आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
बालपणीची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे सायकलवर बसून फेरफटका मारणे. सायकल आणि बालपण यांच्या आठवणी अजोड असतात. सायकल हातात घेतल्यापासून ते बॅलन्स सावरेपर्यंत फुटलेले गुडघे, खरचटलेले ओरखडे अशा कितीतरी खुणा जन्मभर चिकटल्या जातात. तरीही सायकल हे बालपणीचं पहिलं प्रेम असतं. त्यातही ॲटलास सायकल ही प्रत्येकाची पहिली आवड असते.
परंतु लॉकडाऊनमुळे पुरेशा निधी जमा करू न शकल्यानं ॲटलासने आपले उत्पादन युनिट सध्या बंद ठेवले आहे. कंपनीने हा दिलासाही दिला आहे की, लॉकडाऊन खुलताच कंपनी पुन्हा एकदा सुरुवात करेल. सध्या कंपनीने आपल्या कामगारांचीही कपात केली आहे.
सगळ्यात खेदाची बाब म्हणजे ३ जून रोजी जगभर सायकल डे साजरा होत असताना, त्याच दिवशी भारतातील या सगळ्यात मोठ्या सायकल कंपनीला मात्र आपले उत्पादन बंद करावे लागले. सायकलींच्या उत्पादनाचा खर्च आणि कामगारांचा पगार देणे शक्य नसल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या उत्तरप्रदेशमधील साहिबाबाद, येथील उत्पादन युनिटच्या गेटवर लावलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे, “आमच्या रोजच्या कामासाठी आवश्यक तो पैसा जमवण्यात आम्हाला अडचणी येत आहेत. कच्चा माल खरेदी करणे देखील शक्य नाही. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाला ही फॅक्टरी सुरळीतपणे चालवणे अशक्य आहे.”
कंपनी आधीच आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने अडचणीत होती त्यात, लॉकडाऊन. दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झाली.
या बातमीने अनेकांना दुःख झाले असेल. ॲटलासने सामान्य भारतीयांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे प्रदूषणाची समस्या वाढली असताना आणि रस्त्यावर सायकलीची संख्या वाढली पाहिजे अशी अपेक्षा असताना, सायकल कंपनीचे उत्पादन थांबणे ही बाब खरंच खूप क्लेशदायक आहे.
१९५० पासून ॲटलास सायकल भारताच्या रस्त्यावरून धावते आहे. गेल्या सत्तर वर्षांत तिने फक्त व्यापारच केला नाही तर, सामान्य भारतीयांशी जवळचे नाते निर्माण केले. ही कंपनी स्थापन करताना जानकी दास कपूर यांचे एकाच स्वप्न होते. सामान्य भारतीयांना परवडेल अशा दरातील सायकल तयार करणे.
त्यांनी एका छोट्याशा शेडमधून कंपनीची सुरुवात केली आणि एका वर्षातच त्यांनी २५ एकर जागेवर कंपनीची फॅक्टरी उभी केली. पहिल्याच वर्षी कंपनीने १२ हजार सायकलींचे उत्पादन केले. १९६५ पर्यंत ऍटलास सायकल ही देशातील सर्वात मोठी सायकल उत्पादन कंपनी बनली.
जानकी दास यांनी काही काळाने कंपनीची सूत्रे आपले सुपुत्र जयदेव यांच्याकडे सोपवली. कंपनीचे जॉईंट प्रेसिडेंट गिरीश कपूर आणि गौतम कपूर यांनी मिळून कंपनीचा लौकिक अजून वाढवला.
१९८२ साली कंपनी नवी दिल्ली येथे आयोजित केल्या जाणाऱ्या एशियन गेम्सना सायकल पुरवणारी अधिकृत कंपनी बनली. त्यानंतर कंपनीने भारताबाहेरही व्यवसाय सुरु केला. कंपनीची उत्पादन क्षमता वाढली. एका वर्षात कंपनी ४० लाख सायकलींचे उत्पादन करू लागली.
२०१३ पर्यंत कंपनीने भारतीय बाजारपेठेतील २८% भाग व्यापला होता. ॲटलास ही भारतातील एकमेव अशी कंपनी आहे, जिचे संपूर्ण प्रोडक्शन हे कंपनीतर्फेच केले जाते. विशेष म्हणजे नवनव्या टेक्निकल बाबींची पूर्तता करण्यासाठी कंपनीकडे संशोधकांची आणि तंत्रज्ञांची स्वतंत्र टीम होती.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधक पथकानेही या टीमची दखल घेतली होती. साहिबाबाद येथे कंपनीचे आधुनिक पेंट युनिट कार्यरत होते.
कंपनीला फक्त स्वतःच्याच नाहीतर कामगारांच्या उन्नतीचीही काळजी असायची. कामगार सक्षमीकरणासाठी कंपनीने राबवलेल्या योजना अत्यंत प्रभावी होत्या. माजी कामगारांनाही कंपनी बंद होण्याची बातमी ऐकून दुख झाले.
ग्रीकची टायटन ॲटलास ही देवता खांद्यावर पृथ्वीचा भार वाहत आहे असा ॲटलासचा ब्रँड सिम्बॉल आहे. ॲटलासने अनेकांच्या इच्छांना, आकांक्षांना बळ दिले. ज्यामुळे लाखो लोकांनी आपल्या प्रगतीचे मार्ग निवडले आणि आपल्या आयुष्यातील अनेक बदलांचा अनुभव घेतला.
ॲटलास सायकलच्या जाहिरातींनी घराघरात ॲटलास हे ब्रँड पोहोचवण्यात महत्वाची भूमिका निभावली. जाहिरातीतून त्यांनी सायकल चालवणाऱ्या महिलांचेही चित्रण केले. विशेष म्हणजे या महिला साडी परिधान केलेल्या असत. म्हणजेच सायकल ही एक नितांत उपयोगाची वस्तू असल्याचे ग्राहकांच्या मनावर ठसवण्यात कंपनीला यश मिळाले.
ॲटलासच्या काही सुरुवातीच्या जाहिरातीतून साडी परिधान केलेल्या महिलांनाही सायकल चालवताना दाखवण्यात आले. त्यामुळे सायकल चालवण्यासाठी विशिष्ट प्रकारचीच कपडे घातले पाहिजेत असे काही नसून तो फक्त समजुतीचा भाग असल्याचे अधोरखित झाले.
सायकल चालवताना कोणत्याही गोष्टी अडथळा ठरू शकत नाहीत हेच यातून त्यांना बिंबवायचे होते. सुरुवातीच्या काही जाहिरातीतून सायकल ही बहुपयोगी आणि स्वस्त वस्तू असल्याचे सांगण्यात आले. जे अर्थातच खरे आहे.
हळूहळू कंपनीची प्रगती होत गेली तसा कंपनीने आपल्या जाहिरात धोरणांत बदल केला. कंपनीने स्पोर्ट्स बाईक लाँच केल्यानंतर एकमेवाद्वितीय ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बाईक असल्याचे जास्त ठळकपणे ठसवण्यास सुरुवात केली.
त्यानंतर कंपनीने रिबेल बाईक लॉंच केली. वडिलांशी वाद घालण्यात उर्जा वाया घालवण्यापेक्षा मुलगा रिबेल सायकल घेतो आणि डोंगर दऱ्यातून फेरफटका मारतो, अशी जाहिरात दाखवण्यात आली.
नंतर आली ती ॲटलास कॉन्क्रोड. या सायकलला दहा गिअर होते. तोपर्यंत सायकलला गिअर असतात हेही कुणी ऐकले नव्हते. ऍटलासने अनेक नवनवे ब्रँड बाजारात आणले. त्यासाठी नवनवी जाहिरात धोरणे आखली.
अभिनेता सुनील शेट्टी आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांना कंपनीचे ब्रँड अँबॅसिडार नेमण्यात आले. या नव्या जाहिरात कॅम्पेनिंगसाठी कंपनीने ७ ते ८ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
एकेकाळी बाजारपेठेवर राज्य करणाऱ्या या कंपनीला टाळे मारण्याची वेळ यावी याहून दुर्दैवाची बाब ती कोणती? ॲटलासच्या आजी-माजी कामगारांसह त्याच्या ग्राहकांसाठीही ही बातमी धक्कादायक आहे. परंतु हा काही एकेएकी घेतलेला निर्णय नाही. खूप आधीपासून कंपनी आर्थिक झळ सोसत होती.
२०१४ मध्ये कंपनीने मालांपूर येथील उत्पादन युनिट बंद केले होते. गेली चार वर्षे कंपनी सलग तोट्यात जात होती. २०१८ मध्ये कंपनीने सोनेपट येथील प्लांट बंद केला होता. आता कंपनीने शेवटचा प्लांटही बंद करून आपल्या ७०० कामगारांना कामावरून बडतर्फ केले.
आशा आहे भारतीय जनतेच्या वाढत्या अपेक्षांचे प्रतिक बनलेली ही सायकल पुन्हा एकदा त्याच जोमाने रस्त्यावरून धावताना दिसेल आणि कंपनीही पुन्हा एकदा प्रगतीकडे झेपावताना दिसेल. पुन्हा एकदा भारतातील लहानग्यांना सायकलच्या फेरीचा निर्भेळ आनंद घेता येईल आणि बालपण एन्जॉय करता येईल!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.