेबियन बेटांवर येऊन पोहोचला त्यावेळी त्याच्याबरोबर आलेल्या लोकांपैकी काहींनी कॅरेबियन बेटांवर राहणाऱ्या मूळ मायन वंशाच्या आदिवासी जमातीकडून सिगार घेतली आणि माडाच्या पानात भरलेल्या तंबाखूच्या धुम्र आस्वादाने ते फारच प्रभावित झाले. जेव्हा १४९२ साली कोलंबस पुन्हा युरोपात परतला, त्यावेळी त्याने सिगार नावाचे गिफ्ट युरोपसाठी नेले होते.
युरोपियन खलाशी वर्गाला एक चांगली सवय होती. ज्यावेळी ते एखाद्या नव्या भूखंडाचा शोध लावायचे त्यावेळी ते त्या भूखंडात असलेल्या सर्व सांस्कृतिक गोष्टींना अंगिकारून त्या लोकांच्या संस्कृतीला समजून घेत. तसेच त्या संस्कृतीशी संबंधित अशा नाविन्यपूर्ण गोष्टी आणि संपत्ती युरोपात घेऊन जात होते. सिगारच्या बाबतीत हेच घडले.
ख्रिस्तोफर कोलंबस ही सिगार घेऊन स्पेनला गेला. पुढे स्पेनमधून ती सिगार फ्रान्स, इंग्लंड आणि ५० वर्षांत सबंध युरोपात पसरली.
सर्वच स्तराच्या लोकांमध्ये सिगार लोकप्रिय होती. स्पेनच्या व्यापाऱ्यांनी सिगारसाठी कॅरेबियन बेटांवर तंबाखूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. इंग्लंडचा राजा जेम्स पहिला आणि स्पेनचा राजा फिलीप दुसरा याने सिगारला सैतानाचे औषध म्हणून घोषित केले, तरीही सिगारची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. उलट सिगार युरोप-मार्गे रशिया, तुर्कस्तान आणि चीनमध्ये पसरली.
अमेरिकेत सिगारच्या वाटे धुम्रपान करणे फारसे प्रचलित नव्हते. १८व्या शतकातील अमेरिकन राज्यक्रांतीनंतर सिगार तिथे पण हळूहळू प्रसिद्ध होऊ लागली. ती इतकी लोकप्रिय झाली की सिगार बनवण्यासाठी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ खर्च होत होते, पुढे यांत्रिकीकरण झाल्यावर परिस्थिती अजूनच पालटली.
यु*द्धाच्या काळात क्युबामध्ये असलेली सिगार इंडस्ट्री अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात हलवण्यात आली. इथे मोठ्या प्रमाणावर क्युबन आणि साऊथ अमेरिकन मजूर रहायला आले होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात सिगारचे उत्पादन केले जात होते. १९२९ साली तर हे प्रमाण ५० कोटी इतके जास्त होते.
जसा सिगारचा आणि धूम्रपानाचा इतिहास जुना आहे, तसा धूम्रपान बंदीचा इतिहास देखील फार जुना आहे.
१५७५ साली जगातील पहिली धूम्रपान बंदी लावण्यात आली होती. मेक्सिकोत रोमन कॅथलिक चर्चने आपल्या चर्चच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे धूम्रपान करण्यास बंदी घातली होती. १६२७ साली रशियाने देखील ७० वर्षांसाठी सिगारवर बंदी घातली होती.
चौथ्या सुलतान मुरादच्या मृत्यूनंतर ऑटोमन साम्राज्याने सिगारवर बंदी घातली. इतकेच नाही तर, कोणी धूम्रपान करताना आढळून आल्यास त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जात असे. १७०० साली अनेक शहरांत अशी बंदी घालण्यात आली होती.
जर्मनीच्या ना*झी राजवटीने देखील सिगारच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण योजना राबवली होती. १९४१ साली हि*टल*रच्या आज्ञेवरून स्थापन करण्यात आलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ टोबॅको हजार्डच्या सांगण्यावरून हि*टल*रने ना*झी पक्षाच्या कार्यालयात, हॉस्पिटल, विद्यापीठे, पोस्ट ऑफिस आणि सैन्यात धुम्रपानावर बंदी घातली होती.
१९६०च्या काळात अमेरिकन राष्ट्रपती असलेले जॉन एफ. केनेडी यांना देखील सिगारेटचे व्यसन होते. १९६२ साली ते क्युबावर आर्थिक निर्बंध लादून, सर्वप्रकारचे व्यापारी संबंध संपवून टाकणार होते. त्यावेळी या करारावर सही करण्याअगोदर त्यांनी त्यांचा सचिव पिअर सॅलिन्जर यांना १००० क्युबन ब्रँडच्या सिगारेट आणून देण्यास सांगितले होते. ज्या ब्रँडचे ते खूप मोठे चाहते होते.
दुसऱ्या विश्वयु*द्धाच्या वेळी धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती, त्यावेळी धूम्रपान विरोधी प्रचार मोठ्या प्रमाणात केला जात होता. १९९० साली हाताने बनवलेली सिगार चांगली की मशीनने बनवलेली सिगार चांगली यात चांगलीच स्पर्धा रंगली होती.
अशाप्रकारे असंख्य रंजक गोष्टींनी सिगारचा इतिहास परिपूर्ण आहे, यावर असंख्य पुस्तके युरोपात लिहण्यात आली आहेत. त्या पुस्तकांद्वारे तुम्ही या रंजक इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.