बासू चॅटर्जी- अप्रतिम कलाकृती मागे ठेवून गेलेला दिग्दर्शक

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


काल चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी गेले.

जवळपास 50 दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन करूनही त्यांचं नाव तितकंसं लोकप्रिय झालं नाही, पण त्यांचं काम महत्वाचं आणि काहीसं क्रांतिकारी होतं. त्या त्या काळात प्रवाहाच्या विरोधात जाऊन सिनेमा क्षेत्रात दर्जेदार कामाची भर टाकणाऱ्यांच्या इतिहासात “बासू चॅटर्जी” हे नाव नोंदवलं जाईल. त्यांच्या याच कामाबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

मी त्यांचे सगळे चित्रपट बघितले नाहीत पण काळाच्या पुढे असणाऱ्या आणि प्रवाह बदलणाऱ्या त्यांच्या दोन सिनेमांविषयी आपण बोलूयात. काळाच्या पुढे जाऊन काम करणं म्हणजे नेमकं काय असतं ते बघुयात.

1) चंपा की शादी

“मध्यवर्ती” किंवा मधल्या फळीतील सिनेमे असा एक सिनेमाचा प्रकार 80 च्या दशकात प्रसिद्ध झाला होता. एक हिरो-हिरोईनचा हाय बजेट मेलोड्रामॅटिक सिनेमा आणि दुसरा कमी बजेट असणारा समांतर सिनेमा ज्यात जास्त वैयक्तिक किंवा सामाजिक विषयांवर भर दिल्या जात होता.

पण हे सोडून एका तिसऱ्या प्रकारच्या सिनेमात समाजातील वास्तव असायचं पण ते भीषण स्वरूपाचं न दाखवता विनोद, रोमान्स यांचा तडका देऊन तो संदेश काहीसा लोकप्रिय करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. याच प्रकारच्या सिनेमात बासू चॅटर्जी यांनी मोलाची भर घातली.

समीक्षकांनी डोक्यावर घेतलेला “चमेली की शादी” हा त्यातला महत्वाचा सिनेमा. अनिल कपूर आणि अमृता सिंग हे मुख्य भूमिकेत असणारा हा सिनेमा जातीव्यवस्थेवर विनोदी भाष्य करतो, किंबहुना उपाय ही सुचवतो.

चरणदास आणि चमेली हे त्याकाळातील टिपिकल कपल. जात वेगळी असल्यामुळे त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध, आणि मग त्यांची पळून जाऊन लग्न करण्याची फँटसी वगैरे. अशा ओळखीच्या सिनेमॅटिक वातावरणाला बासू चॅटर्जींनी वास्तवाची किनार दिली आहे. हरीश नावाचे वकील (अमजद खान) या जोडप्यात प्रेम खुलवण्यात आणि त्यांचं लग्न लावण्यात त्यांना मदत करतात.

यातला ड्रामा तसाच ठेऊन उपाय सांगताना आजही ज्या गोष्टी गावात मान्य नसतात त्या गोष्टी अमजद खान यांचं पात्र दोघांच्याही परिवाराला समजून सांगतात.

रोटी-बेटीच्या व्यवहारामुळे वाढणारे संबंध, त्याचा होणार फायदा आणि पुरोगामी विचार असण्याची प्रतिष्ठा या मुद्द्यांवर चरणदास आणि चमेली यांच्या लग्नाचं महत्व पटवून दिल्या जातं.

सामान्य प्रेक्षकांना या प्रबोधनाचं ओझं होऊ नये म्हणून पैलवानगीरी, विनोदी फायटिंग सीन्स आणि घरातल्या स्त्रियांची भांडण मुद्दाम टाकलेली आहेत हे लक्षात येतं. पण त्यातही होईल तितकं वास्तववादी राहण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.

सिनेमासृष्टीतील दिग्गज कलाकारांना घेऊन असा धाडसी प्रयोग केल्याबद्दल समीक्षकांनी निर्मात्यांचं कौतुक केलं, पण चित्रपटगृहात प्रेक्षकांचा प्रतिसाद फार विशेष नव्हता. कथा सांगताना पात्रांभोवतीचं वास्तववादी जग तयार करण्यात केलेली मेहनत, पात्रांना हिरो-हिरोईन न बनवता फक्त कथेचे सादरकर्ते बनवून मुख्य प्रबोधनाचा प्राधान्य देणं, या गोष्टी तेव्हाच्या सिनेमांत अजिबात अस्तित्वात नव्हत्या. कमी बजेटमध्ये समांतर सिनेमांच्या नावाखाली समाज प्रबोधनासाठी बनवल्या गेलेल्या सिनेमातसुद्धा जातीव्यवस्थेवर एवढं छान भाष्य केलेलं दिसत नाही.

आजच्या काळात आयुषमानचा आर्टिकल 15 आल्यावर जातिभेदावर आलेला पहिला चित्रपट म्हणून त्याचं मार्केटिंग करण्यात आलं. पण 1986 साली बासुजींनी हाच विषय अधिक जास्त लोकप्रिय बनेल या पद्धतीने “चमेली की शादी” बनवला होता. तेव्हा त्याला न मिळालेला प्रतिसाद आता टीव्ही आणि युट्युबवर मिळतोच आहे. तुम्ही बघितला नसेल तर सहपरिवार जरूर बघा.

2) एक रुका हुआ फैसला

या सिनेमाला “12 अँग्री मेन” या प्रसिद्ध इंग्रजी चित्रपटाच भारतीयिकरण म्हणावं लागेल. मी ऑफिशियल रिमेकही म्हणू शकलो असतो पण बासू चॅटरजींनी भारतात सिनेमा चालावा यासाठी केलेले तांत्रिक बदलही तितकेच उल्लेखनीय आहेत.

एका किशोरवयीन मुलावर त्याच्या वडिलांंच्या हत्येचा आरोप लावलेला असतो. 12 जणांच्या परीक्षकांच्या गटाला या निर्णयावर चर्चा करून शिक्कामोर्तब करायची जबाबदारी दिलेली असते. निर्णय होईपर्यंत रूम सोडून जाण्यास बंदी असते. 12 जण वेगवेगळ्या स्वभावाचे, वयोगटाचे असतात, ही परिस्थिती चित्रपटाच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

त्याकाळात ठराविक अंतरानंतर नाटकात आणि सिनेमात गाणं टाकण्याची पद्धत रूढ होती. गाणे नसलेले समांतर सिनेमे प्रबोधन करण्याच्या किंवा कलात्मक पातळी गाठण्याच्या स्पर्धेत जास्त इव्हेन्टफुल आणि गुंतवून ठेवण्यास अपयशी ठरत होते. यात “एक रुका हुआ फैसला” अपवाद ठरतो.

आरोप सिद्ध होईपर्यंतची चर्चा, पुरावे यामुळं सुरुवातीला रंजक होत गेलेला संवाद नंतर हे वरवरचं बोलणं सोडून अधिक वैयक्तिक होतो. लोकांच्या या केसबद्दल असणाऱ्या मतांमागे त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचं असणारं ओझं उघडकीस येतं. या केसचा निर्णय देता देता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंताही सुटत जातो, तो सुटत जाण्याचा प्रवाहही सिनेमात खिळवून ठेवतो.

एकानंतर एक उलगडत जाणारी अर्धसत्य, कंटाळून व्हलनरेबल होणारे पात्र हे सगळंच साध्य होतं ते फक्त ताकदीच्या दिग्दर्शनामुळे. अशा परिस्थितीत कन्टीन्यूटी टिकवणं महत्वाचं असतं. सुरुवात आणि शेवट जवळजवळ 15 दिवसांच्या अंतराने शूट झाले असणार. त्यामुळं दिवसभर थकलेले चेहरे, मळलेले कपडे, अस्ताव्यस्त होणारं साहित्य आणि त्यांचे भावनिक प्रतिसाद हे अंतर देऊन शूट केल्यासारखं वाटू नये. बासू चॅटर्जी या सगळ्या गुंतागुंतीच्या कामाला स्क्रीनवर तितक्याच सहजतेने सादर करू शकले यातच त्यांचं कौशल्य कळतं.

आजकाल सिनेमात बजेट, मोठे सेट हे सगळं वाढतंय पण ते हाताळू शकेल अशी लोक कमी आहेत. उदा. सेक्रेड गेम्सचे निर्माते विक्रमादित्य मोटवानी, बाहुबलीचे राजमोली. यांच्या अशाच कौशल्यामुळे त्यांना हे मोठे प्रोजेक्ट्स मिळाले. बासू त्याच पातळीचे दिग्दर्शक होते.

हा पण सिनेमा युट्युबवर उपलब्ध आहे, अगदी हातात असेल ते सोडून बघावा इतका खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे.

इतर कोणीही गेलं तरी मागे फक्त आठवणी राहतात. कलाकार या एकाच जातीच्या लोकांना मृत्यूनंतरही स्वतःच्या अभिव्यक्तीचा अंश जिवंत ठेवण्याची संधी असते. आपण त्यांच्या आठवणीत त्यांची कलाकृती बघावी, त्यात स्वतःचं आयुष्य शोधावं, नवीन दृष्टिकोन शोधावे, स्वतःला समृद्ध करावं, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!