आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. इतर अनेक राष्ट्रांनी आपापल्यापरिनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही ही दोन्हीही राष्ट्रं माघार घेण्यास तयार नाहीत. या युद्धाचे परिणाम आता युक्रेनमध्ये दिसत आहेत. युक्रेनमधील अनेक हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहेत. या फोटोंमध्ये प्रामुख्यानं लहान मुलांच्या फोटोंचा समावेश आहे.
काही दिवसांपासून युक्रेनमधील एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लहान मुलीच्या आईनं तिच्या शरीरावर मुलीचं नाव, घराचा पत्ता आणि पालकांचा फोन नंबर लिहिलेला आहे. जर युद्धामुळं ही मुलगी कुटुंबापासून दुरावली गेली तर भविष्यात तिला पुन्हा त्यांचा शोध घेणं सोप्प व्हावं, हा विचार करून त्या युक्रेनियन आईनं मुलीच्या शरीरावर तिची ओळख पटेल अशा गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.
याशिवाय, युद्ध सुरू झाल्याच्या काही दिवसांनंतर कपाळावर फोन नंबर लिहिलेल्या अवस्थेत एक लहान मुलगा दहा किलोमीटर अंतर चालत गेल्याचाही बातमी आली होती. यावरून युक्रेनमधील लहान मुलांची सध्याची स्थिती काय आहे? याची आपण कल्पना करू शकतो. युक्रेनमधील लहान मुलांचं भविष्य अधांतरी आहे, यात अजिबात दुमत नाही. पण, युद्धामध्ये लहान मुलांची वाताहत होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी देखील अनेकदा युद्धाचे बळी ठरलेल्या मुलांचे विदारक फोटो समोर आलेले आहेत. सिरिया, अफगाणिस्तान, रोहिंग्या मुस्लिम रिफ्युजी कॅम्पमधील मुलांच्या फोटोंनी अनेकदा जगभरातील लोकांना हिंसा आणि युद्धाबाबत विचार करण्यास भाग पाडलेलं आहे. अगदी दुसऱ्या जागतिक महायुद्धातसुद्धा लहान मुलांची प्रचंड वाताहत झाली. नॉर्वे शेजारच्या फिनलंड देशामध्ये तर लहान मुलांची संपूर्ण एक पिढी युद्धामध्ये भरडली गेली होती. ही घटना नेमकी काय होती, याबाबत या लेखामध्ये आपण माहिती घेऊया…
फिनलंडनं १९३९ ते १९४५पर्यंत एकूण तीन युद्धं अनुभवली. त्यामध्ये विंटर वॉर, कंटिन्युएशन वॉर आणि लॅपलँड वॉरचा समावेश होतो. या युद्धांदरम्यान जवळपास ८० हजार मुलांना त्यांच्या मायदेशापासून दूर जावं लागलं.
फिनलंडनं आपल्या देशातील ८० हजार मुलांना स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वे या शेजारील देशांमध्ये पाठवलं होतं.
३० नोव्हेंबर १९३९ रोजी सोव्हिएत युनियननं फिनलंडवर हल्ला केला. फिनलंड नाझी जर्मनीशी मैत्री करेल, अशी भीती सोव्हिएत युनियनला होती. तर, सोव्हिएत युनियन त्यांच्या देशाचा ताबा घेईल आणि त्याचा लष्करी चौकी म्हणून वापर करेल, अशी भीती फिनलंडच्या मनात होती. या गैरसमजांमुळं दोन्ही देशांमध्ये तणाव वाढून युद्ध सुरू झालं होतं.
त्यानंतर अवघ्या पाचच महिन्यात २२ हजाराहून अधिक फिनिश लोक मरण पावले. देशात असुरक्षिततेचं वातावरण होतं. म्हणून फिनिश सरकारनं स्वीडनला युद्ध संपेपर्यंत त्यांच्या देशात मुलांना ठेवता येईल का? हे विचारण्याचा निर्णय घेतला. जर्मनीनं स्वीडनवर कधीही आक्रमण केलं नाही कारण स्वीडनकडे मुत्सद्देगिरी चांगली होती. त्यामुळं आपल्या देशातील लहान मुलांसाठी स्वीडन सुरक्षित पर्याय असल्याचं फिनलंडच्या लक्षात आलं.
फिनिश आरोग्य मंत्री आणि सामाजिक संरक्षण मंत्र्यांनी यांनी युद्धकाळात एक विशेष आरोग्य संघटना स्थापन केली. त्या संघटनेच्या माध्यमातून युद्ध संपेपर्यंत जगभरातील विविध देशांमध्ये मुलांना फिनिश मुलांना सुरक्षितपणे पाठविण्याचं काम केलं. स्वीडननं फिनलंडच्या विनंतीला मान देऊन शक्य तितकी फिनिश मुलांना आपल्या देशात घेण्याची तयारी केली.
या सर्व मुलांना स्वीडिश कुटुंबांमध्ये ठेवलं जाणार होतं. ही कुटुंबं युद्ध संपेपर्यंत त्या मुलांचं पालनपोषण करण्यास तयार होती. मात्र, स्वीडिश सरकार देशातील सर्व कुटुंबांना या कामात सहभागी होण्यास भाग पाडू शकलं नाही. म्हणून स्वीडनमध्ये फक्त १० हजार फिनिश मुलांना आश्रय मिळू शकला.
१९४१पर्यंत, फिनलंडनं स्वखर्चानं आपल्या देशातील मुलं स्वीडन आणि इतर शेजारी देशांमध्ये सोडली. मात्र, त्यानंतर फिनलंड वाहतूक खर्च भरण्यासदेखील सक्षम नव्हता. फिनलंड युद्धभूमी बनल्यामुळं तेथील मुलभूत सुविधांचादेखील तुटवडा जाणवू लागला होता. रेडक्रॉस असोसिएशनने अन्न आणि वस्त्र दोन्हीबाबतीत शक्य तितकी मदत केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गळ्यात नावाचे टॅग घातलेली हजारो फिनिश मुलांनी ट्रेनने आणि बोटीनं प्रवास केला होता. बहुतेक मुलांना पर्यायी पालक उपलब्ध करून देण्यात आले होते तर काहींना अनाथाश्रमात ठेवण्यात आलं होतं. बहुसंख्य मुलं ही कारेलिया या सोव्हिएत युनियननं जिंकलेल्या क्षेत्रातील आणि फिनलंडच्या राजधानीतील होती.
६० टक्के मुलं कामगार वर्गातील कुटुंबातून आलेली असल्यानं या स्थलांतराची एक वेगळी सोशल प्रोफाइलही होती. बहुतेक मुलं दहा वर्षांखालील होती आणि सर्वात मोठा वयोगट पाच ते आठ वर्षांच्या दरम्यान होता. अगदी दहा महिन्यांच्या आतील मुलांनाही स्वीडनला पाठवण्यात आलं होतं. युद्धानंतर, १५ हजार फिनिश मुलं स्वीडनमध्ये राहिली.
स्वीडिश घरांमध्ये सुमारे चार हजार मुलं इतरांच्या पालकत्त्वाखाली होती तर ४०० हून अधिक मुलांना स्वीडिश पालकांनी कायमचं दत्तक घेतलं होतं. स्वीडनमध्ये राहिलेली बहुतेक मुलं युद्धामुळं एकतर अनाथ झाली होती किंवा बेघर झाली होती. स्वीडनप्रमाणं फिनलंडच्या इतर शेजारी देशांमध्येदेखील मुलं पाठवण्यात आली होती. अशा एकूण ८० हजार मुलांची युद्धाच्या काळात फरपट झाली होती.
युद्धानंतर काही मुलांना फिनलँडला परत पाठवण्यात आलं होतं. मात्र, ती परत आपल्याला ठेवलेल्या देशांमध्ये आली. कारण, ते त्यांच्या मूळ देशात ॲडजेस्ट करू शकले नाहीत. काही मुलं तर फिनिश भाषा पूर्णपणे विसरले होते. एका सर्वेक्षणानुसार, वातावरण आणि भाषेतील वारंवार बदलांमुळे यातील काही मुलांना मोठ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं.
मुलांना इतर देशात पाठवण्याचा निर्णय योग्य होता की नाही? हा प्रश्न फिनलंडमध्ये बराच काळ संवेदनशील प्रश्न होता. कठीण युद्ध परिस्थितीत मुलांना दूर पाठवणं हाच उत्तम उपाय होता, हे अनेकांनी स्पष्टपणं मान्य केलं. कारण, युद्धादरम्यान आधुनिक बाल मानसशास्त्राचा विचारही कुणी केला नव्हता. तेव्हा एक राष्ट्र म्हणून फिनलंडचं अस्तित्व टिकवणं हे प्राथमिक ध्येय होतं.
युद्धाचा देशातील प्रौढ मनुष्यबळ आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणांमाबाबत सतत बोललं जातं. मात्र, त्याच देशांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांबद्दल आतापर्यंत फारसा विचार केला जात नव्हता. याचीच परिणीती म्हणून हजारो फिनिश मुलांना आपल्या देशापासून दूर रहावं लागलं होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.