आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दारू, सिगारेट, चरस, गांजा अशा कुठल्याही मादक पदार्थांचे व्यसन हे घातक आणि दुर्दशा करणारेच असते. म्हणूनच अशा मादक पदार्थांच्या सेवनावर बंदी घातली जाते. दारू, सिगारेट हे आजही सर्रास विकले जातात. त्याच्या विक्रीवर फारशी बंदी नाही. पण, चरस गांजासारख्या तीव्र मादक पदार्थांवर मात्र सरकारने बंदी आणली आहे. लॉकडाऊनमध्येही महसूल वाढवण्यासाठी म्हणून दारू विक्री सुरु करण्यात आली आणि दुसरीकडे सिनेतारकांच्या पार्ट्यात गांजा वापरला जातो म्हणून बॉलीवूडवर संस्कृती भ्रष्ट करण्याचे खापर फोडण्यात आले. अगदी नजीकच्या काळातील ही परस्परविरोधी दोन टोके आपण नुकतीच अनुभवली.
भारतातील सांस्कृतिक विविधतेतील एक आश्चर्यकारक बाब म्हणजे जिथे मादक पदार्थ निषिद्ध समजले गेले तिथे काही ऋषीमुनी मात्र या मादक आणि नशिल्या पदार्थांना देवाचा प्रसाद मानून सेवन करत असत. अनेक धार्मिक विधीत आणि परंपरामध्ये यांना अनन्य साधारण महत्व दिले जात असे. आजही अनेक साधू हुक्का पितात, ज्यात गांजासारखा बंदी आणलेला मादक पदार्थ असतो.
भारत सरकारने अफू, गांजा, भांग, हशीश, चरस यांसारख्या पदार्थांच्या उत्पादनावर आणि खरेदी-विक्रीवर कायदेशीर बंदी आणली असली, तरी याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही.
जागतिक पातळीवर अंमली पदार्थावर बंदी घालण्यात येत होती. त्याच्याशीच जुळवून घेण्यासाठी म्हणून १९८५ साली भारतानेही अंमली पदार्थ आणि नाशिले पदार्थांवर बंदी घालणारा कायदा आणला. तोपर्यंत भारतात अंमली पदार्थांचा व्यापार आणि शेती करणे कायद्याने वैध होते. परंतु अंमली पदार्थांवर बंदी घातल्याने त्याचे उत्पादन आणि सेवन तर थांबले नाहीच, उलट उघड खरेदी विक्री न करता हा व्यवसाय चोरून केला जाऊ लागला. म्हणूनच या कायद्यामुळे अशा पदार्थांच्या किमतीत आणि वापरातही बेसुमार वाढ झाली.
चरस हा जगातील सर्वात महागडा अंमली पदार्थ असल्याचे मानले जाते. एका ग्रॅम चरसची किंमत वीस डॉलरपेक्षाही जास्त आहे. परंतु चरस उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र यातून फारसा फायदा होत नाही. हिमालयाच्या डोंगररांगात असे अनेक शेतकरी आहेत जे अफिम, चरस यांची शेती करतात. हे शेतकरी सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणेच साधे जीवन जगतात. प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्याकडे शेती सोडून उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. ते ज्या ठिकाणी राहतात तिथे अजूनही पुरेशा सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत.
भारतात अंमली पदार्थांना कायदेशीर संमती देण्याची चर्चा सुरु आहे पण अजून तरी यावर कोणतीची कृती होताना दिसत नाही.
हिमालयावर राहणाऱ्या या लोकांची घरे आणि शेती देखील अतिशय दुर्गम ठिकाणी आहे. यांची वस्तीच सपाटीपासून दहा हजार फुट उंचावर आढळते. या पदार्थांची शेती करणेही या शेतकऱ्यांसाठी धोक्याचे बनले आहे. पोलिस गस्त घालतात म्हणून हे लोकं उंच ठिकाणे शेतीसाठी निवडतात. कधी कधी शेतातच लाकडी घरे बांधून तिथेच वस्ती करतात. जास्तीत जास्त जमीन शेतीखाली आणता यावीत म्हणून हे लोकं इथल्या डोंगरावरची जमीन जाळत आहेत आणि ती जमीन शेती योग्य बनवून तिथे शेती करत आहेत. परंतु यामुळे या डोंगरावरील वन्यजीवन धोक्यात आले आहे. जंगले नाहीशी होत आहेत. ही देखील एक चिंतेची बाजू आहे.
या वस्त्यापर्यंत अजूनही आधुनिक जीवनशैली पोहोचलेली नाही. इथल्या चालीरीती आणि परंपरा आजही जुन्या काळाप्रमाणेच आहेत. देवाची मर्जी असेल तर पिक चांगले येईल अशी या शेतकऱ्यांची मानसिकता आहे.
इथल्या दऱ्याखोऱ्यातील लोकांचा शंकर किंवा शिव या देवतेवर खूपच विश्वास आहे. इथल्या गावांच्या मध्यभागी शिव मंदिरे आढळतात. शिवाय, इथले बहुसंख्य लोक हे हिंदूच आहेत. त्यांच्यात इतरही काही छोट्या छोट्या देवता आहेत. पण, शिवाला त्याच्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. त्यांच्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ते बकऱ्यांचा बळी देतात. शेती व्यतिरिक्त हे लोक मेंढपाळाचाही व्यवसाय करतात. या दऱ्याखोऱ्यामधून मेंढ्यांच्या लोकरीपासून धागे बनवणे आणि त्यापासून उबदार कपडे बनवणे हा देखील इथला एक मुख्य व्यवसाय आहे.
चरसाची राळ गोळा करण्यासाठी या झाडांची मळणी करावी लागते. ही मळणी करण्यासाठी या शेतकऱ्यांकडे कुठलीही आधुनिक अवजारे नाहीत. ते आजही हातानेच याची मळणी करतात. कधी कधी हिंदू साधू आणि हिप्पी लोक या शेतकऱ्यांना यासाठी मदत करतात, त्यांना आणखी सोप्या पद्धतीने कसे करता येईल याची माहिती देतात.
इथल्या गावात फक्त प्राथमिक शिक्षणच मिळते. इथे कुठलीही मोठी बाजारपेठ नाही की डॉक्टर आणि दवाखाने नाहीत. फक्त आवश्यक ते समान पुरवणारी छोटी छोटी किराणा दुकाने तेवढी आहेत. शाळा सुटली की ही मुले या शेतातच दिवसभर फिरत असतात. चरसच्या ज्या उरलेल्या काठ्या असतात त्यापासून ही मुले बाण, धनुष्य, भाले असे काहीतरी खेळाचे सामान बनवतात आणि त्यानेच खेळत बसतात.
झाडापासून राळ काढून त्याची चरस बनवण्याची प्रक्रिया खूपच दमछाक करणारी आहे. शेतकऱ्यांची कुटंबे यात जीव तोडून मेहनत करत असतात. या लोकांच्या वस्त्या खूपच छोट्या असतात. एकेका गावाची लोकसंख्या फक्त २०० किंवा ८०० इतकी असते. कधी कधी जत्रा किंवा उत्सवच्या निमित्ताने हे सगळे एकत्र जमतात. याच जत्रेत किंवा यात्रेत लग्ने वगैरे ठरवली जातात.
फक्त शेती आणि त्यावरून मिळणाऱ्या तुटपुंज्या उदरनिर्वाहावर जगतात. कुठल्याही सोयी सुविधा नसताना अशा ठिकाणी जगण्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. परंतु, त्यांच्या कष्टाचे चीज होताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर चरस महाग असला तरी, या शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम मात्र तुटपुंजीच असते.
तसेही आंतरराष्ट्रीय पातळीवर आता अंमली पदार्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारतातही जर यांच्या शेतीवरील कायदेशीर बंधने उठवली गेली तर निश्चितच त्यांना फायदा होईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.