आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जागतिक स्तरावर पाकिस्तान, पाकिस्तानी उद्योजक आणि राजकीय नेते अनेकदा काही ना काही कारणांनी उपद्रवी म्हणून समोर आले. पाकिस्तान राष्ट्राच्या स्थापनेपासून पाकिस्तान कधीही “राष्ट्र” म्हणून जबाबदारीने वागलेलं नाही. इतकंच काय तर त्यांचा आण्विक कार्यक्रमसुद्धा ‘चोरीचाच’ होता.
याच बेजाबदार पाकिस्तानमधील एक उद्योजक अरिफ नक्वी याने जगातील अनेक मोठ्या उद्योजकांची आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालं आणि दोंन वर्षांपूर्वीच त्याला अटक झाली. सध्या तो जेलमध्ये आहे. अरिफ नक्वीने मायक्रोसॉफ्टचा संस्थापक बिल गेट्सची सुमारे १०० मिलियन अमेरिकी डॉलर्सला फसवणूक केली होती.
एकेकाळी अरिफ नक्वी हा दुबईमधील ‘द अब्राज ग्रुप’ या खाजगी इक्विटी फर्मचा मुख्याधिकारी आणि संस्थापक होता. द अब्राज ग्रुप कंपनी अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक करत आणि त्या रकमेचं व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीची मदत करत. त्याचप्रमाणे बांधकामक्षेत्र आणि ऊर्जाक्षेत्रांतही अब्राज ग्रुपने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.
अरिफ नक्वीच्या मते व्यापारातून मिळालेल्या नफ्यातील बहुतांशी रक्कम ही समाजोपयोगी कामांसाठी वापरली जात असे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रॉसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष बिल गेट्स, गोल्डमन सॅक्सचे माजी सी.इ.ओ. लॉयड ब्लॅन्कफेन यांच्यासह अनेक श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांची नक्वी भेट घेत असत.
पण सायमन क्लार्क आणि विल लाऊच यांनी त्यांच्या “द की मॅन: द ट्रू स्टोरी ऑफ हाऊ द ग्लोबल इलाईट ड्यूपड बाय अ कॅपिटॅलिस्ट फेअरी टेल्स” या पुस्तकात नक्वी हा अतिशय श्रीमंत असलेल्या लोकांना फसवणारा व्यक्ती असल्याचं नमूद केलंय. पुस्तकानुसार, नक्वीने त्याच्या निधीतून ७८० दशलक्ष डॉलर्स काढले, त्यातील ३८५ दशलक्ष डॉलर्स बेहिशोबी आहेत.
आरिफ न्यूयॉर्कमध्ये असताना अब्राज ग्रुपच्या एका कर्मचाऱ्यानी गुंतवणूकदारांना एक निनावी पण सूचनात्मक ई-मेल पाठवला. या इमेलमध्ये अब्राज ग्रुप मध्ये वर्षानुवर्षे चाललेल्या गैरव्यवहाराची कल्पना गुंतवणूकदारांना देण्यात आली होती. आणि हीच इतिहासातील खाजगी इक्विटी फर्मची सगळ्यात मोठी पडझड!
पण एका सामान्य उद्योजकाच्या सांगण्यावरून अनेक हुशार गुंतवणूकदारांनी आपले पैसे इतक्या सहजासहजी कसे गुंतवले असतील? त्याने या उद्योजकांना कसं भुलवलं असेल?
१९६० मध्ये पाकिस्तानातील कराची येथे जन्मलेल्या अरिफ नक्वीने आपलं प्राथमिक शिक्षण एका उच्चवर्गीय शाळेतून पूर्ण केलं आणि त्या नंतर तो लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी बनला. मध्य-पूर्वेच्या अनेक अरब उद्योजक, व्यापारी आणि राजकीय नेत्यांकडून ११८ दशलक्ष डॉलर्स उभारल्यानंतर २००३ साली अरिफ नक्वीने ‘द अब्राज ग्रुपची’ स्थापना केली. गुंतवणुकीच्या माध्यमातून जगातील गरिबी हटवण्याचा या कंपनीचा हेतू असल्याचं त्याने सांगितलं.
अब्राज ग्रुपने भविष्यात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. यांमध्ये भारतातील इ-ग्रोसरी कंपनी बिग बास्केट, तुर्की मधील सर्वांत मोठी लॉजिस्टिक्स कंपनी नेटलॉग तसेच तुर्कीमधील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी हॅप्सिबुरादा आणि अशा अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश होता.
नक्वी दुबईमधील बेव्हर्ली हिल्स ऑफ दुबई येथील आपल्या प्रशस्त हवेलीत चैनीचं आयुष्य जगत होता. त्याच्याकडे स्वतंत्र ‘टेल नम्बर’ असलेलं खाजगी जेट सुद्धा होतं. अनेकदा तो अवाढव्य नौकांमधून समुद्रप्रवास करत अनेक गुंतवणूकदारांची भेट घेत असत.
२००८ मध्ये त्याने कराचीतील स्थानिक इलेक्ट्रीक कंपनी – कराची इलेक्ट्रीक कंपनीवर ताबा मिळवला. त्याने कराचीतील इलेक्ट्रिसिटी विश्वसनीय तर बनवलीच, पण कंपनीलाही मोठा फायदा झाला. पण, याच बरोबर त्याने तब्बल ६००० कर्मचारी कंपनीमधून काढून टाकल्याने दंगली भडकल्या.
२०१० साली उद्योजकतेवरील राष्ट्रपती परिषदेत (प्रेसिडेन्शिअल समिट ऑन आंत्रेप्रुनरशिप) अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांनी अरिफ नक्वीसह २५० मुस्लिम उद्योजकांना बोलावलं होतं, इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जगभरातील तरुणांना आपण “फक्त उद्योजकतेद्वारे” प्रशिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकतो अशा आशयाचं भाषण त्याने या परिषदेत केलं. दोन महिन्यांनंतरच अमेरिकी सरकारने १५० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक अब्राज ग्रुप मध्ये केली.
सायमन क्लार्क आणि विल लाऊच आपल्या पुस्तकात नमूद करतात, “अरिफने अमेरिकेतील विद्यापीठांना आणि लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सला लाखो डॉलर्सचं दान दिलं, या विद्यापीठांनी अरिफच्या नावाने प्राध्यापकपद स्थापन केले, बिल गेट्स सारखं अब्जाधीश परोपकारी बनण्यात पुढचं पाऊल अरिफने उचललं आणि ‘अमन फाउंडेशन’ नावाने संस्था सुरु केली. ही संस्था पाकिस्तानातील शिक्षण आणि आरोग्यसेवांमध्ये सुधारणा करण्याचं काम करत”
पुढे लेखक म्हणतात, “बिल आणि नक्वी बरीच चर्चा करत असत, त्यांच्या सेवाभावी संस्था एकमेकांना सहकार्य करतील तसेच पाकिस्तानमध्ये कुटुंब नियोजनासाठी एकत्र काम करतील असंही ठरलं. बिलला जसा माणूस आपल्या सहकार्यासाठी पाहिजे होता अगदी त्या अपेक्षेप्रमाणेच नक्वी असल्याचं वाटत होतं. श्रीमंत असूनही त्याला गरीब लोकांबद्दल सहानुभूती वाटत असे.”
दवाखाने आणि हॉस्पिटल्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी गेट्स फाउंडेशनने १०० अमेरिकी डॉलर्सचं अनुदान नक्वीला देऊ केलं. या गुंतवणुकीमुळे बाकीच्या गुंतवणूकदारांनीही नक्वीवर असाच विश्वास दाखवला. गेट्स म्हणाला, “ही महत्त्वाची भागीदारी आहे, त्याचप्रमाणे उज्ज्वल भविष्याची खात्री करून देणाऱ्या अद्ययावत गुंतवणूकीचंही हे उदाहरण आहे.”
लेखकांच्या मते, प्रत्यक्षात नक्वीने या रकमेचा गैरवापर आपल्या गुप्त खजिनदार विभागाद्वारे सुरु केला होता, या विभागाची माहिती बहुतांश कर्मचाऱ्यांना नव्हती.
अब्राज कंपनीने जगभरातील करांमध्ये सूट मिळत असलेल्या देशांतील सुमारे तीनशेहून अधिक कंपन्यांचं गुंतागुंतीचं आर्थिक जाळं तयार केलं होतं. अब्राजच्या कर्मचाऱ्याच्या त्या मेल नंतर गेट्स फाऊंडेशनने अब्राज ग्रुपचे जमाखर्च तपासण्यासाठी एका फॉरेन्सिक अकाउंट टीमला कामावर रुजू करवून घेतलं.
ऑक्टोबर २०१८ मध्ये काही लेखकांनी अब्राज ग्रुपच्या गैरव्यवहाराबद्दल आपल्या वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये नमूद केलं.
अंतिमतः नक्वीवरचे आरोप सिद्ध झाले आणि त्याला गुन्हेगारी मार्गाने कंपनी चालवल्याबद्दल २०१९ला लंडन विमानतळावरून अटक करण्यात आली. त्याच्या हस्तांतरणानंतर न्यू यॉर्कच्या न्यायालयात त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला २९१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा मिळाली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.