आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गेल्या अनेक वर्षांपासून आपण ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रम पाहत आलो आहोत. यामुळेच अनेकांची स्वप्नं साकार झाल्याचंही आपल्याला दिसतं, लाखो लोक आपलं नशीब आणि ज्ञान आजमावण्यासाठी या मंचावर येतात. पण हा कार्यक्रम भारतात सुरु होण्याआधी ब्रिटनमध्ये १९९८ साली सुरु झाला होता, तर भारतात २००० साली पहिल्यांदा हा कार्यक्रम स्टार प्लस वाहिनीने प्रदर्शित केला. २००७ नंतर या मालिकेची कमान सोनी वाहिनीने सांभाळली आहे.
दोन दशकांपूर्वी, ‘व्हू वान्ट्स टू बी अ मिलियनीयर?’ हा ब्रिटनच्या टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा कार्यक्रम होता. ब्रिटनची सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या हा कार्यक्रम पाहत असत. पण त्याचा सर्वांत कुप्रसिद्ध भाग प्रत्यक्षात कधीही प्रसारित झाला नाही.
ब्रिटनच्या ‘व्हू वान्ट्स टू बी अ मिलियनीयर?’ या सप्टेंबर २००१ मधील एका भागात धक्कादायक घटना घडली. ब्रिटिश सैन्यातील एका मेजर दर्जाच्या सैन्याधिकाऱ्याने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन १ मिलियन डॉलर्स मिळवले होते, पण त्याचा हा विजय अवैध ठरवण्यात आला. मेजर चार्ल्स इंग्रामने फसवणुकीच्या माध्यमातून हा विजय मिळवल्याचा आरोप होतो.
खेळाच्या नियमांनुसार १०० युरोजच्या प्रश्नापासून खेळाला सुरुवात होऊन, रकमेबरोबरच प्रश्नांची काठिण्य पातळीसुद्धा (डिफिकल्टी लेव्हल) वाढत गेली, एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यास स्पर्धक लाइफ-लाइनचा वापर करू शकतो. काठिण्य पातळी अतिशय सोपी असतानाही, पहिल्या पाच प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यानंतर २००० युरोजसाठीच्या प्रश्नाला चार्ल्स इंग्रामने पहिली लाईफ-लाइन वापरली, ‘आस्क द ऑडियन्स’. त्यानंतर आलेल्या पुढच्याच ४००० युरोजसाठीच्या प्रश्नात त्याने दुसरी लाईफ-लाइन वापरली, ‘फोन अ फ्रेंड’. या प्रश्नानंतर खेळाची वेळ संपली.
दुसऱ्या दिवशी जेव्हा इंग्राम परतेल तेव्हा तो जास्त पुढे जाणार नाही असा निर्मात्यांचा अंदाज होता. तरी, त्या रात्री इंग्राम आणि त्याची पत्नी डायनाने ‘टेसवेन व्हिटोक’ नावाच्या माणसाबरोबर एक योजना आखली. दुसऱ्या दिवशीच्या चित्रीकरणाच्या ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीत टेसवेन व्हिटोक येणार होता. याच संधीचं सोनं करण्याचं इंग्रामने ठरवलं. इंग्रामने प्रश्नाचे प्रत्येक संभाव्य उत्तर वाचण्याची आणि व्हिटॉकने योग्य उत्तर ऐकल्यावर खोकण्याची योजना ठरली होती.
पुढच्या दिवशी सुरु झालेल्या कार्यक्रमात ८ हजार युरोजच्या प्रश्नावर इंग्रामने सी. पर्यायाचा उच्चार केल्यानंतर व्हिटोक खोकला आणि इंग्रामने हेच उत्तर निश्चित केले आणि इथूनच या घोटाळ्याची सुरुवात झाली. १६ हजार युरोजच्या प्रश्नाचे उत्तर इंग्रामला येत होते.
३२ हजार युरोजच्या प्रश्नावर मात्र दोघे अडखळले. व्हिटोक आणि इंग्राम, दोघांपैकी कोणालाही त्या उत्तराबद्दल माहिती नसल्याने इंग्रामने ५०-५० लाईफ लाइनचा वापर केला. त्यामुळे दोनच पर्याय उरले, या पर्यायांपैकी इंग्राम चुकीचे उत्तर देणार इतक्यात त्याच्या पत्नीला, डायनाला खोकला आला. हा धोक्याचा इशारा समजून त्याने आपले उत्तर बदलले आणि दुसरा पर्याय निवडून पुढील प्रश्नाकडे वळला. पुढील तीन प्रश्नांची उत्तरं व्हिटोकच्या मदतीने अचूक आली.
२ लाख ५० हजार युरोजच्या प्रश्नाचे उत्तर व्हिटोक किंवा इंग्राम यादोघांपैकी कोणालाही माहित नव्हते. पण अतिहुशार व्हिटोकने आपल्याबरोबर आलेल्या फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या एका स्पर्धकाला, टॉम ल्युसीला या प्रश्नाचे उत्तर विचारले, त्या स्पर्धकाने बरोबर उत्तर दिले, आणि तो पर्याय इंग्रामने वाचल्यानंतर व्हिटोकला खोकला आला. ल्युसीला इथूनच संशय येऊ लागला. इंग्राम संपूर्ण खेळ जिंकल्यानंतर ल्युसीनेही आपल्याला याठिकाणी काहीतरी गैरप्रकार होत असल्याचा संशय आला असं सांगितलं आहे.
५ लाख युरोजसाठीच्या प्रश्नाला इंग्रामने दोनच पर्याय तोंडी वाचले, याचपैकी कोणते तरी एक उत्तर असेल याची बहुधा त्याला खात्री असावी. उत्तरांच्या पर्यायांपैकी तो ‘बर्लिन’ या पर्यायावर जोर देत होता, पण ते उत्तर नाही हे सांगण्यासाठी व्हिटोकने दोन वेळा सुस्कारे सोडले आणि यापैकी एकही उत्तर नसल्याचा इशारा त्याने दिला. इंग्रामने पॅरिस पर्यायाचा उच्चार केल्यानंतर लगेचच व्हिटोकने आपल्या खोकल्याच्या माध्यमातून या उत्तराला संमती दर्शवली. या प्रश्नादरम्यान व्हिटोकने तब्बल दोन वेळा सुस्कारे सोडले आणि तो चार वेळा खोकला. यावरून साहजिकच संशय येणार होता.
इंग्रामच्या समोर खेळातील शेवटचा आणि १० लाख युरोजचा प्रश्न उपस्थित केला जाणार होता. हा प्रश्न होता, एकावर शंभर शून्य दिल्यास तयार होणाऱ्या संख्येस काय म्हटलं जातं? या प्रश्नाचंही उत्तर दोघांपैकी कोणाला माहित नव्हतं. व्हिटोकने पुन्हा आपल्या सहस्पर्धकाची मदत घेतली आणि गोगोल या पर्यायावर तो खोकला. इंग्राम मिलियनीयर बनला होता.
आपला डाव फसला आहे आणि सत्य सर्वांसमोर आलंय याची कल्पनाही त्या क्षणी ‘मेजर’ इंग्राम चार्ल्सला आली नव्हती. त्याचा हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर सौथवर्क क्राऊन कोर्टमध्ये खटला चालवण्यात आला आणि त्याने जिंकलेली रक्कम त्याच्याकडून काढून घेण्यात आली. हे सगळं यावरच थांबलं नाही तर इंग्राम चार्ल्सला सैन्यातील ‘मेजर’ पद सोडावं लागलं आणि त्याला सैन्यातून कोर्ट मार्शलद्वारे बेदखल करण्यात आलं.
एकवेळ जिंकलेली रक्कम गेल्याचं नुकसान लहान असावं पण कोर्ट मार्शलद्वारे सैन्यातून बेदखल होणे म्हणजे आयुष्यभरासाठीची खंत आणि अपमान होता. माणसाला लालसेची बाधा झाल्यावर तो स्वतःलाही विसरून जातो आणि क्षणिक सुखांसाठी पूर्ण जीवनाची दुर्दशा करून घेतो, याचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण!
इंग्रामच्या मते तो निर्दोष होता. त्याच्या या मताशी सहमती दर्शवतो तो एक जॉन रॉन्सन नावाचा पत्रकार आणि साहजिकच व्हिटोकही. व्हिटोकच्या मते त्याला आयुष्यभर अशा सततच्या खोकल्याचा त्रास होता, पण तो स्वतः हॉट सीटवर बसल्यानंतर एकदाही खोकला नाही आणि त्याने विशेष असं काही कर्तृत्वही केलं नाही. इंग्राम चार्ल्सचा हा भाग ‘व्हू वॉण्टस टू बी या मिलियनीयर’ने प्रदर्शित केलाच नाही. या कार्यक्रमाच्या इतिहासातील कदाचित हाच एक प्रदर्शित न झालेला कार्यक्रम असावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.