शिवचरित्र घराघरात पोहोचवण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी घोडी अटकेपार गेली. पण मग इंग्रज आले. नंतर ते पण गेले. शिवकाळाला 300 वर्ष होऊन गेले होते. जिथं महाराजांनी इतिहास रचला तो रायगड, बाकीचे किल्ले यांवर चार-दोन फिरणारे सोडले तर गुरंच चरत होती. मुख्य दफ्तरखानाच इंग्रजांनी जाळून टाकला, किल्ले तोफा लावून उडवले, यातच इतिहासाचे प्राथमिक पुरावे नष्ट झाले.

पण गुलामगिरीचे सावट हटल्यावर काही अभ्यासकांनी साधनं (शिवकालीन अस्सल कागदपत्रं) गोळा केली. पुरावे जमा करायला वणवण फिरले. त्या बिकट परिस्थितीत त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केला.

हा अभ्यास वैचारिक वर्तुळात पसरला. पण ही भाषा समजायला तशी अवघडच. म्हणून लोकांना फक्त राजा होता, एवढंच माहीत होतं, हे सगळं त्यांना समजणाऱ्या भाषेत किंवा माध्यमात आलं नव्हतं.

महाराज इथून तिथे गेले, तिथून हा प्रदेश किल्ले जिंकले, स्वतःचे नाणे विकसित केले, गनिमी कावा केला, अफजलखानाचा वध केला इत्यादी असं सरधोपट सांगितलं तर ते लोकांना अपील होत नाही, त्यातल्या भावना पोहोचतीलच असं नाही. याउलट त्यांना राम, कृष्ण, नवनाथ यांच्याबद्दल सगळं पाठही असत आणि श्रद्धाच काय विश्वासही असतो, त्यातून ते प्रेरणा घेतात.

हे अवघड शिवचरित्र लोकांना कळेल, उमजेल अशा भाषेत आणण्याची गरज होती. त्याशिवाय हा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास पसरलाच नसता. हे काम ज्यांनी केलं त्यांच्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे “बाबासाहेब पुरंदरे”.

सर्वात जास्त प्रसिद्ध झालेलं शिवचरित्र असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. जाणकार लोक सांगतात की संदर्भानिशी लिहिलेलं, ललित स्वरूपातील, त्यातही चित्र, कविता आणि अशा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव असलेलं “राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे” हे एक अनोख शिवचरित्र आहे. हे पुस्तक महाराष्ट्रभर पसरलं, विक्रमी खप झाला.

बाबासाहेबांनी विशाल शिवसृष्टीच्या निर्माणाचा ध्यासच घेतला. सगळ्यांना प्रदर्शनरुपी ते बघता यावं याची सोय केली. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदींसाठी ते महाराष्ट्रभरच काय तर भारतभर आणि विदेशात पण व्याख्यानं देत फिरले.

त्यांच्या भाषणांना गावात, शहरात तुफान गर्दी व्हायची. सबंध महाराष्ट्रात त्यांनी जणू महाराजांचा जागरच घातला. पण व्याख्यान हा झाला एक मार्ग. एवढ्यावरच न थांबता त्यांनी महानाट्य रचलं. “जाणता राजा”.

या महानाट्याचे गावोगावी प्रयोग झाले, एक प्रयोग तर दिल्लीच्या लालमहालासमोर झाला. यात खरेखुरे घोडे-हत्तींसकट किती तरी लोक काम करतात. कितीतरी दिग्गज मराठी कलाकारांनी यात काम केलंय.

लिखाण, व्याख्यान, शिवसृष्टी अशा बऱ्याच माध्यमांतून बाबासाहेबांनी हे काम सुमारे ७० वर्ष अथकपणे केलं. आज ते शंभरीच्या जवळ पोहोचलेत. महाराष्ट्रातल्या इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांचं योगदान महत्वाचं आहे.

पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिवचरित्रात धगधगत असणारी लोककल्याणकारी राज्याची प्रेरणा आणि त्या महान राजाची गाथा सर्वसामान्यांसाठी खुली केली.

इतिहास संशोधक, अभ्यासक, वाचक, किल्लेप्रेमी आणि तमाम ट्रेकप्रेमींसुद्धा ते प्रेरणा बनले. यातून अभ्यासक तयार झाले, लेखक लिहिते झाले, लोक वाचायला लागली, किल्ल्यांवर आता गर्दी व्हायला लागली. लोकांमध्ये आस्था निर्माण झाली आणि आता हा प्रवाह पुढे किती वळणं घेईल माहीत नाही.

या सगळ्याची सुरुवात करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांपैकी हे एक महत्त्वाचं नाव. अशा व्यक्तिमत्वाला भेटता आलं हे माझं भाग्यच म्हणेन. यातुन पुढील प्रवासासाठी प्रेरणा मिळते. निघताना पाय पडलो तेव्हा त्यांनी पाठीवरून हात फिरवला त्यावेळेस जबाबदारीच्या ओझ्याचीही जाणीव झाली. म्हणाले “मोठं काम करताय, येत रहा!”

thepostman

बऱ्याच लोकांनी मी फोटो टाकल्यावर विचारलं की “हे कोण आहेत?” त्यांच्यासाठीचा हा लेखन प्रपंच. बाकी आक्षेप असणाऱ्या अभ्यासक वृत्तीच्या लोकांचेही रिप्लाय आले. आक्षेपांवर चर्चेचे फड फार रंगू शकतात, ते रंगावेच पण त्यातून चुकूनही एखाद्याच्या कार्याला असणारं महत्व कमी होऊ नये आणि विचारांचा विरोध वैयक्तिक पातळीवर घसरू नये.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

यावर तुमची प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!