ज्या तुलुगमा युद्धनीतीच्याच जोरावर बाबरने हिंदुस्तानावर राज्य केले ती काय आहे..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतावर जवळजवळ ३०० वर्षांची मोगलांची सत्ता होती, या मोगल सत्तेचा पाया रचणारा पहिला शासक होता बाबर. बाबर फक्त बारा वर्षांचा असतानाच त्याचे वडील उमर शेख मिर्झा यांचा मृत्यू झाला आणि फरगना राज्याची सूत्रे बाबरच्या हातात आली. फरगना हे उझबेकिस्तानमधील एक छोटे संस्थान होते.

बारा वर्षांचा असला तरी बाबरची अंगकाठी मजबूत होती आणि त्याच्या इच्छा-आकांक्षा तर आकाशाला गवसणी घालणाऱ्या होत्या. लहान वयातच तो युद्धकौशल्यात निपुण झाला होता. तलवार बाजी असो किंवा घोडेस्वारी, युद्धकलेत त्याचा हात कुणीही पकडू शकत नव्हते. त्याचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील तैमूरलंगने स्थापन केलेली राजधानी समरकंद जिंकून तिथे त्याला पुन्हा आपले राज्य प्रस्थापित करायचे होते.

त्याकाळी समरकंद हे उझबेकिस्तानमधील एक प्रसिद्ध व्यापार पेठ होती. जिथून आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असे. परंतु बाबरचे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले.

उझबेकिस्तानमधून हळूहळू तो भारताचा दिशेने सरकला. भारतात आल्यावर त्याने मुघल साम्राज्याची स्थापना केली. पुढे त्याच्या वंशजांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केले.

बाबरचा जन्म १५ फेब्रुवारी १४८३ रोजी फरगना संस्थानात झाला. त्याचे नाव होते जिहीरुद्दिन मुहम्मद बाबर. त्यावेळी संपूर्ण मध्य आशिया स्वार्थ आणि युद्धाच्या जंजाळात पुरता फसला होता. आपसातील युद्धामुळे मध्य आशियाची अवस्था अतिशय जर्जर झाली होती. अशा काळात बाबरच्या हाती त्याच्या संस्थानाची सूत्रे आली होती, जेंव्हा चारी बाजूंनी शत्रूंचा त्रास वाढला होता. त्याच्या वयाहूनही त्याच्या पुढील समस्यांचा डोंगर मोठा होता.

सततच्या आक्रमणाने आणि अंतर्गत अव्यवस्थेमुळे फरगना राज्याची अवस्था कमकुवत झाली होती. तरीही बाबर या सर्व समस्यांना पुरून उरला. लहानपणापासूनच हे अराजकाचे वातावरण पाहतच तो मोठा झाला होता. त्याचे युद्धकौशल्यही जबरदस्त होते. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही तो समरकंदवर विजय मिळवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागला. संधी मिळताच त्याने समरकंदवर हल्ला चढवला पण पहिल्याच प्रयत्नात तो पराजित झाला.

समरकंदच्या या लढाईत त्याला बंदी बनवण्यात आले पण इथून तो कसाबसा निसटला आणि त्यानंतरही त्याने अनेकदा समरकंदवर हल्ले चढवले. वारंवार अपयशी होऊनही समरकंदवर हल्ला करून समरकंद जिंकण्याचा प्रयत्न त्याने सोडला नाही. सतत समरकंदवर हल्ले करण्याच्या नीतीमुळे त्याच्या स्वतःच्या राजधानीची अवस्था आणखीनच बिकट झाली. त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्या विरुद्ध कट रचला. आपल्याच लोकांनी रचलेल्या या फसव्या कटात तोही आपसूकच अडकत गेला.

समरकंदवर बाबरने तीन वेळा हल्ला केला पण तिन्ही वेळेस त्याला पराजयाचेच तोंड पाहावे लागले. तिसऱ्या वेळी तर त्याचा इतका दारूण पराभव झाला की त्याला स्वतःचेच राज्य त्याला गमवावे लागले.

मात्र या युद्धातून त्याने जो धडा शिकला, त्यानेच नंतरच्या प्रत्येक युद्धात त्याला यश मिळवून दिले. हा धडा होता तुलुगमा युद्धनीतीचा!

समरकंद हे उझबेकिस्तानमधील एक प्रसिद्ध आणि मोठे शहर आहे. त्यावेळी उझबेकिस्तानवर शैबानी खान नावाचा शासक राज्य करीत होता. यानेच बाबरला तीनवेळा पराजित केले होते. त्याचे मुख्य कारण होते तुलुगमा युद्धनीती. मध्यकालीन युगातील ही एक अशी युद्धनीती होती, जिचा पाडाव करणे कुणालाही शक्य नव्हते. तीन वेळा या युद्धनीतीमुळे पराभव पचवाव्या लागलेल्या बाबरने पुढील प्रत्येक युद्धात स्वतःही हीच युद्धनीती वापरली.

आपले राज्य गमावल्यावर उरलेल्या मुठभर सैन्यासह तो अफगाणिस्तानच्या दिशेने वळला. याचवेळी भारताकडेही त्याचे लक्ष गेले. अफगाणिस्तानकडून भारताकडे वळताना त्याने पहिल्यांदा काबुलवर स्वारी केली आणि याच युद्धनीतीचा वापर करून काबुलवर विजय मिळवला.

तुलुगमा युद्धनीतीचा शोध उझबेकी शास्त्यानींच लावला होता. समरकंद युद्धात बाबरने हाच धडा शिकला होता. 

या युद्धनीतीत राजा आपल्या अत्यंत विश्वासू शिपायांना चार गटात विभागतो. यातील पहिल्या दोन तुकड्या राजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असतात तर उरलेल्या दोन तुकड्या अशाच पद्धतीने मागच्या बाजूला असतात.

सर्वात पुढच्या रांगेत भरपूर बैलगाड्या ठेवल्या जातात. या सगळ्या बैलगाड्या चामड्याच्या दोरांनी एकमेकांशी बांधल्या जातात. एकावेळी दोन घोडेस्वार निसटू शकतील इतके अंतर यातील दोन बैलगाड्यांच्यात ठेवले जाते. बैलगाड्यांच्या मागे तोफा ठेवल्या जातात आणि त्याच्याही मागे निष्णात धनुर्धाऱ्यांची फौज उभी असते.

यातील सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यातील एकाच तुकडीतील सैनिक आधी बाहेर येतात आणि समोरच्या सैन्यावर हल्ला करून पुन्हा बैलगाड्यांचे जे सुरक्षा कवच उभारलेले असते त्याच्या मागे जातात. मग हीच तुकडी तोफांचा मारा करते. तोफांच्या माऱ्याने शत्रुसैन्य हडबडून गेले की त्याला सावरण्याचीही उसंत न देता लगेचच धनुष्य बाणांचा वर्षाव केला जातो. एकामागून एक आणि वेगवेगळ्या शास्त्रांच्या सहाय्याने समोरच्या शत्रूला जेरीस आणले जाते. शत्रू कितीही मोठा असला तरी या सैन्याचे सर्वात पुढचे जे सुरक्षा कवच आहे ते तोडू शकत नाही. इथेच शत्रू गलितगात्र होऊन जातो.

बाबर अफगाणिस्तानवरून काबुलवर आपली पकड जमवत होता, त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर इब्राहीम लोदीचे राज्य होते. परंतु लोदी वंशात यावेळी एकही पराक्रमी वीर नव्हता शिवाय हे घराणे आपसातील भांडणांनीच विकलांग झाले होते. इब्राहीम लोदीचा काका दौलत खान लोदी लाहोरचा गव्हर्नर होता. त्याला लाहोरमध्ये स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची इच्छा होती. तर इब्राहीम लोदीचा भाऊ आलम खान लोदी इब्राहीमला दिल्लीच्या गादीवरून हटवून स्वतः दिल्लीशाह होण्याची स्वप्ने पाहत होता.

इब्राहीमचा भाऊ आणि काका यांनीच आपल्या स्वार्थी मनसुब्यापोटी बाबरला दिल्लीवर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिले. त्यांना वाटले बाबर दिल्लीवर आक्रमण करेल आणि त्यांच्याकडे दिल्लीचा कारभार सोपवेल. परंतु जे झाले ते तर अगदीच उलटे होते.

बाबरला तर भारतावर आक्रमण करायचे होतेच आता तर त्याला आयते निमित्त मिळाले आणि त्याची वाट सुकर झाली. त्याने आधी दौलत खान लोदीला विश्वासघातकी ठरवून त्याला कैद केले आणि मग आलम खान लोदीलाही पराभूत केले.

इब्राहीम लोदी यावेळी अगदीच निश्चिंत होता. या सगळ्या घडामोडींनी त्याला धक्काच बसला. युद्धासाठी त्याच्याकडे कुठलीच पूर्वतयारी नव्हती. त्याच्याकडे प्रशिक्षित सैन्य देखील नव्हते. तरीही बाबरचा मुकाबला करण्यासाठी तो दिल्लीहून निघाला.

बाबर आणि इब्राहीम लोदी यांच्यात झालेले हे युद्ध पानिपतचे पहिले युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. इब्राहीम लोदीचे सैन्य तसे कुचकामीच होते. तर बाबरकडे सैन्य कमी होते मात्र ते तरबेज आणि प्रशिक्षित होते. घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, तोफखाना अशा सगळ्या शस्त्रात पारंगत असलेले सैन्य त्याच्याकडे होते. शिवाय, तुलुगमा युद्धनीतीचे कसबही होतेच.

या तुलुगमाच्या तटबंदीपुढे इब्राहीमचे सैनिक लवकरच हारले. त्यांना ही युद्धनीती समजण्याआधीच त्यांच्यावर तोफगोळे आणि बाणांचा वर्षाव होऊ लागला. तोफांच्या माऱ्यामुळे या सैन्यातील हत्ती घाबरून उलटे पळत सुटले आणि त्यांच्याच छावणीत ते धुमाकूळ घालू लागले.

इब्राहीमचे सैन्य पूर्णतः बावचळून गेले होते. अशावेळी बाबरच्या एकेका तुकडीने त्यांच्या ठरलेल्या युद्धनीती प्रमाणे हल्ले सुरूच ठेवले. चारी बाजूंनी वेढलेले इब्राहीमचे सैन्य जीवाच्या आकांताने पळत होते, लढत होते मात्र त्यांना कुठेच विजयाची सुतराम शक्यता दिसत नव्हती. युद्धाला सुरुवात होऊन एक प्रहर लोटला होता आणि इतक्यात त्यांचा राजाच धारातीर्थी पडला.

बाबरने दिल्लीवर कब्जा केला होता. आता तो दिल्लीच्या वाटेने संपूर्ण भारत पादाक्रांत करण्याचे मनसुबे रचण्यास मोकळा होता. ज्या तुलुगमा युद्धनीतीने त्याला पाणी पाजले त्याच युद्धनीतीचा वापर करून त्याने इतरांना पाणी पाजले!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!