आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ब्रॅड पीट केवळ हॉलिवूडवरच राज्य करतो असं नाही तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक आघाडीचा स्टार बनला आहे. अभिनय कौशल्य आणि सामाजिक उपक्रमांतील सहभागामुळं जवळजवळ प्रत्येक देशात व घराघरात त्याला ओळखलं जातं. मात्र, जगात असाही एक देश आहे ज्याने जागतिक दर्जाच्या या अभिनेत्यावर बंदी घातली होती अन् तीही तब्बल २० वर्षांची! असा कोणता देश आहे ज्यानं ब्रॅडवर बंदी घातली आणि बंदीमागचं कारण काय आहे? असे दोन प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख..
‘ब्रॅड पीट’सारख्या कलाकारावर बंदी घालणारा देश आहे चीन! आपल्या देशातील नागरिकांनी काय पहावे आणि काय पाहू नये, याबाबतचे सर्व निर्णय तेथील सरकार घेते. पाश्चिमात्य जगातील अनेक गोष्टींना चीनमध्ये बंदी घातलेली आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर फेसबुक आणि व्हॉट्सॲपचं घेता येईल. याशिवाय चीनच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये कोणते अमेरिकन चित्रपट दाखवले जातात याबाबत देखील चीनचे सरकार अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेते. अलीकडच्या काळात अमेरिकन चित्रपटांसाठी चीनमध्ये बऱ्यापैकी दारे खुली झालेली दिसतात. मात्र, अजूनही त्याठिकाणी काही हॉलीवूड स्टार्सवर बंदी घातलेली आहे. एकेकाळी ब्रॅट पीटचा देखील या कलाकारांमध्ये समावेश होता.
१९९७ साली ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाबद्दल आज फारसं बोललं जात नाही. परंतु पीट आणि चीनमधील संबंधावर या चित्रपटाचा दूरगामी परिणाम झाला. या चित्रपटात ब्रॅड पीटनं हेन्रिक हॅरर नावाच्या एका ऑस्ट्रियन गिर्यारोहकाची भूमिका केली होती. जेव्हा चीन तिबेट ताब्यात घेत होता त्या काळात या गिर्यारोहकाची आणि दलाई लामाची मैत्री झाल्याचं त्यात दाखवण्यात आलं होतं.
तिबेटचे आध्यात्मिक नेते समजल्या जाणाऱ्या दलाई लामांचं सकारात्मक चित्रण करणारा हा चित्रपट चीनला रुचला नाही. चीन तिबेटला आपल्या सार्वभौम प्रदेशाचा भाग मानतो. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी दलाई लामांनी लढा दिल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं. यामुळं चीन सरकारनं सरळ-सरळ ब्रॅट पिटवर बंदी घातली. त्याचे कुठलेही चित्रपट चीनमध्ये दाखवले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.
२०१६ पर्यंत ब्रॅडवर चीननं घातलेली बंदी कायम होती. तोपर्यंत त्याठिकाणी त्याचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झाला नाही किंवा टेलिव्हिजनवरही दाखवला गेला नाही. २०१६ साली आलेला स्पाय थ्रिलर ‘अलाइड’ या चित्रपटाने मात्र, त्याला चीनचे दरवाजे खुले केले. अलाइड हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला.
कारण, या चित्रपटाला ‘Huahua Media’ या चीनी कंपनीने वित्तपुरवठा केला होता. याच कंपनीनं ‘स्टार ट्रेक बियॉन्ड’ आणि ‘जॅक रीचर: नेव्हर गो बॅक’मध्ये देखील पैसा गुंतवलेला होता. चीनी कंपनीने पैसा गुंतवलेला असल्यामुळे अलाइड चीनमध्ये दाखवला गेला. पहायला गेलं तर ती ही खूप मोठी गोष्ट होती. मात्र, पीट आणि त्याची सह-कलाकार मेरियन कोटिलार्ड यांच्या अफेअरच्या चर्चांमध्ये माध्यमं इतकी गुंग होती की, कुणीच याकडे गांर्भीयानं लक्ष दिलं नाही.
चित्रपटांवर झालेला प्रचंड खर्च भरून काढण्यासाठी अमेरिकन चित्रपट कंपन्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी भागीदारी करत आहेत. सध्या प्रामुख्यानं अनेक चीनी कंपन्या हॉलीवूडमध्ये गुंतवणूक करत असल्याचं चित्र आहे. ब्रॅड पीटला याचाच फायदा झाला. त्याच्या चित्रपटांनी चीनमध्ये जोरदार पुनरागमन केलं.
ब्रॅड पिटचा जन्म १८ डिसेंबर १९६३ रोजी झाला. अभिनयाव्यतिरिक्त त्यानं चित्रपटनिर्मिती क्षेत्रात देखील काम केलेलं आहे. त्याला अभिनयासाठी एक ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ‘थेल्मा अँड लुईस’ या चित्रपटातून पीटला ओळख मिळाली.
त्यानंतर त्याने ‘ए रिव्हर रन थ्रू इट’, ‘लीजेंड्स ऑफ द फॉल’ यांसारखे बीग बजेट तर ‘इंटरव्ह्यू विथ द व्हँपायर’ या हॉरर फिल्ममध्ये काम करून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं. क्राइम थ्रिलर ‘सेव्हन’ आणि सायन्स फिक्शन असलेल्या ’12 मंकीज’ या चित्रपटांतील भू्मिकांसाठी त्याला समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली. यानंतर मात्र, त्याने मागे वळून पाहिलं नाही.
त्याची अभिनय कारकर्द भरभराटीला आली आणि तो हॉलिवुडमधील सर्वात आश्वासक चेहरा बनला. त्यानं फाईट क्लब, ओशन्स इलेव्हन, ओशन्स ट्वेल्व्ह, ओशन्स थर्टीन, ट्रॉय, मिस्टर अँड मिसेस स्मिथ, वर्ल्ड वॉर झेड आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड’, ‘द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटण’ आणि मनीबॉल, द डिपार्टेड, 12 इयर्स अ स्लेव्ह, द ट्री ऑफ लाइफ अशा प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्हीसाठी अकादमी पुरस्कार मिळालेल्या मोजक्या कलाकारांमध्ये ब्रॅट पीटचा समावेश होतो.
अमेरिकन मनोरंजन उद्योगातील सर्वांत शक्तिशाली आणि प्रभावशाली लोकांमध्ये ब्रॅड पीटचा समावेश होतो. विविध माध्यमांनी त्याला जगातील सर्वांत आकर्षक व्यक्ती म्हणून घोषित केलं आहे. याशिवाय त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील व्यापक प्रसिद्धीचा विषय आहे. त्यानं अभिनेत्री जेनिफर ॲस्टिन आणि अँजेलिना जोलीपासून घटस्फोट घेतला आहे. पीट आणि अँजेलिनाला एकूण सहा मुले आहेत. त्यापैकी तीन मुलांना त्यांनी दत्तक घेतलं आहे.
चीनमध्ये बंदी घातला गेलेला ब्रॅड पीट हा काही एकमेव कलाकार नाही. चीनने विविध कारणांवरून अनेक पाश्चिमात्त्य कलाकारांवर बंदी घातली आहे. १९९३ च्या अकादमी पुरस्कारांच्या वेळी, रिचर्ड गेर यांनी चीननं तिबेटमध्ये केलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनांविषयी उत्स्फूर्त भाषण केलं होतं. त्यानंतर चीनने त्यांच्यावर देखील बंदी घातली होती.
याशिवाय शेरॉन स्टोन, हॅरिसन फोर्ड, मिली सायरस देखील विविध मुद्द्यांवरून चीनच्या नाराजीचे बळी ठरले आहेत. चीन आपल्या आक्र*मक परराष्ट्र धोरणांसाठी ओळखला जातो. कुठल्याही क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीनं चीनविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला की, त्याला नक्कीच त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यातून मग मनोरंजन क्षेत्र देखील सुटत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.