आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं आफ्रिकन देशातल्या एका बाईची माहिती प्रसारित केली होती. तिच्या तेरा वर्षाच्या मुलाचा खाणीत काम करताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. घरच्या गरिबीमुळे, घरात खायला काहीच नसल्याने ‘मी बाजारात जाऊन चूल पेटवण्यासाठी कोळसा घेऊन येतो’, असं सांगून तो बाहेर गेला पण बाजारात न जाता खाणीवर कामासाठी गेला जेणेकरून काही वेळ काम करून त्यातून थोडेफार पैसे घरासाठी मिळवता येतील. पण तो कामासाठी गेला तो पुन्हा आलाच नाही, तिथेच काम करताना त्याचा मृत्यू झाला. अशा अनेक घटनांपैकी ही एक घटना, ज्याला कारण आहे आपलं आजचं बदलतं जग. ते कसं ?
गेल्या शतकापासून आपल्या रोजच्या वापरतात पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर सुरू झाला. कच्च्या तेलापासून पुढे प्रक्रिया होऊन आपल्या हातात जे पेट्रोल, डिझेल येतं त्यांचा वापर आपणही सहज करू लागलो. यातूनच वाढत्या किंमती, तेलाची वाढती आयात, यातून गाड्यांमुळे वाढणारं प्रदूषण आणि बाकी अनेक गोष्टींचा परिणाम होत गेला. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येला हे गाड्यांमुळे वाढतं प्रदूषणही एक कारण बनू लागलं आहे. आणि या वापराला कुठे तरी आळा घालणं गरजेचं आहे हे लक्षात आलं.
प्रदूषणाला किंवा तापमान वाढीला उपायही आपण शोधून काढले. कोळशाला पर्याय म्हणून हायड्रोपावर, जीवाष्म इंधनाला पर्याय म्हणून सौरऊर्जा आणि पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांना इलेक्ट्रिक व्हेईकल हे काही सुलभ पर्याय निर्माण केले गेले.
पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना पर्याय म्हणून शोध लागला तो इलेक्ट्रिक गाड्यांचा. या विजेवर चालणाऱ्या गाड्या गेल्या १०-१५ वर्षात मोठ्या प्रमाणात विकसित होत गेल्या आणि आता हळूहळू या गाड्यांची मागणीही वाढत आहे.
एकदा या गाडीतली बॅटरी चार्ज केली की पुढचे बरेच तास आपण या गाडीचा कोणतही प्रदूषण न करता वापर करू शकतो. ना गाडीचा आवाज, ना जास्तीचं पेट्रोल, ना प्रदूषण, या सगळ्यांपासूनच सुटका मिळते आणि बाकी काहीच मोठे तोटे नसल्यामुळे गाडी टिकाऊ बनली.
पर्यावरणाचा खूप विचार करूनही जेव्हा आपण इलेक्ट्रिक गाड्या वापरायला सुरवात करतो तेव्हा ती चालते कशी आणि कोणत्या गोष्टींच्या मदतीने आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे एकदा बघायलाच हवं. त्यासाठीच हा लेख.
इलेक्ट्रिक गाड्या धावतात त्यामध्ये एक बॅटरी असते, ज्यामध्ये साठवल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या मदतीने गाडीला गती मिळते. ही बॅटरी बनवली जाते काही ठराविक प्रकारच्या खनिजं, रसायनं आणि मूलद्रव्यांपासून. लिथियम आणि कोबाल्ट या दोन नैसर्गिक मूलद्रव्यांपासून बॅटरीची निर्मिती होते.
या बॅटरीच्या निर्मितीचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम फार मोठा होतो असं कदाचित आपल्याला वाटत असेल पण चित्र काही वेगळंच आहे. या लिथियम, कोबाल्ट बॅटरीवर धावणाऱ्या गाड्या आजच्या घडीला जगाच्या एका कोपऱ्यात मोठ्या समाजवर्गामध्ये गरिबीचं प्रमाण वाढवत आहेतच त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात बालमजुरी देखील वाढवत आहेत. हे होताना मूलभूत मानवी हक्कांचंही उल्लंघन होतंय.
इलेक्ट्रिक गाड्यांचा आणि बालमजुरी, मानवी हक्कभंग वगैरेचा काय संबंध हा प्रश्न इथे पडू शकतो. या बॅटरीज् ज्यापासून बनतात तो धातू किंवा तो महत्त्वाचा घटक आहे कोबाल्ट.
कोबाल्ट हा विपुल प्रमाणात पृथ्वीच्या आत सापडतो. याचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. अगदी साबणाची निर्मिती, कृत्रिम रंगांची निर्मिती यापासून ते मोठमोठ्या कारखान्यांमध्ये लागणाऱ्या चुंबकांमध्ये, स्मार्टफोन्सच्या बॅटरीमध्ये आणि असेच याचे बरेच उपयोग आहेत.
पण यातही सर्वांत जास्त म्हणजे ५६% वापर हा लिथीयम-आयन बॅटरीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणून केला जातो आणि तोही थोडा थोडका नव्हे तर एक बॅटरी बनवण्यासाठी कमीत कमी ४ किलोपासून ते २५-३० किलोपर्यंत कोबाल्ट वापरलं जातं. याच लिथियम-आयन बॅटरी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये असतात.
काँगो हा आफ्रिका खंडातला दुसरा सर्वांत मोठा देश. हा देश जेवढा मोठा आहे तेवढाच गरीबही आहे. गरिबी पाठोपाठ येणारा मोठा धोका म्हणजे भ्रष्टाचार, तोही इथे मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास ९ कोटींच्या लोकसंख्येचा हा प्रदेश आजच्या काळात विज्ञान तंत्रज्ञान एवढं पुढे जाऊनही गरिबी, भ्रष्टाचार या समस्यांशी झुंजत आहे.
एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज या जगाला चालवणाऱ्या बॅटरीमध्ये वापरला जाणारा कोबाल्ट हा घटक सर्वांत जास्त प्रमाणात हाच देश पुरवतो. ९ कोटी पैकी २० लाख लोक हे फक्त कोबाल्टच्या कामावर अवलंबून आहेत तरीही हीच परिस्थिती.
एखादा देश किंवा भूप्रदेश जेव्हा एखादी गोष्ट जगाला पुरवतो तेव्हा अर्थातच त्याच्या निर्यातीतून त्या देशाला मिळणारा नफा हा प्रचंड मोठा असतो. जेवढी मागणी जास्त वाढते तेवढं त्यांना मिळत जाणारं परकीय चलनही वाढतं आणि देशाच्या संपत्तीत वाढ होत जाते.
या गणिताकडे बघितलं तर संपूर्ण जगाला बॅटरी बनवण्यासाठी लागणाऱ्या कोबाल्टचा सगळ्यात जास्त पुरवठा जर हा एकच देश करत असेल तर या देशाची श्रीमंती ही डोळ्यात भरेल एवढी असणं अपेक्षित होतं पण ते तसं होत नाही आणि त्याला कारण आहे काँगो या देशाकडून जे देश कोबाल्ट आयात करतात त्या देशांचं आणि त्यातही बलाढ्य ‘चीन’चं राजकारण. कारण या बॅटरी तयार करणारा महत्त्वाचा देश आहे चीन.
कमीत कमी १०-१५ फुटापासून ते काही ‘शे’ फूट खोल खणल्यानंतर कोबाल्टचा साठा हाती लागतो आणि या कोबाल्ट खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर सगळं कोबाल्ट बाहेर काढलं जातं. आणि या शेकडो फूट खोल खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये जास्त प्रमाणात असतात ते बालमजूर!
लहान मुलांच्या हातून या खाणींमध्ये काम करवून घेतलं जातं. कोणतीही सुरक्षा नाही, सोयी नाहीत, काम करण्यासाठी वापरण्याचे मास्क नाहीत, कामगारांना वापरण्यासाठी दिले जाणारे कपडेही नाहीत. अशा परिस्थितीत हे आफ्रिकी गरीब कामगार केवळ घर चालवण्याच्या हेतूनं जीवावर उदार होऊन काम करतात.
यातून वाढत जाते गरिबी आणि व्यसनाधीनता, ज्यामुळे घरातल्या बालकांपासून ते अगदी एखाद्या वयातही न आलेल्या मुला-मुलींना कामावर जुंपलं जातं. हाती अवजारं घेऊन ही मुलं थोड्याथोडक्या पैशासाठी काम करतात. खोल खाणीत जाऊन, मातीमधून कोबाल्ट शोधून, त्याचे दगड फोडून, त्यातून आवश्यक ते कोबाल्ट काढून, ते जमा करणं हे तिथले स्थानिक मजूर करतात.
थोडाफार मिळणारा ऑक्सिजन, सुरक्षेच्या नावाने शून्य असलेल्या खाणीत केलं जाणारं काम. एवढं सारं काम केल्यावर एका पोत्यात प्रत्येक कामगाराने मिळालेलं कच्चं कोबाल्ट भरून ते बाजारात नेऊन विकायचं, त्यासाठी एखादा व्यापारी मिळतोय का ते शोधायचं आणि एवढी सगळी मेहनत केल्यानंतर या मुलांच्या हातात पडतो फक्त एक डॉलर !
कोबाल्ट उद्योग हा जागतिक बाजारात हजारो कोटींची उलाढाल करणारा उद्योग आहे. एका बॅटरीसाठी २०-२२ किलो कोबाल्ट तर आजपर्यंत बनवल्या गेलेल्या हजारो- लाखो बॅटऱ्या बनवण्यासाठी किती कोबाल्टचा वापर झाला असेल?!, किती प्रमाणात कोबाल्ट जमिनीतून काढला असेल?!, आणि त्यासाठी कामगारांनी किती काम केलं असेल?!, याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो.
एवढ्या कामातून या गरिबांच्या हाती येणारा जेमतेम एक डॉलर आणि श्रीमंत देशांच्या पारड्यात पडणारे लाखो डॉलर्स यांची तुलनाही होऊ शकत नाही. त्यांच्या हाती या लाखो डॉलर्सपैकी एखादा डॉलर पडतो तेव्हा या देशातली गरिबी का संपत नाही हे लक्षात येतं.
अगदी जेमतेम एखाद-दुसऱ्या डॉलरसाठी हे बालकामगार जीवावर बेतेल असंही काम करतात आणि याचंच उदाहरण म्हणजे सुरुवातीला सांगितलेला प्रसंग. घरी जेवण शिजवण्यासाठीही हातात पैसे नसणं, एकवेळचं जेवणही न मिळणं. यातूनच या देशाचं दारिद्र्य वाढत आहे.
या कामांमध्ये अनेक छोटे मोठे अपघातही होत असतात. अगदी नगण्य उत्पन्नासाठी कित्येक कामगारांना आपला जीव गमवावा लागतो, काही जण अपंग होतात, काम न करता आल्यास कधीकधी कामही हातून जातं. वाढत जाणारी रोगराई आणि वेळेवर न मिळणाऱ्या आरोग्य सुविधा हा तर मूलभूत प्रश्न आहे.
याचंच अजून एक उदाहरण म्हणजे जॉनचं. जॉन वयाच्या नवव्या वर्षांपासून कोबाल्ट खाणीत काम करत होता आणि त्याला दिवसभर खाणीत काम करण्याचे मिळत होते ०.७५ डॉलर ! एका खोल खड्ड्यात पडून त्याचा अपघात झाला, त्याला बाहेर काढलं आणि लगेच बाकी कामगार कामाला लागले. जॉनचे आई-वडील तिथे येईपर्यंत उशीर झाला होता, त्याला झालेल्या जखमा आणि मोडलेली हाडं यांच्यावर वेळेत उपचार न होऊ शकल्यामुळे तो अपंग झाला. एका कुटुंबाचा कर्ता हातच बंद झाला.
एका धातूसाठी किंवा बॅटरी बनवण्यासाठी लागणाऱ्या घटकासाठी एवढा मोठा संघर्ष एका देशातल्या लाखो लोकांना रोज करावा लागतो, तोही दिवसाला जेमतेम एक डॉलर, म्हणजे आपले ८० रुपये मिळवण्यासाठी. आपल्या रोजच्या सामान्य वापरात येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये असणाऱ्या बॅटऱ्या या अशा लोकांच्या व्यर्थ कष्टांच्या घामापासूनच बनलेल्या आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये कारण आपली सोय होते आहे आणि त्यांची गैरसोय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.