अटलजींना भुट्टोची शेरवानी इतकी आवडली की त्यांनी तशीच शेरवानी पाकिस्तानहुन बनवून घेतली

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशात सामंजस्य आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. दोन्ही देशांनी आपसातील प्रश्न सामंजस्याने आणि चर्चेने सोडवावेत यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रयत्न सुरु असतात. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध सुधारावेत यासाठी बरेच प्रयत्न केले. दोन्ही देशातील मैत्री, सलोखा आणि संवाद वाढावा यासाठी त्यांनी लाहोर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. ही बस सेवा सुरु झाल्यानंतर ते स्वतः या बस मधून पाकिस्तानच्या भेटीवर गेले.

पन्नासच्या दशकापासून भारतीय राजकारणात सक्रीय असणाऱ्या वाजपेयींचे व्यक्तिमत्वच असे होते की शत्रूलाही ते आपले वाटतील. २००४सालच्या पाकिस्तान दौऱ्यावर गेले असता पाकिस्तानी शास्त्यांनाही काहीसा असाच अनुभव आला. शांत, मृदू स्वभावाच्या अटलजींनी या दौऱ्यात पाकिस्तानवासीयांची मने जिंकली होती. 

त्यांच्या या पाकिस्तान दौऱ्याबद्दल बोलताना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले होते, “अटलजींनी आपल्या भाषणातून पाकिस्तानी जनतेची मने जिंकली आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाने पाकिस्तानी नागरिक इतके प्रभावित झाले आहेत की, वाजपेयी आता पाकिस्तानातही सहज निवडणूक जिंकतील.”

२००४ च्या या पाकिस्तानी दौऱ्यात अटलजींनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टोंच्या एका खास शेरवानीचा देखील उल्लेख केला होता. १९७० साली जुल्फिकार अली भुट्टो भारत दौऱ्यावर आले होते. तेंव्हा त्यांनी घातलेली शेरवानी आणि त्याच्या बंद गळ्यावरील डिझाईन अटलजींना खूपच आवडली होती. या भेटीत त्यांनी आपल्यालाही तशीच शेरवानी बनवून घ्यायची असल्याची इच्छा बोलून दाखवली.

राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गेलेल्या अटलजींनी अचानकच या शेरवानीचा उल्लेख केल्याने पाकिस्तानी सत्ताधीशही थोडेसे गोंधळले. पण पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री शौकत अजीज यांना वाजपेयींच्या या इच्छेची दखल घेण्याचेही आदेश तत्काळ देण्यात आली.

पाकिस्तानातील फॅशन डिझाईनर जोडपे अदनान आणि हुमा यांना जेंव्हा भारतीय पंतप्रधानांसाठी शेरवानी बनवून देण्याचे सांगण्यात आले तेंव्हा तर त्या दोघांचाही यावर विश्वासच बसला नाही.

“त्यादिवशी आम्हाला सकाळीच परराष्ट्र मंत्री शौकत अजीज साहेबांचा फोन आला. आम्हाला काही शेरवानी घेऊन त्यांनी मंत्रालयात येण्यास सांगितले. आम्हाला सांगण्यात आले की, भारतीय पंतप्रधानांना आमच्या कलेक्शनमधील काही कपडे हवे आहेत. हे ऐकून तर आम्हाला आश्चर्याचा धक्काचा बसला. परंतु जेंव्हा आम्ही मंत्रालयात गेलो आणि तिथे जे झाले ते पाहून तर आम्हाला अजूनच धक्का बसला. अदनान आणि हुमा यांच्या मनात अटलजींच्या या भेटीच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

हे दांपत्य कधी काळी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यासाठी ड्रेस डिझाईन करण्यासाठी प्रसिद्ध होते.

“भारताच्या पंतप्रधानांनी आम्हाला हुबेहूब तसलीच शेरवानी बनवून मागितली जशी शेरवानी जुल्फिकार अली यांनी १९७० च्या भारत दौऱ्या दरम्यान घातली होती. अगदी ३४ वर्षांनीही अटलजींना त्या शेरवानीच्या गळ्यावर कोरलेली डिझाईन कसली होती, हे स्पष्ट आठवत होते. त्यांनी आवर्जून सांगितले की शेरवानीच्या कलरवर त्यांना त्याच प्रकारची डिझाईन हवी असल्याचेही सांगितले.”

हुमा सांगतात, “भारताचे पंतप्रधानांना भेटल्याच्या त्या आठवणी आजही सुखद वाटतात. ते एक मृदू स्वभावाचे सभ्य व्यक्ती होते. सुंदर आणि भडक रंगाच्या शेरवानींची निवड करण्याऐवजी त्यांनी काळ्या रंगाची पण तिला पांढरी कॉलर आणि त्याच्या काठांवर केलेली विशिष्ट डिझाईन, अशीच शेरवानी बनवण्यास सांगितली.”

अटलजींनी त्यांना दोन शेरवानी बनवून देण्यास सांगितले होते. पंरतु पाकिस्तान सरकारने त्यांना गिफ्ट करण्यासाठी म्हणून चार शेरवानी बनवण्याची ऑर्डर दिली. ते भारतात जाण्यासाठी रवाना होण्याआधीच आम्ही त्यांची मापे घेतली होती, असे हुमा सांगतात.

अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. त्यातही ते भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे नेते होते. त्यामुळे पाकिस्तानी राजकारण्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळीच प्रतिमा होती. परंतु जेंव्हा प्रत्यक्षात त्यांची भेट झाली तेंव्हा त्यांना कळून चुकले की अटलजी एक खुल्या मनाचे आणि खुल्या विचारांचे व्यक्ती आहेत. पाकिस्तानचे माजी मंत्री मुशाहिद हुसैन यांच्यावर तर अटलजींच्या व्यक्तिमत्वाची गहिरी छाप पडली. ते म्हणाले होते, “अटलजी तर भारतातील सर्वात मोठे राजकारणी आहेत.”

अटलजी स्वभावाने शांत असले तरी ते एक मजबूत नेते होते. ज्यांच्याकडे एक स्पष्ट आणि दूरदर्शी व्हिजन होते, असेही मुशाहिद म्हणाले होते.

अटलजी १९९९ मध्ये पाकिस्तान भेटीवर गेले होते तेंव्हा त्यांनी मिनार-ए-पाकिस्तानला भेट दिली होती. १९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाली तेंव्हा हा मिनार बांधण्यात आला होता. जो पाकिस्तानच्या निर्मितीची साक्ष देतो. यावर मुशाहिद हुसैन त्यांना म्हणाले देखील, “तुम्ही हे खूप मोठे धाडस करता आहात असे वाटत नाही का?” यावर त्यांचे उत्तर होते, ”हो परंतु मला पाकिस्तानी जनतेच्या मनात विश्वास जागवायचा आहे.”

अटलजींप्रमाणेच पंडित नेहरू देखील पाकिस्तानी शेरवानीचे चाहते होते. पाकिस्तानी शेरवानी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. नेहरू देखील खास डिझाईन केलेली पाकिस्तानी शेरवानी मागवत असत. शिवाय, पाकिस्तानचे कायदे-आझम जिन्ना साहेबही हीच शेरवानी वापरत असत. पाकिस्तानमधील अनेक कलाकार शेरवानीच्या कॉलरची विशिष्ट डिझाईन करण्यासाठी ओळखले जातात.

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध आज पुन्हा एकदा तणावपूर्ण बनले असताना अटलजींच्या या विशेष प्रयत्नांची आणि त्यात त्यांना मिळालेल्या यशाची आठवण आणखी गडद होते. पाकिस्तानला दोनदा भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. त्यांनी पोखरणची अणू चाचणी करून पाकिस्तानला आणि जगाला भारताची शक्ती दाखवून दिली. दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्याने काश्मीर असो की दुसरा कुठलाही मुद्दा असो, भारत आणि पाकिस्तान यांना चर्चेने मार्ग काढल्याशिवाय पर्याय नाही, हेही आपल्या भेटीतून आणि वक्तव्यातून त्यांनी अनेकदा सुचवले.

शांत तरीही खंबीर नेतृत्वाच्या अटलजींनी भारत-पाकिस्तान संबंधात सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेल्या कामाचे आजही तितकेच महत्व आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!