आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
साधारणतः ज्येष्ठ महिना सुरु झाला की आषाढी वारीचे वेध लागतात. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून अनेक संतांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर नगरीत दाखल होतात. गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक वैष्णवजन आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर गाठतात.
आषाढीनंतर महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे कार्तिकी, या दोन एकादशीच्या दरम्यानच्या काळाला चातुर्मास असेही म्हणतात. वारकरी संप्रदाय हा प्रामुख्याने शेतकऱ्यांचा संप्रदाय आहे, त्यामुळे ज्येष्ठाच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर पेरणी आटोपून वारकरी पंढरीची वाट धरतात, तर कोकण आणि आसपासच्या प्रदेशात भातशेती मोठ्या प्रमाणात असल्याने, व भात लावणी ऐन पावसाळ्यात करावयाची असल्याने तिथला समाज कार्तिकी वारीला पंढरपूरमध्ये येतो. पंढरपूर क्षेत्रात आषाढी-कार्तिकीचे सोहळे म्हणजे दसरा-दिवाळीच!
सध्या राज्यभरात आषाढीचा उत्साह आहे. पालखी सोहळे पंढरीच्या वेशीजवळ येऊन पोहोचले आहेत. एखाद्या वारकऱ्याच्या अथवा पंढरपूरेतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने पालखी सोहळे पंढरपुरात दाखल झाले आणि आषाढी एकादशीचा दिवस संपला म्हणजे आषाढी वारीचा सोहळा संपला असे मानले जाते, बहुतांश लोक आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेला आषाढी वारी संपते असे मानतात, कारण त्याच दिवशी अनेक संतांच्या पालख्या माघारी फिरतात.
पण असे नाही. पंढरपूर क्षेत्रात आषाढीचा सोहळा गुरुपौर्णिमेला संपत नाही, आपल्यापैकी बहुतांश जणांना याबद्दल माहिती नसते, पण आज आषाढीच्या निमित्ताने हीच माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
आषाढी सोहळ्याचा श्रीगणेशा – पलंग निघणे
पंढरपूरमध्ये आषाढ महिना सुरु होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. नेहमीप्रमाणे विठ्ठल मंदिरात पहाटे काकड-आरती, त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती, दुपारी नैवेद्य, संध्याकाळी पोशाख, धुपारती, रात्री शेजारती असे नित्योपचार होत असतात. या नित्योपचारांदरम्यान आणि रात्रीच्या वेळी मिळून २४ तासांपैकी सुमारे आठ ते नऊ तास पदस्पर्श दर्शन बंद असते.
आषाढात भाविकांची प्रचंड गर्दी होते, एकादशीच्या सुमारास तर दर्शनासाठी ४८ तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे देवाचे काही नित्योपचार बंद केले जातात, यावेळी विठ्ठलाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढला जातो, यालाच स्थानिक भाषेत पलंग निघणे म्हणतात. या दिवसापासून देवाची निद्रा बंद होते. श्रमपरिहारार्थ देवाच्या मागे लोड, रुक्मिणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो. दुपारचा पोषाख बदल, सायंकाळची धुपारती, रात्रीची शेजारती इत्यादी नित्योपचार बंद करण्यात येतात. फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो. सायंकाळी लिंबूपाणी आणि रात्री दूध-साखरेचा नैवेद्य दाखवतात.
पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाचा पलंग निघत असे. आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो.
पालख्यांचा पंढरपूर प्रवेश
पालख्यांचा पंढरपूर प्रवेश हा वारीचा कळसबिंदु आहे. राज्यातून शेकडो पालखी सोहळे पंढरपुरात दाखल होतात. यामध्ये काही पालखी सोहळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आषाढ शुद्ध षष्ठीच्या सुमारास खान्देशातून येणाऱ्या संत मुक्ताईंचा पालखी सोहळा हा महत्त्वाचा सोहळा आहे.
शुद्ध नवमीला बहुसंख्य संतांच्या पालख्या वाखरी येथे मुक्कामाला येतात. वाखरी पंढरपूरपासून आठ किलोमीटरवर आहे. नवमीला वाखरीत येण्याआधी बाजीरावाची विहीर याठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उभे आणि गोल रिंगण होते, ही रिंगणं पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर मंडळी आवर्जून जातात.
दशमीला पहाटेपासूनच वाखरीवरून पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होते. दशमीच्या दिवशी सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताईंची पालखी आणि संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते. नामदेवरायांचा पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी या ठिकाणांच्या मध्ये असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी पादुका मंदिराजवळ येतो. संत ज्ञानेश्वरांची पालखी तेथे आल्यानंतर पालखी सोहळ्याचे चोपदार येऊन नामदेवरायांना पुढे चालण्याची विनंती करतात. शेवटचे सात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.
पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या सात पालख्यांचा क्रम ठरलेला आहे. यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, त्यापुढे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई आणि संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय असा क्रम असतो.
विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण आणि कापुरारती होते. हे सोहळ्यातले शेवटचे रिंगण. पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते. सर्वात शेवटी असलेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचायला रात्रीचे अकरा वाजतात. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी श्रीमंत शितोळे सरकार स्वतः माऊलींच्या पादुका गळ्यात घेऊन पंढरपुरात प्रवेश करतात. दशमी ते चतुर्दशी पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो.
आषाढी एकादशी
आषाढी एकादशीचा दिवस हा वारीचा मुख्य दिवस. या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते, किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीस दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते. आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येते. ही महापूजा शासनाच्या वतीने, शासनाच्या खर्चाने केली जाते. त्यामुळे याला शासकीय महापूजा असे म्हणतात.
संतांच्या पालख्या नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. नगरप्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा. या मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावाच्या खुणा असलेल्या वेशी होत्या, जसे की महाद्वार वेस. पण पुढे गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने केलेल्या पंढरपूरच्या नगरविकास आराखड्यामध्ये या वेशी काढून टाकण्यात आल्या.
नगर प्रदक्षिणा मार्ग महाद्वार घाट-कालिका मंदिर चौक-काळा मारुती चौक-गोपाळकृष्ण मंदिर-नाथ चौक-तांबड्या मारुती-पुन्हा महाद्वार घाट असा आहे. या मार्गावर कोठूनही प्रदक्षिणेस सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते.
गजानन महाराजांची पालखी पहाटे अडीच वाजता नगरप्रदक्षिणेसाठी निघते. तर, माउलींची पालखी सर्वात शेवटी म्हणजे सकाळी आठच्या सुमारास नगरप्रदक्षिणेस निघते. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर, चंद्रभागा तीरावर नेऊन संतांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते. नगरप्रदक्षिणेच्या वेळी त्या त्या ठिकाणी संबंधित अभंग गायले जातात.
पेशवे काळामध्ये पेशव्यांचे एक सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा सुरू केली. ही रथयात्रा खाजगीवाले वाडा येथून म्हणजे आताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते. या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे. हा रथ भाविक हाताने ओढतात. या रथामध्ये विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेऊन रथ ओढायला सुरुवात करतात. नगरप्रदक्षिणा मार्गावरून फिरून रथ पुन्हा खाजगीवाले वाड्यात येतो. यादिवशी सर्वत्र अखंड भजन-कीर्तन सुरु असते.
काला
आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा हा काल्याचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची सांगता काल्याने होते. वारीची सांगतासुद्धा काल्याने होते. हा काला पंढरपूरजवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो. या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात. अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये लाकडी सभामंडपात होतो.
गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय, दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. मंदिराच्या आवारातच जनाबाईंचे व इतर मंदिरे आहेत. प्रत्येक पालखीसमोर काल्याचे कीर्तन होते. यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूरमध्ये येतात.
विठ्ठल भेट
गेल्या वीसेक वर्षांपासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला आहे. यानुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखीसह मंदिरात नेतात. तेथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात. देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य, भोजन होऊन दुपारनंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात होते.
विठ्ठल नगरप्रदक्षिणा
पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघते. वारीमध्ये स्थानिक भाविकांना दर्शन मिळणे अवघड होते. स्थानिक लोक आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आणि आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे स्थानिकांना दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणेस निघते.
महाद्वार काला
जरी पौर्णिमेला संतांचा काला झाला तरी देवाचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला होतो. याला महाद्वार काला म्हणतात. या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका सात सेवेकऱ्यांपैकी एक सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहेत. या पादुका हरिदास वेशीपाशी हरिदासांच्या ज्या वाड्यामध्ये असतात, त्याला काल्याचा वाडा असे म्हणतात.
महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामध्ये या पादुका मानकरी हरिदास यांच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात. पूर्वी नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते. त्यामुळे आतासुद्धा नामदेवांचे वंशज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात.
काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते. तेथे सभामंडपामध्ये या पादुकांवर हंडी फोडली जाते. नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते. तेथून महाद्वार घाटाने चंद्रभागेवर आणि तेथून कुंभार घाटमार्गे खाजगीवाले वाडा या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात येते. महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली.
प्रक्षाळ पूजा
महाद्वार काल्यानंतर वारीनिमित्त बंद झालेले देवाचे उपचार पुढे वद्य पंचमीच्या आसपास सुरू केले जातात. या पूजेला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात. प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे. वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुणे, मंदिराची स्वच्छता करणे आणि देवाला आलेला शिणवटा घालवणे असे या पूजेचे दोन भाग आहेत. पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागे लावलेला लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मर्दन करतात. पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पतीपासून बनवलेले उटणे लावून स्नान घालतात.
दुपारी दोनच्या सुमारास पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते. देवाचा पलंग पुन्हा शेजघरामध्ये ठेवतात.
या पूजेपासून देवाच्या नित्योपचारांना पुन्हा सुरुवात होते. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते. रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुळस, बडीशेप, लवंग, दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो. दुसर्या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात.
अशा रितीने जवळ जवळ महिनाभर पंढरपुरात आषाढीची लगबग चालू असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.