आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मित्रांनो, ताजमहाल माहीत नाही असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. या जगामधील सात आश्चर्यांमध्ये गणली जाणारी, प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक असलेली आग्रा शहरातली ही वास्तू तमाम भारतीयांच्या तसेच जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. भारत सफारीवर आलेले परदेशी पाहुणे इथं हमखास भेट देतातच.
आपल्याकडेसुद्धा कित्येक जणांचं आग्र्याला जाऊन ताजमहाल पहायचं स्वप्न असतं. त्याची ती भव्यता, ते उत्तुंग रुप डोळ्यांत साठवायचं असतं. तिथं बसून ताजमहालाचे व त्यासोबत आपलेही फोटो काढायचे असतात. काही लोक तर प्रत्यक्षात बघायला जमलं नाही म्हणून किंवा जरी बघून आले तरीसुद्धा ताजमहालाची छोटी तळहातावर मावणारी प्रतिकृती आपल्या घरी ठेवतात.
पण आपल्या महाराष्ट्रातही ताजमहालाची एक हुबेहूब प्रतिकृती उभारलेली आहे हे तुम्हांला माहीत आहे का? तीही काही शतकांपूर्वी. याचं उत्तर तसं बहुतेक जणांना माहिती असेलच. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातला ताजमहाल म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शहरातील ‘बीबी का मकबरा’. आग्र्याचा ताजमहाल हे जसं प्रेमाचं प्रतीक आहे, तसं बीबी का मकबरा हे मातृप्रेमाचं प्रतीक आहे.
ताजमहाल हा शाहजहानने आपली बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ आग्रा इथं बांधला असं म्हणतात. तर बीबी का मकबरा हा त्याचा नातू म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा आझम शहा याने आपली आई दिलरास बानो बेगम (जिला राबिया उल दुरानी म्हणूनही ओळखलं जातं, ही इराणच्या सफवी राजवंशातील होती) हिच्या स्मरणार्थ ताजमहालावरूनच प्रेरित होऊन बांधला. ताजमहालामध्ये जशी शाहजहानच्या बेगम मुमताज महलची कबर आहे, तशी या मकबऱ्यामध्ये औरंगजेबाच्या बेगम राबियाची कबर आहे. याचं बांधकाम सुमारे इ. स. १६६० ते १६७९ पर्यंत चाललं होतं.
ताजमहाल बनवण्यासाठी त्याकाळी सुमारे ३.२० कोटी रु. खर्च आला होता, तर बीबी का मकबरासाठी औरंगजेबाने ७ लाख रुपये इतकी रक्कम मंजूर केली होती. त्यामुळेच याला ‘गरिबांचा ताजमहाल’ असंही म्हटलं जातं.
ताजमहाल हा पूर्णपणे संगमरवरी आहे, तर बीबी का मकबराचा केवळ वरचा घुमट संगमरवरी असून बाकीचा भाग हा लाल आणि काळ्या दगडांबरोबरच संगमरवर आणि पांढऱ्या मातीच्या मिश्रणापासून बनवलेला आहे. या मिश्रणाला स्टको प्लॅस्टर असं म्हणतात जो दिसायला हुबेहूब संगमरवरच वाटतो. या दोन्ही वास्तू मुघल तसेच पर्शियन वास्तुकलेच्या मिलापाची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. मकबऱ्यासाठी संगमरवर जयपूर इथून मागवण्यात आलं होतं.
‘बीबी का मकबरा’च्या आत मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीभोवतीने आकर्षक अष्टकोनी रचना केली आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवराच्या जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे. या कबरीपर्यंत उतरून जायला पायऱ्याही आहेत.
बीबी का मकबराच्या समोरील भागाची रचना ताजमहालाप्रमाणेच करण्यात आलेली आहे. इथेही दर्शनी भागात बाग, कारंजे लावण्यात आले आहेत. इथेही ताजमहालासारखाच पदपथ आहे, संरक्षक भिंती आहेत. इमारतीच्या तीन बाजूस खुले पॅव्हेलियन्स आहेत. या मकबऱ्याच्या पश्चिम बाजूला एक मशीद आहे, जी कदाचित नंतर उभारली गेली असावी.
सध्या सुरक्षेच्या कारणास्तव या मशिदीत नमाज पढायला परवानगी नाही. बीबी का मकबरा ही वास्तू औरंगजेबाच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कलाकृती मानली जाते. त्याकाळी बीबी का मकबरा हा छत्रपती संभाजीनगर शहराच्या केंद्रस्थानी होता.
ताजमहाल व बीबी का मकबरा या दोन्ही वास्तू एकसारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यात एक फरक आहे. मकबऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार ते मकबरा या दरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला ६ फूट उंचीची जाळीदार भिंत आहे. ही अशी भिंत ताजमहालाला मात्र नाही. हा या दोन वास्तूंमधला अजून एक फरक.
उस्ताद अतउल्लाह हा इथला मुख्य वास्तुरचनाकार होता. अतउल्लाह हा उस्ताद अहमद लाहोरी याचा मुलगा होता, अहमद लाहोरीनेच ताजमहालाची वास्तुरचना केली होती. या मकबऱ्याचा एकूण आकार हा पूर्व-पश्चिम २७५ मीटर व उत्तर-दक्षिण ४५८ मीटर आहे. या मकबऱ्याचा घुमट हा ताजमहालाच्या घुमटापेक्षा आकाराने लहान आहे. अनेक तांत्रिक उणीवा अन् अत्यंत कमी प्रमाणात झालेला संगमरवराचा वापर या कारणांनी बीबी का मकबरा कधी ताजमहालाच्या बरोबरीचं स्थान मिळवू शकला नाही.
खरंतर ताजमहालापेक्षाही भव्यरित्या ‘बीबी का मकबरा’ची रचना आझम शहाला करायची होती, परंतु औरंगजेबाने त्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम त्यासाठी अपुरी ठरल्याने ते स्वप्न सत्यात उतरू शकलं नाही. अन्यथा आज कदाचित ताजमहालाऐवजी बीबी का मकबरा जागतिक आकर्षणाचं केंद्र बनला असता.
एका वृत्तपत्रातील बातमीनुसार इथं नमाजसाठी परवानगी मिळावी म्हणून अखेरचा मुघल बादशहा बहादूर शाह जफर याचा पणतू असल्याचा दावा करणाऱ्या शहजादा याकूब हबीबुद्दीन तूसी याने सरकारला विनंती केली होती. त्याच्या मते, मकबऱ्याच्या परिसरातच ही मशीद स्थित आहे, परंतु तिथे नमाज पढायला मनाई असेल, तर हे संविधानाद्वारे दिल्या गेलेल्या अधिकारांच्या विरुद्ध आहे.
ताजमहालात जर कुणीही कधीही नमाज पढू शकत असेल, तर त्याचीच प्रतिकृती असलेल्या या बीबी का मकबरामध्येच नमाजला हरकत का घेतली जातेय? ही दोन्ही स्थळं एकाच धर्माशी संबंधित असताना दोघांसाठी वेगवेगळे नियम कशासाठी? या बाबतीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधीक्षकांकडे त्यांनी केलेल्या अर्जावर अशी माहिती मिळाली की, निदान तीन नमाज पढण्याची मुभा दिली जाऊ शकते.
हा बीबी का मकबरा आपण उकाड्याचे दिवस सोडले तर एऱ्हवी वर्षभरात कधीही पाहू शकतो. इथे उन्हाळा कडक असल्यामुळे हिवाळ्याच्या काळात पर्यटकांची जास्त गर्दी असते. पावसाळ्यात देखील तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येऊन हा महाराष्ट्राचा ताजमहाल पाहू शकता.
– प्रफुल कुलकर्णी
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.