आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या राजकीय पटलावर सर्वश्रुत असलेले एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते अटबिहारी वाजपेयी जी. अटलजी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व असले तरी सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी, आजही त्यांचा उल्लेख अत्यंत आदराने करत असत. अटलजींचा सर्वसमावेशक चेहरा हे याचे प्रमुख कारण आहे. अटलजींचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ते एक यशस्वी राजकारणी, लेखक, विचारवंत आणि प्रसिद्ध कवी होते. राजकीय वर्तुळातील लोक जेव्हाही अटलजींबद्दल मत मांडतात तेव्हा “दिलदार मनाचा वचन पाळणारा राजनेता” असा आवर्जून उल्लेख करतात.
अटल बिहारी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेर प्रांतात झाला. अटलजी अभ्यासात हुशार होते, त्यांच्या वडिलांनी त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कानपूरला पाठवले अटलजींनी येथीलच डीएमए महाविद्यालायातून राज्यशास्त्राची पदवी मिळवली. याच महाविद्यालात शिकत असताना त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होऊ लागला, ते विद्यार्थी चळवळीतील अग्रणी नेता बनले. त्यावेळी कोणास ठाऊक होते की विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणारा हा मुलगा एक दिवस देशाचा पंतप्रधान बनेल.
बालपणापासून अटलजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, स्वातंत्र्याची चळवळ, देश, पारतंत्र्य याविषयी त्यांना ओळख झाली. विद्यार्थीदशेपासूनच ते कविता लिहित असता त्यांच्या कवितांची लोकप्रियता वाढत होती, अनेक जण त्यांना “तुमच्या शब्दात सरस्वती आहे” असे म्हणून त्यांचे कौतुक करत. कविता, साहित्य याबरोबर त्यांनी काही दिवस पत्रकार म्हणूनही काम पहिले. त्यांनी त्याकाळी लिहिलेले अनेक लेख हे विद्यार्थी चळवळीसाठी प्रेरणादायी ठरत होते.
एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले, त्यांनी प्रत्यक्ष राजकीय सहभाग दिला तो भारत छोडो आंदोलनाच्या निमित्ताने, काही सहकाऱ्यांसमवेत ते उस्फुर्तपणे आंदोलनात सहभागी झाले आणि याच आंदोलनात त्यांना तुरुंगवासही झाला.
यातच त्यांचा परिचय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेतृत्व असणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने त्यांचे व श्यामाप्रसादजींचे घनिष्ट संबंध तयार झाले आणि नंतर अटलजी भारतीय जनसंघाचे सदस्य बनले. ही त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात होती.
राजकीय आयुष्याबरोबर अटलजींनी आपल्या साहित्याला व शिक्षणाला नेहमीच महत्त्व दिले. त्यांनी विक्टोरिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी मिळवत राजकीय पातळीवरील नियम कायदे यांचा अभ्यास केला. अटलजी चळवळीत काम करत असताना त्यांची भाषणे लोकप्रिय होऊ लागली. ग्वाल्हेरचा कोणीतरी मुलगा जनसंघात जीव ओतून काम करतोय, त्याची भाषणे तर अगदी ऐकण्यासारखी असतात असे ग्वाल्हेरच्या महाराणी विजयाराजे सिंधिया यांच्या ऐकण्यात होते त्यांनी या मुलाला बोलावून त्याचा परिचय करून घेत अटलला आपल्या मानस पुत्राची माया दिली.
पुढे देशाला स्वातंत्र्य मिळून कॉंंग्रेस सत्तेवर आली, जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री बनले, पण जनसंघाचा प्रवास मात्र अखंडपणे सुरु राहिला. जनसंघ कॉंंग्रेसचा पर्याय म्हणून उभारी घेत जनमानसात रुजू लागला. अटलजींचे राजकीय नेतृत्व आता चांगलेच बहरले होते, मध्य प्रदेशाबरोबर देशाच्या केंद्रीय पातळीवर काम करणाऱ्या अनेक नेत्यांना अटलजींच्या ओजस्वी वक्तृत्वाचे आकर्षण वाटू लागले.
१९५७ सालच्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी होऊन संसदेत पोचले.
भारतातील अनेक ज्वलंत प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. अटलजींचे भाषण, त्यातील मुद्दे, विषयांवर असणारा अभ्यास यांमुळे एक दिवस हा मुलगा जनसंघाचे नेतृत्व करेल अशी चर्चा खासगीत काही नेते करू लागले. त्यांच्या भाषणावर प्रभावित होऊन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील “अटलजी तुमच्यासारखा माणूस देशाच्या पंतप्रधान पदाच्या काबील आहे” असे म्हणत गौरवोद्गार काढले होते.
यातच श्यामप्रसाद मुखर्जींच्या निधनानंतर जनसंघात गट निर्माण झाले आणि जनसंघात फुट पडली होती. पण सहकार्याचे कार्य अविरत सुरु होते, इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. आणि देशातील समविचारी राजकारण्यांनी या विरोधात एकत्र येत जनता पक्ष स्थापन केला. अटलजींनी आपल्या राजकीय गुरूंना अभिप्रेत असलेली विचारसरणी जपत जनता पक्षासह जाण्याचा निर्णय घेतला.
देशातील लोकांनीही जनता पक्षाला साथ दिली. जनता पक्षाचे मोरारजी देसाई प्रधानमंत्री बनले व त्यांच्या सरकारमध्ये अटलजींना परराष्ट्रमंत्री पद देण्यात आले. हे सरकार फार काळ टिकले नाही. यातच सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कारवाई केल्याने नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला. देशात बदल घडवायचा असेल तर आपण निर्णायक पावले उचलायला हवेतच या विचाराने अटलजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघातील आपल्या काही सहकाऱ्यांना एकत्र करून १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. ते भाजपचे पहिले अध्यक्ष होते.
राजकीय संघर्ष सुरुच होता, देशभरातून भाजपला समर्थन मिळत होते स्थापनेनंतरच्या पहिल्या लोकसभेत भाजपला केवळ २ जागा मिळाल्या. अनेकांनी भाजपला हिणवले, पण ध्येय निश्चित केलेल्या अटलजींनी याकडे दुर्लक्ष करत आपले काम जोमाने पुढे नेले. दक्षिण भारतातील एका मेळाव्यात बोलताना ठामपणे सांगितले , भारताच्या दक्षिण तटावर उभे राहून मी ही भविष्यवाणी करण्याचे साहस करतो की,
“अंधेरा छटेगा सुरज निकलेगा, कमल खिलेगा”.
त्यांच्या या घोषणेने भाजप कार्यकर्ते व समर्थकांना नवसंजीवनी मिळाली.
१९९२ साली देशभरातील कारसेवकांनी अयोध्या गाठत बाबरी प्रकरण घडवले, अर्थात याची एक सुरुवात भाजपचे संस्थापक सदस्य असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्या रामजन्मभूमी रथ यात्रेच्या निमिताने झाली होती. भाजपची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल व समस्त हिंदुत्ववादी संघटना यासाठी आग्रही होत्या.
भारतीय जनमानसावर याचा प्रभाव इतपत वाढला होता की १९९६ च्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश प्राप्त झाले. देशांतील अनेक कॉंग्रेस विरोधी पक्षांना सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार देशात स्थापन करत देशाचे पंतप्रधान बनले. सहकारी काही स्थानिक पक्षांनी ऐनवेळी साथ सोडल्यामुळे हे सरकार काही काळातच कोसळले पण ठरवले तर आपण कॉंग्रेस सारख्या बलाढ्य पक्षाला पाणी पाजू शकतो हा विश्वास भाजप व सहकारी पक्षांच्या मनात दृढ झाला.
१९९७ मध्ये मध्यावधी निवडणूक लागली त्यात भाजपला पुन्हा अधिक जागा मिळाल्या सम विचारी पक्षांना सोबत घेवून अटलजींनी पुन्हा सत्ता स्थापन केली व सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वात भारत सरकारने अनेक गोष्टींना सत्यात उतरवले, परराष्ट्र धोरण, पोखरणची अणुचाचणी, कारगिलचे युद्ध, भारतीय प्रशासनातील बदल यांमुळे त्यांच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तब झाले.
१९९९ मध्ये अटलजी तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली. २००१ चा संसदेवरचा ह*ल्ला त्यांच्याच कार्यकाळात झाला होता, पण त्यांनी ऑपरेशन पराक्रमच्या माध्यमातून याचे चोख उत्तर पाकिस्तानला दिले होते.
काही कारणांनी पुढील निवडणुकांत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही व पुन्हा कॉंग्रेस सरकार आले, अटलजींनी जनतेचा कौल मान्य करत विरोधी बाकांवर बसणे पसंत केले व ते विरोधी पक्ष नेते बनले, त्यांनी ही भूमिकासुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे निभावली.
भारतीय जनता पक्ष असो वा देशाचा एकंदर राजकीय प्रवास असो यात अटलजींचा उल्लेख नाही झाला तरच नवल. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अविवाहित राहून संसारी जीवनाचा त्याग करून आपले काम अविरत सुरु ठेवले. अटलजींना एक प्रामाणिक राजकारणी म्हणून देशभर नावाजले गेले. हिंदुत्ववादी पार्श्वभूमी असतानाही पंतप्रधान झाल्यानंतर अटलजींनी सर्वसमावेशकता दाखवत आपले कर्तव्य बजावले.
आदर्श भारतीय राजकारण्यांविषयी लिहित असताना अनेकजण आजही अटलजींना अव्वल दर्जा देतात. २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप स्वबळावर सत्तेत आली तेव्हाही अनेक पत्रकारांनी याला अटलजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कष्टाचे हे फळ आहे असे सांगितले, २०१८ मध्ये अटलजींना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले.
राजकीय नेता असण्याबरोबरच आपल्यात असलेली कवितेची कला त्यांनी आयुष्यभर जपली व अनेक प्रेरणादायी कवितांची रचना केली. योग्य वयानुसार त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, प्रदीर्घ आजाराजे त्रस्त असलेल्या अटलजींनी १६ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.